संलक्षणी : संघटन, उत्पत्ती व परिसर यांची सूचक अशी शिला-वैज्ञानिक व जीवविषयक वैशिष्टये असलेल्या गाळांच्या खडकांना संलक्षणी किंवा स्तरवैज्ञानिक संलक्षणी म्हणतात. एकूण दृश्यरूप संघटन अथवा निर्मितीची परिस्थिती यांसारखे निरीक्षण करता येण्यासारखे खडकांचे गुणधर्म आणि एखादया भूवैज्ञानिक क्षेत्रात या गुणधर्मांमध्ये आढळू शकणारे फरक या गोष्टी संलक्षणीमुळे समजतात. संलक्षणी ही संज्ञा गाळाच्या खडकांच्या राशींच्या बाबतीत मोठया प्रमाणावर वापरली जाते, मात्र ती त्यांच्यापुरती मर्यादित नाही. वातावरणक्रिया, रूपांतरण किंवा संरचनात्मक विक्षोभ यांच्या-मुळे गाळाच्या खडकांत निर्माण होणाऱ्या वैशिष्टयांच्या आधारे सामान्यपणे संलक्षणीची व्याख्या केली जात नाही. तथापि, रूपांतरित खडकांच्या बाबतीत रूपांतरणाने होणाऱ्या बदलांची तीव्रता (मात्रा) दर्शविणाऱ्या खनिजावरून संलक्षणी निश्चितपणे ओळखली जाऊ शकते.

गाळांच्या खडकांची (अवसादी) संलक्षणी : ज्याचे वर्णन करता येईल किंवा अर्थ लावता येईल अशा वैशिष्टयांच्या आधारे गाळाच्या खडकांच्या राशीला गाळाच्या खडकांची संलक्षणी म्हणतात. वर्णनात्मक संलक्षणी शिलावैज्ञानिक किंवा जीववैज्ञानिक अथवा या दोन्ही प्रकारच्या वैशिष्टयांवर आधारलेल्या असतात. संघटन कणांचे आकारमान, स्तरणाची वैशिष्टये व अवसादी संरचना या शिलावैज्ञानिक वैशिष्टयांच्या आधारे शिला संलक्षणीची तर जीववैज्ञानिक वैशिष्टये किंवा वैशिष्टयेपूर्ण जीवाश्म (शिला-भूत झालेले जीवावशेष) यांच्या आधारे जैव संलक्षणीची व्याख्या करतात. एकेकटया शिला व जैव संलक्षणीत काही मिमी. जाडीचे एकेकटे थर असतात किंवा थोडे ते शेकडो मीटर जाडीचे थरांचे क्रमवार समुदाय असतात. उदा., नदीमधील निक्षेपात पिंडाश्म संलक्षणीचे डेसीमीटर जाडीचे थर प्रतिस्तरित वालुकाश्म शिला संलक्षणीबरोबर अंत:स्तरित झालेले असू शकतात. विशिष्ट पुराजीवकालीन (सु. ६० ते २४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) प्रमुख द्रोणीत साचलेल्या निक्षेपाचे शेकडो मीटर जाडीच्या घटकांत विभाजन करता येते. त्यात एकशेली (शेलखडकयुक्त) संलक्षणी व तिच्यातील बॅकिओपॉड व ट्रायलोबाइट हे जीवाश्म ग्रॅप्टोलिटिक संलक्षणी आढळते.

संलक्षणी विश्लेषण : सारख्या परिस्थितीत तयार झाल्याचा समज असलेल्या खडकांच्या गटाकरिताही विवरणात्मक अर्थाने संलक्षणी म्हणतात. अशा वापरामुळे विशिष्ट निक्षेपण प्रक्रियांवर (उदा., टर्बिडाइट संलक्षणी) किंवा निक्षेपणाच्या एका विशिष्ट परिसरावर (उदा., निधाय-शेल्फ-कार्बेनेट संलक्षणी) भर दिला जातो. यात निक्षेपणाच्या प्रक्रियांचा एक पल्ल अंतर्भूत होतो. अखेरीस दोन संलक्षणी संज्ञा व्यापकपणे वापरल्या जातात व त्यांच्या व्याख्या भूसांरचनिक नियंत्रणाच्या आधारे केल्या जातात. उदा., फ्लिश संलक्षणीत सागरी निक्षेप असून प्रमुख गिरिजननातील उत्थानाआधीच्या भूपट्ट सांरचनिक परिस्थितीतील केंद्राभिमुख स्थितीतील खंडांच्या सीमावर्ती भागात त्या बनतात. मोलास संलक्षणीत असागरी व उथळ सागरी अवसाद असतात. एक भूपट्ट दुसऱ्याखाली जात असण्याच्या परिस्थितीत घडया असलेल्या पट्टयात व त्याच्या शाखांत हे पट्टे उचलले जात असताना व नंतर ते पर्वतरांगेच्या रूपात उन्नत होताना ही संलक्षणी तयार होते [à गिरिजनन, भूपट्ट सांरचनिकी].

