कडलोर : तामिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्याचे ठाणे. लोकसंख्या १,॰१,३३५(१९७१). हे पूर्व किनाऱ्याला, मद्रासच्या दक्षिणेस लोहमार्गाने २॰२ किमी. व सडकेने १९॰ किमी. असून पाँडिचरीपासून सु. २९ किमी. वर आहे. गडिलम व पोन्नाइय्यार नद्यांच्या संगमाचे हे गाव. संगमनगर या अर्थी यास कुडल-उर-कडलोर नाव पडले असावे. ईस्ट इंडिया कंपनीने जिंजीच्या नबाबाकडून १६८४ साली हे ठिकाण भाडेपट्टीने आणि नंतर १६९॰ मध्ये छत्रपती राजारामाकडून विकत घेऊन येथे वखार घातली व फोर्ट सेंट डेव्हिड हा किल्ला बांधला. १७५८ मध्ये फ्रेंच सेनापती लाली याने किल्ला नष्ट करून कडलोर घेतले. १७८५ च्या तहाने ते इंग्रजांना परत मिळाले. जुने कडलोर हे बंदर व व्यापारी पेठ आहे. नव्या कडलोरात तिरुपापुलियर विभागातील प्राचीन जैन मंदिर व शिव मंदिर, मंजकुप्पम हा वृक्षराजींचा रम्य परिसर, देवनामपट्टणम्मधील फोर्ट सेंट डेव्हिड किल्ल्याचे अवशेष इ. प्रेक्षणीय आहेत. येथे थोडेबहुत कापडविणकाम होते आणि कच्च्या खनिजांची व तेलबियांची निर्यात समुद्रमार्गे करण्यात येते.
ओक, शा. नि.