सहदेवी : [ म.,गु.,हिं.सदोदी गु.सेदरडी क.,सं.सहदेवी सं. दंडोत्पला, देविका इं. ॲश कलर्ड फ्लीबेन, पर्पल फ्लीबेन लॅ. व्हर्नोनिया सिनेरिया कुल-कंपॉझिटी (ॲस्टरेसी)]. फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग काहीशी शाखायुक्त, वर्षायू ( सु.एक वर्षभरजगणारी ) ⇨ ओषधी ( लहान व नरम वनस्पती ) भारतात सर्वत्र तणाप्रमाणे आढळते. शिवाय ती पाकिस्तानात (सिंध), आफिका, आशियातील उष्णप्रदेश व ऑस्ट्रेलिया इ. ठिकाणी आढळते. व्हर्नोनिया ह्या तिच्या प्रजातीत सु. १,००० जाती असून भारतात सु. ४५ जाती (काहींच्या मते ५८) आढळतात. व्ह. मोनॉसिस हा एक लहान वृक्ष असून तो फुलांनी बहरला असता फार आकर्षक दिसतो. व्ह.ॲन्थेल्मिंटिका ही उपयुक्त ओषधी ‘ कडू जिरे ’या परिचीत नावाने ओळखली जाते [⟶जिरे].
सहदेवीची उंची सु. १५-७५ सेंमी., क्वचित अधिक असून हिमालयात ती स.स.पासून सु. १,८०० मी. उंचीपर्यंत, खासी टेकड्यांत व इतर डोंगराळ भागांतही पसरली आहे. तिची साधी व एकाआड एक पाने २.५- ५ × १.८-३.८ सेंमी. आकाराची, रूंदट दीर्घवृत्ताकृती किंवा भाल्यासारखी, अनियमित व एकंदरीने विविध आकारांची, काहीशी लवदार व कमी-जास्त दातेरी असतात. खोडाच्या किंवा फांदयांच्या टोकांजवळची पाने सर्वांत लहान असतात. हिला गुलाबी जांभळट व फार लहान, द्विलिंगी व नियमित फुलांचे स्तबक प्रकारचे लहान फुलोरे मोठया गुलुच्छाप्रमाणे [⟶ पुष्पबंध] वनस्पतीच्या शेंडयांकडे जानेवारी ते फेबुवारीत येतात. स्तबकाच्या तळाशी छदे (उपांगे) व पुष्पासनावर नलिकाकृती अनेक पुष्पके येतात. कृत्स्न फळे (शुष्क, एकबीजी व न तडकणारी फळे) शूलाकृती, सु. १.२५ मिमी. लांब, आयताकार व तळाशी निमुळती असतात त्यांवर सपाट केसाची बारीक लव असून टोकांस पांढऱ्या लांबट केसांचा झुबका ( संवर्त ) असतो. हिची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ कंपॉझिटी ( ॲस्टरेसी ) कुलात ( सूर्यफूल कुलात ) वर्णन केल्याप्रमाणे असतात.
या वनस्पतीत अनेक औषधी गुण आहेत. वनस्पतीचा रस मुलांना असंयमित लघवीकरिता देतात. मूत्राशयाच्या संकोचावर व अश्मरीवर ही वनस्पती गुणकारी आहे तिच्या अंगरसामुळे लघवीची तिडीक कमी होते तिचा रस मूळव्याधीवर व मूळ जलोदरावर उपयुक्त असते ते कडू, कृमिघ्न व मूत्रल (लघवी साफ करणारे) असते वनस्पतीचा काढा तापात घाम येण्यास देतात हिवतापात ( मलेरियात ) वनस्पतीचा फांट (चहाच्या कृतीप्रमाणे परंतु न उकळता काढलेला अर्क) कोयनेलाबरोबर देतात. हस्तिपाद रोगांवर पानांचा रस तेलात उकळून वापरतात. अमीबाजन्य विकारांवर ताज्या पानांचा रस पोटात घेण्यास देतात. पानांचे पोटीस ओलसर पुरळ, इसब व गजकर्ण यांकरिता आणि नारू (कृमी) बाहेर काढण्यास देतात. मुळांचा काढा अतिसारावर देतात तो दीपक (भूक वाढविणारा) असतो. मुळांचा रस खोकला व शूल यांवर उपयुक्त असतो. संधिवात, डोळे येणे आणि ताप यांवर फुलांचा उपयोग करतात. बिया सामान्यपणे कृमिघ्न व विषशामक जंत व सूत्रकृमी यांवर त्या परिणामकारक असून कफ, उदरवायू, आंत्रशूल, मूत्रकृच्छ, कोड, कंडू व इतर हट्टी त्वचारोग इत्यादींवर वापरतात, त्यांचा लेप (लिंबाच्या रसातून काढलेला) उवांच्या नाशाकरिता डोक्यात लावतात. घोडयांना दिलेल्या मसाल्यात बिया घालतात त्यात सु. ३८% स्थिर तेल असते. सुश्रूतसंहिते त ह्या वनस्पतीचा उल्लेख वृश्चिक दंशावर उतारा म्हणून आला आहे परंतु त्याला प्रायोगिक दुजोरा मिळालेला नाही.
पहा : जिरे.
संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. X, New Delhi, 1976.
2. Gazetteer of The Bombay State, Vol. General A, Botany, Part 1–Medicinal Plants, Bombay, 1953.
3. Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. II, New Delhi, 1975.
जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.