संलक्षणी विश्लेषण हा स्तरविज्ञानविषयक व अवसादी भूविज्ञानातील महत्त्वपूर्ण घटक आहे. कारण यामुळे पद्धतशीर वर्णन करणारी पद्धती-मीमांसा उपलब्ध होते. असे वर्णन हे सुव्यवस्थित सूक्ष्मसंदर्भ (दस्तऐवज) तयार करणे, निक्षेपणाच्या परिसराचा अर्थबोध करून घेणे आणि पुराभूगोल यांच्या दृष्टीने मूलभूत (मौलिक) असते. आता बहुतेक अवसादी द्रोण्यांचा अभ्यास अशा विश्लेषणाने सुरू झाला पाहिजे, असे मानतात. या विश्लेषणात निक्षेपाचे त्याच्या घटक शिला संलक्षणीमध्ये विभाजन करून त्यांच्या वैशिष्टयांचे काळजीपूर्वक वर्णन करतात. शिला संलक्षणींना नावे देतात किंवा त्या संशोधकांनी तयार केलेल्या संकेत प्रणालीव्दारे ओळखल्या जातात. संक्षिप्त वर्णन व टिपणे आणि संगणक प्रक्रियण यासाठी संकेत प्रणालीची पद्धत सोयीस्कर आहे.

संलक्षणी समूह : अवसादी अभिलेखमालेत सामान्यपणे शिला संलक्षणीचे एकत्रितपणे आढळणारे गट म्हणजे हे समूह वा संघ म्हणजे संलक्षणी समूह होत. असे गट केल्यामुळे पुराभौगोलिक पुनर्रचना करण्याच्या हेतूने अधिक व्यापक विरणात्मक (अर्थबोधक) संलक्षणी निश्चित करण्यासाठी मूलाधार उपलब्ध होतो. उदा., त्रिभूज प्रदेशातील मैदानी संलक्षणी निश्चित करता येते.

शेली संलक्षणी, ग्रॅप्टोलिटिक संलक्षणी ह्या जैव संलक्षणीच्या संज्ञा आहेत, परंतु त्या अनुकमे निधाय कार्बेनेटी अवसाद आणि खोल पाण्यातील पंकाश्म, गाळवटीचे खडक यांचे प्रमाण अधिक असलेल्या शिला संलक्षणी समूहांशी तुल्य आहेत. संज्ञा वापरल्याने अनेक ठिकाणच्या काही प्रमुख पुराजीवकालीन अवसादी द्रोण्यांच्या पुराभूगोलाचे स्थूल वर्णन करण्यासाठी सोयीस्कर मार्ग उपलब्ध होतो.

अनेक संलक्षणी समूह आवर्ती (चक्रीय) स्वरूपाचे असतात. म्हणजे त्यांच्यातील एकेकटे शिला संलक्षणी घटक हे स्तरवैज्ञानिक अनुक्रमामध्ये सारख्याच क्रमाने एकमेकानंतर येतात. यावरून निक्षेप साचण्याच्या त्याच प्रक्रिया पुनरावृत्त झाल्याचे लक्षात येते. अशा समूहांना चक्रीस्तरक्रम (किंवा कालचक्र) म्हणतात. या चकांचे विश्लेषण व अर्थबोधन करण्यासाठी अवसाद विज्ञानातील बरेच संशोधन होत असते. अशी चके अनेक कारणांनी निर्माण होतात आणि या कारणांचे परिणाम अध्यारोपित (एकमेकांत गुंतलेले) असतात. यातून प्रश्न उभे राहतात. वाल्थर नियम लावून या चक्रीयतेचे विश्लेषण करतात. या नियमानुसार निसर्गात एकमेकींलगत आढळणाऱ्या संलक्षणीच उभ्या दिशेतील अनुक्रमात अध्यारोपित (एकमेकींवर रचल्या गेलेल्या) आढळू शकतात. व्यापकपणे पसरलेली चक्रीय एकके ओळखणे हा स्तरानुकमी स्तरविज्ञानाचा आधार असतो. भूपट्ट सांरचनिकीमुळे किंवा सागरी द्रोणीच्या धारकतेत किंवा सागरी पाण्याच्या घनफळात बदल होऊन समुद्रपातळीत होणारे प्रादेशिक वा जागतिक बदल यांची नोंद अशा स्तरानुक्रमांनी केली जाते.

