किरगीझिया : सोव्हिएट संघराज्याच्या पंधरा राज्यांपैकी मध्य आशियातील एक राज्य. क्षेत्रफळ १,९८,५०० चौ. किमी., लोकसंख्या ३१,००,००० (१९७२) राज्याच्या वायव्येस व उत्तरेस कझाकस्तान, पूर्वेकडे व आग्नेयीकडे चीन, दक्षिणेकडे व नैर्ऋत्येकडे ताजिकिस्तान आणि पश्चिमेकडे उझबेकिस्तान संघराज्य असून फ्रुंझ (लोकसंख्या ४,५२,०००) ही राज्याची राजधानी आहे.

भूवर्णन : हा भाग डोंगराळ असून पुष्कळश्या प्रदेशाची उंची समुद्रसपाटीपासून १,६०० मी.च्या वर आहे. या प्रदेशात तिएनशान पर्वतरांगांच्या दक्षिणेकडील भागाचा समावेश होतो. ह्या पर्वतरांगात रशिया व चीन यांच्या सरहद्दीवर असलेल्या, पोबेडा (७,४३७ मी.) व खानतेंग्री (७,१९९ मी.) या शिखरांचा समावेश होतो. या शिखरांपासून पुढे पश्चिमेकडे गेलेली डोंगरांची रांग कुंघाई-आला-तौ पश्चिमेकडे किरगीज पर्वतरांगेत गेलेली आहे नैर्ऋत्येकडे गेलेली कोलशाल-तौ ही रशिया व चीन यांमधील सरहद्द होय. पुवेंकडील उंच पठारी प्रदेशात तितिकीच्या खालोखाल जगातील सर्वांत उंचावरील व ७०२ मी. खोल असलेल्या इसिक्कूल या सरोवराचा समावेश होतो. हा पठारी प्रदेश पूर्व-पश्चिम पसरलेला असून त्याची रुंदी २०० किमी. आहे व उंची समुद्र सपाटीपासून सर्वसाधारणपणे ३,०४८ मी. वर आहे. या प्रदेशातून वाहणाऱ्या मुख्य नद्यांत चू व नरिन यांचा समावेश होतो. चू नदी प्रथम उत्तरेस व नंतर ईशान्येस वळून किरगीझिया व कझाकस्तान यांच्या सरहद्दीवरून वाहते. नरिन नदी फरगाना खोऱ्यातून पुढे सिरदर्याला मिळते. पश्चिम किरगीझियाचा प्रदेश पूर्वेकडील प्रदेशाच्या मानाने कमी उंच आहे. फरगाना खोरे येथूनच सुरू होते. नैर्ऋत्येकडून कारादर्याचा उगम होतो. हिलाच पुढे सिरदर्या म्हणतात. येथील हवामान उंचीप्रमाणे बदलत असते. उत्तरेकडे व पश्चिमेकडील डोंगरउतारावर बाष्पयुक्त वारे येतात पण त्या ठिकाणी सूर्यप्रकाश कमी मिळतो, त्यामुळे ह्या उतारावर विशिष्ट वनस्पतींची वाढ मोठ्या प्रमाणावर आढळते. त्याचप्रमाणे उंचीबरोबर पर्जन्यमानही बदलते. ३०४८ मी.वर पर्जन्य हिमस्वरूपात आढळतो. जानेवारीतील सरासरी तपमान गोठणबिंदूखाली असते जुलैतील तापमान मात्र १८0 से. ते २५0 से. आढळते. येथे मुख्यत्वेकरून आल्पीय व उपाल्पीय कुरणे आढळून येतात. दऱ्यांत व उत्तर उतारांवर सूचिपर्णी वृक्षांची अरण्ये आढळूून येतात. यांंत मुख्यत्वेकरून फर, स्प्रूस, मॅपल, ॲश, ॲस्पेन हे वृक्ष आढळून येतात. काही दऱ्यांत जंगली अक्रोड, जर्दाळू, पिस्ते इत्यादींची झाडे उगवतात. राज्यात प्राणिजीवन विरळ असले, तरी पक्षी विपुल आढळतात.

