कन्याकुमारी: केप कोमोरीन. तमिळानाडू राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण आणि सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र. लोकसंख्या ११,२११(१९७१). भारताचे अगदी दक्षिण टोक अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर यांचे संगमस्थान आणि भारतातील ५१ शक्तिपीठांपैकी एक म्हणून हिंदूंच्या दृष्टीने पवित्र असलेले हे ठिकाण, त्रिवेंद्रमच्या आग्नेयीस सु.८० किमी. आणि नागरकोइलच्या दक्षिणेस १३ किमी. आहे. तमिळनाडू राज्याचे हे एक प्रमुख मच्छीमारी केंद्र असून तेथे मत्स्यसंशोधन केंद्रही आहे. कन्याकुमारीजवळील तीन समुद्रांचे वेगवेगळे रंग मोनोझाइट व इल्मेनाइट या खनिजांमुळे किनाऱ्याजवळ बनलेली रंगीबेरंगी वाळू आणि समुद्रामधून सूर्योदय व समुद्रातच सूर्यास्त तसेच पौर्णिमेला एकाच वेळी समुद्रात सूर्यास्त व समुद्रातून चंद्रोदय या वैशिष्ट्यांमुळे प्रवाशांची येथे नेहमी गर्दी असते. किनाऱ्याजवळील समुद्रातील एका खडकावर विवेकानंद नेहमी बसत म्हणून त्याला विवेकानंदखडक नाव मिळाले तेथेच १९७० साली विवेकानंदांचे भव्य स्मारक उभारले गेल्याने कन्याकुमारीच्या वैभवात भर पडली आहे. किनाऱ्याजवळील महात्मा गांधींचे स्मारक आणि चर्च प्रेक्षणीय आहेत. पौराणिक कथेनुसार बाणासुराचा वध करणारी येथील पराशक्ती ही कुमारी कन्याकालीचाच अवतार आहे. बाणासुर या कुमारी कन्येच्या हातून मरणार असतो. तिने तपश्चर्येने शंकराला लग्नासाठी प्रसन्न केले म्हणून देवांनी कन्याकुमारीपासून ३२ किमी. वरील शुचिंद्रम् येथे शंकराचा मुहूर्त टाळला. बाणासुर तिला मागणी घालण्यास गेला व त्यातून निर्माण झालेल्या युद्धात मारला गेला. हातात वर माला घेतलेली आणि शंकराची वाट पहात असलेली पराशक्तीची सुंदर मूर्ती कन्याकुमारीच्या मंदिरात असून नवरात्रात तेथे उत्सव होतात. कन्याकुमारीचे मंदिर कोरीवकामयुक्त, दाक्षिणात्य पद्धतीचे आहे.
शाह, र.रू.