सकल-इस्लामवाद : सर्व इस्लाम धर्मीय अनुयायांना एकत्र आणण्यासाठी उदभवलेली एक चळवळ. इस्लाम हा जगातला सर्वांत संघटित असा धर्म आहे. ⇨ मुहंमद पैगंबरकेवळ धर्मसंस्थापकच नव्हते, तर राज्यकर्तेही होते. त्यांच्या मुखावाटे ईश्वराने दैनंदिन जीवनातले नीतिनियम सांगितले, अशी मुसलमानांची धारणा व श्रद्धा आहे. त्यामुळे पैगंबरांपासून (सातवे शतक) सर्व मुसलमानांवर सकल-इस्लामवादाचा प्रभाव पडलेला आहे. धर्मनेत्याने दिलेले आदेश पाळणे, हे एक धार्मिक कर्तव्यच मानले जाते. पैगंबरांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारस किंवा खलिफा यांनी सकल-इस्लामवाद जतन केला मात्र तेराव्या शतकात खिलाफतच नष्ट झाल्याने या मूळ सकल-इस्लामवादाचीही जवळजवळ इतिश्री झाली. तुर्की समाटांनी औपचारिक रीत्या खिलाफत आपल्याकडे घेतली पण आधीच्या खलिफांएवढी लोकमान्यता त्यांना मिळू शकली नाही.
एकोणिसाव्या शतकात इराणमध्ये जन्मलेले जमाल अल्-दीन अल् अफगाणी (१८३८-९७) आणि त्यांचा ईजिप्शियन शिष्य मुहम्मद अब्दू (१८४९-१९०५) यांनी मुसलमानांच्या एकोप्यासाठी व यूरोपीय साम्राज्यवादास पायबंद घालण्यासाठी एक साप्ताहिक काढून त्याव्दारे प्रसार-प्रचार सुरू केला. त्यामुळे परिणामत: सकल-इस्लामवाद ही एक राजकीय तत्त्वप्रणाली म्हणून पुढे आली. त्यांनी तुर्की साम्राज्याच्या नियंत्रणाखालील राज्यांत धर्मविकास होत नाही, आवश्यक त्या धर्मसुधारणा किंवा समाजसुधारणा केल्या जात नाहीत, असा दावा मांडला. मुसलमान जनतेनेच एक होऊन नवीन खलिफा निवडला पाहिजे आणि धार्मिक विकासाला वाट मोकळी करून दिली पाहिजे, असा प्रचार त्यांनी केला. आधुनिक राष्ट्रवादाचा ईजिप्त किंवा इतर अरब राष्ट्रांत उदय झालेला नसल्यामुळे साम्राज्यवादविरोधी आंदोलनाचे सकल – इस्लामवाद हे अधिष्ठान बनले. साहजिकच या आंदोलनाचे नेतृत्व जमाल अल्-दीन अल् अफगाणी या विचारवंत नेत्याकडे आले. हा सकल- इस्लामवाद यूरोपीय व तुर्की साम्राज्यवादविरोधी, धार्मिक आणि सामाजिक सुधारणांचा आगह धरणारा, असा प्रागतिक विचार होता. अल् अफगाणींच्या विचारांचा मध्यपूर्व आणि रशियातील मुसलमानांवर प्रभाव पडला. त्यांनी इराणी बादशहाच्या दरबारात काही काळ व्यतीत केला. इराणी बादशाहास त्यांचे विचार व कृती क्रांतिकारक वाटल्यामुळे त्याने त्यांस कैदेत टाकले. तेव्हा सकल- इस्लामवादींनी बादशाहाचा खून केला (१८९६). साम्राज्यातील तुर्केतर आणि विशेषत: अरब प्रजा अशा रीतीने असंतोष व्यक्त करीत असतानाच रशियन सैन्याने तुर्की सैन्याचा दारूण पराभव केला. या वेळी ब्रिटन आणि फ्रान्स यांनी हस्तक्षेप करून तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूललाच रशियन सैन्याचा धोका निर्माण झाला होता, तो दूर करून तुर्की साम्राज्याची अबू राखली पण यासाठी सुलतानाला जबर किंमत मोजावी लागली. तुर्की साम्राज्यात असलेले आफ्रिकी देश, ब्रिटन आणि फ्रान्स यांनी आपसांत वाटून घेतले, तेव्हा ईजिप्तच्या शासनात फेरबदल होऊन अफगाणी व अब्दू यांना सत्तेत वाटा मिळाला. अफगाणी ईजिप्तबाहेरचे म्हणून त्यांना ईजिप्तमधून हद्दपार करण्यात आले, पण ईजिप्तमध्ये त्यामुळे असंतोषाचा भडका उडाला. शेवटी अब्दू यांना ईजिप्तचा धर्मनेता (शेख उल इस्लाम) आणि अब्दूचे अनुयायी अराबी यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त करावे लागले. नंतर ब्रिटिशांनी ईजिप्तमध्ये अराजक माजल्याचा प्रचार केला. हा प्रचार हिंदुस्थानातही झाला. ब्रिटिश साम्राज्याशी एकनिष्ठ असलेल्या सर सय्यद अहमद खान व सय्यद अमीर अली यांनी त्याला दुजोरा दिला. संधी मिळताच ब्रिटिश फौजांनी ईजिप्तच्या सैन्यावर हल्ल करून ते ताब्यात घेतले. अफगाणी, अब्दू आणि अराबी पॅरिसला गेले. तेथे त्यांनी प्रागतिक सकल-इस्लामवादाच्या प्रचारासाठी गुप्त मंडळे स्थापन केली परंतु धार्मिक व सामाजिक सुधारणा आणि मुसलमान