संस्कृत साहित्य : संस्कृत ही इंडो-यूरोपियन भाषाकुटुंबातील एक प्राचीन भाषा. भारतातील भिन्नभिन्न मानवगणांच्या शारीरिक वैशिष्टयांचा अभ्यास करून, नऊ उपवंशांसह जे सहा मुख्य भारतवासी मानववंश निश्र्चित केले गेले आहेत, त्यांतील ‘नॉर्डिक’ ह्या मानववंशातील लोकांनी भारताला संस्कृत वाणीची देणगी दिली, असे म्हणतात. संस्कृत भाषा बोल-णाऱ्या मानवसमाजाने ह्या भाषेतील अगदी आरंभीची साहित्यनिर्मिती केली. ⇨ ऋग्वेद,सामवेद,यजुर्वेद आणि ⇨ अथर्ववेद हे चार वेद संस्कृत साहित्यातल्या आरंभीच्या कृती होत. यांतील मात्र ऋग्वेद हा संस्कृत साहित्यातील सर्वांत प्राचीन गंथ होय. भारतविdyeच्या अभ्यासकांनी त्याचा काल इ. स. पू. सु. १५०० असा ठरविला आहे. भांडारकर प्राच्यविदया संशोधन संस्थेतील ऋग्वेदा ची तीस दुर्मिळ हस्तलिखिते जागतिक ठेवा म्हणून जतन करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रां शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) घेतला आहे. त्यामुळे त्याचा अंतर्भाव ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’ च्या यादीत झाला आहे (२००७). वेद हे हिंदूंच्या दृष्टीने धार्मिक महत्त्व असणारे गंथ होत. वेदांना ‘ संहिता ’ असेही म्हणतात. संहिता म्हणजे संग्रह. उपर्युक्त चार वेद म्हणजे कोणा एका व्यक्तीची निर्मिती नाही, तर निरनिराळ्या ऋषींनी – उदा., वसिष्ठ, विश्वामित्र, वामदेव, भारव्दाज, वसुश्रूत इ. – केलेली ती रचना आहे. तथापि वेद हे ‘अपौरूषेय ’ म्हणजे कोणी माणसाने वा ईश्वरानेही उत्पन्न केलेले नाहीत. अमुक ऋषीने अमुक एका वेदातील अमुक एक सूक्त (ऋचांचा वा पदयांचा समूह) रचले, असे जरी म्हटले जात असले, तरी तो त्या सूक्ताचा रचयिता नसून ‘ द्रष्टा ’ होय कारण त्याला ते सूक्त ‘ दिसले ’ असे श्रद्धेने मानले जाते. वर निर्दिष्ट केलेल्या चार वेदांचे संहिता, ⇨ बाह्मणे,आरण्यके व उपनिषदे असे एकूण चार प्रकारचे साहित्य आहे. ऋग्वेद हा पदयमंत्रांचा संग्रह होय. संस्कृतातील सर्वांत प्राचीन साहित्य ऋग्वेदा त आढळते. ह्या वेदात वैदिक देवतांच्या प्रार्थनेची सूक्ते आहेत. ह्या देवता म्हणजे निसर्गातल्या विविध शक्तींना दिलेली व्यक्तिरूपे आहेत. उदा., सूर्य, उषा, पर्जन्य, अग्नी, वायू इत्यादी. ह्यांखेरीज बुद्धीजन्य पण इंद्रियांना गोचर नसलेल्या इंद्रवरूणादी देवता वैदिक ऋषींनी शोधून काढल्या.[⟶ इंद्र वरूण]. त्यांच्यावरही सूक्ते आहेत. ह्या सर्व सूक्तांपैकी अनेक सूक्ते केवळ काव्यगुणांच्याच दृष्टीने नव्हे, तर विश्वविषयक चिंतनाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण आहेत. सामवेद हा ऋग्वेदा पेक्षा वेगळा नाही. ऋग्वेदा तील ज्या ऋचांवर गान म्हणायचे त्या ऋचांचा संग्रह म्हणजेच सामवेद होय. यज्ञात म्हणावयाचे गद्यमंत्र यजुर्वेदा त आहेत. ‘शुक्ल यजुर्वेद’ आणि ‘कृष्ण यजुर्वेद’ अशा यजुर्वेदा च्या दोन संहिता आहेत. यज्ञ हाच वैदिकांचा धर्म होता. होता, अध्वर्यू, उद्गाता व ब्रह्मा ह्या चार ऋत्विजांसाठी अनुक्रमे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेदअथर्ववेद हे चार वेद होते. ऋग्वेदा चे मंत्र होता म्हणतो यजुर्वेदा तील मंत्र म्हणत साक्षात आहुती देणे इ. यज्ञकर्म अध्वर्यू करतो उद्‌गाता सामे म्हणतो ब्रह्मा हा प्रमुख ऋत्विज असल्यामुळे त्याला चारही वेदांचे ज्ञान अपेक्षित असते. तो केवळ मौन धरून निरीक्षण करतो व क्वचित प्रसंगी काही ऋचा म्हणतो. अथर्ववेदा चे स्वरूप मात्र ऋग्वेद, सामवेदयजुर्वेद ह्या तीन वेदांच्या तुलनेत काहीसे वेगळे आहे. या वेदात निरनिराळे शत्रूनाशक अभिचारमंत्र (जारणमारण मंत्र) आणि इतर अमंगल (आणि मंगलही) जादूचे मंत्र मोठया प्रमाणावर संगहीत केले आहेत. ह्या वेदाला बराच काळ प्रतिष्ठा नव्हती.

प्रत्येक वेदाचे बाह्मण वा बाह्मणे असतात. हे गदय वाङ्‌मय आहे. बाह्मणगंथांत मुख्यतः यज्ञांचे विवेचन आहे. निरनिराळ्या देवतांना उद्देशून सांगितलेल्या मंत्रांचा विनियोग यज्ञकर्मांत कसा करायचा ह्याचे विवेचन बाह्मणगंथांत असते. आरण्यक म्हणजे अरण्यातच ज्या बाह्मणभागाचे किंवा वेदभागाचे पठण करावयाचे तो भाग होय. उपनिषद म्हणजे गुरूसन्निध बसून शिकावयाची विदया, असा व्युत्पत्यर्थ आहे पण रहस्य वा गूढ ज्ञान असा त्याचा रूढ अर्थ आहे.

प्रत्येक वेदाच्या संहिता सारख्या असल्या, तरी प्रत्येक वेदाचे बाह्मणगंथ व आरण्यके वेगळी आहेत. उदा., ऋग्वेदा चे ऐतरेय बाह्मणआरण्यक, कौषीतकी बाह्मणआरण्यक कृष्ण यजुर्वेदाचे तैत्तिरीय बाह्मणआरण्यक, शुक्ल यजुर्वेदाचे शतपथ बाह्मणबृहदारण्यक सामवेदा चे पंचविंश बाह्मण वा तांड्य बाह्मण, जैमिनीय बाह्मण, जैमिनीय उपनिषद्‌बाह्मण इत्यादी. ईश, केन, कठ किंवा काठक, प्रश्न, मुंडक, ऐतरेय, तैत्तिरीय, छांदोग्य, बृहदारण्यक, कौषीतकीश्र्वेताश्वतर ही दहा उपनिषदे सर्व उपनिषदांमध्ये प्राचीन होत.

