वर्णांक : दोन वेगळ्या तरंगलांब्यांच्या प्रकाशांत ताऱ्यांच्या प्रतींचे [⟶ प्रत] मापन करून लघुतरंगलांबीच्या प्रकाशातील प्रतीमधून दीर्घतरंगलांबीच्या प्रकाशातील प्रत उणे करून येणाऱ्या मूल्यास ढोबळमानाने वर्णांक असे म्हणतात. वर्णांकावरून ताऱ्यांच्या रंगाचे मापन होते. यासाठी दोन प्रतींपैकी एक निळ्या प्रकाशातील व दुसरी पिवळ्या प्रकाशातील प्रत घेण्यात येते. छायाचित्रण फिल्म किंवा पट्टीवरील पायस हे निळ्या व जांभळ्या रंगांच्या प्रकाशास संवेदनाक्षम असते व डोळा हा दृश्य प्रकाशातील पिवळ्या व हिरव्या रंगांस विशेष संवेदनाक्षम असतो. या कारणास्तव वर्णांक काढण्यास छायाचित्रण पट्टीवरून ठरवलेल्या ताऱ्याच्या प्रतीतून साध्या डोळ्याची ठरवलेली प्रत उणे करतात, म्हणून छायाचित्रीय प्रत – दृश्य प्रत = वर्णांक, असे समीकरण मिळते.

डोळ्यांनी ठरवावयाची प्रत ही आता पिवळ्या प्रकाशास संवेदनाक्षम असणाऱ्या छायाचित्रण पट्टीवरूनही काढता येते. छायाचित्रणावरून ठरविलेल्या प्रतीस निळी प्रत व दृश्य प्रतीला पिवळी प्रत असेही म्हटले जाते, म्हणून निळी प्रत – पिवळी प्रत = वर्णांक, असेही समीकरण मिळते.

वर्णांकावरून रंगाप्रमाणेच ताऱ्यांचे  तापमान सूचित होते आणि ढोबळमानाने ताऱ्यांच्या उत्सर्जित ऊर्जेचे वर्णपटात कसे वितरण झालेले असते ते समजते. उष्ण निळ्या वर्णांच्या ताऱ्यांचा  वर्णांक ऋण मूल्याचा असतो कारण त्यांचे लघुतरंगलांबीचे प्रारण (तरंगरूपी ऊर्जा) प्रभावी असून छायाचित्रीय प्रत दृश्य प्रकाशीय प्रतीपेक्षा कमी असते. याउलट थंड ताऱ्यांचे  वर्णांक घन मूल्याचे असतात कारण दृश्य प्रकाशीय प्रत छायाचित्रीय प्रतीपेक्षा कमी असते. अतिशय दूरच्या ताऱ्यांचा  प्रकाश आंतरतारकीय माध्यमातून येताना त्यातील काही प्रकाशाचे प्रकीर्णन (विखुरला जाण्याची क्रिया) व शोषण होऊन छायाचित्रीय प्रतीत वाढ होते व त्यामुळे त्यांच्या वर्णांकात वाढ झालेली असते. अशा ताऱ्यांच्या वर्गवारीच्या वर्णांकाच्या मध्यममानापेक्षा ताऱ्यांच्या वर्णांकात जितकी वाढ झालेली आढळते त्या वाढीव मूल्यास वर्णांकाधिक्य असे म्हणतात. वर्णांकाधिक्यावरून दूरच्या ताऱ्याच्या प्रकाशातील किती भागाचे आंतरतारकीय माध्यमात शोषण झाले आहे, ते काढता येते.

व्याधासारख्या निळसर पांढऱ्या रंगाच्या ताऱ्यांचा  वर्णांक शून्य असतो. KO प्रकारच्या ताऱ्यांचा वर्णांक एक असतो [⟶ तारा]. ज्येष्ठा ताऱ्याचा वर्णांक १.७३ आहे. वर्णांकावरून ताऱ्याचे तापमान ठरविण्याचे सूत्र पुढीलप्रमाणे आहे.

त =

७२००

किंवा व =

७२००

-०.६४

व + ०.६४

 (व = वर्णांक त = निरपेक्ष तापमान).

मराठे, स. चिं.