सत्यकाम जाबाल : एक प्राचीन भारतीय आचार्य. त्याच्या आईचे नाव जबाला, म्हणून तो जाबाल. त्याची कथा छांदोग्योपनिषदा त आलेली आहे. ती थोडक्यात अशी : गुरूकुलात बह्मचर्याने राहून विदया संपादन करावी, अशी इच्छा असल्यामुळे सत्यकामाने आपल्या आईला ‘ माझे गोत्र काय ? ’ असा प्रश्न विचारला. कारण, ज्याचे कुलगोत्र माहीत आहे, त्याचेच उपनयन करून आचार्यांनी त्याला विदया दयावयाची, असा त्या काळात शिष्टाचार होता. जबाला आपल्या पुत्राला म्हणाली, ‘ तू कोणत्या गोत्रात जन्मलास हे मला माहीत नाही तुझा पिता कोण हेही मला माहीत नाही. माझ्या तरूणपणी मी परिचारिका होते, तेव्हा तुझा जन्म झाला. माझे नाव जबाला आणि तुझे सत्यकाम, त्यामुळे तू आपले नाव सत्यकाम जाबाल असे सांग ’, त्यानंतर सत्यकाम हा रिद्रूमत गौतम ह्या आचार्यांकडे गेला. आचार्यांनी त्याला त्याचे कुलगोत्र विचारल्यावर त्याने आईने त्याला जे सांगितले होते, तेच आचार्यांना सांगितले. सत्यकामाने खरे तेच सांगितल्यामुळे आचार्य त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी सत्यकामाचे उपनयन करून त्याला आपला शिष्य करून घेतले. त्यानंतर त्यांनी त्याला कृश झालेल्या चारशे गायी दिल्या आणि त्यांच्या मागून जाण्यास सांगितले. त्या गाईंसह तो अरण्यात आला आणि तेथे अनेक वर्षे केवळ कंदमुळांवर आपली उपजीविका करून त्याने त्या गायींचे पालन केले. यथावकाश त्या गायींची संख्या वाढून ती एक हजार झाली. त्यानंतर त्याला एका बैलाच्या वाणीत प्रवेश केलेला वायू , अग्नी, हंस (आदित्य) आणि मद्गु (पाण्याच्या आश्रयाने राहणारा एक रानटी पक्षी) ह्यांनी प्रत्येकी एक, ह्याप्रमाणे चार बह्मपादांचे ज्ञान दिले. हे ज्ञान घेऊन आलेला सत्यकाम आपल्या हजार गायींसह आश्रमात येताच त्याला आचार्यांनी प्रेमाने हाक मारून म्हटले, ‘ तू मला बह्मज्ञासारखा दिसत आहेस. तुला बह्मोपदेश कुणी केला ? ’ त्यावर मनुष्यांखेरीज अन्य जीवांनी तो केला, असे सांगून सत्यकाम म्हणाला, ‘ परंतु आपण श्रेष्ठ आहात आपण माझी इच्छा पूर्ण करू शकाल. श्रेष्ठतम आचार्यांकडून प्राप्त झालेली विदयाच श्रेष्ठतम पदवीला पोहोचविते ’. गुरूशिवाय इतरांनी उपदेश करू नये आणि शिष्याने दुसरा गुरू करू नये, ह्या संकेताचे त्याने पालन केले. त्यानंतर आचार्यांनी तोच उपदेश त्याला पुन्हा केला. बह्म हे सोळा कलांचे असून ते एकरस आहे, ही शिकवण त्यांनी दिली. सत्यकाम जाबाल षोडशकल ब्रह्माचा द्रष्टा झाला. सत्यकाम जाबालाचा निर्देश शतपथबाह्मण,बृहदारण्यकोपनिषद, मैत्रायणी उपनिषद ह्या उपनिषदांतूनही आलेला आहे.
कुलकर्णी, अ. र.