कॅलिफोर्निया : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी पॅसिफिक विभागातील एक राज्य. ३२० ३०’ उ. ते ४२० उ. व ११४० ८’ प. ते १२४० २४’ प. क्षेत्रफळ ४,१२,६०२ चौ. किमी. लोकसंख्या १,९९,५३,१३४ (१९७०). याच्या दक्षिणेस मेक्सिको देश, पश्चिमेस पॅसिफिक महासागर, उत्तरेस ऑरेगन आणि पूर्वेस नेव्हाडा व ॲरिझोना ही राज्ये आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसर्‍या क्रमांकाचे हे राज्य असून सॅक्रेमेंटो ही राजधानी आहे.

भूवर्णन : राज्याच्या वेगवेगळ्या भागांची विविधता, परस्पर विरोधी स्वरूपे आणि आत्यंतिक गुणधर्म वैशिष्ट्यपूर्ण आहेत. देशाच्या मुख्य खंडभूमीवरचे सर्वोच्च (४,४९३ मी.) शिखर मौंट व्हिटने आणि सर्वांत खोल (समुद्रसपाटीखाली ८७ मी.) गर्ता डेथ व्हॅलीमधील बॅडवॉटर याच राज्यात आहेत. याचा १,३४४ किमी. लांबीचा समुद्रकिनारा उत्तरेकडे उंच व खडकाळ तर दक्षिणेकडे सखल व पुळणीचा आहे. उत्तरेच्या किनार्‍यापासून समुद्रात सु. ४५ किमी.वर सदा जोराचा वारा खाणारी लहान लहान खडकाळ फॅरॅलोन बेटे आणि दक्षिण किनार्‍यापासून ३२ ते ९६ किमी.वरील सॅंता बार्बरा ही आठ लहानमोठी बेटे या राज्यात मोडतात. राज्याच्या उत्तर सीमेपासून दक्षिण सीमेपर्यंत किनार्‍याला समांतर अशी कोस्ट रेंज ही पर्वतश्रेणी पसरली असून तिच्यावर उत्तरेस भरपूर पाऊस व दाट झाडी, तर दक्षिणेत रुक्ष व उजाड प्रदेश आहे. पर्वतावर ३,१०० मी. वर उंचीची चार शिखरे आहेत. कोस्ट रेंज व महासागर यांच्या मधल्या किनारपट्टीवर व नदीखोर्‍यातून अत्यंत सुपीक जमीन आहे. राज्याचा बराचसा दक्षिण भाग ‘ग्रेट बेसिन’ या खोलगट प्रदेशापैकी असून मोहावी व कोलोरॅडो ही मोठी वाळवंटे तेथपर्यंत पोहोचलेली आहेत. तथापि अगदी दक्षिणेकडे पाटबंधार्‍यांच्या पाण्याने भूमी संपन्न बनवलेली आहे. कोस्ट रेंजच्या पूर्वेस सॅन वाकीन आणि सॅक्रेमेंटो नद्यांचे मिळून समृद्ध मध्यवर्ती खोरे आहे. दक्षिणोत्तर सु. ६४० किमी. व रुंदीला ३२ ते ८० किमी. असा हा प्रदेश जगातील अत्यंत सुपीक जमीनीपैकी एक समजला जातो. त्याच्या पूर्वेस सु. ६८८ किमी. लांबीची आणि ८० ते १२८ किमी. रुंदीची सिएरा नेव्हाडा ही भव्य पर्वतराजी कोस्टल रेंजशी उत्तरेकडे क्लॅमथ व कॅस्केड पर्वतभागांनी आणि दक्षिणेकडे टेहाचॅपी या २,७२८ मी. पर्यंत उंचीच्या पर्वताने जोडलेली आहे. कॅस्केड पर्वतात ४,३९० मी. उंचीचा मौंट शॅस्टा हा हिमाच्छादित पर्वत असून त्याच्या दक्षिणेस व सिएरा नेव्हाडाच्या उत्तर भागात ३,२४० मी. उंचीचा देशाच्या खंडभूमीवरील एकमेव जागृत ज्वालामुखी मौंट लॅसन आहे. त्याचे १९१४ व १७ साली उद्रेक झाले होते. सिएरा नेव्हाडा पर्वतात मौंट व्हिटनेखेरीज ४,३४० मी.