वेद हे मौखिक परंपरेने जसेच्या तसे अनेक शतके कायम ठेवण्यात आले आहेत कारण पाठांतराला धार्मिक श्रद्धेने महत्त्व देण्यात आले होते. वेदांचे बौद्धीक चिंतनही वैदिक करीत होते. त्यातून शिक्षा, कल्प, व्याकरण, निरूक्त, छंद आणि ज्योतिष ही वेदांगे निर्माण झालीr.[⟶ वेद व वेदांगे].

संस्कृत साहित्यातील ह्यानंतरचा काळ म्हणजे ⇨ रामायण,महा-भारत ह्या महाकाव्यांचा ⇨ पुराणे व उपपुराणे यांचा. संस्कृत महाकाव्यांच्या परंपरेच्या अगस्थानी रामायण आणि महाभारत ही दोन ‘आर्ष’ महाकाव्ये आहेत. ‘आर्ष’ म्हणजे ऋषींनी रचिलेली. महाकवी ⇨ वाल्मीकीकृत रामायण हे आर्ष महाकाव्य मानले गेले असले, तरी संस्कृतातील काव्याच्या अभिजात आकृतिबंधाचा पहिला व उत्कृष्ट आविष्कार वा नमुना म्हणून त्याचा गौरव केला जातो. रामायण इ. स. पू. दोनशेच्या अलीकडे झाले, असे कोणीही म्हणू शकत नाही म्हणून ऐतिहासिक दृष्ट्या रामायण हा गंथ आदिकाव्य होय. भारतीय आणि विशेषत: संस्कृत काव्यरचनेचा अभिजात आकृतिबंध व पहिला आदर्श म्हणूनही रामायणा ला मान्यता मिळाल्याने वाल्मीकी हे आदयकवी ठरले. बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्घकांड आणि उत्तरकांड अशी रामायणा ची सात कांडे वा भाग असून त्यांत चोवीस हजार श्लोक आहेत. मूळ रामायण हे अयोध्याकांडापासून (दुसऱ्या कांडापासून) युद्घकांडापर्यंतच (सहावे कांड) असावे आणि बालकांड व उत्तरकांड ही नंतर टाकलेली भर (प्रक्षेप) असावी, असे संशोधकांचे मत आहे. पहिल्या आणि सातव्या कांडांत रामाला विष्णूच्या अवताराच्या पदवीस पोहोचविले आहे. त्यामुळे रामायण हा हिंदूंचा धर्मगंथ म्हणून मान्यता पावला. रामायणा च्या भिन्नभिन्न आवृत्त्या सापडतात. त्यांत मुंबईची आवृत्ती सगळ्यांत प्राचीन असावी, असे आधुनिक समीक्षक मानतात.

कृष्णव्दैपायन ⇨ व्यासां च्या महाभारता ची एकूण १८ पर्वे आहेत. ती अशी : (१) आदिपर्व, (२) सभापर्व, (३) वनपर्व, (४) विराटपर्व, (५) उदयोग पर्व, (६) भीष्म पर्व, (७) द्रोण पर्व, (८) कर्ण पर्व, (९) शल्य पर्व, (१०) सौप्तिक पर्व, (११) स्त्री पर्व, (१२) शांतिपर्व, (१३) अनुशासन पर्व, (१४) आश्वमेधिक पर्व, (१५) आश्रमवासिक पर्व, (१६) मौसल पर्व, (१७) महाप्रस्थानिक पर्व, (१८) स्वर्गारोहण पर्व. हरिवंश हे परिशिष्टवजा एक पर्व मागून जोडलेले आहे. महाभारता त नसलेली कृष्णकथा हरिवंशात विस्ताराने सांगितली आहे. महाभारता च्या अनेक पाठावृत्त्या आढळतात. तसेच या गंथाला जय, भारत आणि महाभारत अशा तीन संज्ञा दिल्या आहेत. गंथाच्या मंगलाचरणाच्याश्र्लोकातच जय हे नाव आले आहे. महाभारता च्या वेगवेगळ्या पाठांत अनेक अध्याय वा अनेक श्र्लोक कमीजास्त आहेत. कोणती पाठावृत्ती सगळ्यांत प्राचीन असावी, हे निश्चित करून पुणे येथील भांडारकर प्राच्यविदया संशोधन मंदिराने संशोधनपूर्वक महाभारता ची जुन्यातली जुनी चिकित्सक पाठावृत्ती प्रसिद्ध केली आहे (१९३३-६८).


महाभारत हे महाकाव्य इतिहासवेद म्हणून ओळखले जाते. अद्‌भुत कथानकांच्या स्वरूपात दडलेला अतिप्राचीन इतिहास त्यात सूचित केलेला आहे. भरत ह्या मानववंशीयांचा महान संगाम म्हणजे महाभारत. धीरोदात्त, पराकमी पुरूष आणि मनस्वी महनीय महिला ह्या महाकाव्याच्या केंद्रस्थानी आहेत. महाभारता च्या भीष्म पर्वातील भगवद्‌गीता हे इतिहास-पुराणात्मक वाङ्‌मयातील उच्च्तम रत्न आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीचा वैचारिक परमोत्कर्ष म्हणजे गीता होय. विश्र्वसाहित्यातील तिचे उच्च स्थान निर्विवादपणे आज मान्य झाले आहे. गीते त काही चिरंतर वैचारिक मूल्ये आहेत. गीता हा हिंदूंचा पवित्र धर्मगंथ मानला गेला आहे.

महाकाव्यानंतरचा संस्कृत साहित्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे पुराणांचा. पुराणांचे ‘ महापुराणे ’ व ‘ उपपुराणे ’ असे दोन प्रकार आहेत. पुराणे ही हिंदूंच्या धार्मिक गंथांत मोडतात. अनेकदा महापुराणांचा निर्देश करीत असताना पुराणे ही संज्ञा वापरली जाते. किंबहुना पुराणे हेच त्यांचे मूळ नाव असून नंतर निर्माण झालेल्या उपपुराणांहून त्यांचे वेगळेपण दाखविण्यासाठी त्यांना महापुराणे म्हटले जाऊ लागले. बह्म, पद्म, विष्णु, वायु, भागवत, नारदीय, मार्कंडेय, अग्नि, भविष्य, ब्रह्मवैवर्त, वराह, लिंग, स्कंद, वामन, कूर्म, मत्स्य, गरूडब्रह्मांड अशी अठरा पुराणे आहेत. काही त्यांत हरिवंशा चीही भर घालतात.

