कॅपिबारा : कृंतक (कूरतडून खाणाऱ्या प्राण्यांच्या) गणाच्या हायड्रोकीरिडी कुलातला सस्तन प्राणी. शास्त्रीय नाव हायड्रोकीरस कॅपिबारा. हा दक्षिण अमेरिकेत पनामापासून यूरग्वायपर्यंत आढळतो. सरोवरे नद्या, दलदल इत्यादींच्या भोवतालच्या दाट झाडी मध्ये तो राहतो. कॅपिबारा गिनीपिगसारखा दिसत असला तरी त्याच्यापेक्षा फार मोठा असतो शरीर मजबूत आणि अवजड डोके मोठे, डोक्यासकट शरीराची लांबी १–१⋅५ मी. उंची ५० सेंमी. पर्यंत शेपूट अगदीच आखूड शरीरावरील केस लांब, खरखरीत ते अतिशय विरळ असल्यामुळे कातडी स्पष्ट दिसते पाठीकडचा रंग तांबूस तपकिरी आणि खालचा पिवळसर तपकिरी वरचा ओठ दुभागलेला कान आखूड, डोळे लहान व पाय आखूड पुढल्या पायांवर चार बोटे आणि मागच्यांवर तीन असून ती अंशतः पातळ कातडीने जोडलेली नखे खुरांसारखी कृंतकांपैकी हाच सर्वांत मोठा प्राणी होय.
जेथे शत्रूपासून धोका असतो अशा ठिकाणी तो रात्री बाहेर पडतो. त्याचा पाठलाग केला तर तो पाण्यात शिरून लपतो. तो शाकाहारी असून पाणवनस्पती व गवत खातो. स्वभावाने तो गरीब असतो.
मादीची वर्षातून एकदाच वीण होऊन तिला दोन–आठ पिल्ले होतात. ती बरेच दिवस आईच्याबरोबर असतात. कॅपिबारा आठ–दहा वर्षे जगतो.
भट,नलिनी
“