भागलपूर : भारताच्या बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या २,२१,२७६ (१९८१). हे पाटण्याच्या आग्नेयीस १९० किमी. गंगा नदीकाठी वसलेले आहे. रेशीम व लोकर उद्योगांच्या दृष्टीने विशेष प्रसिद्ध, तसेच रस्ते, लोहमार्ग यांचे केंद्र. अकबराचे सैन्य बंगालवरील स्वारीच्या वेळी (१५७३-७५) येथून गेले होते. अकबराचा सेनापती मानसिंग याने बिहारमधील आपल्या लष्करी छावणीसाठी या शहराचा उपयोग केल्याचा उल्लेख आढळतो. १८६४ पासून येथे नगरपालिका आहे.

आसमंतातील कृषिमालाची मोठी बाजारपेठ म्हणून भागलपूर प्रसिद्ध आहे. येथे भातगिरण्या, साखर कारखाने, लोकरी व रेशमी कापडाच्या गिरण्या आहेत. एरी सिल्कच्या उत्पादनासाठी सरकारद्वारे विशेष प्रयत्न केले जात आहेत येथील भागलपूर विद्यापीठ, सबौर येथील कृषी महाविद्यालय ही उल्लेखनीय आहेत. अठराव्या शतकातील ऑगस्टस क्लीव्हलँड या जिल्ह्याधिकाऱ्याच्या स्मरणार्थ येथील जमीनदार आणि ईस्ट इंडिया कंपनीने बांधलेली स्मारके, लजपत व हिम्मतसिंग यांसारखी उद्याने, पुरातच मंदीरे, तसेच जवळील चंपानगर येथील मशीद व जैन मंदिर प्रसिद्ध असून पर्यंटकांची येथे वर्दळ असते.

गाडे, ना. स.