संचारी : हिंदुस्थानी रागदारी संगीतातील एक संज्ञा. मध्ययुगीन संगीतशास्त्रकार मतंगा ( सु. सातवे शतक ) याने आपल्या संगीतशास्त्रावरील बृहद्देशी नामक संस्कृत गंथात रागाची व्याख्या करताना, गायनकियेला ‘ वर्ण ’ असे म्हटले आहे. हे स्वरवर्ण चार प्रकारचे असतात : (१) स्थायी वर्ण – एकाच स्वराचा राहून राहून पुनःपुन्हा उच्चर करणे. आरंभी व शेवटी एकच ( तोच ) स्वर असल्यास तो स्थायी वर्णालंकार होय, (२) आरोही वर्ण – नीच स्वरापासून उच्च स्वरावर जाणे, (३) अवरोही वर्ण – उच्च स्वरापासून नीच स्वरावर येणे आणि (४) संचारी वर्ण – वरील तिन्हींच्या म्हणजे स्थायी, आरोही, अवरोही यांच्या मिश्रणाने होणारा प्रयोग, म्हणजे संचारी वर्ण होय. संचारी म्हणजे फिरता. चिजेचा तिसरा भाग, असाही अर्थ सांगितला जातो. सारांश, वर्ण म्हणजे प्रत्यक्ष गान-क्रिया व तिला अनुसरून गाणाऱ्याच्या गळ्याला शक्य तेवढयाच चार क्रिया सांगितल्या आहेत. एकाच वेळी अनेक स्वर एकसंगती लावणे, मानवी गळ्याला शक्य नाही.

प्राचीन काळी धृपदगीताचे संगीतदृष्टया आणि शब्दरचनादृष्टया स्थायी ( अस्ताई ), अंतरा, संचारी व आभोग असे जे चार भाग असत, त्यांतील तिसरा भाग म्हणजे संचारी. प्रथमतः प्रत्येक भागात चार चरण नियमाने असत. संचारीमध्ये गायक मध्यसप्तकातून तारसप्तकामध्ये स्वरांच्या वळण- वाकणांनी जातो आणि अशा रीतीने तो जात असता राग पुढेमागे झुलत राहतो [→ धृपद-धमार]. पूर्वी वर दर्शविलेले चार भाग असत पुढे विकासकमात केवळ दोनच भाग उरले : ध्रूव किंवा स्थायी व संचारी. कर्नाटक संगीतात या वर्णांना समांतर व साधर्म्यदर्शक अशा संज्ञा आहेत. त्या अशा : (१) पल्ल्वी ( स्थायी ), (२) अनुपल्ल्वी ( अंतरा ), (३) चरणम् ( संचारी ) व (४) आभोगामध्ये अस्ताईकडे परतणे असते, तसेच अंतिम टप्प्यात पल्ल्वीकडे परतणे असते.

पहा : अस्ताई-अंतरा आभोग.

संदर्भ : जोशी, लक्ष्मण दत्तात्रेय, संगीतशास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास, पुणे, १९३५.

मंगरूळकर, अरविंद