काश्त्रु, येउझ्यॅनिऊ द : (४ मार्च १८६९—१७ ऑगस्ट १९४४). एक पोर्तुगीज कवी. कोईंब्रा येथे जन्म. शिक्षण कोईंब्रा आणि लिस्बन येथे झाले. काही काळ पोर्तुगीज वकिलातीत नोकरी केल्यावर तो फ्रान्सला गेला आणि पॅरिसमधील वाङ्मयीन वर्तुळांत वावरल्यानंतर फ्रेंच प्रतीकवादाने तो प्रभावित झाला. कोईंब्रा येथे परतल्यानंतर (१८८९) प्रसिद्ध झालेल्या त्याच्या Oaristos (१८९०) आणि Horas (१८९१) ह्या दोन काव्यसंग्रहांतील कवितांमुळे श्रेष्ठ दर्जाचा प्रतीकवादी कवी म्हणून तो मान्यता पावला. Oaristos ह्या काव्यसंग्रहाला त्याने लिहिलेल्या प्रस्तावनेने पोर्तुगीज कवितेतील शब्दकळा आणि तंत्र ह्यांना एक वेगळी दिशा दिली. तथापि १८९१ नंतर तो प्रतीकवादापासून दूर जाऊ लागला. A Nereide de Harlem (१८९६), Constanca (१९००) आणि Ultimos versos (१९३८) अशांसारख्या त्याच्या काव्यसंग्रहांतून हे परिवर्तन प्रत्ययास येते.

कोईंब्रा विद्यापीठातील फ्रेंच साहित्याच्या अध्यासनावर १९१४ मध्ये त्याची नेमणूक झाली. लिस्बनच्या अकादमीचाही तो सदस्य होता. कोईंब्रा येथे तो निवर्तला.

जगताप, बापूराव