ससून, सीगफ्रीड : (८ सप्टेंबर १८८६-१ सप्टेंबर १९६७). इंग्रज कवी आणि कादंबरीकार. जन्म बेंचली, केंट येथे. शिक्षण मार्लबरो आणि केंब्रिज येथे. पहिल्या महायुद्धात ब्रिटिश पायदळातील एक अधिकारी म्हणून त्याने काम केले. युद्धातील कामगिरीबद्दल त्याला ‘ मिलिटरी क्रॉस ’ देऊन गौरविण्यातही आले होते तथापि सीगफ्रीड ससूनयुद्धाबद्दल त्याच्या मनात तिटकारा निर्माण झाला होता. द ओल्ड हंट्स्मन (१९१७) आणि काउंटर-अटॅक (१९१८) ह्या त्याच्या काव्य-संग्रहांतून त्याच्या युद्धविरोधी भावनेचा तीव्र प्रत्यय येतो. भावविवश राष्ट्रवादातून युद्धाचे गोडवे गाण्याच्या प्रवृत्तीविरूद्ध त्याने आपल्या कवितांतून परखड प्रतिक्रिया व्यक्त केली, तसेच धारदार उपरोधातून युद्धाची भीषणता दाखवून दिली. ह्यानंतर त्याचे अन्य काही कवितासंग्रह-उदा., सॅटिरिकल पोएम्स (१९२६, १९३३) आणि द रोड टू रूइन (१९३३)-प्रसिद्ध झाले तथापि त्यांत त्याच्या युद्धविरोधी कवितांमधली उत्कटता आणि परिणामकारकता जाणवत नाही.

ससूनने द मेम्वार्स ऑफ जॉर्ज शेर्स्टन (१९३७) ही आत्मचरित्रात्मक कादंबरीही लिहिली. तिचे तीन खंड – मेम्वार्स ऑफ अ फॉक्स-हंटिंग मॅन -१९२८ मेम्वार्स ऑफ ॲन इन्फंट्री ऑफिसर-१९३० आणि शेर्स्टन्स प्रोगेस-१९३६ – आहेत. ह्या त्रिखंडात्मक कादंबरीचे वर्णन त्याने आपला ‘मानसिक इतिहास ’ असे केलेले आहे. विसाव्या शतकाच्या पहिल्या पंचवीस वर्षांत घडून आलेल्या सांस्कृतिक ऱ्हासाचे आत्मप्रत्ययपूर्ण चित्रण त्याने ह्या कादंबरीत प्रभावीपणे केले आहे. ह्या कादंबरीला पूरक म्हणून त्याने आपले आत्मचरित्रही लिहिले ( तीन खंड-द ओल्ड सेंचरी अँड सेव्हन मोअर यिअर्स१९३८, द वील्ड ऑफ यूथ१९४२ आणि सीगफीड्स जर्नी -१९४५).

वॉरमिन्स्टर, विल्टशर येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.