पुराणांतून जो धर्माविष्कार झाला त्यात सर्व मानवांना पारमार्थिक- दृष्टया समता देण्याची दृष्टी आढळते. पुराणे म्हणजे साधारणपथ किंवा सर्वांचा मार्ग, असा निर्देश पद्मपुराणा त आढळतो. पुराणांतील देवी आणि मुख्य देव शिव व विष्णू हे कोणताही भेदाभेद न मानता सर्वांना पावन करणारे आहेत. पुराणांतील मनोरंजक कथांनी समाजातील सर्व वर्गांना सद्‌वृत्ती, धार्मिक श्रद्धा व नीती ह्यांचे शिक्षण दिले. तसेच कथा, कीर्तन, वते, देवतोत्सव, सण इ. रूपाने धार्मिकता निर्माण केली आणि भक्तिमार्गाची स्थापना करण्यात महत्त्वाची कामगिरी बजाविली. [⟶पुराणे व उपपुराणे].

संस्कृतातील अभिजात साहित्य : हे दृश्य वा प्रेक्ष्य आणि श्रव्य असे दोन प्रकारचे आहे. दृश्य वा प्रेक्ष्य हे अभिनेय, तर श्रव्य हे अनभिनेय होय. त्यामुळे दृश्य काव्यात नाटकाच्या विविध प्रकारांचा समावेश होतो तर श्रव्य काव्यात गदय, पदय किंवा गदयपदयमिश्रित अशा साहित्याचा अंतर्भाव होतो. गदयकाव्यात कथा, आख्यायिका, नीतिकथा, लोककथा इ. येतात. पदयकाव्यात महाकाव्य, लघुकाव्य उदा., खंडकाव्य, स्तोत्रे, नीतिकाव्ये, सुभाषिते इ. येतात. गदयपदयमिश्रित श्रव्य काव्यरचनेला संस्कृतपरंपरेत ⇨ चंपूकाव्य म्हणतात.

नाटक : संस्कृत नाटकाचा उगम वैदिक ⇨ यज्ञसंस्थे पर्यंत पोहोचतो. ऋग्वेदा त नाटयकलेचा उगम आढळतो. यज्ञात निरनिराळ्या ऋत्विजांना जी कामे दिलेली असत, त्यांत गदय, पदय, अभिनय, रसात्मक भाव आणि गाणे यांचा उपयोग केला जात असे. यज्ञसंस्थेतील ह्या सर्व क्रियांचा नाटयसंस्थेच्या उगमाशी अप्रत्यक्षपणे संबंध पोहोचतो. वेदांमध्ये संवादसूक्ते आहेत. ⇨ पाणिनी च्या (इ. स. पू. पाचवे वा चौथे शतक) अष्टाध्यायी त शिलाली व कृशाश्व ह्यांच्या नटसूत्रांचा उल्लेख आहे. सीताबेंगा येथे एका गुहेत एक खोदीव उघडे नाटयगृह सापडले आहे. ब्लॉशसारख्या अभ्यासकांच्या मते ह्या नाटयगृहाचा काळ इ. स. पू. तिसरे शतक इतका प्राचीन असावा. नाटयवेद म्हणून ओळखला जाणारा भरतकृत ⇨ नाटयशास्त्र हा प्राचीनतम गंथ साधारणपणे इ. स. पू. पाचव्या शतकापासून इ. स. दुसऱ्या शतकापर्यंतच्या कालावधीत केव्हा तरी तयार झाला असावा, असे म्हटले जाते तथापि ह्या नाटयशास्त्रातील काही भाग इ. स. पू. सहाव्या शतकाइतका प्राचीन असल्याचा संभव व्यक्त केला जातो. नाटयशास्त्रा च्या मूळ संहितेत वेळोवेळी भर पडून ह्या गंथाची संहिता इ. स.च्या तिसऱ्या शतकात बऱ्याच अंशी आजच्या स्वरूपात झाली असावी, असाही तर्क केला जातो. या गंथात छत्तीस अध्याय असून एकूण श्लोकसंख्या सु. सहा हजार आहे. त्यांत नाट्याच्या विविध पैलूंचे तपशीलवार विवेचन आहे. ह्या नाटयशास्त्रा च्या दुसऱ्या अध्यायात भरताने नाटयमंडपाच्या रचनेचे जे विधान सांगितले आहे, ते पाहता नाटयमंडपाचे तंत्र यज्ञमंडपाच्या तंत्रातून विकसित झाले, असेही अनुमान करता येते.

भारतीय नाटयाचा उगम ग्रीक नाटकांपासून झाला, असे काही विद्वान मानतात. अलेक्झांडरच्या स्वारीबरोबर अनेक ग्रीक कलाकार भारतात आले होते आणि भारताच्या सीमेवर अनेक ग्रीक राज्यही होती. त्यांचे अनुकरण भारतीयांनी केले असावे हे त्यांचे मत स्वीकारार्ह ठरलेले नाही. ह्याची कारणे अशी : संस्कृत नाटकांची शैली व स्वरूप ग्रीक नाटकांच्या शैलीहून व स्वरूपाहून भिन्न आहे. भारतीय नाटकातील पात्रस्वभावरेखा उत्कट व्यक्ति-वैशिष्टयाने भारलेली नसते. त्यातील पात्रे म्हणजे मनुष्यस्वभावाचे सामान्य नमुने असतात, हाडामासांची जिवंत माणसे त्यात क्वचित आढळतात. कथापरिपोष शापासारख्या बाह्य निमित्तावर अवलंबून असतो. ग्रीक अभिनय व हिंदी अभिनय यांतही कमी साम्य आहे. तसेच-(१) सूत्रधार व नायिका यांचा प्रारंभीचा संवाद, (२) भिन्न भाषांचे मिश्रण, (३) गदयपदयांचा संगम, (४) रंगभूमीचा साधेपणा आणि (५) विदुषकाचे अस्तित्व या गोष्टी ग्रीक नाटकांच्या पूर्वीची अवस्था सूचित करतात. यज्ञात किंवा धार्मिक उत्सव-प्रसंगी पौराणिक कथा अभिनयपूर्वक गाऊन दाखवीत असत त्यातून क्रमाने संस्कृत नाटकांचा हळूहळू विकास झाला, या अनुमानास बळकटी प्राप्त होते.

नाटक हा रूपकाचा एक प्रकार आहे. रंगभूमीवर प्रयोग करण्याजोग्या नाटयप्रकारांना रूपक ही सामान्य संज्ञा आहे. संस्कृतात दहा रूपके आहेत, ती अशी : (१) ⇨ नाटक, (२) प्रकरण, (३) अंक किंवा उत्सृष्टि-कांक, (४) व्यायोग, (५) ⇨ भाण, (६) समवकार, (७) वीथी, (८) ⇨ प्रहसन, (९) डिम व (१०) ईहामृग. ह्या दहा रूपकांत काही अभ्यासक नाटिका व ⇨ सट्टक ह्यांचा अंतर्भाव करतात आणि एकूण बारा रूपके मानतात.


