टॅपिर : स्तनि-वर्गाच्या विषमखुरी गणातील (ज्या प्राण्यांच्या पायांवरील बोटांची अथवा खुरांची संख्या विषम असते अशा प्राण्यांच्या गणातील) टॅपरिडी कुलातील प्राणी. या कुलात टॅपिरस हा एकच वंश असून त्यात चार जाती आहेत : (१) मलायी टॅपिर (टॅपिरस इंडिकस). हा मलाया, ब्रह्मदेश, थायलंड आणि सुमात्रामध्ये आढळतो. (२) ब्रॅझिली टॅपिर (टॅपिरस टेरेस्ट्रिस). हा द. अमेरिकेत आढळतो. (३) पहाडी टॅपिर (टॅपिरस पिंकाक). हा कोलंबिया, एक्वादोर व पेरूतील अँडीज पर्वतात २,१३४–३,६५८ मी. उंचीवर आढळतो. (४) मध्य अमेरिकेतील टॅपिर (टॅपिरस बेर्डाय). हा मध्य अमेरिका, एक्वादोर व कोलंबियात १,८२९ मी. उंचीपर्यंत आढळतो. टॅपिरांत त्यांच्या पूर्वजांची काही आद्य लक्षणे आढळतात.

मलायी टॅपिर (टॅपिरस इंडिकस)

मलायी टॅपिर उष्ण प्रदेशातील दाट अरण्यात पाण्याच्या जवळपास राहतात. हा मजबूत बांध्याचा प्राणी आहे. त्याच्या शरीरावर विखुरलेले राठ केस असतात. डोके आणि धड मिळून त्याची लांबी सु. २०० सेंमी. शेपटी खुंटासारखी, ५–१० सेंमी. लांब पाय आखूड पण मजबूत पुढच्या पायांवर चार बोटे आणि मागच्यांवर तीन उंची सु. ९१ सेंमी. वजन सु. १८० किग्रॅ. मुस्कट पुढे आलेले, निमुळते, वरचा ओठ सोंडेसारखा पुढे आलेला डोळे लहान, नाकपुड्या सोंडेच्या टोकावर डोळे, मान,खांदे आणि पाय काळे खांदे व ढुंगण यांच्या मधला शरीराचा भाग (दोन्ही बाजूंसह) पांढरा असतो. या रंगव्यवस्थेमुळे अरण्यातील अंधुक चंद्रप्रकाशात हा प्राणी दिसत नाही.

हा रात्रिंचर असून झाडाझुडपांचे धुमारे, डहाळ्या व रसाळ पाणवनस्पतींवर उपजीविका करतो. ह्याचे घ्राणेंद्रिय आणि श्रवणेंद्रिय तीक्ष्ण असते, पण दृष्टी अधू असते. हा उत्तम पोहणारा असून आपला बराच वेळ पाण्यात डुंबण्यात किंवा चिखलात लोळण्यात घालवतो.

नर आणि मादी यांचे मैथुन पाण्यातच होते, असे म्हणतात. टॅपिराचा गर्भावधी १३ महिन्यांचा असून मादीला दर खेपेस एक (कधीकधी दोन) पिल्लू होते. पिल्लाचा रंग काळा असून अंगावर आणि पायांवर पिवळे किंवा पांढरे पट्टे व ठिपके असतात. सु. दोन वर्षांनंतर ते नाहीसे होतात.

ब्रॅझिली टॅपिर हा मलायी टॅपिरासारखाच असतो, पण त्याचे सगळे शरीर गडद तपकिरी रंगाचे असते. उंची ९१ सेंमी. आणि लांबी १८३ सेंमी. असते. याचे पाय आखूड आणि त्यांवरील बोटे मलायी टॅपिरांच्या प्रमाणेच असतात. हा रात्रिंचर असून भित्रा आहे. दाट अरण्यातील सखल दलदलीच्या जागी हा राहतो. याच्या जीवनाला पाणी अत्यावश्यक आहे. तो वरचेवर पाणी पितो. हा उत्तम पोहणारा आहे. इतर जातीच्या टॅपिरांप्रमाणेच हा शाकाहारी असून झाडाझुडपांची पाने, डहाळ्या व पाणवनस्पती खातो.

मादीला एकच पिल्लू होते. त्याच्या अंगावर पट्टे आणि ठिपके असतात. उपजल्याबरोबर ते आईबरोबर हिंडूफिरू लागते.

फार प्राचीन काळी टॅपिर चीन, उत्तर आशिया आणि उत्तर अमेरिकेतदेखील होते. तेथील सौम्य आणि उबदार हवामान त्यांना मानवणारे होते. शिवाय आशिया व अमेरिका हे दोन्ही खंड जोडलेले असल्यामुळे एका खंडातील टॅपिर दुसऱ्यात जाऊ शकत पण भूवैज्ञानिक कालगणनेप्रमाणे अलीकडील काळात दोन्ही खंड बेरिंग सामुद्रधुनीमुळे वेगळे झाले व या भागातील हवामानही बदलले. याचा परिणाम असा झाला की, फक्त मलाया आणि मध्य व दक्षिण अमेरिकेतील टॅपिर शिल्लक राहिले व वर उल्लेखिलेल्या सगळ्या प्रदेशांतून ते लु्प्त झाले.

कर्वे, ज. नी.