ज्येष्ठा : सत्तावीस भारतीय नक्षत्रांपैकी अठरावे, अनुराधाच्या पूर्वेचे व वृश्चिक राशीत समाविष्ट असलेले नक्षत्र. यात पाश्चात्त्य वृश्चिक (स्कॉर्पिओ) तारका समूहातील आल्फा, टाउ व सिग्मा हे तारे असून हे श्रवणाप्रमाणे व मृगातील बाणाप्रमाणे त्रिकांड आहे. यातील आल्फा हा मुख्य तारा असून त्याच्या लाल रंगावरून त्याला अँटारेझ (प्रतिमंगळ) असे नाव पडले आहे. होरा १६ ता. २६·४ मि. क्रांती २६° १९′ [→ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] कोनीय व्यास ०·०४ से. सूर्यापासून अंतर सु. ४०० प्रकाशवर्षे दृश्य प्रत ०·९२ निरपेक्ष प्रत-४·५ [→प्रत] गांगेय रेखांश ३२०° अशी याची प्राथमिक माहिती आहे. हा तारा २० ऑगस्टच्या सुमारास रात्री ८ वाजता मध्यमंडलावर खमध्याच्या बराच दक्षिणेस आकाशगंगेत दिसतो. याचा मध्य सूर्याच्या ठिकाणी मानला, तर मंगळाची सबंध कक्षा ताऱ्यात सबंध मावेल इतका तो (सूर्याच्या २८५ पट) मोठा आहे. याची घनता सूर्याच्या घनतेच्या एक दशलक्षांशाहूनही कमी आहे. पण हा सूर्याच्या १,५०० पट तेजस्वी असून सूर्याच्या ३,५०० पट प्रकाश उत्सर्जित करतो. हा महत्तारा M1 या वर्णपटीय प्रकारचा [→वर्णपटविज्ञान] असून त्याला B5 प्रकारचा ६·८ प्रतीचा ३·२ से. कोनीय अंतरावर एक सहचर आहे. याचे तापमान ३,०००° के. असावे.  

वृत्र या ज्येष्ठ असुराला या नक्षत्रात मारावयाचे देवांनी ठरविल्यामुळे याला ज्येष्ठघ्नी म्हणत ज्येष्ठा हे त्याचेच संक्षिप्त रूप आहे. या नक्षत्राची देवता इंद्र व आकृती कुंडल आहे. या नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाची जननशांती करावी लागते.                         

ठाकूर, अ. ना.