संलक्षणी प्रतिकृती : या बहुतेक प्रतिकृती अवसादी परिसरांसाठी ठरविल्या आहेत. ओहोटी मैदान किंवा अंत:सागरी पंखा (व्यजन) यासारख्या विशिष्ट परिस्थितीत आढळणाऱ्या निक्षेपण प्रक्रिया व निक्षेपित पदार्थ यांची थोडक्यात माहिती देणे हा प्रत्येक प्रतिकृतीचा हेतू असतो. अज्ञात अवसादी स्तरानुक्रमाची प्राथमिक माहिती देणाऱ्या अशा प्रतिकृती या उपयुक्त मार्ग-दर्शक ठरतात. कारण शिला संलक्षणी, अवसादी संरचना, जैव संलक्षणी व चक्रीय वैशिष्टये यांच्याशी निगडित अशा निकषांचा पल्ल या प्रतिकृतीमुळे उपलब्ध होतो. हे निकष वापरून भूवैज्ञानिक विशिष्ट अर्थबोधन (अर्थ लावण्याचे काम) निश्चित करू शकतो वा ते नाकारू शकतो.

संलक्षणी नकाशे : हे नकाशे अवसादी द्रोणीतील शिलावैज्ञानिक बदल चित्रित करण्यासाठी तयार करतात. नकाशा काढता येण्यासारखी स्तरवैज्ञानिक एकके एकाच शिला संलक्षणीची अथवा त्याच्या लहान समूहाची बनलेली असतात. अशा नकाशामुळे निक्षेपणाचा परिसर किंवा पुराभूगोल यांच्या संदर्भात सहजपणे अर्थ लावता येतील असे आकृतिबंध किंवा दिशा सर्वसाधारणपणे उघड होतात. समर्पक वैशिष्टयांवर भर देण्यासाठी विविध परिमाणात्मक तंत्रे योजतात. (उदा., गुणोत्तर नकाशात वालुकाश्मांच्या थरांच्या एकूण जाडीशी शेल किंवा कार्बेनेटी खडकाच्या थरांच्या एकूण जाडीचे असलेले गुणोत्तर वापरलेले असते). ददोलिक किनारी परिसरात अशा नकाशाव्दारे प्रमुख वालुकाश्म राशीचे स्थान व आकार उघड होऊ शकेल. मग त्यांचे आकारमान, आकार व दिक्स्थिती यावरून उचित अवसादी प्रतिकृतीच्या (उदा., त्रिभूज प्रदेश, रोधक द्वीप प्रणाली, अंत:सागरी पंखा इ.) भाषेत त्यांचा अर्थ लावता येतो. याचबरोबर त्याचे निदान करण्यास उपयुक्त असे अवसाद वैज्ञानिक निकषही वापरतात उदा., सच्छिद्र वालुकाश्म राशीत खनिज तेल वा नैसर्गिक इंधन वायू आढळत असल्याचे माहित असल्याने त्याचे स्थान व दिक्स्थिती ही आर्थिक दृष्टया बरीच महत्त्वाची असतात. कार्बेनेटी खडकांच्या अनेक स्तरानुक्रमासाठी अशा तृहेची तंत्रे वापरता येतील. त्यातून तेथील पुराभूगोल समजू शकेल.

