कामसूत्र : हा वात्स्यायनाचा सूत्रात्मक ग्रंथ इसवी सनाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या शतकात लिहिलेला असून कामशास्त्रावरील उपलब्ध संस्कृत ग्रंथांत कालदृष्ट्या सर्वांत प्राचीन व गुणदृष्ट्या सर्वांत उत्तम आहे. गौतमाच्या न्यायसूत्रावर भाष्य लिहिणारा वात्स्यायन हाही याच सुमारास झाला असल्यामुळे हे दोन्ही वात्स्यायन एकच असण्याचा संभव आहे. वात्स्यायन हे अर्थशास्त्रकार कौटिल्याचेच दुसरे नाव होय अशी परंपरागत समजूत आहे परंतु ती आधुनिक पंडितांना मान्य नाही. या कामसूत्रात सात अधिकरणे (विभाग), छत्तीस अध्याय, चौसष्ट प्रकरणे व (बत्तीस अक्षरांचा एक श्लोक या गणनेने) बाराशे पन्नास श्लोक आहेत, असे ग्रंथारंभी म्हटले आहे. तथापि उपलब्ध आवृत्तीशी ही संख्या पूर्णत: जमत नाही. विषयविवेचनाला अनुसरून अध्यायांस व प्रकरणांस नावे दिली आहेत. ‘भवन्ति चात्र श्लोका:’ असे म्हणून अध्यायाच्या अखेरीस संग्रहात्मक श्लोक दिले आहेत. ‘पूर्वाचार्यांचे ग्रंथ अभ्यासून संक्षेपाने हे कामसूत्र मी ग्रंथित केले आहे’, असे त्याने स्पष्टच म्हटले आहे. या ग्रंथांतील सात अधिकरणे खालीलप्रमाणे :
(१)साधारण : ग्रंथात अंतर्भूत विषयांची सूची (शास्त्रसंग्रह), ग्रंथप्रयोजन, कामसूत्र व तदंगभूत गीतादिक कलांसह विद्यांचे अध्ययन, चतुर व्यवहारज्ञा पुरुषाची (नागरिकाची) दिनचर्या, नायक-नायिका आणि त्यांचे साहाय्यक दूत-दूती यांच्यासंबंधीचे विवेचन इतके विषय यात आले आहेत.
(२)सांप्रयोगिक : संप्रयोग म्हणजे संभोग. वधूवरांचे वैवाहिक जीवन सुखमय होण्यास ते दोघे परस्परानुरूप कोणत्या गुणांनी होऊ शकतील याचा, तसेच आलिंगन, चुंबन, नखक्षत, दंतक्षत, आसनप्रकार, चित्ररत, पुरुषायित, प्रणयकलह इत्यादिकांचा विचार यात आला आहे.
(३)कन्यासंप्रयुक्तक : इतर स्त्रियांपेक्षा कुमारींचाच सहवास संभोगासाठी घडवून आणण्याचा विचार प्राधान्याने यात केला आहे. नायकाच्या दृष्टीने विवाहयोग्य कन्या कोणती, तिचा परिचय कसा करून घ्यावा, प्रेमसंबंध कसा जुळवावा, कोणत्या उपायांनी तिला आकृष्ट करून तिचा विश्वास संपादावा, कोणत्या प्रकाराने तिच्याशी विवाह करावा इ. चर्चा यात आली आहे.
(४)भार्याधिकारिक : भार्येने गृहव्यवस्था कशी ठेवावी, वैवाहिक संबंध दृढ होण्यासाठी पतीशी कसे वागावे, सवतींशी कसे वागावे, पतीने दुर्लक्षिलेल्या स्त्रीने काय करावे, राजाने स्वत:च्या अनेक स्त्रियांशी कसे वर्तन ठेवावे वगैरे विचार यात आला आहे.
(५)पारदारिक : परदारा म्हणजे परस्त्री. तिच्या ठिकाणी प्रेम कसे व कोणत्या परिस्थितीत उत्पन्न होते, वाढते, नाहीसे होते, कोणत्या प्रकारे परदारेच्छा पूण करता येणे शक्य आहे व व्यभिचारी लोकांपासून अंत:पुरातील स्त्रियांचे रक्षण कसे करावे, याचा विचार यात आहे.
(६)वैशिक : वेश्याव्यवहारविषयक वर्णन यात केले आहे. वेश्येने कसे वागावे, तिचे साहाय्यक कोण, तिने कुणाकुणाशी संबंध ठेवू नये, नायकाचे गुण कोणते, द्रव्यप्राप्तीचे मार्ग कोणते, द्रव्यहीन नायकास कसे हाकलून द्यावे इत्यादिकांचे वर्णन यात आहे.