प्रकरण हा रूपकप्रकार बाह्यतः नाटकासारखाच असला, तरी नाटक आणि प्रकरण ह्यांच्यांत दोन बाबतींत फरक आहे. (१) प्रकरणाचे कथानक कवीने आपल्या कल्पनाशक्तीने निर्मिलेले, स्वतंत्र असावे. (२) प्रकरणाचा नायक राजा नव्हे, तर ब्राह्मण, वर्णिक, अमात्य असा कुणीतरी असावा. अंक वा उत्सृष्टिकांक हा एक अंकी असावा. त्यात करूण रसाला प्राधान्य असावे. व्यायोगात नायक व कथा ही दोन्ही विख्यात असावी लागतात. त्यात स्त्रिया थोडया व पुरूष बरेच असले पाहिजेत. हे स्त्री-पुरूष दिव्य नसावेत. यात युद्ध, संघर्ष वगैरे असावेत पण ते स्त्रीच्या संदर्भात असू नयेत. तो एक अंकी असावा. संस्कृतात ⇨ भासा चे मध्यमव्यायोग आहे. जामदग्न्यजय आणि सौगन्धिकाहरण ही व्यायोगाची अन्य काही उदाहरणे होत. भाण ही एकांकी नाटयरचना असून ती ‘ एकहार्य ’ म्हणजे एकाच पात्राने सादर करावयाची असते. हे पात्र म्हणजे धूर्त किंवा विट. समवकार हे देवासुरांच्या कृत्यांवर आधारित असते. ह्याचा नायक उदात्त व प्रख्यात असतो. ह्याचा प्रयोग अठरा घटका चालला पाहिजे, अशी अपेक्षा असे. ह्याचे अंक तीन. ह्यात तीन प्रकारचे कपट, तीन प्रकारचे विद्रव म्हणजे भयानक अनर्थ, तसेच धर्मशृंगार, अर्थशृंगार आणि कामशृंगार असे तीन प्रकारचे शृंगार असतात. ज्यात धर्मामुळे नायिका प्राप्त होते, वा नायिका प्राप्त झाल्यामुळे धर्म सिद्घ होतो, तो धर्मशृंगार. अर्थप्राप्तीच्या हेतूने केलेली रती म्हणजे अर्थशृंगार आणि युवक-युवतीच्या प्रेमातून उत्पन्न झालेला आवेगी शृंगार म्हणजे कामशृंगार. मात्र ह्यातील स्त्री परस्त्रीविवक्षित असते. पयोधिमंथन वा समुद्रमंथन ह्याचा समवकाराचे उदाहरण म्हणून निर्देश केला जातो. संस्कृत साहित्यात समवकाराचे अन्य उदाहरण नाही. वीथी हा काल्पनिक कथावस्तू असलेला एकांकी नाट्यप्रकार आहे. ह्यात प्रधान रस शृंगार असून त्याला पोषक अशा प्रकारे इतर रस येऊ शकतात. ह्यात पात्रे अगदी मोजकी – म्हणजे एक वा दोन असतात. मालतिकाइन्दुलेखा ह्या दोन प्राचीन वीथी होत. ⇨ रामपाणिवाद कृत (१७०७-७५) चंद्रिकालीलावती ही वीथीची उदाहरणे होत. शुद्घ आणि संकीर्ण असे संस्कृत प्रहसनाचे दोन प्रकार भरताने सांगितलेले आहेत. हे दोन्ही प्रकार हास्यरसप्रधान असतात. शुद्घ प्रहसनात एकाच व्यक्तीचे हास्यास्पद वर्तन वा तिच्या हास्यास्पद कृती दाखविलेल्या असतात. म्हणून हा शुद्घ प्रहसन-प्रकार. संकीर्ण प्रहसन-प्रकारात मात्र वेश्या, चेट (दास), नपुंसक, विट, धूर्त बंधकी (व्यभिचारिणी) इ. हीन (क्षुद्र) पात्रांचे चित्रण असते. शशिविलास, सागरकौमुदी, कंदर्पकेलि ही शुद्घ प्रहसनाची उदाहरणे असून भगवतज्जुक, सैरन्धिका आणि लटकमेलक ही संकीर्ण प्रहसनाची उदाहरणे होत. डिम ह्या नाट्यप्रकारात चार अंक असतात आणि त्यात रौद्र रस प्रधान असतो. शृंगार वा हास्य ह्यांना स्थान नसते. ह्यात सोळा पात्रे असून ती बहुधा देव, राक्षस, यक्ष, पिशाच्चे ह्यांच्यापैकी असतात. एकंदर कथानकाचा काळ चार दिवसांचा असतो. त्रिपुरदाह हे डिम ह्या नाटयप्रकाराचे उल्लेखनीय उदाहरण होय. उपलब्ध संस्कृत साहित्यात ईहामृगाचे उदाहरण नाही. त्याचे स्वरूप थोडक्यात असे सांगितले जाते : दुष्प्राप्य अशी एखादी दैवी स्त्री प्राप्त करून घेण्यासाठी होणाऱ्या संघर्षाभोवती ईहामृगाचे कथानक गुंफलेले असते. त्या स्त्रीसाठी युद्घे होतात आणि अखेरीस नायकाचा वध होतो. त्यातील एकूण पात्रसंख्या बारा असते, असे ⇨ साहित्यदर्पण कार ⇨ विश्वनाथा ने म्हटले आहे.

नाटिकेला उपरूपक मानलेले आहे. नाटक आणि प्रकरण ह्या दोन रूपकप्रकारांचा संगम नाटिकेत झालेला दिसून येतो. कथानक कविनिर्मित असते (प्रकरण) आणि नायक राजा असतो (नाटक). तीत स्त्रीपात्रे बहुसंख्य असतात. नाटिकेचे अंक चारच असावे असा संकेत आहे. सट्टक हे काहींच्या मते रूपक, तर अन्य काहींच्या मते उपरूपक आहे. भरताच्या नाटयशास्त्रात आणि धनंजयाच्या दशरूपका त रूपके व नाटिका ह्यांचे विवेचन आहे परंतु सट्टकाचा साधा उल्लेखही नाही. शिवाय सट्टक हे संपूर्णपणे प्राकृतात असते.[⟶ सट्टके].

संस्कृत नाटकांचे कालौघात टिकलेले जवळजवळ बारा नमुने इ. स. पू. ६०० पासून आठव्या शतकापर्यंतच्या काळातील आहेत. संस्कृत नाटक-कारांपैकी भास (काळ निश्र्चित नाही), ⇨ कालिदास (अंदाजे इ. स. ४०० ते ६०० दरम्यान), ⇨ विशाखदत्त (सहावे-सातवे शतक ?), ⇨ शूद्रक (काळ अनिश्चित), ⇨ भवभूती (अंदाजे सातव्या शतकाची अखेर ते सु. ७२५) हे नाटककार प्रमुख होत. भासाची म्हणून मानलेली तेरा नाटके १९१२ ते १९१५ ह्या कालखंडात टी. गणपतिशास्त्री ह्यांना मिळाली. ती त्रिवेंद्रम येथे प्रसिद्ध झाली. तत्पूर्वी भासाचे केवळ नाव शिल्ल्क होते. ती तेरा नाटके अशी : (१) स्वप्नवासवदत्त, (२) प्रतिज्ञायौगंधरायण, (३) पंचरात्र, (४) दूतघटोत्कच, (५) अविमारक, (६) बालचरित, (७) मध्यमव्यायोग, (८) कर्णभार, (९) ऊरूभंग, (१०) दूतवाक्य, (११) अभिषेक, (१२) चारूदत्त आणि (१३) प्रतिमा. ही नाटके भासाचीच आहेत किंवा काय ह्याबद्दल विव्दानांत मतभेद असले, तरी या सर्व नाटकांची शैली व भाषा समान आहे. अ. द. पुसाळकर यांनी भासाच्या सर्व नाटकांचे परिशीलन करून ती इ. स. पू. दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकातील असावीत असे अनुमानिले आहे.