वर उंचीची १२ व ३,१०० मी.हून जास्त उंचीची २८ शिखरे आढळतात. या पर्वतावर पडणारा ९ ते १२ मी. हिमवर्षाव राज्याचा पाण्याचा मुख्य आधार आहे. यात उगम पावणार्‍या अनेक नद्या सॅन वॉकीन व सॅक्रेमेंटो यांना मिळतात. पर्वतावरील हजारो चौ.किमी. प्रदेश व्यापणार्‍या अनेक जातींच्या वृक्षांपैकी सीक्काया हे प्रचंड पुरातन वृक्ष जगप्रसिद्ध आहेत तसेच वृक्ष कोस्टल रेंजच्या वायव्य भागातही आढळतात. राज्याचा ईशान्य प्रदेश ज्वालामुखी उद्रेकाच्या शिलारसाने बनलेला व वैराण आहे. पण दक्षिण प्रदेशातील ज्वालामुखीजन्य मृदा कालव्यांच्या पाण्याने सुपीक बनली आहे. सर्व नदीखोर्‍यात उत्कृष्ट गाळमाती आहे. खनिजांचे उत्पादन देशात तिसर्‍या क्रमांकाचे असून पेट्रोलियम, नैसर्गिक ज्वलनवायू, बाेरॉन, फेल्स्पार, जिप्सम, मॅग्नेशियम संयुगे, पारा, पोटॅशियम, पमीस, पायराइट, रेती, वाळू, सोडियम कार्बोनेट व सल्फेट, गंधक, संगजिरा, थोरियम, टंगस्टन ही मोठ‌्या प्रमाणात आणि लोह, ॲल्युमिनियम, प्लॅटिनम, सोने, चुनखडी व इतर बरीच खनिजे अल्प प्रमाणात आढळतात. बोरोनचा जगातील सर्वात मोठा साठा या राज्यात आहे. कोस्टल रेंजमधून महासागराला मिळणार्‍या उत्तर भागातल्या नद्यांना पाणी भरपूर असते पण दक्षिण भागातल्या नद्या कोरड‌्या राहतात. तथापि राज्यात आग्नेय सीमेवरच्या कोलोरॅडो नदीचे पाणी अडवून आणलेल्या कालव्यांनी दक्षिणेतल्या इंपीरिअल व्हॅलीचा एकेकाळचा शुष्क मुलूख आता समृद्ध बनविला आहे. राज्यभर नद्या अडवून ठिकठिकाणी मोठमोठे जलाशय तयार केलेले आहेत. सिएरा नेव्हाडाच्या पूर्वेकडील ओवेन्स नदीचे पाणी ३८७ किमी. लांबीच्या कालव्याने पश्चिम किनार्‍यावरच्या लॉस अँजेल्सला आणलेले आहे. सिएरा नेव्हाडात अनेक नैसर्गिक सरोवरे असून त्यांतील पूर्वसीमेवरचे १,९३० मी. उंचीवरील लेक ताहो सर्वांत सुंदर आहे. सर्वात मोठे क्लिअर लेक आहे. पण सर्वात मोठा जलाशय दक्षिण भागातील समुद्रसपाटीपासून ८५ मी. खाेलीच्या खचदरीतील खार्‍या पाण्याचा सॉल्टन सी हा होय. राज्याच्या सहा नैसर्गिक विभागांत वेगवेगळ‌्या