कश्यप : ‘कश्यप’ हे एका गोत्रप्रवर्तक ऋषीचे नाव आहे.ऋग्वेदातील काही थोड्याच सूक्तांचा तो द्रष्टा आहे.ऋग्वेदात याचा एकदाच उल्लेख असून, इतर वेदांमध्ये मात्र त्याचा अनेकदा उल्लेख आला आहे.सूक्तद्रष्टा म्हणून उल्लेखिलेल्या कश्यपाचे ‘मारीच’ हे विशेषण आहे. मारीच म्हणजे मरीचीचा पुत्र .श्रौतसूत्रांच्या गोत्रप्रवराध्यायांत कश्यपनामक गोत्राचा निर्देश आहे.या गोत्राचे कश्यप, अवत्सार व निध्रुव असे तीन प्रवर सांगितले आहेत. हे गोत्रनाम असल्यामुळे ते उपनामासारखे त्या गोत्रातील कोणत्याही व्यक्तीला लागते. शतपथ ब्राह्मणात ‘कश्यप नैध्रुवी’ असा उल्लेख आला आहे. नैध्रुवी म्हणजे निध्रुवाचा पुत्र. विश्वकर्मा भौवन राजाचा अभिषेक करणारा एक पुरोहित म्हणून कश्यपाचा ब्राह्मणग्रंथांत उल्लेख आहे. प्राचीन व अर्वाचीन बहुतेक पुराणांत कश्यपाचा एक प्रजापती म्हणून निर्देश आढळतो. त्याची सप्तर्षींत गणना केलेली आहे. देव व दैत्य हे कश्यपाच्या अदिती व दिती यांचे पुत्र म्हणून पुराणांनी सांगितले आहेत. विनतेपासून गरुड व अरुण आणि कद्रुपासून नाग हे पुत्र कश्यपाला झाले, असेही पुराणे सांगतात. मनुष्य, पशू, पक्षी, नाग, जलचर इ. प्राणिसृष्टी त्याच्या अन्य भार्यांपासून झाली असेही पुराणे सांगतात. पृथ्वी हीसुद्धा कश्यपाचीच मुलगी, असाही उल्लेख पुराणांत आढळतो. अवतारी वामन हा कश्यपाचाच पुत्र होय, असे भागवतात सांगितले आहे. परशुरामाने पृथ्वी जिंकून अखेर कश्यपाला दान दिली, असे भागवतात म्हटले आहे.
कश्यप हा एक श्रेष्ठ बुद्धशिष्य होता असे त्रिपिटकात म्हटले आहे. कश्यप हा आयुर्वेदाच्या एका संहितेचा कर्ता होय. तिला कश्यपसंहिता म्हणतात. कश्यप हा धर्मसूत्रकार म्हणून बौधायनाने निर्दिष्ट केला असून त्याच्या नावाचा एक स्मृतिग्रंथही असल्याचा उल्लेख आढळतो. कश्यप हा एक शिल्पशास्त्रकारही आहे.
जोशी, लक्ष्मणशास्त्री.