भासानंतर दुसरा प्रसिद्ध नाटककार म्हणजे कालिदास होय. एक महाकवी म्हणून, तसेच नाटककार या दृष्टीनेही त्याचे स्थान उच्च्तम आहे. त्याच्या ⇨ मालविकाग्निमित्र,विकमोर्वशीय आणि ⇨ अभिज्ञान शाकुंतल ह्या तीन नाटकांमुळे त्याची कीर्ती अजरामर झाली आहे. ह्यांतही अभिज्ञान शाकुंतल या नाटकाला आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली आहे. विशाखदत्ताचे ⇨मुद्राराक्षस ह्या सात अंकी नाटकात प्रेमकथेचा लवलेशही नाही. चंद्रगुप्त मौर्य आणि त्याचा अमात्य चाणक्य ह्या ऐतिहासिक व्यक्तींच्या राजकीय जीवनावर आविष्कृत केलेले हे एक नाटक असून, नंद राजाचा मंत्री राक्षस याला वश करण्याचे चाणक्याने केलेले हरेक प्रयत्न दर्शविले आहेत.

शूद्रकाच्या ⇨ मृच्छकटिक नाटकातील काही स्थळांशी मुद्राराक्षसा चे किंचितसे साम्य आढळते. त्याचप्रमाणे मृच्छकटिका तील आणि भासाच्या चारूदत्ता तील कथानक एकच असल्यामुळे मृच्छकटिक नाटकाबाबत वादग्रस्तता निर्माण झाली. तसेच भारतीय नाटयशास्त्राची विहित मर्यादा न पाळता रचलेले हे नाटक आहे. या मर्यादेप्रमाणे वेश्येला (गणिका) नायिकेचे काम देता येत नाही, ते यात दिले आहे. मात्र भिन्न पात्रांच्या वैशिष्टयपूर्ण स्वभावदर्शनामुळे मृच्छकटिक नाटक रसिकमान्य ठरले आहे. भवभूतीची महावीरचरित, मालतीमाधव आणि ⇨ उत्तररामचरित ही तीन नाटके संस्कृत साहित्याची भूषणे होत. त्यांपैकी उत्तररामचरित हे सर्वोत्कृष्ट असून, संस्कृत साहित्याला ललामभूत ठरले आहे. करूण रसाची सर्वोत्कृष्ट व प्रभावी निर्मिती उत्तररामचरिता त आढळते. त्याच्या नाटकांत विदूषक कुठेच आढळत नाही, हेही त्याचे एक वैशिष्टय आहे. अन्य नाटककारांपैकी ⇨ भट्टनारायणा चे (इ. स.च्या सातव्या शतकाचा उत्तरार्ध किंवा आठव्याचा पूर्वार्ध) ⇨ वेणीसंहार हे वीररसप्रधान सहा अंकी नाटक महाभारतातील द्रौपदीच्या विटंबनप्रसंगाने उद्‌भवलेल्या सूडाच्या कथानकावर आधारलेले आहे. गौडी रीतीचे हे नाटक वीररसात्मक असून नाटयशास्त्रानुरूप पंचसंधींच्या अनेक भेदांची अभिव्यक्ती त्यात आढळते. वत्सदेशाचा उदयन राजा व परिचारिका सागरिका ह्यांच्या प्रेमकथेवर आधारलेल्या रत्नावलि आणि ह्याच धर्तीच्या कथानकावरचे प्रियदर्शिका ह्या दोन नाटिका आणि जीमूतवाहनाच्या दंतकथेवर आधारलेले नागानंद हे नाटकही ⇨ सम्राट हर्षवर्धना ची निर्मिती होय. नागानंदा ची कथा मूळ विदयाधर जातका तील तथापि बृहत्कथे त आलेले तिचे रूपांतर हर्षाने आपल्या नाटकासाठी घेतले आहे.


