दाभोळ : रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील एक महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या ५,४०२ (१९७१). हे दापोलीच्या दक्षिणेस सु. २५ किमी. वर समुद्रकिनाऱ्यापासून ३·२ किमी. आत वाशिष्ठी नदीच्या उजव्या काठावर वसलेले आहे. दाभ्य जंगल किंवा दाभिलेश्वर या नावांवरून दाभोळ हे नाव पडले असावे. पूर्वी ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या ठिकाणाचा चौदा ते सोळाव्या शतकात तांबड्या समुद्रकिनाऱ्यावरील बंदराशी मोठ्या प्रमाणावर व्यापार चालत होता. १३१२ मध्ये मलिक काफूरने जी ठिकाणे उद्‌ध्वस्त केली, त्यांतील दाभोळ हे एक होते. हे यूसुफ आदिलशाहाच्या वेळी विजापूर राज्यातील महत्त्वाचे ठिकाण होते. १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी हे गाव जिंकून हे आरमारी केंद्र केले आणि मुलकी खात्यात दाभोळ हा सुभा केला. बंदरातील तीन दीपगृहांपैकी पोलकेश्वर पॉइंटच्या दीपगृहातून २४ किमी. पर्यंत प्रकाश पडतो. येथे ‘सार्सानिक’ शैलीची मशीद व इ. स. ५५०–७८ मध्ये बांधलेले चंडिकेचे देवालय आहे. आग्नेयीस १८५ किमी. असलेले कराड हे याचे जवळचे रेल्वेस्थानक असून हे दापोलीशी सडकेने तर मुंबईशी जलमार्गाने जोडलेले आहे. येथून मुख्यतः सुपारीची निर्यात होत असून येथील कापड विणण्याचा उद्योग महत्त्वाचा आहे. येथे लिमोनाइटचे साठे असल्याचे आढळून आले आहे. गावात प्राथमिक व माध्यमिक शाळा, प्राथमिक आरोग्यकेंद्र वगैरे सोयी आहेत.

सावंत, प्र.रा. चौधरी, वसंत

Close Menu
Skip to content