सरगम : संगीतविषयक संज्ञा. भारतीय संगीतातील षड्ज, ऋषभ, गांधार इ. स्वरनामांची लघुरूपे सा, री (किंवा रे), ग, म, इत्यादी होतात. या लघू स्वरनामांना आपापल्या स्थानी योजून गायनकिया करणे, याला ‘सरगम’ करणे असे म्हणतात. सोमेश्वराच्या मानसोल्लस (११३१) गंथात स्वरनामे गाण्याच्या क्रियेचा उल्लेख ‘चतुर्मुख’ या गायनप्रकाराच्या संदर्भात केला आहे. त्यावरून सरगम करणे, ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याचे दिसून येते. रागस्वरूप निश्चित व योग्य तऱ्हेने लक्षात रहावे, या हेतूने सरगमची उपयुक्तता आहे, असे म्हणता येईल. शिवाय शब्द, अर्थ यांनी बांधले न जाता हे लघुत्व व उच्चरसुलभता, यांमुळे लयीचे अधिक विविध प्रकार जसे सरगममुळे शक्य होतात, तसेच पूर्ण व सार्थ शब्दांपेक्षा अधिक द्रूतगती आविष्कार शक्य होण्याचाही फायदा सरगममध्ये मिळतो. ⇨ ख्याल गायनात याचा सर्रास उपयोग करण्याकडे आजकाल अधिक प्रवृती दिसून येते.

पाश्चात्त्य संगीतात ‘सोल्फा’ अथवा ‘टोनिक सोल्फा’ ही सरगमला समानार्थक संज्ञा रूढ आहे. ही संगीताचे दृक्वाचन करण्याची प्रणाली आहे. १८५० च्या सुमारास जॉन कुर्वेन या इंग्लिश संगीतशिक्षकाने ही पद्धती सर्वदूर प्रसृत केली. त्यात स्वरसप्तकातील स्वरांची निदर्शक संक्षिप्त अक्षरे योजिली जातात, तसेच इतरही सांगीतिक संकेत साध्यासुध्या चिन्हांनी दर्शविले जातात. स्वरसप्तकातील प्रत्येक स्वर विशिष्ट संक्षिप्त अक्षरांनी निर्देशित करण्याच्या पद्धतीची (सोलमायझेशन) मूळ कल्पना पाश्चात्त्य संगीतात प्रथमत: इटालियन भिक्षू व संगीतज्ज्ञ ग्वीदो दी आरेत्सो (सु. ९९१-१०५०) याने अकराव्या शतकात अंमलात आणली. त्याने सर्व संगीतस्वरांचे सहास्वरी गटांत (द हेक्झॅकॉर्ड) विभाजन केले. या सहास्वरी गटांना नावे देण्यासाठी त्याने सेंट जॉनसाठी रचलेल्या एका स्तोत्रातील आदयाक्षरांची योजना केली. उदा., ut, re, mi, fa, Sol, la ही ती सहा स्वरनामे होत. नॉर्विच, इंग्लंडमधील सारा ॲन ग्लोव्हर (१७८५-१८६७) या संगीतशिक्षिकेने 1812 च्या सुमारास वरील स्वरनामे वापरून ‘टोनिक सोल्फा’ स्वरलेखन पद्धतीला जन्म दिला आणि जॉन कुर्वेन याने ही पद्धती स्वीकारून व तीत अधिक सुधारणा करून, तिचा सर्वत्र प्रसार केला. तत्कालीन सुधारित व प्रचलित ‘सोलमायझेशन’ पद्धतीत सामान्यत: पुढील स्वराक्षरे येतात : doh, ray, me, fah, soh, lah, te. त्यातील doh हे स्वरक्षर म्हणजे C असे स्थिर doh पद्धतीत (Fixed doh) धरले जाते, तसेच ते कळीचा स्वर (की नोट) म्हणून चल doh वा ‘टोनिक सोल्फा’ पद्धतीमध्ये अवलंबिले जाते. जॉन कुर्वेनने 1853 मध्ये ‘टोनिक सोल्फा असोसिएशन ’ ही संघटना स्थापन केली. ‘द टोनिक सोल्फा कॉलेज’ (कालांतराने ‘कुर्वेन कॉलेज नामांतर) १८६३ मध्ये स्थापन झाले. जॉन स्पेन्सर कुर्वेनने द स्टोरी ऑफ टोनिक सोल्फा (१८९१) या गंथामध्ये हा इतिहास दिला आहे. कालांतराने ही पद्धती मागे पडली व तिची जागा सध्याच्या प्रचलित ‘स्टाफ-रीडिंग’ संगीतलेखनपद्धतीने घेतली.

पहा : स्वरसप्तक.

रानडे, अशोक दा.