सहा तऱ्हांचे हवामान आहे. तथापि सामान्यतः किनार्‍यावर व अंतर्गत नदीखोर्‍यात सौम्य हवामान आढळते. उत्तर व पूर्व विभागांतील पर्वतप्रदेशांत थंडी कडक व दक्षिणेच्या वाळवंटात उन्हाळा प्रखर असतो. पाऊस पडण्याचा मोसम नोव्हेंबर ते एप्रिल असतो. उत्तरेत व खोरे प्रदेशांत पाऊस जास्त पडतो. विशेषतः सॅन फ्रन्सिस्कोच्या पूर्वेकडील खोरे विभागात कडक व कोरडा उन्हाळा आणि आर्द्र व सौम्य हिवाळा असे वैशिष्ट‌्यपूर्ण भूमध्यसागरी हवामान आढळते. उत्तर भागात उन्हाळ्यात दाट धुके असते. तपमान स्थलपरत्वे उत्तरेकडून दक्षिणेकडे किमान ७⋅२ अंश से. ते १२⋅८ अंश से., कमाल १५⋅६ अंश से. ते २३⋅९ अंश से. व पर्जन्यमान वार्षिक सरासरी ३५ ते ५१ सेंमी. असते. राज्याचा ४२ टक्के प्रदेश वनाच्छादित असून सीक्कायाखेरीज पाँडेरोझा पाइन, स्प्रूस, डगलस फर, हेमलॉक, सीडार, मॅपल, ओक या जातींचे वृक्ष तसेच प्रदेशानुसार वाळवंटापासून हिमसीमेपर्यंतच्या जातींची झुडपे व फुलझाडे आहेत. राज्यात ४०० जातींचे प्राणी व ६०० जातींचे पक्षी आढळतात.

इतिहास व राज्यव्यवस्था : हेर्नांदो द ॲलकॉर्न हा कॅलिफोर्नियाकडे आलेला पहिला गोरा मनुष्य, कोलोरॅडो नदीमार्गे राज्याच्या आग्नेय सीमेवर १५४० मध्ये आला होता. १५४२ साली काब्रीयो हा दर्‍यावर्दी सॅन डिएगो उपसागरात येऊन गेला. इंग्लंडचा साहसवीर सर फ्रान्सिस ड्रेक १५७९ मध्ये आपल्या जहाजाच्या डागडुजीसाठी सॅन फ्रॅन्सिस्को उपसागराच्या उत्तरेला उतरला होता. १६०२–०३ मध्ये स्पेनच्या सेबासत्यान व्हीथ्‌काईनो याने माँटेरे बंदराची वसाहतीच्या दृष्टीने पाहणी केली व १७७६ पासून स्पेनच्या वसाहतींची येथे सुरुवात झाली. या वसाहतींचा विकास करण्यास फ्रॅन्सिस्कन पाद्र्यांची फार मदत झाली. त्यांनी १८२३ पर्यंत सॅन डिएगोपासून उत्तरेकडे सोनोमापर्यंत एकेक दिवसाच्या प्रवासाचे अंतर ठेवून एकूण २१ मिशन्स किंवा धार्मिक ठाणी वसवली. स्पॅनिश वसाहतींचे स्वरुप धार्मिक, मुलकी व लष्करी असे तिहेरी असे, १८२२ मध्ये मेक्सिको देश स्वतंत्र झाला तेव्हा कॅलिफोर्निया हा त्याचा एक प्रांत झाला. १८४६ साली मेक्सिकोशी अमेरिकेचे युद्ध सुरु झाले तेव्हा कॅलिफोर्नियात येऊन स्थायीक झालेल्या वसाहतवाल्यांनी स्वातंष्य पुकारले, पण अमेरिकन नाविक दलाने येऊन तेथे अमेरिकन निशाण लावले. १८४८च्या तहान्वये मेक्सिकोने हा प्रदेश अमेरिकेला दिला. त्या