राजनैतिक कथानकावर आधारित कौमुदिमहोत्सव नावाचे एक पाच अंकी स्त्रीकर्तृक नाटक उपलब्ध झाले आहे पण त्याच्या लेखिकेबद्दल आणि कालाबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत. ⇨ दिङ्नाग नावाच्या बौद्ध पंडिताने कुन्दमाला नावाचे एक सहा अंकी नाटक लिहिले आहे (पाचवे शतक). उत्तररामचरिता च्या कथानकाची ह्या नाटकात पुनरूक्ती झाली आहे. उमामहेश्वरांचा विवाहप्रसंग हा पार्वती-परिणय ह्या नाटकाचा आधार आहे. हे नाटक ⇨ बाणभट्टा च्या नावावर मोडत असले, तरी ते वस्तुत: वामनभट्ट बाणाचे (चौदावे-पंधरावे शतक) आहे. मुरारी (सु. ७५०) ह्या पंडित कवीने रामकथेवर अनर्घराघव ह्या सात अंकी नाटकाची उभारणी केली असून ताटकावधापासून तो रामराज्याभिषेकापर्यंतचा  कथाभाग ह्या नाटकात आहे. वीर आणि अदभुत ह्या दोन रसांना ह्या नाटकात प्राधान्य आहे. रामायणा चे नाटयमय रूपांतर असलेले दामोदर मिश्रकृत हनुमन्नाटक हे चौदा अंकी महानाटक आहे. थोडे गदय, पुष्कळ पात्रे आणि विपुल श्र्लोक असे ह्या नाटकाचे विलक्षण स्वरूप आहे. माउराज (प्राकृत) – मातृराज किंवा अनंगदर्प नावाच्या राजाचे तापसवत्सराज हे नाटक वत्सराज उदयनाच्या कथानकावर आधारलेले आहे. या सहा अंकी नाटकाची संविधानकरचना भासाच्या स्वप्नवासवदत्त सारखीच आहे. कविराज ⇨ राजशेखरा ने (नववे व दहावे शतक) बालरामायण, बालभारत, विद्धशालभंजिका आणि ⇨ कर्पूरमंजरी ही चार नाटके लिहिली. बालरामायण हे दहा अंकी महानाटक शिथिल रचनेचे असून त्यात शार्दूलविकीडित आणि स्त्रग्धरा या प्रदीर्घ वृत्तांतले ७४१ श्लोक आहेत. बालभारत नाटकास प्रचण्डपाण्डव असेही नाव असून त्याचे दोनच अंक उपलब्ध आहेत. विद्धशालभंजिका ही चार अंकी नाटिका एका राजाच्या प्रणयकथेवर आधारलेली आहे. कर्पूरमंजरी ह्या चार अंकी सट्टकाची कथा रत्नावली प्रमाणे आहे. माहाराष्ट्री आणि शौरसेनी या प्राकृत भाषांत जवळजवळ हे संपूर्ण नाटक रचले आहे. संस्कृत आणि प्राकृत भाषांत शुद्ध व सरळ वृत्तरचनेचे प्रावीण्य हाच राजशेखराचा मुख्य गुण आहे परंतु त्यात उच्च अभिरूची व मौलिकता यांचा अभाव आहे. क्षेमीश्वराच्या (९००) नैषधानंद ह्या सात अंकी आणि चण्डकौशिक ह्या पाच अंकी नाटकात अनुक्रमे नलदमयंतीकथा आणि हरिश्चंद्रकथा आली आहे. कनौजचा राजा महीपाल ह्याच्या राजसभेत हा कवी होता, अशी माहिती मिळते. दहाव्या शतकात झालेल्या कुलशेखर ह्या केरळीय राजाच्या तपतीसंवरण (सहा अंक) आणि सुभद्राधनंजय (पाच अंक) ह्या दोन नाट्यकृती उपलब्ध आहेत. पहिले नाटक संवरण राजा आणि तपती यांच्या प्रणयावर आधारलेले, पण शिथिल रचनेचे असून दुसरे महाभारता तील कथेवर आधारित आहे. शक्तिभद्रा हा वैदर्भी शैलीचा कवी आठव्या शतकाच्या अखेरीस झाला. त्याचे आश्चर्यचूडामणि हे वैशिष्टपूर्ण नाटक रामकथेवर आधारलेले आहे. ⇨ प्रबोधचंद्रोदय हे सहा अंकी रूपकनाटय अव्दैत तत्त्वज्ञानावर आधारित आहे. अव्दैत तत्त्वज्ञान आणि विष्णुभक्ती ह्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न ह्यात आहे. यात प्रवृत्ती, निवृत्ती, मोह, विवेक अशा अमूर्त संकल्पना व्यक्तिरूपाने साकार केल्या आहेत. शांतरसाचा प्रयोग म्हणून ह्या नाटकाची निर्मिती झाल्याचे नाटकीय प्रस्तावनेत म्हटले आहे तथापि यात शृंगार आणि हास्य हे रस व भक्ती हा भाव आढळतो. हे नाटक अकराव्या शतकाच्या उत्तरार्धात कृष्णमिश्र या कवीने लिहिले. यश:पालाचे मोहपराजय (तेरावे शतक), वेंकटनाथाचे संकल्पसूर्योदय (चौदावे शतक) आणि कर्णपूराचे चैतन्यचंद्रोदय (सोळावे शतक) ही ह्या नाटकाचीच अनुकरणे होत. अशाच प्रकारची रूपकात्मक नाटके म्हणून भूदेव शुक्ललिखित धर्मविजय (सोळावे शतक) हे पाच अंकी नाटक, वेदकवी (अठरावे शतक) ह्याचे विदयापरिणयजीवानंद अशी दोन सात अंकी नाटके, मैथिल गोकुळनाथ (सतरावे शतक) ह्याचे अमृतोदय हे पाच अंकी नाटक, सामराज दीक्षिताचे श्रीदामचरित हे पाच अंकी नाटक आणि वरदाचार्य ह्याचे यतिराजविजय किंवा वेदान्तविलास ह्यांचा उल्लेख करता येईल. गीतगोविंद कार जयदेवाहून भिन्न असलेल्या या जयदेवाचे (सु.१२००) प्रसन्नराघव (सात अंक) हे एक चांगले नाटक आहे. ते रामकथेवर रचलेले असून त्यातील पदलालित्य, रचनासौंदर्य आणि काव्य परिणामकारक आहे. हे नाटक विद्वन्मान्य आहे. कौरवांनी पळवि-लेल्या विराटाच्या गाई परत मिळविणाऱ्या पार्थाचा पराक्रम हा प्रल्हाददेव याने लिहिलेल्या पार्थपराक्रम ह्या व्यायोगाचा विषय आहे. ह्याच कथेवर कांचनाचार्य ह्याने धनंजयविजय हा व्यायोग रचिलेला आहे.

वत्सराजाने बाराव्या शतकात सहा रूपकप्रकारांत सहा नाटके लिहिली. ती अशी : (१) किरातार्जुनीयव्यायोग, (२) कर्पूरचरित (एकांकी भाण), (३) हास्यचूडामणी (एकांकी प्रहसन), (४) रूक्मिणीहरण (चार अंकी ईहामृग), (५) त्रिपुरदाह (तीन अंकी डिम), (६) समुद्रमंथन (तीन अंकी समवकार). तेराव्या शतकात रविवर्म्याने कृष्णपुत्र प्रद्युम्नाची कथा प्रद्युम्नाभ्युदय ह्या नाटकात हरिवंश आणि पुराणे यांच्या आधारे रंगविली आहे. सतराव्या शतकाच्या मध्याला झालेल्या महादेव ह्या दक्षिणेतील नाटककाराने अद्भुतदर्पण ह्या दहा अंकी नाटकात एका जादूच्या आरशाची योजना करून अंगदशिष्टाईपासून तो रामराज्याभिषेकापर्यंतची कथा रंगदार, मनोहर व नाट्यमय केली आहे. ⇨ हेमचंद्रा चा शिष्य रामचंद्र ह्याने नलविलास हे सात अंकी नाटक नलकथेवर लिहिले असून निर्भयभीम हा एकांकी व्यायोग बकासुरकथेवर आधारलेला आहे. द्रौपदी-स्वयंवराची कथा त्याच नावाच्या एका दोन अंकी नाटकात विजयपालाने रंगविली आहे. भीम आणि हनुमान यांच्यातील संघर्षावर आधारलेल्या दोन व्यायोगांपैकी पहिला व्यायोग सौगन्धिकाहरण हा विजयपालाने रचिला आहे, तर दुसऱ्याचे कर्तृत्व नीलकंठ ह्या केरळीय नाटककाराकडे जाते.

