नेर्न्स्ट, व्हाल्टर हेर्मान : (२५ जून१८६४–१८ नोव्हेंबर १९४१). जर्मन रसायनशास्त्रज्ञ आधुनिक भौतिकीय रसायनशास्त्राचे एक संस्थापक. त्यांनी विद्युत् रसायनशास्त्र, विद्रावांविषयीचा सिद्धांत, ऊष्मागतिकी (उष्णता आणि यांत्रिक व इतर रूपांतील ऊर्जा यांच्यातील संबंधांचे गणितीय विवरण करणारे शास्त्र), घन अवस्था व प्रकाशरसायनशास्त्र (प्रारणाचा म्हणजे तरंगरूपी ऊर्जेच्या रासायनिक परिणामांचा व रासायनिक बदलाद्वारे सरळ प्रारणनिर्मिती होण्याचा अभ्यास करणारे शास्त्र) या विषयांत महत्त्वपूर्ण संशोधन केले. त्यांचा जन्म ब्रिसेन (प्रशिया) येथे व शिक्षण झुरिक, ग्रात्स व वुट्‌सबर्ग येथील विद्यापीठांत झाले. १८८७ मध्ये लाइपसिक विद्यापीठात ते व्हिल्हेल्म ओस्टव्हाल्ट यांचे साहाय्यक झाले. जे. व्हांट हॉफ, स्वांटे अऱ्हेनियस आणि व्हिल्हेल्म ओस्टव्हाल्ट यांनी भौतिकीय रसायनशास्त्राचा पाया घातला. ह्यांच्या प्रोत्साहनाने नेर्न्स्ट यांनी त्या शाखेत संशोधन सुरू केले. १८९० मध्ये त्यांची गटिंगेन विद्यापीठाच्या भौतिकी विभागात नेमणूक झाली. १९०५ मध्ये ते बर्लिन विद्यापीठाच्या भौतिक-रसायनशास्त्रीय प्रयोगशाळेत काम करू लागले. १९२४ साली ते बर्लिन येथील इन्स्टि‌ट्यूट फॉर एक्स्‌परिमेंटल फिजिक्स या संस्थेचे संचालक झाले व १९३३ मध्ये निवृत्त होईपर्यंत ते तेथेच काम करीत होते.

विद्राव-दाबामुळे (विद्रावामध्ये जाण्याच्या द्रव्याच्या प्रवृत्तीमुळे) विद्युत् अग्रातील आयन (विद्युत् भारित अणू वा रेणू) विद्रावात जातात, तर विरघळलेल्या आयनांच्या तर्षण दाबामुळे [→ तर्षण] त्याला विरोध होतो, हे गृहीत धरून नेर्न्स्ट यांनी गॅल्व्हानिक विद्युत् घटाचा सिद्धांत १८८९ मध्ये शोधून काढला. याच वर्षी त्यांनी विद्राव्य पदार्थांसंबंधीचे समीकरण शोधून काढले. या समीकरणावरून संतृप्त (विरघळण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त विद्राव्य पदार्थ असलेल्या) विद्रावातून घन पदार्थाचा अवक्षेप (साका) कोणत्या परिस्थितीत तयार होतो, हे कळून येते. १९०६ मध्ये त्यांनी उष्णता सिद्धांत [ऊष्मागतिकीचा तिसरा नियम → ऊष्मागतिकी] प्रसिद्ध केला. याबद्दलच त्यांना १९२० सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. नेर्न्स्ट व त्यांचे विद्यार्थी यांनी भौतिकीय रसानयशास्त्रात बरेच प्रयोग केले. उच्च तापमानाला बाष्प घनतेचे मापन, नीच तापमानाला घन पदार्थाच्या विशिष्ट उष्णतेचे (एकक द्रव्यमानाच्या पदार्थाचे तापमान एक अंशाने वाढविण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेचे) मापन इत्यादींवर त्यांनी संशोधन केले. प्रकाशरसायनशास्त्राचा अभ्यास करून त्यांनी आणवीय शृंखला विक्रियेसंबंधीचा (सुरुवातीच्या विक्रियेकरिता लागणाऱ्या पदार्थांपैकी एक पदार्थ विक्रियेतच प्रत्येक वेळी तयार होऊन मालिकेच्या स्वरूपात चालू राहणाऱ्या विक्रियेसंबंधीचा) सिद्धांत शोधून काढला. या सिद्धांतामुळे प्रकाशरसायनशास्त्रज्ञांना ज्या विक्रिया पूर्वी गोंधळात टाकीत असत त्यांपैकी पुष्कळ विक्रियांचे स्पष्टीकण देता येऊ लागले. विज्ञानाचा उपयोग उद्योगधंद्यात कसा करून घेता येईल, याकडे त्यांचा विशेष कल होता. सैद्धांतिक कार्यशिवाय त्यांनी बरेच शोधही लावले. तथापि त्यांच्या या शोधांना विस्तृत प्रमाणावर मान्यता मिळू शकली नाही. वर्णपटविज्ञानात प्रकाशाचा उद्‌गम म्हणून वापरण्यात येणारा व ज्यातील प्रदीप्त होणाऱ्या तंतूत विशिष्ट विरल धातूंची ऑक्साईडे वापरलेली असतात अशा विद्युत् दिव्याचा शोध त्यांनी लावला व हा दिवा आता त्यांच्याच नावाने ओळखण्यात येतो. त्यांनी १८९३ मध्ये सैद्धांतिक रसायनशास्त्रावरील एक पुस्तक प्रसिद्ध केले. याशिवाय त्यांनी खास विषयांवरील अनेक लेख लिहिले. शेवटी शेवटी ते मुख्यतः खगोल भौतिकीत रस घेऊ लागले. या क्षेत्राशीही त्यांच्या उष्णता सिद्धांताचा महत्त्वाचा संबंध आहे. ते मुसकाऊ येथे मृत्यू पावले.

पहा : उष्णता उष्मागतिकी प्रकाशरसायनशास्त्र.

जमदाडे, ज. वि.