सरँ : बेल्जियममधील ल्येझ प्रांतातील एक शहर. लोकसंख्या ६०,४०७ (२००२ अंदाज). हे पूर्व बेल्जियममध्ये, ल्येझपासून नैऋर्त्येस १० किमी. वर, म्यूज नदीच्या काठावर वसले आहे. लोह, पोलाद व यंत्रनिर्मिती या अवजड उदयोगांचे हे प्रमुख केंद्र आहे. येथील कॉकरील पोलाद व रेल्वे एंजिन (लोकोमोटिव्ह) निर्मिती केंद्र विशेष महत्त्वाचे आहे. या उदयोगाची स्थापना इ. स. १८१७ मध्ये जॉन कॉकरील या ब्रिटिश व्यक्तीने केली. या कारखान्यातून यूरोपातील पहिले वाफेचे रेल्वे एंजिन तयार करण्यात आले (१८३५). १९५५ मध्ये अस्तित्वात आलेल्या कॉकरील–ऊगे कंपनीचे प्रधान कार्यालय सध्या ल्येझच्या बिशप वास्तूत आहे. या कंपनीचा विस्तार २०० हेक्टर परिसरात आहे. १९७९ मध्ये बेल्जियम शासन या कंपनीचे भागीदार बनले. शहरालगतच्या ॲबीमधील व्हाल सेंट-लँबर्ट हे यूरोपातील सर्वांत मोठया काचसामान निर्मिती केंद्रांपैकी एक आहे. शहराच्या परिसरात कोळसा खाणकाम व्यवसाय चालतो.
चौधरी, वसंत