जनतेने नवा खलिफा निवडावा, या मागण्यांवर अधिष्ठित असलेल्या या सकल- इस्लामवादाला फारसे भवितव्य उरले नाही. परिणामत: प्रागतिक आणि उदारमतवादी सकल-इस्लामवादाचे प्रतिस्पर्धी तत्त्वज्ञान म्हणून खलिफाप्रणीत सनातन सकल – इस्लामवादाचा वापर करण्याची फार निकड राहिली नाही तथापि साम्राज्यातील अरब व इतर तुर्केतर मुसलमानांची निष्ठा कायम ठेवण्या- साठी मुल्लमौलवींमार्फत मुख्यत: मशिदीतून प्रचार चालू राहिला. १८९६ मध्ये तुर्कस्तान व ग्रीस यांच्यात युद्ध झाले. त्यावेळी ब्रिटन व फ्रान्स यांनी उघडउघड ग्रीसची बाजू घेतली. तेव्हा तुर्की सुलतानाने जगातील सर्व मुसलमानांना मदतीची हाक दिली. त्याबरोबर तुर्की खलिफाचा प्रचार करणारे मुल्लमौलवी अनेक देशांत धाडण्यात आले. त्या सर्वांनी सनातन सकल-इस्लामवादाचा प्रसार करण्याची शर्थ केली. ब्रिटिश साम्राज्यातील मुसलमान अत:पर एकनिष्ठ राहतील की नाही, अशी शंका निर्माण झाल्याबरोबर सर सय्यद अहमद खानांनी एक पुस्तिकाच प्रसिद्घ केली. त्यांनी तुर्की सुलतान अब्दुल हमीद पैगंबरांचे खलिफा असल्याचा दावाच खोडून काढला. जरी या वेळी ब्रिटिश सरकारने तुर्कस्तानविरोधी धोरण स्वीकारले असले, तरीसुद्धा भारतीय मुसलमानांनी सरकारशी एकनिष्ठ राहिले पाहिजे, असे या पुस्तिकेत सर सय्यदांनी आग्रहाने प्रतिपादिले होते.
भारतातील सनातन मुल्लमौलवींमध्ये सर सय्यद विशेष लोकप्रिय नव्हते. त्यामुळे १८९६ नंतर आलेल्या सनातन सकल – इस्लामवादी लाटेचा प्रभाव त्यांच्यावर पडू लागला. हळूहळू मशिदींतून शुकवारच्या प्रार्थनेचे वेळी तुर्की खलिफाशी एकनिष्ठ असल्याचे उच्चरण करण्याचा प्रघात पडू लागला. १९११-१२ च्या तुर्कस्तानच्या ग्रीस व इटली यांच्या विरूद्धच्या लढायांच्या वेळीही ब्रिटिशांनी तुर्कविरोधी धोरण अंगीकारल्यामुळे तुर्की सकल-इस्लामवादाचा प्रभाव झपाटयाने वाढला. पहिल्या महायुद्धाच्या वेळी तुर्कस्तानने ब्रिटन व फ्रान्सविरूद्ध धर्मयुद्ध पुकारले. त्याला भारतीय सनातनी मुसलमानांची सहानुभूती होती. धर्मयुद्धाच्या फतव्याच्या प्रती येथेही वाटण्याचे प्रयत्न झाले. महायुद्ध संपल्यानंतर तुर्की साम्राज्य अबाधित ठेवण्यासाठी जी राष्ट्रव्यापी खिलाफत चळवळ झाली, तिला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला. भारतीय मुसलमानांमध्ये खिलाफत वसकल-इस्लामवादाचे लोण पसरले परंतु अरबदेशांत मात्र सकल- इस्लामवादाऐवजी सकल – अरबवादाचा प्रभाव वाढला. तुर्की सत्ता उखडून टाकण्यास सकल – अरबवाद उपयुक्त ठरला [⟶ सकल – अरबवाद]. युद्धोत्तर काळात तुर्कस्तानच्या असेंब्लीनेच केमाल आतातुर्क यांच्या प्रेरणेने खिलाफत बरखास्त केली आणि सनातन इस्लामचा पुरस्कार करणारा धर्मनेता आणि राजकीय नेता म्हणून पैगंबरांचा वारसा जतन करणारा सकल – इस्लामवाद संपुष्टात आला.
मक्का आणि मदिना ही इस्लामची धर्मतीर्थे सौदी अरेबियाकडे आली. सकल- इस्लामवादाच्या आधारावर या तीर्थक्षेत्रांचे नियंत्रण एका देशाकडे न राहता जगातील सर्व मुसलमानांच्या प्रतिनिधींकडे सोपवावे, ही मागणी इब्न सौदाने मान्य केली नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र इस्लामी राष्ट्रांचे एक राष्ट्रमंडल करून त्याचे नेतृत्व आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न सौदी अरेबिया, पाकिस्तान यांसारख्या देशांनी केला. इस्लामी देशांच्या वार्षिक परिषदा गेली ३०-३५ वर्षे भरत आहेत. खनिज तेलामुळे समृद्ध झालेले सौदी-अरेबियासारखे देश मुसलमानांसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करीत आहेत. नव्या सकल- इस्लामवादाची तात्त्विक चर्चा आणि ठरावही संमत होतात पण इस्लामी एकतेचे स्वप्न साकार होण्याची चिन्हे एकविसाव्या शतकातही दृष्टिपथात नाहीत.
संदर्भ : Karandikar, M. A. , Islam in India’s Transition to Modernity, Poona, 1981.
करंदीकर, म. अ. नगरकर, व. वि.