रूपांतरित खडकांची संलक्षणी : या संलक्षणीतील खडकांत वैशिष्टयपूर्ण खनिजांचे समूह असतात व ही खनिजे भूपृष्ठाखालच्या खोल जागी ती पुरलेल्या ठिकाणी असलेल्या तापमान व दाब यांच्या परिस्थितीनुसार तयार झालेली असतात. रूपांतरणाची भौतिकीय परिस्थिती दर्शविणारे सूचक खनिजसमुदाय किंवा विशिष्ट संघटन असलेल्या खडकांतील ठराविक खनिजसमुदाय निर्मिणारी तापमान व दाब यांची परिस्थिती या संलक्षणीने सूचित होऊ शकते. भूसांरचनिक घडामोडी किंवा शिलारसाचे अंतर्वेशन (घुसण्याची क्रिया) यामुळे तापमान व दाब यांत होणाऱ्या बदलांमुळे खड-कांतील खनिजांची परस्परांशी व्रिक्रिया होऊन नवीन खनिज-समुदाय व खडकाचा पोत तयार होतात. या प्रक्रियेत अग्निज वा गाळाच्या खडकांत बदल होऊन रूपांतरित खडक बनतात. रूपांतरित खडकात टिकून राहिलेल्या खनिज- -समुदायामुळे मूळ अग्निज वा गाळाच्या खडकांचे संघटन आणि रूपांतरण होताना खडकाभोवती असलेल्या तापमान व दाब यांच्या परिस्थितीचा इतिहास याविषयी माहिती मिळते. म्हणून मूळ संघटन एकसारखे असलेल्या खडकांवर सारख्याच तापमान व दाब असलेल्या परिस्थितीचा परिणाम झालेला असल्यास त्या (रूपांतरित) खडकांत सारखे खनिज-समुदाय आढळतील. [à रूपांतरित खडक].

संलक्षणीची नावे व सीमा : खडकातील खनिज-समुदायावरून तो कोणत्या रूपांतरित संलक्षणीतील आहे ते कळते. खनिजाच्या स्थैर्यावर प्रयोगशाळेत प्रयोग करतात. या प्रायोगिक कार्यावरून प्रत्येक संलक्षणीव्दारे सूचित होणाऱ्या तापमान व दाबाच्या परिस्थिती स्थूलपणे लक्षात येतात. ब्ल्यूशिस्ट (सुभाजा), ग्रीनशिस्ट, अँफिबोलाइट, ग्रॅन्युलाइट, एक्लोजाइट, प्रेहनाइट-पंपेलाइट, हॉर्नफेल्स, झिओलाइट, सॅनिडीनाइट इ. संलक्षणीची नावे सर्वसाधारणपणे स्वीकारली आहेत. ही नावे बेसाल्टासारख्या संघटनाच्या खडकांचे रूपांतरण होताना तयार झालेल्या खनिज-समुदायांवरून आलेली आहेत. (बेसाल्ट हा लोह व मॅग्नेशियम विपुल व सिलिका अल्प असलेला ज्वालामुखी-अग्निज-खडक आहे). या संलक्षणीमधील प्रमुख वैशिष्टयदर्शक खनिजे पुढीलप्रमाणे आहेत : ब्ल्यूशिस्ट – ग्लॉकोफेन, ग्रीनशिस्ट – क्लोराइट व ॲक्टिनोलाइट, अँफिबोलाइट – हॉर्नब्लेंड, ग्रॅन्युलाइट – पायरोक्सिने, प्लॅजिओक्लेज ही सामान्य खनिजे व कणमय (ग्रॅन्युलर) पोत, सॅनिडीनाइट – सॅनिडीन.

प्रत्येक संलक्षणीत भिन्न संघटनांचे खडक भिन्न खनिज-समुदाय दर्शवितात. उदा., शेलपासून बनलेल्या ब्ल्यूशिस्ट संलक्षणीत क्लोराइट, कृष्णाभ्रक व कदाचित गार्नेट, तर बेसाल्टापासून बनलेल्या ब्ल्यूशिस्ट संलक्षणीत क्लोराइट व ॲक्टिनोलाइट आणि शेलपासून बनलेल्या अँफिबोलाइट संलक्षणीत गार्नेट, स्टॉरोलाइट वा कायनाइट, तर बेसाल्टा-पासून बनलेल्या अँफिबोलाइट संलक्षणीत हॉर्नब्लेंड हे अँफिबोल ही खनिजे आढळतात.

