फ्रँकफर्ट : अमेरिकेच्या केंटकी राज्याची राजधानी व फ्रँक्लिन काउंटीचे मुख्य ठिकाणी. लोकसंख्या २१,९०२ (१९७०). हे केंटकी नदीच्या दोन्ही तीरांवर व लूइसव्हिलच्या पूर्वेस सु. ८० किमी. अंतरावर वसले आहे. हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या प्रख्यात ‘ब्लू ग्रास’ प्रदेशात हे शहर मोडते.

अन्नधान्याची बाजारपेठ व व्यापारी केंद्र म्हणून फ्रँकफर्ट प्रसिद्ध असून याच्या आसमंतात चुनखडीच्या भरपूर खाणी आहेत. तंबाखू, मका, गवतचारा यांचे उत्पादन मोठे असून येथे नैसर्गिक वायू, जलविद्युत् भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. शहरात इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फर्निचर, बूर्‍बाँ व्हिस्की, खडीसाखर, पादत्राणे, तयार कपडे यांसारखे विविध उद्योगधंदे चालतात. शहरापासून केंटकी नदी सु. ६५ किमी.पर्यंत जलवाहतुकीस सुलभ असल्याने तिचा मोठा उपयोग होतो. चाऱ्याच्या मुबलकतेमुळे गुरे-घोडे इत्यादींची पैदास मोठ्या प्रमाणावर होते.

वसाहतकार स्टीफन फ्रँक व त्याचे सहकारी यांची केंटकी नदीउतारावर (फोर्ड) इंडियनांशी झालेल्या चकमकीत कत्तल करण्यात आली (१७८०). ‘फ्रँकफर्ट’ हे नाव ‘फ्रँक्स फोर्ड’ या शब्दांचा अपभ्रंश आहे. जनरल जेम्स विल्किन्सन याने १७८६ मध्ये हे शहर वसविले. १७९२ मध्ये ते राजधानीचे शहर झाले. ते दोन वेळा अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. शहरात जुन्या वास्तू जतन केलेल्या असून त्यांपैकी ‘लिबर्टी हॉल’ (स्था. १७९६), राज्य शस्‍त्रागार व केंटकी ऐतिहासिक संग्रहालय तसेच ‘ऑर्‍लँदो ब्राऊन हाऊस’ (स्था. १८३५) ही प्रसिद्ध आहेत. स्टेट कॅपिटॉलच्या (राज्य विधान सभागृहाच्या-१९१०) इमारतीचा घुमट कंदिलाच्या आकाराचा असून त्याची उंची ६५ मी. आहे. या इमारतीच्या हिरवळीवर एक पुष्पघड्याळ असून त्याचा मिनिटकाटा व तासकाटा अनक्रमे २४० किग्रॅ. व १९० किग्रॅ. वजनाचा आहे.

केंटकी राज्याचा संस्थापक डॅन्येल बून (१७३४-१८२०) आणि इतर सुप्रसिद्ध केंटकी नागरिकांचे दफन येथील भूमीतच केलेले आहे. बेडन-पॉवेलच्या अनुमतीने येथे १९०९ मध्ये पहिला अमेरिकन बालमेळावा भरविण्यात आला होता. येथे अनेक शैक्षणिक सुविधा असून मंदबुद्धी मुलांसाठीही एक विद्यालय आहे. केंटकी राज्य विद्यापीठ येथेच आहे.

गद्रे, वि. रा. कापडी, सुलभा