कॉर्सिका : पश्चिम भूमध्य समुद्रातील फ्रान्सचे बेट. क्षेत्रफळ ८,७२२ चौ. किमी. लोकसंख्या २,१८,५०० (१९७२ अंदाज). हे बेट फ्रान्सपासून १६८ किमी. आग्नेयीस व इटलीपासून ८० किमी. पश्चिमेस असून बोनिफाचो ही ११ किमी. रुंद सामुद्रधुनी या बेटास दक्षिणेकडील इटलीच्या सार्डिनिया बेटापासून वेगळी करते. झाडाच्या पानाच्या आकाराचे हे बेट १८२ किमी. लांब व ८३ किमी. रुंद असून पश्चिमेकडील व नैर्ऋत्येकडील एकूण बेटाचा ६०% भाग स्फटिकमय, हॉर्नब्लेंड, ग्रॅनाइट खडकांचा आणि ईशान्येकडील केप कॉर्स हा भाग वलीकरण झालेल्या शिस्ट खडकांचा बनलेला आहे. पश्चिमेकडील पर्वतप्रदेशात ४० शिखरे, १,९८० मी.हून जास्त उंच असून सर्वोच्च शिखर मॉंटे सिंटो २,७१० मी. आहे. टिरिनियन समुद्राच्या बाजूची पूर्व किनारपट्टी सलग असून त्या बाजूसच ताविन्यानो नदीच्या मुखाशी अलिरीआ मैदान आहे. पश्चिम किनारा हा तीव्र उतार व समांतर डोंगरगंगा असलेला आणि दंतुर आहे. बहुतेक सर्व नद्या लहान असून त्यांच्या मुखाशी लहान त्रिभुजप्रदेश आढळतात. गोलो व ताविन्यानो ह्या प्रमुख नद्या होत. येथील सर्वसाधारण हवामान भूमध्यसामुद्रिक असून प्रामुख्याने हिवाळ्यात पाऊस पडतो. अंतर्भागी पर्वतप्रदेशात अल्पाइन प्रकारचे हवामान दिसून येते व काही शिखरे तर हिमाच्छादित असतात. कॉर्सिकाचा २५% प्रदेश जंगलव्याप्त आहे. डोंगरउतारावर पूर्वी दाट झाडी असल्याने गुन्हेगार तेथे छपून रहात. सदाहरित ओक, बुचाचे ओक, चेस्टनट, अक्रोड, बीच, पाइन, माकी, सिस्ट्स्, मर्टल, रोझमेरी, लव्हेंडर, जूनिपर इ. वृक्षप्रकार येथे आढळतात. प्राण्यांत रानमेंढी, रानडुक्कर, हरिण, मार्मोट, बॅजर, कोल्हे, ससे व रानमांजरे असून पक्षी विपुल आहेत. उंच प्रदेशात शेळ्यामेंढ्यांची पैदास केली जाते. पश्चिम किनाऱ्याजवळील समुद्रात ट्यूना, लॉब्स्टर, अँकोव्ही आणि प्रवाळ मिळतात. अँटिमनी, आर्सेनिक ॲस्बेस्टॉस ही येथील महत्त्वाची खनिजे आहेत. तसेच ग्रॅनाइट व संगमरवर सापडतो. ऑलिव्ह, धान्य, भाज्या, लिंबू जातीची फळे व केपभागात द्राक्षे होतात. त्यांपासून मद्य बनवितात. केवळ २% भूमी शेतीखाली असून २५% चराऊ कुरणे आहेत. दऱ्यांतील डोंगरउतारांवर खाचरांतून जुन्या पद्धतीने शेती केली जाते. कॉर्सिकास ३०% अन्न आयात करावे लागते. आयात्चो ही कॉर्सिकाची राजधानी असून गुइतेरा व ओरेझा येथे खनिज पाण्याचे झरे आढळतात. सार्टेनी, कॉर्ती, बास्तीया (केप कॉर्सवरील सर्वांत मोठे शहर), काल्व्ही ही येथील महत्त्वाची शहरे होत. एकूण ४,००० किमी. लांबीचे रस्ते आणि २६४ किमी. लांबीची रेल्वे असून पॉर्तो व्हेक्यो, बास्तीया व काल्व्ही शहरे रेल्वेने जोडलेली आहेत. लोक प्रामुख्याने रोमन कॅथलिक पंथाचे आहेत. शासनाची भाषा फ्रेंच असली, तरीही व्यवहारात मात्र फ्रेंच आणि इटालियन अपभ्रंश चालू आहे.

कॉर्सिका : एक दृश्य

नवाश्मयुगापर्यंत कॉर्सिकावर मानववस्ती नसावी. इतिहासातील पहिला उल्लेख इ. स. पू. ५६४ सालचा आहे. फिनिशियन व नंतर कार्थेजियन लोकांचे तेथे वर्चस्व होते. रोमन लोकांनी इ. स. पू. २५९ मध्येच बेट जिंकले. ४५० पर्यंत रोमन लोकांचे, नंतर व्हॅंडॉलांचे व नंतर अरबांचे वर्चस्व येथे होते. १०७० मध्ये पोपने हे बेट पीसाला दिले. १३४७—१७६८ ते जेनोआच्या सत्तेखाली होते. १७६८ साली जेनोआने ते फ्रान्सला विकले. १७६९ मध्ये नेपोलियन बोनापार्टचा जन्म या बेटावरील आयात्चो येथे झाला. दुसऱ्या महायुद्धात जर्मनी, इटली यांनी ही बेटे व्यापली होती. मार्च ते मे पर्यंत हौशी प्रवासी मोठ्या प्रमाणावर येथे येतात.

डिसूझा, आ. रे.