व्यक्तिगत संलक्षणी एकमेकींपासून अलग करणाऱ्या सीमा म्हणजे रासायनिक व्रिक्रिया असून त्यांना समश्रेणी (समरेषा) म्हणतात. अशा व्रिक्रियेने एका सूचक (प्रमाणभूत) खनिज-समुदायाचे दुसऱ्यात परिवर्तन होते. उदा., नमुनेदार ग्रीनशिस्ट संलक्षणीचे हॉर्नब्लेंड समश्रेणी व्रिक्रियेने (क्लोराइट + ॲक्टिनोलाइट + प्लॅजिओक्लेज = हॉर्नब्लेंड) अँफिबोलाइट संलक्षणीत परिवर्तन होते तर ‘ हॉर्नब्लेंड = क्लिनोपायरोक्सीन + ऑर्थोपायरोक्सीन + प्लॅजिओक्लेज ’ या समश्रेणी व्रिक्रियेने अँफिबोलाइट संलक्षणीचे ग्रॅन्युलाइट संलक्षणीत परिवर्तन होते. सर्वसाधारणपणे या व्रिक्रिया तापमान व दाबाच्या परिस्थितीच्या एका पल्ल्यात घडतात व हा पल्ल संबंधित खनिजाच्या विशिष्ट संघटनावर अवलंबून असतो. बहुतेक बाबतीत संलक्षणी अनेक विक्रियांनी अलग असतात आणि तापमान-दाब अवकाशाच्या मर्यादित कालखंडात घडतात. अशा प्रकारे संलक्षणी दरम्यानच्या सीमा पसरलेल्या असून त्या सुटया रेषांऐवजी छटायुक्त क्षेत्रांनी दर्शवितात.

सॅनिडिनाइट संलक्षणी हा रूपांतरित खडकांच्या संलक्षणींपैकी एक प्रमुख विभाग आहे. या संलक्षणीचे खडक संपर्क (संस्पर्शी) रूपांतरणाच्या सर्वांत तीव्र परिस्थितीत बनतात. अग्निज अंतर्वेशन व सभोवतालचे खडक यांच्यातील संपर्काच्या ठिकाणी किंवा अंतर्वेशनातील इतर खडकांच्या समाविष्टामध्ये हे खडक बनतात. येथील तापमान खडकाच्या वितळबिंदू एवढे उच्च असू शकते. दाब सापेक्षतः कमी व अंतर्वेशनाच्या खोलीवर अव-लंबून असतो. अधिक तीव्र परिस्थितीत वितळण्याची क्रिया घडते, तर कमी तीव्र स्थितीत हॉर्नफेल्स संलक्षणीचे खडक बनतात. सॅनिडीन, कुरविंद, कॉर्डिएराइट व सिलिमनाइट ही या खडकांतील वैशिष्टयपूर्ण खनिजे असून त्यात काचही असू शकते. ही तयार होणारी खनिजे अंतर्वेशनाभोवतीच्या मूळ खडकांच्या संघटनावर अवलंबून असतात. कार्बन डाय-ऑक्साइड, पाण्याची वाफ यांसारखी बाष्परूपात उडून जाऊ शकणारी द्रव्ये खनिज निर्मात्या विक्रियांदरम्यान खडकांतून बाहेर घालविली जातात.