तहाआधी दहाच दिवस या भागात सोन्याचा शोध लागला होता ती बातमी फेलावताच दूरदुरुन रस्त्यांनी आणि जलमार्गांनी सुवर्णार्थी लोकांचा अभूतपूर्व लोंढा इकडे लोटला चार वर्षात कॅलिफोर्नियाची वस्ती १५,०००ची २,५०,००० झाली. त्या चार वर्षात २० कोटी डॉलर्स किंमतीचे सोने येथील खाणींतून काढण्यात आले. आलेले बहुसंख्य इंग्लिशभाषी होते. त्यांनी या मूळच्या स्पॅनिश वसाहतीचे रूप पार बदलून टाकले. सुरुवातीला कोणतेही कायदेशीर नियंत्रण नसल्यामुळे येथे अंदाधुंदी, बेबंदशाही, गुंडगिरी आणि गुन्हेगारीचे थैमान होते. त्याला आळा घालण्यासाठी जबाबदार नागरिकांनी दक्षतादले उभारून कठोरपणे सुव्यवस्था सुरू केली आणि केंद्रीय विधिमंडळाच्या मान्यतेची वाट न पाहता १८४९ मध्ये कॅलिफोर्नियाची घटनापरिषद माँटेरे येथे भरवून राज्य शासन स्थापन केले. केंद्रीय विधिमंडळात खूप कडाक्याच्या वादविवादानंतर राज्याला संघराष्ट्रात १८५० साली प्रवेश मिळाला. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या तीस वर्षात दक्षिण कॅलिफोर्नियाची गुरचराईवर आधारलेली अर्थव्यवस्था बदलू लागली. १८६९ मध्ये लोहमार्गाने पूर्वेशी दळणवळण सुरु झाल्यावर राज्याचा आधुनिक कालखंड चालू झाला. दक्षिणेत तेल सापडले, पाटाच्या पाण्यावर शेतीचा विकास झाला आणि लिंबू जातीच्या फळांची बागायती हा एक मोठा उद्योग बनला. राज्याच्या राजकारणावरची लोहमार्ग मालकांची पकड जागृत नागरिकांनी उडवून दिली व अनेक राजकीय सुधारणा अंमलात आणल्या. वेळोवेळी मोठ‌्या संख्येने आलेल्या चिनी व जपानी देशांतरितांचा प्रश्न या राज्याला दुसर्‍या महायुद्धापर्यंत जाचत होता. त्याचप्रमाणे त्या युद्धाआधी मंदीची झळही बरीच जाणवली होती. त्यानंतरच्या काळात कॅलिफोर्नियात उद्योगधंद्यांना अभूतपूर्व तेजी आली. असंख्य नवेनवे कारखाने आले आणि देशातील सर्वाधिक लोकसंख्या, संपत्ती व व्यापार या राज्यात केंद्रित झाला. आता राज्यापुढे नवीन समस्या आहेत : पाणीपुरवठ‌्याची वाढती टंचाई, कारखान्यांनी आणि वाहनांनी दूषित होणारी हवा व शहरी वस्तीची बेसुमार वाढ. तथापि तूर्त तरी देशातील व परदेशांतील अधिकाधिक पर्यटनप्रेमी प्रवासी याच राज्याकडे आकृष्ट होत आहेत. शासनाच्या सोईसाठी राज्य ५८ काउंटीमध्ये विभागले असून ४० सदस्यांचे विधिमंडळ आहे. राज्यातून दोन सीनेटर व ३८ प्रतिनिधी काँग्रेसवर निवडून जातात.

