कायफळ : (गु.कारीफळ क.किरिशिवणी, इप्पेमरा सं.कटफळ इं.बे-बेरी, बॉक्स मिर्टल लॅ.मिरिका नागी कुल-मिरिकेसी). सु.३-१५ मी. उंचीचा हा सदापर्णी आणि सुगंधी वृक्ष हिमालयाच्या पायथ्यास रावी ते पूर्वेस आसामकडे, खासी, जैंतिया नागा आणि लुशाई टेकडया (९००-२,१०० मी.उंचीपर्यंत) येथे आढळतो. शिवाय चीन व जपानमध्येही सापडतो चीनमध्ये शेकडो वर्षे लागवडीत आहे. साल उदी अथवा पिंगट, उभ्या व खोल भेगांमुळे खरबरीत पाने साधी, एकांतरित (एकाआड एक), भाल्यासारखी, अनुपपर्ण (उपपर्णरहित), विशालकोनी फुले एकलिंगी, लहान, कक्षास्थ (बगलेतील) मंजऱ्यांवर येतात. संदले व प्रदले नसतात. केसरदले दोन किंवा अधिक किंजपुटात एक कप्पा आणि एक बीजक [→फूल ] फळ लंबगोल अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळाची साल बारीक उंचवटयांनी भरलेली, लालसर किंवा पिवळसर रंगाची बी अपुष्क (वाढणाऱ्या बीजाच्या गर्भाला अन्न पुरविणारा पेशी समूह नसलेली) फळे खाद्य व आंबटगोड असून उत्तेजक पेय तयार करण्यासाठी वापरतात. फहांवरील मेणाचा पातळ थर उकळत्या पाण्यात टाकून वेगळा करतात. साबण, मेणबत्त्या, कातडयांना लावण्याचे पॉलिश इत्यादींमध्ये ते मेण वापरतात.
फळे शामक, दीपक (आकुंचन करणारी), जंतुनाशक ज्वर, दमा, कफ यांवर उपयुक्त असून ती मत्स्यविषही आहे. सालीतील पिवळट रंग कातडी कमावण्यास व रंगविण्यास उपयुक्त, पण त्यामुळे कातडयांना चिरा पडतात. लोकरीस व कापडासही रंगाच्या छटा देतात. साल दातदुखीवर चावण्यास व चघळण्यास वापरतात सालीचा रस जखमा धुण्यास चांगला.
राजे, य.बा.
“