गोत्सी, कार्लो : (१३ डिसेंबर १७२०–४ एप्रिल १८०६). इटालियन नाटककार. व्हेनिस येथे एका खानदानी कुटुंबात जन्म. काही काळ लष्करात नोकरी. १७४४ मध्ये तो व्हेनिसला परतला आणि ‘Accademia dei Granelleschi’ ह्या कडव्या परंपरावादी संस्थेचा निष्ठावंत सदस्य बनला. ठोकळेबाज व्यक्तिरेखा, निश्चित नाट्यसंहितेचा अभाव, बरेचसे संवाद उत्स्फूर्तपणेच म्हणण्याचा संकेत आणि त्यातून अटळपणे येणारा विदूषकीपणा यांमुळे जुनी इटालियन सुखांत्मिका ऱ्हासाला लागली होती. तिची कालजीर्ण चौकट मोडून तिला नवे, सुसंबद्ध आणि वास्तववादी स्वरूप देण्याचा प्रयत्न गोत्सीचा समकालीन ⇨ कार्लो गोल्दोनी  हा करीत होता. गोस्सीने त्याला प्रखर विरोध केला आणि जुन्या सुखात्मिकेचे पुनरुज्जीवन करण्याचा निकराचा प्रयत्न केला. ह्या दिशेने केलेला एक प्रयत्न म्हणून जुन्या सुखात्मिकेचाच घाट स्वीकारून काही लोककथा-परीकथांना त्याने नाट्यरूप दिले. Fiabe (इंग्रजीत फेबल्स) ह्या नावाने त्या नाट्यकृती ओळखल्या जातात. १७६१ ते १७६५ ह्या कालखंडात गोत्सीने अशा ‘फेबल्स’ लिहिल्या आणि त्या लोकप्रिय करून दाखविल्या.

L’amore delle tre melarance (१७६१, इं. शी. द लव्ह ऑफ द थ्री ऑरेंजिस) आणि Turandot (१७६२) ह्या त्याच्या अत्यंत लोकप्रिय फेबल्स. Memorie inutili (१७९७) इ. भा. द मेम्वार्स ऑफ कार्लो गोत्सी, २ खंड, १८९०) हे आत्मचरित्रही त्याने लिहिले आहे. व्हेनिस येथेच तो निधन पावला. 

कुलकर्णी, अ. र.