संलक्षणी माला : वेगवेगळ्या भूवैज्ञानिक भूप्रदेशात रूपांतरित खडकाच्या संलक्षणीचे एकत्रित झालेले संयोग (गट) आढळतात. उदा., एका क्षेत्रातील काही किलोमीटर अंतरात ब्ल्यूशिस्ट ते एक्लोजाइट ते ग्रीनशिस्ट अशी पुढे जात असलेली संलक्षणीची श्रेढी आढळू शकते. तर दुसऱ्या क्षेत्राचे गीन-शिस्ट ते अँफिबोलाइट ते ग्रॅन्युलाइट असा संलक्षणीचा अनुक्रम हे वैशिष्टय असू शकते. विशिष्ट संलक्षणी रूपांतरणाचा दाब व तापमान यांच्या परिस्थितीशी निगडित असल्याने या भिन्न संलक्षणी माला सदर दोन क्षेत्रांच्या गतकालातील दाब व तापमान याच्या परिस्थितीमधील भेद दर्शवितात. ब्ल्यूशिस्ट- एक्लोजाइट – ग्रीनशिस्ट संलक्षणी माला उच्च तापमानाला व सापेक्षत: कमी तापमानाला झालेल्या रूपांतरणाच्या क्षेत्रात आढळते. दाब व तापमान यांची अशा प्रकारची गतकालीन परिस्थिती जेथे एक शिलावरणीय भूपट्ट अशा दुसऱ्या भूपट्टावर आढळतो तेथे निर्माण होते. याउलट ग्रीनशिस्ट- अँफिबोलाइट- ग्रॅन्युलाइट संलक्षणी माला भूकवचात मध्यम ते कमी खोलीवर तापण्याची क्रिया होणाऱ्या भागात बनते. ही संलक्षणी माला हिमालया- सारख्या अनेक पर्वतरांगांमध्ये उघडी पडलेली आढळते आणि ती एक भूपट्ट दुसऱ्यावर भूसांरचनिक हालचालींनी रेटला जाऊन बनते. कमी दाबाची हॉर्न-फेल्स किंवा ग्रीनशिस्ट – अँफिबोलाइट संलक्षणी माला भूकवचात उथळ ठिकाणी तप्त शिलारस अंतर्वेशित होऊन बनते. याला संस्पर्शी रूपांतरण म्हणतात. यावरून संलक्षणी माला एखादया भूवैज्ञानिक भूप्रदेशाचा भूपट्ट भूसांरचनिक इतिहास दर्शविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. चाऱ्नोकाइट संचा-तील खडक ग्रॅन्युलाइट संलक्षणीच्या निर्जलीय व अत्युच्च दाबाच्या परि-स्थितीत शिलारसापासून स्फटिकीभवनाने तयार झाले असल्याचे एकमत आहे [à चार्नोकाइट माला भूपट्ट सांरचनिकी शिलारस].

दाब-तापमान पथ : खडक पुरले व उचलले जाण्याच्या त्वरा उष्णतेच्या स्थानांतरणाच्या त्वरेपेक्षा भिन्न असू शकतात. यामुळे व्यक्तिगत खडक दाब-तापमान अवकाशातून ज्या पथांना जाऊ शकतात ते पथ आश्रयी भूप्रदेशात संलक्षणी मालेने नोंदलेल्या (दर्शविलेल्या) पथांहून अगदी भिन्न असू शकतात. खनिज व्रिक्रियेच्या त्वरा तापमानावर खूप अवलंबून असतात आणि या व्रिक्रिया तापण्याच्या स्थितीपेक्षा थंड होण्याच्या स्थितीत अधिक जलदपणे होतात. या त्वरांवर दाबाचा थोडाच परिणाम होतो, म्हणून रूपांतरण संलक्षणी व संलक्षणी माला सामान्यपणे रूपांतरणाच्या महत्तम ऊष्मीय स्थितीत समतोल दर्शवितात. याच्याशी भूसांरचनिक हालचालींना प्रतिसाद म्हणून खडकाने अनुसरलेल्या प्रत्यक्ष दाब-तापमान पंथाच्या गुंतागुंतीचा संबंध नसतो. असंतुलित खनिज-समुदाय आणि काही खनिजातील रासायनिक मंडलन (मंडले तयार होण्याची क्रिया) यांचा कधीकधी या दाब- तापमान पथांच्या भागांची पुनर्रचना करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. यावरून काळाच्या ओघात खडक पुरला जाण्याची खोली व तापमान कसे बदलत गेले याची माहिती मिळते. एखादया क्षेत्राच्या रूपांतरित संलक्षणी मालेवर आधारित एखादया क्षेत्रातील भूसांरचनिक हालचालींचा अर्थ लावण्यासाठी ही माहिती वापरता येते.

पहा : गाळाचे खडक पुराभूगोल भूपट्ट सांरचनिकी रूपांतरित खडक स्तरविज्ञान.

संदर्भ : 1. Miall, A. D. Principles of Sedimentary Basin Analysis, 1990.

2. Miyashiro, A. Metamorphic Petrology, 1994.

3. Pasamentier, H. W. (Ed.,) Sequence Stratigraphy and Facies Associations, 1994.

4. Reading, H. G. (Ed.,) Sedimentary Environment and Facies, 1968.

5 Turner, F. J. Metamorphic Petrology : Mineralogical Field and Tectonic Aspects, 1981.

6. Weimer, P. Link, H. Bouma, A. H., (Eds.) Seismic facies and Sedimentary Processes of Submarine Turbidites, 1991.

ठाकूर, अ. ना.