झॉश्चेंकॉ, म्यिखईल : (? १८९५–२२ जुलै १९५८). प्रख्यात रशियन कथाकार. पल्टाव्हा येथे एका सरदार घराण्यात जन्म. पीटर्झबर्ग विद्यापीठात त्याने एक वर्ष कायद्याचा अभ्यास केला. १९१४ मध्ये तो सैन्यात भरती झाला. १९१७–२० या काळात अनेक व्यवसायांनिमित्त त्याने निरनिराळ्या शहरांत वास्तव्य केले. १९२१ मध्ये तो लेनिनग्राडला गेला व ‘सेरेपिअन ब्रदर्स’ या लेखकसंघटनेचा सदस्य बनला. झॉश्चेंकॉच्या कथांतून समकालीन जीवनाचे औपरोधिक चित्रण आढळते. बाह्यतः कम्युनिस्ट प्रणाली स्वीकारलेल्या, पण त्याविषयी अनभिज्ञ असलेल्या व मूलतः त्यापासून दुरावलेल्या सामान्य अडाणी व्यक्ती त्याच्या उपरोधाचे लक्ष्य बनतात पण त्याबरोबरच सामान्य माणसांबद्दलची गाढ सहानुभूतीही त्याच्या कथांतून प्रकटली आहे. त्याच्या शैलीमध्ये विविध स्तरांवरील भाषेचे वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण दिसून येते. त्याच्या विनोदी शैलीमुळे व आशयातील वास्तवाच्या अंतःप्रवाहामुळे त्याला त्याच्या काळात अमाप लोकप्रियता लाभली. १९३० नंतर सोव्हिएटविरोधी प्रवृत्तीबद्दल त्याच्या लिखाणावर टीका होऊ लागली. नंतर त्याने समाजवादी वास्तवाचे दर्शन घडविणाऱ्या व कम्युनिस्ट नायकांची विधायक चित्रे रंगवणाऱ्या काही दीर्घकथा लिहिल्या पण त्या कलादृष्ट्या अगदीच सामान्य होत्या. १९४३ मध्ये त्याने Pered voskhodom Solntsa (इं. शी. बिफोर सनराइझ) ही आत्मचरित्रपर लेखमालिका Oktyabr या नियतकालिकातून छापण्यास सुरुवात केली पण तिच्यावर बंदी घालण्यात आली. १९४६ मध्ये त्यांच्या ‘द अड्व्हेंचर्स ऑफ एप’ या कथेवर सोव्हिएट नागरिकांची निंदानालस्ती केल्याचा आरोप ठेऊन त्याला सोव्हिएट लेखकांच्या संघटनेतून हद्दपार करण्यात आले. तो त्याच्या वाङ्मयीन कारकीर्दीचा शेवटच होता. लेनिनग्राड येथे त्याचे निधन झाले. सीन्स फ्रॉम द बाथहाउस अँड अदर स्टोरीज ऑफ कम्युनिस्ट रशिया (१९६१) हा त्याच्या कथांचा अनुवादित संग्रह प्रसिद्ध आहे. आधुनिक रशियन साहित्यामध्ये तो एक श्रेष्ठ विनोदी लेखक व एकमेव उपरोधकार मानला जातो.
इनामदार, श्री. दे.