संयुक्त अरब प्रजासत्ताक  : युनायटेड अरब रिपब्लिक. ईजिप्त व सिरिया या मध्यपूर्वेतील दोन देशांनी एकत्र येऊन १ फेबुवारी १९५८ रोजी स्थापन केलेले एक संघराज्य. पहिल्या टप्प्यात संपूर्ण ‘ अरब संघराज्य ’ निर्माण करणे, हा या संघराज्याचा उद्देश होता. त्यासाठी या संघराज्याने सिरियन व ईजिप्शियन नागरिकत्व रद्द करून तेथील नागरिकांना ‘ अरब ’ व त्यांच्या राज्याला ‘ अरब भूप्रदेश ’ अशी संज्ञा रूढ केली. या संघराज्याने इराणच्या आखातापासून अटलांटिक महासागरापर्यंतचा संपूर्ण खनिज तेल उत्पादक प्रदेश यासाठी विचारात घेतला होता. याचाच एक भाग म्हणून ८ मार्च १९५८ रोजी येमेनला सामावून घेऊन ‘ युनायटेड अरब स्टेट्स ’ या नावाने एका संघाचीही स्थापना केली होती परंतु हे ऐक्य फार काळ टिकू शकले नाही.

संयुक्त अरब प्रजासत्ताकाने १९५८ साली कैरो येथे राजधानी स्थापून दोन्ही देशांचे प्रशासन कैरो येथे केंद्रित केले होते. ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष नासर व सिरियाचे शुकी अल् कुवात्ली हे या संघराज्याचे संस्थापक होते. ईजिप्त व सिरिया हे याचे प्रांत आणि त्यांच्या अनुकमे कैरो व दमास्कस या राजधान्या होत्या. या संघराज्यातील लोकांनी हंगामी संविधान स्वीकारून नासर यांना राष्ट्राध्यक्ष केले होते. त्यांनी राष्ट्रीय संसदेमध्ये निम्मे सभासद ईजिप्तचे व निम्मे सिरियाचे घेतले होते परंतु बरेच निर्णय नासर स्वत: घेत असत. वास्तविक प्रशासनातर्फे दोन्ही प्रांतांसाठी अनेक योजना आखण्यात आल्या होत्या परंतु नासर हे ईजिप्तला झुकते माप देत आहेत असे सिरियनांना वाटू लागले. अखेर संयुक्त अरब प्रजासत्ताकाच्या सैन्यदलातील सिरियन अधिकाऱ्यांनी संघराज्यातून बाहेर पडून स्वतंत्र सिरियाची स्थापना केली. सिरियाच्या सत्तेवर असलेल्या बाथ पक्षाने व इराकनेही या संघराज्याचे प्रशासन अमान्य करून नासर यांच्या प्रयत्नांना पूर्ण विरोध केला. त्यामुळे २८ सप्टेंबर १९६१ रोजी संयुक्त अरब प्रजासत्ताकाचे अस्तित्व संपुष्टात आले. असे असूनही ईजिप्तने १९७१ मध्ये ‘ अरब रिपब्लिक ऑफ ईजिप्त ’ हे अधिकृत नाव स्वीकारेपर्यंत ‘ युनायटेड अरब रिपब्लिक ’ असे नाव वापरात ठेवले होते. एप्रिल १९६३ मध्ये ईजिप्त, सिरिया व इराक यांनी पुन्हा नवीन संयुक्त अरब प्रजासत्ताकाच्या स्थापनेचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांच्यातील कराराची पूर्तता होऊ शकली नाही.

पहा : अरबस्तान इराक ईजिप्त येमेन सिरिया.

चौंडे, मा. ल.