कँटन व एंडरबरी बेटे : दक्षिण पॅसिफिकमधील फीनिक्स द्वीपसमूहातील कंकणद्वीपे. परंपरेप्रमाणेच ती गिल्बर्ट आणि एलिस या द्वीपसमूहात येतात. कँटन हवाईच्या नैऋत्येस ३२० किमी., २० ४९’ द. व १७१० ४१’ प. येथे असून ते सु. १३ किमी. लांब व ६·५ किमी. रुंद आहे. ते पश्चिमेस तुटलेले आहे. त्यावर फिजी व होनोलूलू हवाई मार्गावरील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. एंडरबरी कँटनच्या आग्नेयीस ५९ किमी., ३० ८’ द. व १७१० ५’प. येथे आहे. त्याचे क्षेत्रफळ सु. ५·७ चौ. किमी. आहे. त्याच्या मध्यभागी समुद्राशी न जोडलेले असे एहान खारकच्छ आहे. हे बेट निर्मनुष्य आहे. १९३७ साली कँटनवर रेडिओ केंद्र उभारून या बेटावर इंग्लंडने सार्वभौमत्व सांगितले. त्याच वर्षी अमेरिकेचे पथक सूर्यग्रहण निरीक्षणास तेथे आले व त्यांनी अमेरिकेचा दावा सांगितला. शेवटी दोन्ही देशांमध्ये तडजोड होऊन त्यांनी १९३९ साली ही बेटे पुढील ५० वर्षांकरिता अमेरिका-इंग्लंडच्या संयुक्त शासनाखाली ठेवावी असे ठरविले. एकेकाळी ग्वानो खतासाठी ही बेटे फार महत्त्वाची होती.
डिसूझा, आ. रे.