सराटव्ह : रशियाच्या पश्चिम भागातील याच नावाच्या प्रांताचे मुख्य ठिकाण, प्रमुख शहर व नदीबंदर. लोकसंख्या ८,९२,००० (१९९७). हे व्होल्गा नदीच्या खालच्या टप्प्यात तिच्या उजव्या तीरावर वसले आहे. पूर्वी व्होल्गा नदीतून चालणाऱ्या व्यापाराचे, हल्लेखोर टोळ्यांपासून संरक्षण करण्यासाठी १५९० मध्ये एक रक्षक ठाणे म्हणून याची स्थापना करण्यात आली. १६१६ व १६७४ अशी दोन वेळा या ठाण्याची जागा बदलण्यात आली. सराटव्ह हे १७८० मध्ये प्रांताच्या राजधानीचे ठिकाण तर एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात मॉस्कोशी रेल्वेने जोडल्यापासून प्रमुख व्यापारी केंद्र बनले. सांप्रत शहराच्या औदयोगिक परिसराचा विस्तार व्होल्गा नदीच्या काठांवर खूप दूरवर झालेला आहे. १९६५ मध्ये रस्ते वाहतुकीसाठी येथील नदीपात्रावर एक मोठा पूल बांधण्यात आला.
व्होल्गा नदीच्या खालच्या खोऱ्यातील हे एक प्रमुख औदयोगिक, वाहतूक व सांस्कृतिक केंद्र असून येथे अवजड उदयोगांचा विस्तार झाला आहे. अभियांत्रिकी, खनिज तेल रसायने, विद्युत उपकरणे, यांत्रिक हत्यारे, डिझेल एंजिने, जनित्रे, गोलक धारवा, काच, फर्निचर, विटा व इतर बांधकामाचे साहित्य, पादत्राणे, कपडे, खादयपदार्थ इत्यादींचे निर्मिती उदयोग येथे आहेत. राज्यक्रांतिपूर्व काळापासून प्रसिद्ध असलेल्या येथील पीठ गिरणी उदयोगाचे महत्त्व अजून टिकून आहे. व्होल्गा नदीपात्रातून वाहून आणलेल्या लाकडी ओंडक्यांवर येथील लाकूड कापण्याच्या गिरण्यांत प्रक्रिया करून त्यांपासून विविध लाकडी सामान तयार केले जाते. परिसरातून उत्पादित होणाऱ्या खनिज तेल व नैसर्गिक वायूची येथील रसायन उदयोग विकसित होण्यास चांगलीच मदत झाली आहे. येथे संश्लिष्ट अल्कोहॉल, कृत्रिम धागे, ॲसेटिलीन व अमोनियम सल्फेट यांचे उत्पादन होते. सराटव्हच्या वरच्या बाजूस व्होएस्क येथे व्होल्गा नदीवर १९६० च्या दशकात एक मोठे धरण बांधण्यात आले असून जलविद्युत्निर्मिती केंद्र उभारण्यात आले आहे. सराटव्ह हे एक प्रमुख लोहमार्ग स्थानक असून मॉस्को, व्होल्गोगाड, कझॅन व इतर ठिकाणांशी लोहमार्गांनी जोडलेले आहे. १९१९ मध्ये येथे विदयापीठाची स्थापना झाली.
चौधरी, वसंत