कृष्णकथांवरील किरकोळ नाटकांत रामचंद्राचे यादवाभ्युदय, अनंत- देवाचे कृष्णभक्तिचंद्रिका, त्रावणकोरच्या रामवर्मा ह्यांचे रूक्मिणीपरिणय, सुंदरराजाचे वैदर्भी वासुदेव, शेषचिंतामणीचे रूक्मिणीहरण, कायस्थ मथुरा-दासाची वृषभानुज ही चार अंकी नाटिका, शेषकृष्णाचे कंसवध हे सात अंकी नाटक ह्यांचा समावेश होतो. शिवाय सोळाव्या शतकाच्या सुमारास बंगाल-बिहार-ओरिसामधील चैतन्य संप्रदायाची विदग्ध माधव (सात अंक), ललितमाधव (दहा अंक), दान केलिकौमुदी (भणिका), जगन्नाथ-वल्ल्भ (पाच अंक) ही नाटके निर्माण झाली. रतिमन्मथ (पाच अंक) नावाचे नाटक जगन्नाथ नावाच्या एका पंडिताने लिहिले. सत्यहरिश्चंद्र (पाच अंक) हे हरिश्चंद्रतारामती कथेवरचे नाटक रामचंद्रकृत आहे. अनंगवती, इन्दुलेखा, कौशलिका वगैरे नाटकांची फक्त नावेच आढळतात. संस्कृत साहित्यात फार थोडया नाटिका आहेत. त्यांचे कथानक काल्पनिक वा अर्ध-ऐतिहासिक अशा आंतरगृहाशी संबद्ध विषयांवर घेतलेले आहे. काश्मीरी पंडित ⇨ बिल्हणा ची कर्णसुंदरी ही नाटिका चार अंकी असून त्यात अनहिलवाडच्या राजाच्या विवाहाचे एका रोमांचक दंतकथेच्या आधारे प्रदर्शन केले आहे. ते रत्नावली आणि विद्धशालभंजिका यांनाच नवा घाट दिलेले रूपांतर होय. याच धर्तीवर विजयश्री किंवा पारिजातमंजिरी ही मदन बालसरस्वती (तेरावे शतक) याने नाटिका लिहिली आहे. अशीच नाटिका सोमदेव याने ललितविगहराजनाटक या शीर्षकाने लिहिली आहे. त्यात चाहमान राजा विशालदेव आणि इंद्रपूरची राजकन्या देशलदेवी यांची प्रेमकथा हा प्रमुख विषय आहे. या नाटकाचा अजमीर येथील शिलालेखात काही भाग अवशिष्ट आहे. याचा आदर्श घेऊन विदयानाथ याने प्रतापरूद्रकल्याण हे अभिनव नाटक लिहिले. त्यात त्याने वरंगळच्या राजाच्या स्तुतीबरोबरच आपला नाटकलेविषयीचा दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. रामचंद्राने नाटयदर्पणा त उल्लेखिलेल्या चार प्रकरणांपैकी कौमुदिमित्रानंद हे फक्त उपलब्ध आहे. मल्लिकामारूत हे उद्दण्डिन ह्याचे मालतीमाधवा चे अनुकरण करणारे प्रकरण. अंगसेन हरिनन्दी, मल्लिका मकरन्द, रोहिणी मृगांक आणि कौमुदिमित्रानंद इ. प्रकरण नाटके उल्लेखित आहेत पण शेवटचे एक सोडून उर्वरित सर्व आज लुप्तप्राय आहेत. वातावरण आणि वृत्ती या दृष्टीने मृच्छकटिका सारखी रचना असलेले वररूचि याचे उभयाभिसारिका, शूद्रक याचे पद्मप्राभृतक, ईश्वरदत्त याचे धूर्तविटसंवाद आणि श्यामिलक ह्याचे पादताडितक ही चार भाणे ⇨ चतुर्भाणी म्हणूनच प्रसिद्ध आहेत. मत्तविलास हे महेंद्र विक्रमवर्मा ह्याचे एकांकी प्रहसन दाक्षिणात्य असून एका मदयपी कापालिकाची कथा त्यात आहे.


वामनभट्ट बाणाचे शृंगारभूषण, वरदाचार्य ह्याचे वसंततिलका, रामचंद्र दीक्षिताचे शृंगारतिलक, नल्ल दीक्षिताचे शृंगारसर्वस्व, कोटिलिंगपूरम् येथील युवराजाचे रससदन, रंगाचार्याचे पंचबाणविजय, शंकराचे शारदातिलक, श्रीनिवासाचार्याचे रसिकरंजन आणि काशिपती कविराज ह्याचे मुकुंदानंद हे सर्व भाण ह्या नाटयप्रकारातील असून पुष्कळसे दाक्षिणात्य आहेत. या भाणांमध्ये कर्पूरचरित हा भाण एका जुगारी व्यक्तीच्या गणिके बरोबरच्या प्रेमावर बेतला आहे.

प्रहसन हा प्रकारही प्राचीनांनी पुष्कळ हाताळलेला असला, तरी त्यातले फार थोडे साहित्य उपलब्ध होते व इतर गंथांतून त्यांचा उल्लेख आढळतो. उदा., भगवद अंजुकीय हे प्रहसन. दामकप्रहसन हे अंशतः उपलब्ध असून नाटवाटप्रहसन हे यदुनंदनाचे प्रहसन फार नंतरचे असावे. कविराज शंखधर (बारावे शतक) ह्याचे लटकमेलक हे धूर्तपरिषदेवरील प्रहसन हीन अभिरूचीचे दयोतक आहे. मैथिल ज्योतिरीश्वर  कविशेखर ह्याचे धूर्तसमागम ह्याच धर्तीचे आहे. जगदीश्वराचे हास्यार्णव हे दोन अंकी प्रहसन समाजातील लबाड लोकांच्या उपद्व्यापांवर रचिलेले आहे. सतराव्या शतकाच्या अखेरीस सामराज दीक्षिताने लिहिलेले धूर्तनाटक ह्याच प्रकारात मोडते. एकूण प्रहसनांतून तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर जसा प्रकाश पडतो, तद्वतच प्रणयाराधना आणि उत्तान शृंगार यांचे दर्शन होते. या प्रहसनांचा काळ निश्र्चित नसला, तरी मध्ययुगात अकराव्या-बाराव्या शतकांत ती लिहिली गेली असावीत. हास्यचूडामणी या प्रहसनात भागवत धर्माच्या गुरूची निर्भर्त्सना केली आहे.

अन्य नाटयकृतींत सुभटाचे दूतांगद हे आख्यानकाव्य आणि नाटक यांचे विचित्र मिश्रण आहे. अंगदशिष्टाईकथा ही त्याचा आधार आहे. मेघ-प्रभाचार्याचे धर्माभ्युदय छायानाटक म्हणून ओळखले जाते तर तीन प्रवेशांचे एकांकी रूक्मिणीपरिणय, दोन अंकी रामाभ्युदय, दोन अंकी पांडवाभ्युदय ह्यांनाही छायानाटकच म्हणतात परंतु त्यांत खास असे रचनावैशिष्टय आढळत नाही. अशाच प्रकारची कोणत्याही खास नाट्यप्रकारात न बसणारी हरिदूत, आनंदलतिका आणि चित्रयज्ञ ही नाटके उपलब्ध आहेत. उमापती उपाध्याय ह्यांचे पारिजातहरण हे नाटक वैशिष्टयपूर्ण मानले जाते. रामचंद्र दीक्षिताचे (सतरावे शतक) जानकीपरिणय हे मध्ययुगीन संस्कृत वाङ्‌मयातील अखेरचे नाटक म्हणावे लागेल.

