किवी : पक्षिवर्गातील ॲप्टेरिजिफॉर्मिस या आदिम (आद्य) गणाच्या ॲप्टेरिजिडी कुलातला हा पक्षी असून शहामृग, एमू इ. पक्ष्यांशी याचे साम्य आहे. या पक्ष्यांच्या उरोस्थीवर (छातीच्या हाडावर) कणा जवळजवळ नसतोच आणि पंखांची वाढ पूर्णपणे खुंटलेली असल्यामुळे त्यांना उडता येत नाही.
हा पक्षी फक्त न्यूझीलंड येथे आढळत असून तेथे त्याच्या तीन जाती आहेत. यांपैकी विपुल आढळणाऱ्या जातीचे शास्त्रीय नाव ॲप्टेरिक्स ऑस्ट्रॅलिस आहे. दाट आणि दमट अरण्यात राहणारा हा पक्षी रात्रिंचर आहे. झाडांच्या बुंध्याजवळच्या ढोलीत अथवा बिळात तो दिवसा लपून बसतो आणि भक्ष्य शोधण्याकरिता रात्री बाहेर पडतो.
आकाराने किवी पाळीव कोंबडीपेक्षा थोडा मोठा असतो. मादी नरापेक्षा थोडी मोठी असते. पिसारा केसांसारख्या पिसांचा बनलेला असून ती कायम विसकटलेली असतात. पिसाऱ्याचा रंग उदी असतो; शेपूट नसते; प्रत्येक पंखाच्या टोकावर एक शृंगी नखर (कायटिनयुक्त नखी) असतो; चोच लांब, बारीक आणि लवचिक असते; तिच्या टोकावर श्वसनरंध्रे असतात; डोळे बारीक असतात; कानाचे छिद्र मोठे असते; याची दृष्टी जरी मंद असली, तरी श्रवणेंदिय आणि घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असते. चोच आणि चेहऱ्यावरील राठ केस स्पर्शेंद्रियाचे कार्य करतात. पाय आखूड पण मजबूत असून बोटांवरील नखर तीक्ष्ण असतात. मान पुढच्या बाजूला लांबवून तो फार झपाट्याने धावू शकतो. नराचा आवाज बारीक आणि चिरका व मादीचा घोगरा असतो.
गांडुळे, किडे, झाडांखाली पडलेली फळे हे यांचे भक्ष्य होय. आपली लांब चोच मऊ जमिनीत किंवा कुजणाऱ्या पालापाचोळ्यात खुपसून तो भक्ष्य शोधीत असतो.
किवीची मादी झाडांच्या मुळांखालच्या पोकळ जागेत किंवा एखाद्या दरडीतील बिळात एक किंवा दोन अंडी घालते. या पक्ष्याच्या आकाराच्या मानाने त्याची अंडी फार मोठी असतात. प्रत्येक अंडे सु. १३५ × ८५ मिमी. मापाचे असून रंग पांढरा असतो; त्याचे सरासरी वजन ४५० ग्रॅ. असते. अंडी घातल्यानंतर मादी इतकी क्षीण होते की, अंडी उबविण्याचे काम नरालाच करावे लागते. ७५–७७ दिवसांनंतर अंड्यांतून पिल्ले बाहेर पडतात. पहिले सहा दिवस त्यांना काहीच खाऊ घालण्यात येत नाही. यानंतर घरट्यातून बाहेर पडल्यावर नराच्या मदतीने ती आपले भक्ष्य मिळवू लागतात.
हे पक्षी हल्ली दुर्मिळ आहेत, पण त्यांच्या तीन जातींपैकी एकही लुप्त होण्याच्या मार्गावर नाही ही समाधानाची गोष्ट आहे.
चित्रसंदर्भ : https://www.britannica.com/animal/kiwi-bird
कर्वे, ज. नी.