किरगीझियातील मेंढपाळी

इतिहास व राज्यव्यवस्था : किरगीझ लोक तुर्की गटात मोडतात. बाराव्या शतकापर्यंत हे लोक बैकल सरोवर व येनिसे नदीच्या दरम्यान असलेल्या स्टेपच्या गवताळ प्रदेशात गुरांचे कळप पाळून उपजीविका करीत होते. तेराव्या शतकात चंगीझखानाने या प्रदेशावर हल्ला केल्यानंतर हे लोक नैर्ऋत्येकडे वळले व तिएनशान आणि पामीर येथील उंच पठारी प्रदेशात राहू लागले. मंगोलियन लोकांनी हिरवळीच्या प्रदेशांवर हल्ले करून तेथील मुख्य शहरे काबीज केली. त्यानंतर त्यांनी सबंध तुर्कस्तान आपल्या वर्चस्वाखाली आणला व स्वतःचे राज्य स्थापन केले. हे राज्य जवळजवळ तीन शतके टिकले. अठराव्या शतकाच्या सुरुवातीस किरगीझ लोकांना काल्मुक लोकांशी लढावे लागले. काल्मुक लोकांतील कोकंदच्या खानाने किरगीझ लोकांवर वर्चस्व स्थापण्याचा प्रयत्न केला. पण किरगीझ लोकांनी आपले स्वातंत्र्य टिकवून धरले. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास मात्र ज्यावेळेस रशियाने तुर्कस्तान घेतला यावेळेस परिस्थिती बदलली. १ नोव्हेंबर १८६० मध्ये पीकिंग येथे झालेल्या तहात चीन व रशिया यांच्यातील सरहद्द ठरवली गेली. पहिल्या महायुध्दापूर्वी या भागातील उत्तरेकडे ६१ व दक्षिणेकडे ५० रशियन वसाहती होत्या. रशियन लोकांविरूद्ध किरगीझ लोकांनी १८९८ मध्ये पहिला उठाव केला पण तो मोडण्यात आला.  त्यानंतर १९१६ मध्ये दुसरा उठाव झाला पण या उठावात किरगीझ लोकांची फार नुकसानी झाली. १९१७ मध्ये रशियात क्रांती झाल्यावर किरगीझांवर थोडा काळ कोणतीही राजवट अस्तित्वात नव्हती. १९२० पासून सखल प्रदेश सोडला, तर बाकी ठिकाणी रशियाविरूद्ध झालेल्या गनिमी युध्दात किरगीझ लोकांनी भाग घेतला. सोव्हिएट तुर्कस्तानचा भाग असलेला किरगीझीया १४ ऑक्टोबर १९२४ रोजी सोव्हिएट संघराज्याचा एक ओब्लास्ट व १९२६ मध्ये स्वायत्त राज्य म्हणून ओळखला जाऊ लागला. ५ डिसेंबर १९३६ रोजी आजचे किरगीझीया राज्य अस्तित्वात आले. इतर राज्याप्रमाणेच तेथील शासनव्यवस्था असून त्याचे इसिक्कूल, नरिन व ऑश असे तीन विभाग आहेत. त्याची ३२ ग्रामीण जिल्ह्यात विभागणी केली आहे. राज्यात १५ शहरे आणि ३५ शहर विभाग आहेत. सुप्रिम सोव्हिएटवर १९७१ च्या निवडणुकीत ३३९ सदस्य निवडून आले असून त्यांपैकी १२० स्त्रिया आहेत व २३१ कम्युनिस्ट आहेत.

आर्थिक स्थिती : गुरे पाळण्याचा व्यवसाय किरगीझियात मोठ्या प्रमाणावर केला जातो. येथीले घोडे आकारमानाने लहान पण ताकदवान असतात. १९७२ मध्ये राज्यात ९⋅१२ लक्ष गुरे, २⋅४४ लक्ष डुकरे व ९⋅५ लक्ष शेळ्या-मेंढ्या होत्या. याकची मांसासाठी आणि दुधासाठी पैदास करतात. नेहमीची गुरे ज्या उंचीवर चरण्यास जाऊ शकत नाहीत, तेथे याक चरतात. संकरित याक वजनाने दुप्पट व दुप्पट दुध देणारे असतात. जानेवारी १९७२ रोजी येथे २३६ सामुदायिक शेते व १०९ राज्य शेते होती. तसेच ४५,२०० ट्रॅक्टर, ३,५०० धान्य कापणीमळणी यंत्रे व १,६०० कापूस वेचणी यंत्रे होती. बहुतेक सर्व शेतांस ‌वीजपुरवठा आहे. १९७१ मध्ये ८,७१,००० हे. क्षेत्र ओलीताखाली होते. किरगीझियातील शेती बहुतांशी यांत्रिक पद्धतीने केली जाते. राज्याला पुरेल इतका गहू येथे होतो. त्या‌शिवाय घासचारा, बटाटे, तांदूळ, वाख व तत्सम तंतू देणारी कनॅफ व केंदिर, शुगरबीट, तंबाखू, ही येथील मुख्य पिके होत. याच्याशिवाय औषधोपयोगी वनस्पतींची लागवडही केली जाते. द्राक्षाचे मळे, फळबागा, पालेभाज्या, रेशीम उत्पादन, मधमाशापालन हे इतर उद्योगधंदे शेतीचाच भाग असून राज्यांत त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. किरगीझियात जवळजवळ ५०० च्या वर मोठे अत्याधुनिक कारखाने आहेत. त्यात साखरशुद्धीकरण, कातडी कमावणे, कापूस व लोकर स्वच्छ करणे, आटा, अन्नपदार्थ, धातुकाम, यंत्रे, तंबाखू, लाकूडसामान, अभियांत्रिकी, कापड, खनिज तेले व खाणकाम यांचा समावेश होतो. दक्षिणेकडे कोळसा, फरगाना खोऱ्यात तेल, आला तौ पर्वताच्या उतारावर पारा व अँटिमनी, नरिन नदीखोऱ्यात टंगस्टन व मॉलिब्डेनम मिळते. याशिवाय राज्यात युरेनियमचाही साठा आहे. जलविद्युत् केंद्रे तिएनशानच्या मध्यभागात, चू खोऱ्यात, ऑश भागातल्या कापूस पिकविणाऱ्या जिल्ह्यात व इसिककूल सरोवराजवळ बांधली जात आहेत. १९७१ मध्ये एकूण वीज निर्मिती ३८७.७ किवॉ. तास होती. राज्यात एकूण लोहमार्गाची लांबी ३७० किमी. आहे. अतिशय डोंगराळ प्रदेश असल्याने बरेचसे दळणवळण सडकांवरून चालते. १९७१ साली एकूण रस्त्यांची लांबी १९,६०० किमी. होती. फ्रुंझ-ऑश रस्त्यावर २,९२७ मी. उंचीवर तिएनशानमधून बोगदा खणण्यात येत आहे. अंतर्गत जलमार्गांची लांबी ६०० किमी होती. फ्रुंझ येथे मोठा विमानतळ आहे.

