जिनसेन आचार्य :(सु. नववे शतक). दिगंबर जैनांमधील एक प्रख्यात आचार्य. त्यांच्या लौकिक जीवनाबाबत निश्चित माहिती मिळत नाही तथापि त्यांच्या पारमार्थिक जीवनाबाबतची थोडीफार माहिती त्यांचा शिष्य गुणभद्र याने लिहिलेल्या उत्तरपुराण  ह्या ग्रंथाच्या प्रशस्तीवरून मिळते. जिनसेनांचे गुरू वीरसेन यांनी षट्‌खंडागमावर धवला  नावाची टीका संस्कृत-प्राकृतमिश्रित ७२,००० श्लोकांत लिहिली आणि कषायप्राभृतावर जयधवला  नावाची टीका लिहावयास घेऊन तिचे २०,००० श्लोक रचिल्यावर त्यांचे निधन झाले. वीरसेनांची ही अपूर्ण राहिलेली जय धवला  टीका जिनसेन आचार्यांनी तीत स्वरचित ४०,००० श्लोकांची भर घालून पूर्ण केली. जिनसेन आचार्यांनी पार्श्वाभ्युदय   नावाचे एक खंडकाव्यही लिहिले आहे. यात मंदाक्रांता वृत्तात रचलेले एकूण ३३४ श्लोक आहेत. या काव्याचे वैशिष्ट्य असे, की या काव्याचा विषय पार्श्वनाथचरित्र असला, तरी कालिदासाच्या मेघदूतातील सर्व चरण यात त्यांनी  समस्यापूरण पद्धतीने समाविष्ट केलेले आहेत. जिनसेनांनी वर्धमानपुराणही लिहिले पण आज तरी ते उपलब्ध नाही. जिनसेनांचा विशेष प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे त्यांनी लिहावयास घेतलेले महापुराण  होय. ह्या महापुराणाच्या ‘आदिपुराणा’तील ४२ पर्वे व ४३ व्या पर्वातील फक्त तीन श्लोक म्हणजे एकूण १०,३८० श्लोक एवढाच भाग त्यांच्या हातून लिहून झाला आणि त्यांचे निधन झाले. जैनांच्या त्रेसष्ट शलाकापुरुषांची चरित्रे वर्णन करणे, हा महापुराणातील नियोजित विषय होता. जिनसेनांचे अपूर्ण राहिलेले महापुराण  पुढे जिनसेनांचे शिष्य गुणभद्र यांनी पूर्ण केले. गुणभद्रांनी आपल्या गुरूंचे अपूर्ण राहिलेले आदिपुराण  तर पूर्ण केलेच, पण उत्तरपुराणही लिहून महापुराण  रचण्याचे कार्य सिद्धीस नेले. जिनसेनांचे आदिपुराण हे केवळ पुराणच नाही, तर ते एक उच्च दर्जाचे महाकाव्यही आहे.

संदर्भ : १. जैन, जगदीशचंद्र, प्राकृत साहित्य का इतिहास, वाराणसी, १९६१.

  २. प्रेमी, नाथूराम, जैन साहित्य और इतिहास, मुंबई, १९५६.

पाटील, भ. दे.