आर्थिक व सामाजिक स्थिती : वेगवेगळी २०० प्रकारांची पिके काढणारे हे राज्य कृषिउत्पादनात देशात आघाडीवर आहे. लिंबू जातीची व इतर फळे, कवचीची फळे, कापूस, बटाटे, बार्ली, बीट, घासचारा, टमाटे, भजीपाला, कलिंगडे यांचे उत्पादन इतर राज्यांहून जास्त आहे. पोसलेली गुरे, दूधदुभते, कोंबड‌्या व अंडी यांचाही भरपूर पुरवठा हे राज्य करते. मच्छीमारी अन्य कोणत्याही राज्याहून अधिक आहे.  कारखानदारीमध्ये विमाने, इतर वाहतुकसामग्री, प्रक्रिया केलेले, सुकवलेले, गोठवलेले व डबाबंद अन्नपदार्थ, दारू विजेची यंत्रसामग्री, घडीव यंत्रभाग, बिगरविजेची यंत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कपडे, लाकूड व लाकूडसामान, मूलधातू, रसायने, शास्त्रीय उपकरणे इ. प्रमुख असून चित्रपटनिर्मितीचे जागतिक केंद्र हॉलिवुड याच राज्यात आहे. व्यापार देशात दुसर्‍या क्रमांकाचा असून पर्यटनव्यवस्थेचा धंदाही महत्त्वाचा आहे. राज्यात १९७२ मध्ये लोहमार्ग १३,३१२ किमी. रस्ते, २, ६३,९२४ किमी.१ कोटी ३५ लाख नोंदलेली वाहने व ७०० वर विमानतळे असून लॉस अँजेल्स व सॅन फ्रॅन्सिस्को ही जागतिक महत्त्वाची बंदरे आहेत. सॅन वाकीन सॅक्रेमेंटो या नद्यांवर जलवाहतूक चालते. राज्या १३५ दैनिके व ६०० इतर नियकालिके, ३७२ नभोवाणी व ५७ दूरचित्रवाणी केंद्रे आहेत आणि १⋅२९ कोटी दूरध्वनी आहेत. राज्याची वस्ती १९५० नंतरच्या दशकात दीडपट वाढली व लोकसंख्या देशात पहिल्या क्रमांकाला आली. त्यापुढील दशकात लोकसंख्या सु. २७% वाढली. निम्म्याहून अधिक लोक राज्याबाहेरून आलेले आहेत. एक लाखाचे वर वस्तीची एकवीस शहरे फक्त याच राज्यात आहेत. एक लाखाचे वर वस्तीची एकवीस शहरे फक्त याच राज्यात आहेत. ९०⋅९% वस्ती शहरी आहेत. नागरिकांत ८९% लोक गोरे व (निग्रो व रेड इंडियन मिळून) गौरेतर ११% लोक आहेत. देशातील सात राज्यांतील १० लाखांहून अधिक लोकवस्तीच्या शहरांपैकी एक लॉस अँजेल्स या शहरामधून त्याच्या २८,१६,०६१ वस्तीपैकी २२⋅८% लोक गौरेतर आहेत (१९७०). धर्म, पंथ, रूढी, भाषा, कला व क्रीडा यांबाबतीत कॅलिफोर्नियाचे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील इतर राज्यांशी साधारणपणे साधर्म्य आहे. राज्यात १९७१ मध्ये १४ प्रमुख विद्यापीठे व ३५ प्रमुख महाविद्यालये धरून एकूण २०७ उच्च शिक्षणसंस्था होत्या व त्यांत १३ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत होते. प्राथमिक शाळांतून २९ लाखांहून अधिक व माध्यमिक शाळांतून सु. पावणेअठरा लाख विद्यार्थी होते. १ लक्ष ११ हजारांहून अधिक प्राथमिक व सु. पाऊण लाख माध्यमिक शिक्षक होते. पॅसाडीना येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व इतर अनेक प्रशिक्षण संस्था प्रख्यात आहेत. राज्यात पॅलोमार व विल्सन या जगप्रसिद्ध वेधशाळा असून अनेक ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये, चित्रवीथी, संगीतवृंद, प्रेक्षणीय राष्ट्रीय व राज्य उद्याने आहेत. भव्य निसर्गदृश्ये, क्रीडाविहारस्थाने, नैसर्गिक संपत्ती आणि मानवी कर्तृत्व यांचा यशस्वी संयोग कॅलिफोर्नियात दिसून येतो.

ओक, शा. नि.