कानपूर : उत्तर प्रदेश राज्यातील महत्वाचे औद्योगिक शहर आणि जिल्ह्याचे ठिकाण. लोकसंख्या कँन्टोन्मेंन्ट व उपनगरांसह १२,७५,२४२ (१९७१). हे गंगेच्या दक्षिण तीरावर असून, अलाहाबादच्या वायव्येस १८४ किमी आणि दिल्लीच्या आग्नेयीस ३९२ किमी.आहे. सु. २६० चौ. किमी. क्षेत्राचे हे शहर दिल्ली-कलकत्ता आणि झांशी-लखनौ महामार्गावर असून मध्य, उत्तर आणि ईशान्य रेल्वे येथे मिळतात. येथे विमानतळ असून भारतीय हवाईदलाचे केंद्र आहे. ब्रिटीशांकडे आले तेव्हा (१८०१) हे एक खेडे होते. १८५७ च्या उठावात कानपूरला बऱ्याच गोऱ्यांची कत्तल झाली. ब्रिटीश सरकारने येथे कातडी कमवण्याचा कारखाना काढला आणि कातडीकाम हा येथील महत्वाचा उद्योग बनला. त्यापाठोपाठ सुती, लोकरी व तागाच्या कापडाच्या गिरण्या, रसायने, सिमेंट, होजिअरी, आगकाड्या, यंत्रसामग्री, प्लॅस्टिक, आटा, साबण, तेल, विद्युत्‌ उपकरणे, भांडी, सतरंज्या, लोखंड, स्टीलच्या वस्तू, विमानाचे सुटे भाग आदींचे उद्योग वाढले आणि कानपूरची औद्योगिक दृष्ट्या मोठीच वाढ झाली. लष्करी साहित्याचे एक पुरवठा केंद्र येथे असल्याने कानपूरला लष्करी दृष्ट्याही महत्व आले आहे. गंगा-यमुना दुआबातील समृद्ध खोऱ्यात वसल्याने कानपूर ही मोठी बाजारपेठ बनली असून धान्य, कापड, कपडे, पादत्राणे, साखरइ. वस्तूंची मोठी उलाढाल येथे होत असते. कापनूर हे महत्वाचे शैक्षणिक केंद्रही मानले जाते. येथे विविध महाविद्यालये, राष्ट्रीय तंत्रसंस्था व इतर संस्था असून १९६६ मध्ये येथे विद्यापीठ स्थापन झाले आहे. 

शाह, र. रू.