टॉलस्टॉय, अल्यिक्स्येई : (१० जानेवारी १८८३–२३ फेब्रुवारी १९४५). सोव्हिएट लेखक. न्यिकलायेफस्क (सध्याचे पूगचॉफ) येथे एक उमराव घराण्यात जन्म. सेंट पीटर्झबर्ग येथे त्याने अभियांत्रिकीचा अभ्यास केला. पहिल्या महायुद्धात त्याने युद्धवार्ताहर म्हणून काम केले. रशियन क्रांतीनंतर त्याने पॅरिस येथे वास्तव्य केले पण १९२३ साली तो सोव्हिएट रशियात परतला.

द्येत्स्त्वो निकीति (१९२१, इं. भा. निकीताज चाइल्डहूड, १९४५) ही कथा त्याच्या बालपणाच्या अनुभवांवर आधारलेली आहे. खझद्येनिये प मूकाम (१९२०–४१, इं. भा. द रोड टू कॅल्व्हरी, १९४६) ही त्याची त्रिखंडात्मक कादंबरी महत्त्वपूर्ण मानली जाते. राज्यक्रांतीच्या व नंतरच्या यादवी युद्धाच्या काळातील रशियन लोकांचे जीवन तीत त्याने वर्णिले आहे. या कादंबरीच्या पहिल्या खंडातील रशियन बुद्धिवाद्यांच्या जीवनाचे चित्रण फार बोलके आहे. प्योत्र I (१९२९–४५, इं. भा. पीटर द फर्स्ट, १९५६) ही त्याची अपूर्ण ऐतिहासिक कादंबरी. ती रशियाचे यूरोपीकरण झाले, त्या काळावर आधारलेली आहे. या दोन्ही कादंबऱ्‍यांना स्टालिन पारितोषिके लाभली. सोव्हिएट रशियामध्ये त्यास विशेष लोकप्रियता व मान्यता मिळाली. सोव्हिएट मतप्रणालीचे उत्कृष्ट विवरण करणारा लेखक म्हणून सोव्हिएट नेत्यांनी त्याचा गौरव केला. मॉस्को येथे त्याचे निधन झाले.

मेहता, कुमुद