कॅन्यन : भिंतीसारख्या उभ्या कड्यांच्या बाजू असलेली नदीची खोल निदरी. ही बहुधा रूक्ष, पठारी प्रदेशात आढळते. नदी आपले पात्र खोल खोल कोरीत नेते, तेव्हा पात्राच्या बाजूचे खडक कठीण असतील तर ते उभे कापले जातात. प्रदेशाच्या रुक्षपणामुळे उपनद्या नसतात आणि इतर क्षरणकारकांच्या मानाने नदीचे कार्य अधिक वेगाने चालते. अमेरिकेतील येलोस्टोन, स्नेक, कोलंबिया यांच्या कॅन्यन व कोलोरॅडोची ‘ग्रॅंड कॅन्यन’ या जगप्रसिद्ध आहेत. कॅन्यनच्या भिंतींचे आडव्या थरांचे खडक, त्यांत सापडणारे जीवाश्म, भूपृष्ठाचे उत्थान व निमज्जन यांचे पुरावे, काही कॅन्यनमधील प्राचीन मानववस्तीच्या गुहा व त्यांतील भित्तिचित्रे हे शास्त्रज्ञांचे अभ्यासविषय आहेत. महाबळेश्वरच्या ईशान्येस कृष्णेच्या उगमप्रवाहांनी डेक्कन ट्रॅपच्या बॅसाल्टी लाव्हाच्या आडव्या थरांत कोरलेल्या सु. ७०० मी. खोल कॅन्यन प्रेक्षणीय आहेत. हिमालयात सिंधूने आणि हिंदुकुशमध्ये ऑक्ससने खोल कॅन्यन कोरल्या आहेत.
समुद्रतळावरही कॅन्यन आढळतात. गंगा, हडसन, काँगो इ. मोठ्या नद्यांच्या मुखांपासून आत समुद्रतळावर मोठमोठ्या कॅन्यन आढळल्या आहेत.
कुमठेकर, ज. ब.
“