बांदार सेरी बगावन : पूर्वीचे नाव ब्रूनाई. आग्नेय आशियातील बोर्निओ बेटाच्या वायव्येकडील ब्रूनाई देशाची राजधानी. लोकसंख्या ७५,००० (१९७६ अंदाज). हे ब्रूनाई नदीच्या मुखापासून सु. १४ किमी. अंतर्भागात वसले आहे. ब्रूनाईच्या पश्चिम किनाऱ्यावरील सारीया आणि क्वाला बालाइट या शहरांना जोडणाऱ्या हमरस्त्यावरील हे शहर शेतमालाची प्रमुख बाजारपेठ असून देशाती महत्त्वाचे नदीबंदर आहे. येथे मासे, रबर इत्यादींचाही थोडाफार व्यापार चालतो.
दुसऱ्या महायुद्धात या शहराचे बरेच नुकसान झाल्यामुळे त्याची पुनर्रचना करण्यात आली. शहरात अनेक आधुनिक इमारती असून त्यांपैकी राजप्रासाद, क्रीडागार आणि शहराच्या मध्यभागी असले सुप्रसिद्ध ओमर अली सैफुद्दीन मशीद या वास्तू उल्लेखनीय आहेत. काम्पुंग आइयर या दाट लोकवस्तीच्या विभागात ब्रूनाई नदीपात्रात बांबूंची घरे बांधलेली आढळतात. १९७० पासून ही वस्ती हलविण्याचे प्रयत्न चालू आहेत. शहरात विमानतळही आहे.
कापडी, सुलभा