किंगलेक, अलेक्झांडर विल्यम : (५ ऑगस्ट १८०९ — २ जानेवारी १८९१). इंग्रज प्रवासवर्णनकार व चरित्रकार. जन्म टाँटन येथे. शिक्षण ईटन आणि केंब्रिज येथे १८३७ मध्ये तो बॅरिस्टर झाला. ओथेन (१८४४) हे त्याचे पहिलेच प्रवासवृत्त अतिशय लोकप्रिय झाले. पूर्वेकडील प्रदेशांत घोड्यावरून केलेल्या प्रवासाचे जिवंत व वेधक चित्रण त्यात आढळते. इंग्रज सेनापती लॉर्ड रॅगलन ह्याच्या पत्नीच्या आग्रहावरून त्याने क्रिमीयन युद्धाचा लॉर्ड रॅगलनच्या मृत्यूपर्यंतचा अष्टखंडात्मक इतिहास लिहिला (१८६३—८७). स्वत:चे अनुभव आणि लेडी रॅगलनने पुरविलेले कागदपत्र ह्यांच्या आधारे तो लिहिला आहे. युद्धविषयक तांत्रिक ज्ञानाच्या दृष्टीने तसेच एक वाड‌्.मयगुणसंपन्न कृती म्हणून हा इतिहास मोलाचा असला, तरी त्यात लॉर्ड रॅगलनबद्दल पक्षपाती भूमिका घेऊन त्याचे समर्थन करण्यात आले आहे, अशी टिका झालेली आहे. लंडन येथे तो निवर्तला.

देशपांडे, मु. गो.