झायलीन : (झायलॉल, डायमिथिल बेंझीन). बेंझीन वलवातील दोन हायड्रोजन अणूंच्या जागी दोन मिथिल गट (–CH3) प्रतिष्ठापित झाले म्हणजे त्यांच्या स्थानानुसार तीन समघटक (तेच व तितकेच अणू रेणूमध्ये असूनही त्यांच्या रचना भिन्न असल्यामुळे वेगळे गुणधर्म असलेले पदार्थ) बनतात. ती ऑर्थो (०)–, मेटा (m) – व पॅरा (p) – झायलीन या नावांनी ओळखली जातात. त्यांच्या मिश्रणाला ‘झायलीन’ ही समुदायवाचक संज्ञा लावतात. रेणुसूत्र C8H10 संरचना सूत्र C6H4(CH3)2.

ऑर्थो-झायलीन मेटा-झायलीन पॅरा-झायलीन

निर्मिती : बिट्युमेनी दगडी कोळशाच्या डांबरापासून, तसेच खनिज तेल रसायनांच्या निर्मितीत पेट्रोलियम नॅप्थ्यापासून उत्प्रेरकांच्या (विक्रियेत भाग न घेता विक्रियेची गती वाढविणाऱ्या पदार्थांच्या) साहाय्याने ते तयार केले जाते.

कोळशाच्या डांबरापासून मिळणाऱ्या झायलिनात ऑर्थो- झायलीन ५० ते ६० टक्के असून उरलेल्या भागांत मेटा व पॅरा हे समघटक समप्रमाणात असतात. त्यांच्या उकळबिंदूंत फारसा फरक नसल्यामुळे भागशः ऊर्ध्वपातनाने [⟶ ऊर्ध्वपातन] ती वेगळी करता येत नाहीत. म्हणून त्यांच्या विक्रियाशीलतेतील भेदाचा उपयोग विलगीकरणासाठी करतात. एका विलगीकरण प्रक्रियेत संहत (प्रमाण जास्त असलेल्या) सल्फ्यूरिक अम्लाने २०से. तापमानास मिश्रणाचे सल्फॉनीकरण (एका किंवा अधिक सल्फॉनिक अम्लगटांचा समावेश करणे) घडवितात. या प्रक्रियेत मुख्यतः ऑर्थो- व मेटा-झायलिनांवरच विक्रिया होते व त्यांची सल्फॉनिक अम्ले बनतात, पॅरा समघटक तसाच राहतो. ओलियमाने त्याचे सल्फॉनीकरण करून विरल अम्लातून स्फटिकीकरण केले म्हणजे पॅराचे सल्फॉनिक अम्ल बाहेर पडते, ते काढून घेतात. उरलेल्या सल्फॉनिक अम्लांचे सोडियम लवणात रूपांतर करून त्यांचे स्फटिकीकरण करतात. त्यामुळे प्रथम ऑर्थो समघटकाचे सोडियम सल्फोनेट बाहेर पडते. ते काढून घेतले म्हणजे केवळ मेटाचे सोडियम सल्फोनेट शिल्लक राहते. वेगवेगळ्या सल्फॉनिक अम्लांचे वा सोडियम लवणांचे हायड्रोक्लोरिक अम्लांने १९०–१९५ से. तापमानास जलीय विच्छेदन (पाण्याशी विक्रिया होऊन रेणूचे तुकडे होण्याची क्रिया) केले म्हणजे ते ते झायलीन मिळते.

गुणधर्म व उपयोग : तिन्ही समघटक वर्णहीन व तीव्र वासाचे असून ते पाण्यात अविद्राव्य परंतु कार्बनी विद्रावकांत (विरघळविणाऱ्या पदार्थांत) विद्राव्य आहेत. ते बाष्पनशील असून सु. २४ से. तापमानास पेट घेतात. ऑर्थो-झायलिनाचा उकळबिंदू १४४·२ से., मेटाचा १३९·१ से. व पॅराचा १३८·४ से. आहे. त्यांचे वितळबिंदू अनुक्रमे –२५·२ से., –४७·९ से. आणि १३·३ से. आहेत. नायट्रिक अम्लाने आंशिक ऑक्सिडीकरण [⟶ ऑक्सिडीभवन]. होऊन त्यापासून अनुरूप टोल्यूइक अम्ले बनतात. मेटा-नायट्रोटोल्यूइक अम्ल बनविण्यास ही विक्रिया वापरतात. संपूर्ण ऑक्सिडीकरणाने ऑर्थो-, मेटा-, व पॅरा-झायलीन यांपासून अनुक्रमे थॅलिक, आयसोप्थॅलिक व टेरेप्थॅलिक अम्ले बनतात. टेरेप्थॅलिक अम्ल किंवा डायमिथिल टेरेप्थॅलेट ही रसायने व्यापारी प्रमाणावर बनविण्यासाठी ही प्रक्रिया वापरता येते. या रसायनांचा उपयोग पॉलिएस्टर (टेरिलीन इ. तंतुद्रव्ये ) नामक बहुवारिके (एकापेक्षा अधिक रेणू एकत्र येऊन मोठा जटिल रेणू तयार झालेले पदार्थ) बनविण्यासाठी होतो.

व्हॅनेडियम ऑक्साइड हा उत्प्रेरक वापरून ऑर्थो-झायलिनाचे ऑक्सिडीकरण केले असता थॅलिक ॲनहायड्राइडाची व्यापारी प्रमाणावर निर्मिती करता येते.

झायलिनांचा विद्रावक म्हणूनही उपयोग होतो. एका तऱ्हेच्या कृत्रिम कस्तुरीच्या निर्मितीत मेटा-झायलीन उपयोगी पडते. दहा हजार भाग हवेत दोन भाग इतके अल्प झायलीन मिसळलेले असले, तरी अशा हवेत दीर्घकाल श्वसन करण्याने विषबाधा संभवते.

देशपांडे, ज. र.