काळा समुद्र : (यूक्साइन समुद्र रशियन-चॉर्नॉयमॉर्य प्राचीन पॉंटस किंवा पॉंटसयुक्सायनस). यूरोप व आशिया यांमधील भूवेष्टित समुद्र. क्षेत्रफळ ४,६६,२०० चौ. किमी. जास्तीत जास्त पूर्व-पश्चिम रुंदी ५२८ किमी. दक्षिणोत्तर लांबी १,००८ किमी. आणि खोली २,२१० मी. काळ्या समुद्राच्या पूर्वेस व उत्तरेस रशिया, पश्चिमेस रुमानिया व बल्गेरिया आणि नैर्ऋत्येस व दक्षिणेस तुर्कस्तान आहे. ईशान्येकडे काळ्या समुद्राचाच फाटा समजला जाणारा ॲझॉव्ह समुद्र असून तो काळ्या समुद्राशी ४० किमी. लांबीच्या केर्च सामुद्रधुनीने जोडला आहे. काळ्या समुद्राचे पाणी नैर्ऋत्येकडून ३२ किमी. लांबीच्या बॉस्पोरस सामुद्रधुनीमार्गे मार्मारा समुद्रात व तेथून ४८ किमी. लांबीच्या दार्दानेल्स सामुद्रधुनीमार्गे इजीअन या भूमध्य समुद्राच्या फाट्याला मिळते. काळा समुद्र उत्तरेकडे सु. ४५ ते १५० मी. खोल असून दक्षिणेकडे तो १,५२५ मी. पर्यंत खोल होत जातो. काळ्या समुद्राचा दक्षिणेकडील आशिया मायनरचा किनारा आणि ईशान्येकडील व पूर्वेकडील कॉकेशसचा किनारा खडकाळ, डोंगरकड्यांनी युक्त आहे, तर उत्तर व वायव्येकडील किनारपट्ट्या सपाट, वालुकामय व तुटक आहेत. तेथे नद्यांच्या मुखांशी गाळ व वालुकामय दांडे आडवे आल्याने त्या भागात असंख्य दलदली निर्माण झाल्या आहेत. काळ्या समुद्राला मिळणाऱ्या प्रमुख नद्या म्हणजे डॅन्यूब, नीस्तर, बग, नीपर, ऱ्यिऑन, चोरूख, किझिलइर्माक व साकार्या या होत. डॉन व कूबान नद्या ॲझॉव्हला मिळतात. या सर्व नद्यांचे पाणी काळ्या समुद्राला मिळाल्याने काळ्या समुद्राच्या पृष्ठभागाची क्षारता १७-१८% आहे. तथापि काळ्या समुद्रातील १९८ मीटरच्या खालील पाण्यात हायड्रोजन सल्फाइडचे प्रमाण जास्त असून त्यात जलचर आढळत नाहीत. वाऱ्यांमुळे पृष्ठभागावरील प्रवाह घड्याळकाटेविरुद्ध दिशेने वाहतात पृष्ठभागावरील ताजे पाणी भूमध्य समुद्राकडे जाते व त्या जागी भूमध्य समुद्रातील खारे पाणी तळभागाकडून येते. पृष्ठभागाजवळ व विशेषत: उत्तरेकडील उथळ भागात हेरिंग, मॅकॅरल, पाइक, पर्च, ब्रीम आणि स्टर्जन या प्रकारची विपुल मासळी मिळते. ओडेसा, निकोलायेव्ह, खेरसॉन, सेव्हॅस्टोपोल (क्रिमियातील रशियाचा नाविक तळ), नोव्होरोसिस्क, पॉटी आणि बाटुमी ही रशियाची त्रेबिझोंड, गिरेसून, सामसून व झांगूल्डाक ही तुर्कस्तानची बुर्गास, स्टालिन ही बल्गेरियाची तसेच कॉस्टॉंट्सा हे रूमानियाचे अशी काळ्या समुद्रावरी बंदरे महत्त्वाची आहेत. क्रिमिया किनाऱ्यावरील याल्टा आणि पश्चिम कॉकेशेसजवळील सोची ही प्रसिद्ध हवा खाण्याची ठिकाणे होत. धान्य, लाकूड, पेट्रोलियम, सिमेंट व मॅंगेनीज या काळ्या समुद्रावरील महत्त्वाच्या व्यापारवस्तू होत.
काळ्या समुद्राच्या परिसरात ग्रीकांनी इ. स. पू. आठव्या-सातव्या शतकांत वसाहती केल्याचा इतिहास आहे. इ. स. ३३० मध्ये कॉन्स्टॅंटिनोपल (सध्याचे इस्तंबूल)ची स्थापना झाल्यानंतर व बायझंटिन साम्राज्याच्या उदयानंतर काळ्या समुद्राला फारच महत्त्व आले परंतु १४५३ मध्ये कॉन्स्टॅंटिनोपल तुर्कांकडे गेल्यापासून काळ्या समुद्राचे महत्त्व कमी झाले. उत्तरेस अथवा पूर्वेकडे रशियाला वर्षभर बर्फमुक्त बंदर नसल्याने सतराव्या शतकात पीटर द ग्रेटचे लक्ष काळ्या समुद्राकडे वळले. तेव्हापासून रशियाने आपले काळ्या समुद्रावरील वर्चस्व खूपच वाढविले आहे.
शाह, र. रू.
“