सत्यनारायण : बंगालमध्ये आणि महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले एक काम्य – म्हणजे काही इच्छा मनात ठेवून केलेले -व्रत. सत्यनारायण ही ह्या वताची प्रमुख देवता. ह्यांखेरीज गणपती, गौरी, वरूण, अष्ट-दिक्पाल, नवग्रह इ. परिवारदेवताही आहेत. सत्यनारायण ह्या शब्दात सत्य आणि नारायण अशी दोन नावे एकत्र आल्यासारखी दिसतात. पेशवेकालीन कागदोपत्री या पूजेचा (वताचा) उल्लेख आढळत नाही. परंतु गेल्या शंभर वर्षांत महाराष्ट्रात या वताचा खूप प्रसार झाला आहे. सत्यनारायणाची पूजा व मुसलमान पीरांची पूजा यांत काही साम्य दिसते. मुसलमान पीरांच्या पूजेचे नाव ‘ सत्यपीरेर पूजा ’ असल्याचेही सांगितले जाते. सत्यपीराला शिरणी (प्रसाद) अर्पण करण्याची चाल असून तशी प्रथा बंगाली हिंदूंच्या सत्यनारायण पूजेत दिसून येते. तिथून ती महाराष्ट्र व अन्य प्रदेशात प्रचलित झाली. महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांतून सत्यनारायण-पूजासत्यनारायणाची पूजा विशेषत: श्रावण महिन्यात केली जाते. नवस फेडण्यासाठी प्रामुख्याने ही पूजा करतात. तसेच लग्नानंतर नवदांपत्यांकडून ही पूजा सामान्यत: केली जाते. सत्यनारायणाची सार्वजनिक पूजाही करतात. सांप्रत या पूजेला सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सत्यनारायणाचा पूजा विधी थोडक्यात असा : तांदळाच्या वा गव्हाच्या लहानशा राशीवर पाण्याने भरलेला एक कलश ठेवतात. त्यात दूर्वा, पंचपल्ल्व, सुपारी, शक्य असल्यास सोन्याचे नाणे इ. घालतात. त्यानंतर त्या कलशावर पूर्णपात्र ठेवून त्यात सत्यनारायणाची प्रतिमा वा शाळीगाम वा बाळकृष्णाची मूर्ती वा नारळ ठेवतात. कलशाभोवती उंची वस्त्र गुंडाळलेले असते आणि गंध, अक्षता आणि फुलांची सजावटही केलेली असते. त्यानंतर सत्यनारायणाची षोडशोपचार पूजा केली जाते. गव्हाच्या वा तांदळाच्या रव्याचा केळी घालून केलेला शिरा हा सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून दिला जातो. सत्यनारायणाची कथा पोथी वाचून सांगितली जाते. नंतर पोथीची व पोथी वाचणाऱ्याची पूजा करून त्याला दक्षिणा दिली जाते.

सत्यनारायण वताच्या अनेक कथा स्कंदपुराणा च्या रेवा खंडात आहेत. नवस केल्याप्रमाणे इच्छापूर्ती झाल्यानंतरही सत्यनारायणाचे व्रत न करणाऱ्या साधू वाण्यावर संकटे कशी कोसळली ह्याची कथा प्रसिद्ध असून ती सत्यनारायण पूजेच्या प्रसंगी सांगितली जाते.

कुलकर्णी, अ. र.