लोक व समाजजीवन : १९२६ मध्ये राज्यात ६६⋅४% किरगीझ लोक होते. १९७२ मध्ये राज्यात ४४% किरगीझ, २९% रशियन, ४% युक्रेनियन, ११⋅३% उझबेक व इतर होते. १९७१ मध्ये राज्यात ८⋅१६ लक्ष कामगार होते आणि ७,२०० कामगार प्रशिक्षित विशेषज्ञ होते. ऋतूंप्रमाणे डोंगराळ भागात गुरचराईसाठी येणारे व एरव्ही सखल भागात शेती करण्यास जाणारे किरगीझ अद्याप येथे आढळतात. गुरांचे व घोड्यांचे कळप बाळगून भटके जीवन जगणारे, युर्ट या कातडी तंबूत राहणारे, घोड्याचे दूध व रक्त यांपासून कुमिस हे पेय प्रिय असणारे ही किरगीझ लोकांची सुपरिचित प्रतिमा पुसट होत जाऊन, आधुनिक पशुपालन, यांत्रिक शेती, खाणी व कारखाने यांचे स्थिर जीवन जगणारे, अशी त्यांची प्रतिमा आता सुप्रतिष्ठित होत आहे. १९४० च्या सप्टेंबरमध्ये रशियन भाषेवर आधारलेली नवीन मुळाक्षरे येथील शाळांत शिकविण्यात येऊ लागली. राज्यात १९७१-७२ मध्ये, १,८१० प्राथमिक व माध्यमिक शाळांत ७⋅९९ लक्ष विद्यार्थी शिकत होते. ८५३ पूर्व प्राथमिक शाळांत ९३,००० मुले होती. याशिवाय येथे ९ उच्च शिकणसंस्थांतून ४८,९०० विद्यार्थी, तसेच कला व संगीत शाळा असून १९५१ मध्ये येथे विद्यापीठ स्थापन झाले आहे. १९५४ मध्ये येथे शास्त्र अकादमीची स्थापना करण्यात आली.


१९७१ मध्ये ६५ संशोधन संस्थांपैकी १८ मध्ये १,२३२ शास्त्रज्ञ होते. १९७० साली एकूण अस्तित्वात असलेल्या ९० वर्तमानपत्रांचा खप ८,८८,००० होता पैकी ५,६२,००० खपाची ५० वर्तमानपत्रे किरगीझ भाषेत होती. १९७१ साली या राज्यात एकूण ६,६०० डॉक्टर होते आणि दवाखान्यांत ३३,५०० खाटांची सोय होती.

फ्रुंझ हे राजधानीचे शहर असून ऑश हे महत्त्वाचे दळणवळण-केंद्र व रेशीमकेंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. किझिल किया येथे कोळशाच्या खाणी असून इसिक्कूल काठचे पर्झेव्हाल्स्क हे बीअर व मद्य यांचे उत्पादनकेंद्र आहे. टोकमॅक शहरी मोटारदुरुस्ती व धागा बनविण्याचे कारखाने आहेत. जेटी-ओगुझ व जलालाबाद ही उत्तम हवा खाण्याची ठिकाणे असून, तेथील औषधी पाण्याच्या झऱ्यांमुळे ती लोकप्रिय आहेत. किरगीझ लोकांचे जीवन, त्यांच्या कला, यांबरोबरच चीनला लागून असलेले राज्य म्हणून किरगीझियास महत्त्व आहे.

वर्तक, स. ह.