कल्हण : (बारावे शतक). एक काश्मीरी ग्रंथकार. राजतरंगिणी ह्या इतिहासग्रंथाचा कर्ता. काश्मीरचा हा पद्यबद्ध इतिहास त्याने संस्कृतात लिहिला असून त्यात ११४८ पर्यंतच्या घटना अंतर्भूत आहेत. मंखाने श्रीकंठचरितात उल्लेखिलेला कल्याण पंडित हा कल्हणच असावा. कल्हणाचे कुटुंब परिहासपूरचे दिसते. काश्मीरचा राजा हर्ष (१०७६ — ११०१) ह्याचा मंत्री चंपक हा कल्हणाचा पिता. राजतरंगिणीतील प्रत्येक तरंगाच्या मंगलाचरणात कल्हणाने अर्धनारीनटेश्वराची स्तुती केली आहे. तसेच काश्मीर शैव संप्रदायाचा एक आचार्य भट्ट कल्लट ह्याचाही कल्हणाने आदरपूर्वक उल्लेख केलेला आहे. अशा काही प्रमाणांवरून कल्हण हा काश्मीर शैव संप्रदायाचा अनुयायी होता, असे अनुमान काढले जाते. अन्य धर्मांविषयी तो कमालीचा सहिष्णू होता. उपासनामंदिरांविषयी आस्था दाखविताना त्याने धर्मभेद मानला नाही. मंदिरे, स्तूप, विहार ह्यांसारख्या उपासनास्थानांचा योगक्षेम पाहून त्यांना संरक्षण देणाऱ्या सर्वच व्यक्तींविषयी त्याला आदरभाव वाटत असे. आपला चुलता कनक ह्याने हर्षाच्या तावडीतून एक बौद्ध विहार वाचविल्याबद्दल कल्हणाने त्याला राजतरंगिणीत सहर्ष धन्यवाद दिले आहेत. काव्यशास्त्राचा त्याने उत्तम व्यासंग केला होता. रामायण – महाभारतादी महाकाव्ये तसेच विक्रमांकदेवचरित, हर्षचरित ह्यांसारख्या ग्रंथांचेही त्याने सूक्ष्म अध्ययन केले होते. युगमहिमा, देवाघरचा न्याय आणि प्रत्येक घटनेचे अटळ पूर्वनियोजन ह्यांवर त्याची पराकाष्ठेची श्रद्धा होती. राजनैतिक सिद्धांत आणि अर्थशास्त्राचे नियम ह्यांचीही डोळस जाण त्याला होती. कुटिल राजनीतीपायी हर्षाचा निर्घृणपणे वध झालेला पाहून त्याला राजकारणाचा वीट आला आणि तो काशीला जाऊन राहिला.
राजतरंगिणीचे एकूण आठ तरंग आहेत. ह्या ग्रंथाच्या लेखनासाठी सामग्री संकलित करण्याच्या दृष्टीने अकरा जुने इतिहास व नीलऋषीकृत काश्मीरचा वृत्तान्त अभ्यासिल्याचे त्याने सांगितले आहे. शिलालेख, ताम्रपट, वास्तुशिल्पे, नाणी इ. इतिहास–साधनांच्या आधारे घटनांचा अन्वयार्थ व कालानुक्रम शक्य तो निश्चित करण्याची त्याची साक्षेपी वृत्तीही ह्या ग्रंथातून दिसून येते. राजतरंगिणीची रचना काश्मीरचा राजा जयसिंह ह्याच्या कारकीर्दीत, ११४८–५० मध्ये झालेली असली, तरी कल्हण त्याचा आश्रित वा चाकर नसल्यामुळे त्याचा नि:पक्षपाती बाणा ह्या ग्रंथात सर्वत्र दिसतो. अर्धनारीनटेश्वराचे एक स्तोत्रही त्याने लिहिले आहे.
पहा : राजतरंगिणी.
संदर्भ : Dhar, S. Kalhana, Peot-Historian of Kashmir, Bangalore, 1956.
करंदीकर, शैलजा