बँड : वादकांचा ताफा किंवा वाद्यघोष. ‘बँड’ हा अनेकार्थक इंग्रजी शब्द असून संगीताच्या संदर्भात त्याचा हा अर्थ रूढ आहे. आपणाकडे ⇒ वाजंत्री वा कुतप हे वादनप्रकार प्राचीन काळापासून रूढ आहेत. परंतु त्यांत सामूहिक किंवा सांघिक वादनाचा अंश कमी असतो. तो बँडमध्ये भरपूर असतो; किंबहुना तेच त्याचे वैशिष्ट्य होय.
बँड या कल्पनेचा उगम यूरोपातील असून पाश्चात्त्यांच्या आगमनाबरोबरच तो भारतात आला. प्रशियाचे फ्रीड्रिख द ग्रेट ( १७१२−८६) यांना आधुनिक बँडचे प्रवर्तक मानले जाते. १७६३ मध्ये त्यांनी सैनिकी बँडची स्थापना केली आणि त्यात वाजवावयाची वाद्ये, त्यांची संख्या व इतर तपशीलही ठरवून दिला. त्यातून बँडचे प्रमाणभूत स्वरूप सिद्ध होण्यास सुरुवात झाली. पुढे अनेकांनी त्यात मौलिक भर टाकली आणि एकोणिसाव्या शतकात बँडला विशेष सांगीतिक अर्थ प्राप्त झाला. [→ लष्करी संगीत].
बँडमध्ये मुख्यतः सुषिर, अवनद्ध व घन वाद्ये वापरली जातात. त्यातील मोठमोठी पितळी वाद्ये प्रथमदर्शनीच लक्ष वेधून घेतात. ‘ब्रास-बँड’ अशी संज्ञा त्यातूनच रूढ झालेली दिसते. परंतु या ब्रासबँडमधील अनेक महत्त्वाची वाद्ये लाकडी, वा आधुनिक काळात एबनाइटची असतात. याशिवाय बॅगपाइप बँड, फ्लूट-बँड, ब्यूगल-बँड इ. वेगवेगळे बँडही वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्या सर्वांतील वादकांची संख्या वीस-पंचविसापासून शे-दीडशेपर्यंत असू शकते.
तंतुवाद्यांसारखी नाजुक वाद्ये आणि पियानोसारखी अवजड वाद्ये ही मैदानावर व हालता-चालताना वापरता येत नाहीत. त्यामुळे बँडमधून ती सहजच वगळली जातात. त्यांचा वापर बैठकीच्या स्वरूपातील कार्यक्रमांत, तसेच बंदिस्त जागेत केला जातो. या प्रकारचा ⇒वाद्यवृंद म्हणजे ‘ऑर्केस्ट्रा’ होय. बँडमध्ये तुमुल नाद करू शकणारी, पल्लेदार फेक असलेली आणि उन, वारा, पाऊस यांत टिकाव धरू शकणारी अशीच वाद्ये वापरली जातात. वाद्यवृंदामध्ये ती कर्कश वाटण्याचा संभव असतो.
बँड हा मुख्यतः सैनिक, पोलीस आणि त्यांच्याप्रमाणे सांघिक कवायती व संचलने करणाऱ्या नागरी संघटना यांना अत्यंत उपयुक्त असतो, किंबहुना अत्यावश्यक मानला जातो. शाळा व्यायामशाळा याही बँडचा उपयोग करतात. सर्कशीत किंवा क्रीडांगणावरील अनेक कार्यक्रमांत घोष-वादन अत्यावश्यक मानले जाते. आपणाकडील डोंबारी-गारुडी हे आपल्या कसरती खेळांच्या प्रात्यक्षिकांत वादनाचा वापर करतात. त्याच प्रकारचा वापर सांघिक व प्रमाणबद्ध स्वरूपात बँडमध्ये केला जातो, असे म्हणता येईल. समूह-मन (कॉर्पोरेट माइंड) जोपासण्यामध्ये घोषसंगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
प्राचीन भारतीय संगीतविषयक साहित्यात ‘तत कुतप’, ‘अवनद्ध-कुतप’, ‘नाट्य-कुतप’ इ. संज्ञा आढळतात. तसेच ‘पृथग्वाद्ये’ वाजवून समरांगणावर प्रचंड ध्वनि-कल्लोळ माजविल्याचे उल्लेखही आढळतात. तथापि पुढे वाद्यांत आणि वादनपद्धतींत सुधारणा होत गेल्या. तसेच युद्धतंत्रातही बदल होत गेले. आता वाद्ये नि वादनपद्धती प्रमाणभूत झालेली असून त्यांच्या सांघिक वादनाला कोलाहलासारखी संज्ञा मुळीच वापरता येणार नाही.आजचे बँडचे वादन म्हणजे स्वर-लय-तालयुक्त सुबद्ध संगीत असते. स्वरमेलन (हार्मनायझेशन) ही त्याची विशेषता होय.
जलद व मंद लयीतील रचना ( क्विक् व स्लो मार्चेस), उद्घोष (कॉल्स), प्रणाम (सॅलूट्स) इ. प्रकारांचे वादन आधुनिक बँडवर ऐकावयास मिळते. करमणुकीसाठी, समारंभांसाठी प्रसंगविशेषी अभिजात संगीतही चांगल्या बँडवर ऐकावयास मिळते. त्यातील रचना मुख्यतः पाश्चात्त्य संगीतपद्धतीवर आधारित असत. पण आता शुद्ध भारतीय रागदारीवर आधारित रचना निर्माण झालेल्या आहेत; होत आहेत. विशेष म्हणजे त्यांविषयी विदेशांतही आकर्षण वाढू लागलेले आहे.
मंगल-बँड ही एक आवश्यकतेतून निर्माण झालेली नवीन संकल्पना आहे. तिचा सारा नूर लष्करी बँडसारखा असला, तरी वादनविषय देशी संगीताचाच असतो. परंपरागत वाजंत्रीचेच आधुनिक स्वरूप, असे या मंगल-बँडचे वर्णन करता येईल.
संदर्भ :
- Adkins, H. E. Treatise on the Millitary Band, London, 1958.
- Goldman, R. F. The Band’s Music, New York, 1938.
दात्ये, ह. वि.