कार्बन डायसल्फाइड : एक कार्बनी संयुग. सूत्र CS2. यास कार्बन बायसल्फाइड असेही म्हणतात. हे संयुग १७९६ मध्ये लांपाडीउस यांनी प्रथम शोधून काढले.

उत्पादन : (१) बकपात्र पद्धतीने बिडाच्या किंवा पोलादाच्या पात्रात लोणारी कोळसा व गंधकाची वाफ यांची रासायनिक विक्रिया घडवितात व तयार झालेले कार्बन डायसल्फाइड उर्ध्वपतनाने (वाफ करून व नंतर ती थंड करून) वेगळे करून शुद्ध करतात.

(२) विद्युत् भट्टीमध्ये लोणारी कोळसा तापवून त्यावर वितळलेले गंधक सोडले जाते. या पद्धतीने उष्णता वाया जात नाही. शिवाय भट्टीच्या बाहेरचे आवरण तापत नाही, त्यामुळे आतील तापमान जास्त काळ टिकते.

(३) हायड्रोकार्बन पद्धतीत मिथेन वायू किंवा नैसर्गिक वायू (खनिज इंधन वायू) आणि गंधक यांची विक्रिया सिलिकोजेन या उत्प्रेरकाच्या (विक्रियेत भाग ने घेता विक्रियेची गती वाढविणाऱ्या पदार्थाच्या) सान्निध्यात घडवून आणतात. या पद्धतीत उतारा सु. ९०% येतो. ही पद्धती अलीकडेच प्रचारात आली आहे.

गुणधर्म : वर्णहीन द्रव उकळबिंदू ४६·३ से. वि.गु. १·२६१ वास उग्र, अगदी शुद्ध स्थितीत असल्यास ईथरासारखा वास पाण्यात विरघळत नाही. अल्कोहॉल, ईथर, बेंझीन इ. कार्बनी विद्रावकांत (विरघळविणाऱ्या पदार्थांत)‌ मिसळते. अत्यंत ज्वालाग्राही, अनुकूल परिस्थितीत १०० से. तापमानास स्वत:च पेट घेते. याच्या ज्योतीला फिकट निळसर रंग येतो. याच्या ज्वलनाने कार्बन डाय-ऑक्साइड व सल्फर डाय-ऑक्साइड हे वायू निर्माण होतात.

याची क्लोरिनाबरोबर विक्रिया होऊन कार्बन टेट्राक्लोराइड हे संयुग मिळते. क्षाराशी (अम्लाशी विक्रिया होऊन लवणे देणाऱ्या पदार्थाशी म्हणजे अल्कलीशी) अल्कोहॉली विद्रावात विक्रिया केली असता झॅंथेटे मिळतात. क्षारीय सेल्युलोजाबरोबर याची विक्रिया केली असता सेल्युलोज झॅंथेट मिळते. व्हिस्कोज रेयॉन या ‌कृत्रिम रेशीम बनविण्याच्या कृतीतील ही एक मूलभूत विक्रिया आहे. उकळत्या ॲनिलिनाबरोबर याची विक्रिया होऊन थायोकार्बानिलाइड व हायड्रोजन

          CS2   +                    2C6H5NH2 = SC (NH⋅C6H5)2 + H2S

 कार्बनडाय सल्फाइड   ॲनिलिन              थायोकार्बानिलाइड

सल्फाइट तयार होतात. कृत्रिम रंग व औषधे यांच्या निर्मितीत व व्हल्कनीकरणाचा (गंधक व रबर यांची विक्रिया घडवून रबराचे भौतिकीय गुणधर्म बदलणाऱ्या विक्रियेचा) वेग वाढविणारा पदार्थ म्हणून थायोकार्बानिलाइड वापरले जाते.

उपयोग : कृत्रिम रेशीम तयार करण्याच्या व्हिस्कोज पद्धतीमध्ये याचा उपयोग करतात. कार्बन टेट्राक्लोराइड, अमोनियम थायोनेट, थायोयूरिया फॉर्माल्डिहाइड हे पदार्थ तयार करण्याकरिता व रबराचे व्हल्कनीकरण करताना याचा उपयोग करतात. गंधक, फॉस्फरस, आयोडीन यांसारखे पदार्थ विरघळविण्यासाठी, तसेच तेलबिया व पेंड यांत असलेले तेल निष्कर्षण करून काढण्यासाठी याचा पूर्वी वापर करीत असत. परंतु हे ज्वालाग्राही आणि विषारी असल्यामुळे या कामी अलीकडे कार्बन टेट्राक्लोराइड व तत्सम क्लोरीनयुक्त विद्रावक वापरतात. याच्या वाफा विषारी असतात. जंतुनाशक व कीटकनाशक म्हणून याचा उपयोग करतात.

संदर्भ : Partigton, J. R. Geneal and Inorganic Chemistry. London, 1966.

शहा, ज. रा.