(७)औपनिषदिक : एकदा नष्ट झालेला अनुराग पुन्हा कसा उत्पन्न करावा, सौंदर्यवर्धन कसे करावे, वशीकरणाचे मार्ग कोणते, वाजीकरणासाठी कोणते उपाय करावेत इ. गुह्य गोष्टींचा विचार यात आहे.
ग्रंथप्रयोजन थोडक्यात असे : धर्म व अर्थ या पुरुषार्थांसाठी शास्त्राची जशी नितांत आवश्यकता आहे, तशी काम या पुरुषार्थासाठीही आहे. दांपत्यजीवन सुखमय व आनंदमय व्हावे म्हणून, तसेच शारीरिक आरोग्य रहावे म्हणून अन्न व निद्रेप्रमाणेच कामसेवन हे अत्यंत आवश्यक आहे. कामाच्या अतिरिक्त सेवनाने दोष उत्पन्न होतील, तर ते दोष टाळून संयमाने कामसेवन करावे. चारही वर्णांतील गृहस्थाश्रमी स्त्रीपुरुषांची जीवनयात्रा सुखाने व्हावी यासाठी या ग्रंथांचा अवतार आहे कामवासना अधिक भडकावी म्हणून नव्हे. या शास्त्राचे रहस्य जो कोणी यथार्थपणे जाणून घेईल, तो त्रिवर्गाची मर्यादा योग्यपणे सांभाळून जितेंद्रियत्व जोडील.
कामसूत्र हा शास्त्रग्रंथ असल्याने कामविषयक सर्व विचारांचे सांगोपांग विवेचन यामध्ये येणे क्रमप्राप्त्यच होय. त्यामुळे काही काही प्रसंगी ग्रंथांतील लैंगिक संभोगासंबंधीची अंगोपांगे व संभोगाच्या विविध क्रिया अशा प्रकारचा अश्लील मजकरू त्यात आहे, असा आक्षेप या ग्रंथावर येण्याचा संभव आहे परंतु विषयच तत्संबंधी आहे ही गोष्ट, तसेच शास्त्रीय मांडणी आणि ग्रंथकाराचा निर्मळ उद्देश ध्यानी घेता अश्लीलतेचा दोष यावर येऊ शकत नाही. हा ग्रंथ कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्या धर्तीवर लिहिलेला आहे. विषयसूची, त्रिवर्गप्रतिपत्ती व विद्यासमुद्देश यांनीच दोहोंचा आरंभ झालेला असून शेवटही औपनिषदिक अधिकरणाने झालेला आहे. अधिकरणअध्याय-प्रकरणात्मक अशी दोहोंची रचना आहे. अध्यायाच्या अखेरीस दोघेही शास्त्रज्ञा श्लोक देतात. दोघेही ‘इति कौटिल्य:’,‘इति वात्स्यायन:’ असे म्हणून अनेक मतांपैकी एकास संमती दर्शवितात. कामसूत्र हा ग्रंथ बराच प्राचीन असून अभ्यासक्रमातून बाजूला पडला असल्याने तो बराच दुर्बोध झाला आहे. परंतु पुढे तेराव्या शतकातील यशोधराने लिहिलेल्या जयमंगला ह्या टीकेने ती दुर्बोधता पुष्कळ कमी केली आहे.
कामसूत्रात अत्यंत प्राचीन अशा श्वेतकेतूबाभ्रव्यादी आचार्यांनी आणि सातवाहनादी अनेक राजांची नावे प्रसंगोपात्त उद्धृत केलेली आहेत. भिन्न भिन्न देशांतील व्यवहार, चालीरीती यात वर्णिलेल्या आहेत. प्राचीन इतिहासाला उपयोगी पडणारी काही माहिती यात आली आहे. महाकाव्ये व नाटके लिहिताना कालिदास-भवभूतीसारख्या महाकवींनी याचा भरपूर उपयोग केलेला दिसतो. पुढे झालेले अनेक कामशास्त्रविषयक ग्रंथ यावरच मुख्यत्वे आधारलेले आहेत. सदाचाराचा उपदेश, लोकव्यवहारातील कौशल्य तसेच चौसष्ट कलांची माहिती आणि गार्हस्थ्य धर्माचे शिक्षण या ग्रंथाच्या अभ्यासाने मिळते, असे म्हणता येईल.
संदर्भ : 1. Upadhyaya, S. C. Trans. Kamasutra of Vatsyayana, Bombay, 1963.
2. चौखंबा संस्कृत सीरिज, कामसूत्रम् (जयमंगला टीकेसह), बनारस, १९१२.
कुलकर्णी, वा. म.