टार्सिअर : नरवानर गणाच्या (प्रायमेट्स) टार्सीइडी कुलातील टार्सियस  वंशाचा प्राणी. टार्सीइडी कुलात टार्सियस हा एकच वंश असून या वंशाचे प्राणी सुमात्रा व त्याच्या लगतची बेटे, बोर्निओ, साव्हू, पालाऊ, सेलेबीझ आणि फिलिपीन्समधील मिंदानाओ, लेइट वगैरे बेटांत आढळतात. त्यांच्या टार्सियस सिरिक्टा, टार्सियस स्पेक्ट्रम आणि टार्सियस बँकॅनस या तीन जाती शास्त्रज्ञांनी मान्य केलेल्या आहेत. टार्सिअर झुडुपांच्या रानात राहतात.

टार्सिअर (टार्सियस सिरिक्टा)

डोक्यासहित याच्या शरीराची लांबी ८·५–१६ सेंमी. असून शेपूट १३·५–२७ सेंमी. लांब असते. प्रौढ प्राण्याचे वजन ८०–१५० ग्रॅ. असते. केस कुरळे व रेशमासारखे मऊ असतात. शरीराच्या काही भागांवर ते विरळ असतात. पाठीकडचा रंग पिवळसर किंवा भुरकट तपकिरी रंगापासून तो गडद तपकिरी रंगापर्यंत कोणताही असतो खालची बाजू पिवळसर, भुरकट किंवा काळपट निळसर रंगाची असते. शेपटीवर मुळीच केस नसले, तरी तिच्या टोकावर थोडे आखूड केस असतात. डोळे हे टार्सिअरचे एक महत्त्वाचे लक्षण आहे ते खूप मोठे असून नेत्रगोलाचा व्यास जवळजवळ १६ मिमी. असतो. डोके वाटोळे, मुस्कट विशेष पुढे न आलेले आणि मान आखूड असते. कान पातळ असून त्यांवर बहुतेक केस नसतात. नाकाच्या भागावर आखूड केस असतात, परंतु नाकपुड्यांभोवती केस नसलेली त्वचेची एक लहान पट्टी असते. पुढचे पाय (हात) आखूड असून मागचे पुष्कळच लांब असतात. मागच्या पायांचे घोटे बरेच लांबट झालेले असतात. या लक्षणावरूनच या प्राण्याला ‘टार्सिअर’ हे नाव मिळाले आहे. बोटे लांब असून त्यांच्या टोकांशी लहान, वाटोळ्या व मऊ गाद्या असतात. हातांच्या आणि पायांच्या पंजांच्या तळव्यांवरही मऊ गाद्या असतात. त्यांच्यामुळे हा प्राणी कोणत्याही पृष्ठभागावर पकड घेऊ शकतो. हाताचा आंगठा वळवून बोटांच्या समोर आणता येत नाही, पण पायांच्या आंगठ्यांची चांगली वाढ झालेली असून ते प्रशस्तपणे इतर बोटांच्या समोर आणता येतात. मागच्या पायांवरील दुसरे आणि तिसरे बोट सोडून बाकीच्या सर्व बोटांवर चपटी नखे असतात, पण पायांवरील दुसऱ्‍या आणि तिसऱ्‍या बोटांवर नखरांसारखी नखे असून त्यांचा उपयोग शरीर साफसूफ ठेवण्याकरिता व खाजविण्याकरिता करण्यात येतो. तोंडात एकंदर ३४ दात असतात. वरचे कृंतक दात मोठे व टोकदार आणि खालचे वर वळलेले असतात. वरचे सुळे सापेक्षतेने लहान असतात.

टार्सिअर मुख्यत्वेकरून वृक्षवासी असून रात्रिंचर आहेत. सबंध दिवस ते दाट झाडाझुडपातील एखाद्या झाडाच्या उभ्या फांदीवर किंवा क्वचित त्याच्या ढोलीत झोपून काढतात. उभ्या फांदीला कवटाळून झोपताना ते आपली शेपटी तिला घट्ट चिकटवून तिचा आधार घेतात. विश्रांती घेत असताना त्यांना त्रास दिल्यास ते वर किंवा खाली जातात व शत्रूकडे तोंड वळवून दात विचकतात. मान सगळ्या बाजूंना खूप वळविता येत असल्यामुळे ते सगळीकडे पाहू शकतात. टार्सिअरांना उत्तम डोंबारी म्हणता येईल कारण झाडाझुडपांवर ते अनेक प्रकारच्या कसरती करतात. कित्येक मीटर अंतरावर ते सहज उडी घेतात. उडी मारताना शेपूट मागे लोंबत असते. एखाद्या सपाट जागेवर, शेपटीची पाठीवर कमान करून, ते बेडकाप्रमाणे उड्या मारतात, पण चारही पायांवर चालताना शेपूट मागे लोंबत असते. जमिनीवरील त्यांची उडी १–२ मी. लांब व ६० सेंमी. उंच असते. जागेपणी हा प्राणी सारखे कान हालवीत असतो. पुष्कळदा तो कान दुमडतो किंवा गुंडाळतो.

टार्सिअर एकएकटे किंवा जोडीने असतात वा तीन-चार प्राण्यांचे गट असतात. हे मुख्यतः किडे खाणारे प्राणी आहेत, पण पाळलेले प्राणी सरडे किंवा चिंगाट्यांसारखे क्रस्टेशियन (कवचधारी) प्राणी मोठ्या खुषीने खातात. भक्ष्याच्या हालचाली हा प्राणी लक्षपूर्वक न्याहाळतो व ते आपल्या आटोक्यात आले आहे असे दिसताच एकदम उडी घेऊन त्याला दोन्ही हातांनी पकडून खातो. तो ताठ बसतो व भक्ष्य चावून चावून खातो. हा लप् लप् आवाज करून जिभेने पाणी पितो.

प्रजोत्पादनाच्या ठरावीक काळ नसतो. चीं चीं आवाज करीत नर मादीचा पाठलाग करतो किंवा नर व मादी एकमेकांना कुरवाळतात विशेषकरून मादी नराला कुरवाळते. गर्भावधीची काही माहिती नाही. मादीला दर खेपेस एकच पिल्लू होते व त्याची चांगली वाढ झालेली असते. त्याच्या अंगावर दाट फर असून डोळे उघडलेले असतात. त्याला झाडावर चढता येते आणि सपाट जागेवर ते लहान उड्या मारू शकते. त्याचे वजन सु. २०–२५ ग्रॅ. असते. पिल्लू बहुधा आईच्या पोटाला बिलगलेले असते किंवा कधीकधी ती त्याला तोंडात धरून आपल्याबरोबर नेते. टार्सिअर माणसाळतात.

टार्सीइडी कुलातील टार्सिअरांचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) आढळलेले नाहीत पण नरवानर गणातील ते अतिप्राचीन प्राणी असावेत, असे अनुमान आहे.

यार्दी, ह. व्यं.