महाकाव्ये : पाणिनी हा पहिला महाकवी, असे म्हटले जाते पण हा महाकवी पाणिनी अष्टाध्यायी चा कर्ता व्याकरणकार भगवान पाणिनी आहे, असे अदयाप निःसंशयपणे सिद्ध झालेले नाही. त्याने पातालविजय अथवा जांबवंतीविजय हे महाकाव्य लिहिले असल्याचे काही विद्वान म्हणतात पण ते महाकाव्य आज उपलब्ध नाही. मात्र त्यातील काही श्र्लोक अन्यत्र उद्‌धृत केल्याचे आढळते पण ज्याचे महाकाव्य उपलब्ध आहे, असा प्राचीन महाकवी म्हणजे ⇨ अश्र्वघोष (इ. स.चे पहिले शतक) होय. त्याचे बुद्धचरित हे महाकाव्य सर्वमान्य आहे. मात्र ते अंशत:च उपलब्ध आहे. उपलब्ध महाकाव्यात बुद्धाच्या आत्मसाक्षात्कारापर्यंतची कथा आलेली आहे. सौंदरानंद हे अश्र्वघोषाचे दुसरे महाकाव्य संपूर्णतः उपलब्ध असून त्याच्या अठरा सर्गांत गौतमबुद्धाचा भाऊ सुंदर किंवा नंद याची जीवनकथा वर्णिली आहे.

संस्कृतातील ख्यातनाम पंचमहाकाव्यांपैकी कालिदासाची ⇨ कुमारसंभव आणि ⇨ रघुवंश ही दोन महाकाव्ये विख्यात आहेत. कालिदासाची प्रतिभासृष्टी या काव्यांत प्रकट झाली आहे. कुमारसंभवा त शिवपार्वतीचा विवाह आणि कार्तिकेयाचा जन्म हा कथाभाग आला आहे. रघुवंश हे एकोणीस सर्गांचे महाकाव्य असून त्यात रघुकुलातील दिलीप, रघू , अज, दशरथ, राम यांसारख्या रघुवंशीयांच्या जीवनप्रसंगांचे वर्णन आढळते. रसोत्कर्ष, अलंकार-प्राचुर्य, प्रसाद आणि माधुर्य इ. काव्यगुणांमुळे रघुवंश  रसिकमान्य आहे.

पाशुपतास्त्र प्राप्त करून घेण्यासाठी अर्जुनाने केलेली तपश्चर्या हा महाभारता तील कथाभाग भारवीच्या ⇨ किरातार्जुनीय (अठरा सर्ग) या महाकाव्याचा विषय आहे. मात्र भारवीने त्यात अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. भारवीची भाषाशैली पांडित्यपूर्ण, अधिक क्लिष्ट परंतु ओजस्वी व गंभीर आहे. अर्जुन, भीमसेन, धर्मराज व द्रौपदी ह्यांचे व्यक्तित्व ठसठशीतपणे डोळ्यांपुढे ठेवण्याचे भारवीचे कौशल्य प्रशंसनीय आहे.

माघ कवीचे ⇨ शिशुपालवध हे वीस सर्गांचे महाकाव्य महाभारता तील कथेवर आधारित आहे. माघाचे प्रकांड पांडित्य व भाषाप्रभुत्व महाकाव्यात ठिकठिकाणी दृग्गोचर होते. ⇨ श्रीहर्ष या दार्शनिक कवीने लिहिलेले ⇨ नैषधीयचरित हे संस्कृतातील पंचमहाकाव्यांपैकी पाचवे महाकाव्य. महाभारता तील नलोपाख्यानावर ते आधारित आहे. या महाकाव्याचे बावीस सर्गच उपलब्ध असून त्यात नलदमयंतीच्या स्वयंवरापर्यंतचा भाग समाविष्ट आहे. पांडित्यपूर्ण व कल्पनाप्रधान अशा या महाकाव्यात श्रीहर्षाचे पदलालित्य, अलंकरणाच्या अंगाची दिमाखदार योजना, श्र्लेष-यमकाच्या चमत्कृती आणि भाषासौष्ठव हे गुण जाणवतात. तसेच त्यात अधूनमधून भावगीताचेही अंश सापडतात.

नवव्या शतकातील काश्मीरी पंडित रत्नाकर ह्याचे हरविजय हे ५० सर्गांचे महाकाव्य त्याच्या वृत्तप्रभुत्वाची साक्ष देते. शंकराने अंधकासुराचा केलेला वध, हा त्या महाकाव्याचा विषय आहे. काश्मीरी कवी शिवस्वामीन् ह्याचे कप्फिणाभ्युदय हे २० सर्गांचे महाकाव्य बुद्धधर्मांच्या महतीचे वर्णन करते. शंकर-त्रिपुरासुर युद्धाचे कथानक असलेले २५ सर्गांचे श्रीकण्ठचरित रचणारा महाकवी मङ्‌ख हाही काश्मीरीच होता. ⇨ क्षेमेंद्रा चे दशावतारचरित ही रचना महाकाव्य आणि स्तोत्रकाव्य यांच्या सीमेवर उभी आहे. काश्मीरी कवींपैकी अभिनंदकवी (नववे-दहावे शतक) ह्याने दंबरीकथासार नावाचे सर्गबद्घ काव्य लिहिले. बाणभट्टाच्या कादंबरी चे हे श्र्लोकवृत्तातले सार आहे. हे खरे तर महाकाव्य नव्हे. त्याचे आठ सर्ग आहेत म्हणूनच त्याला महाकाव्य म्हणावे लागेल. महाकाव्याची इतर लक्षणे विशेषत्वाने त्यात आढळत नाहीत. भौमकाने सातव्या शतकात काश्मीरात रावणार्जुनीय किंवा अर्जुनरावणीय हे काव्य महाकाव्याच्या धर्तीवर लिहिले आहे. कार्तवीर्य अर्जुन आणि रावण यांच्या संगामाची रामायणा तील कथा ह्या काव्यात वर्णिली आहे.

श्लेष अलंकाराचा व भाषाप्रभुत्वाचा प्राचुर्याने वापर करून नवव्या शतकात कविराजनामक कवीने राघवपांडवीय हे महाकाव्य रचिले. रामायण आणि महाभारत यांच्या कथा एकाच वेळी सांगण्याचे कौशल्य कवीने ह्या काव्यात दाखविले आहे. शब्दांच्या कसरतीमुळे क्लिष्ट व चमत्कृतिपूर्ण झालेल्या या काव्याची नंतरच्या काळात नीरस अनुकरणे झाली.


विक्रमाङकदेवचरित (अकरावे शतक) ह्या १८ सर्गांच्या महाकाव्यात बिल्हणाने लिहिलेल्या महाकाव्याचा विषय कल्याण (णी) च्या चालुक्य राजांच्या-विशेषतः सहावा विक्रमादित्य त्रिभुवनमल्ल् याच्या कर्तृत्वाचा  इतिहास आहे. ह्या महाकाव्याच्या अठराव्या सर्गात त्याने स्वत:विषयीची चरित्रात्मक माहिती दिली आहे. ⇨ कल्हणा ची ⇨ राजतरंगिणी (बारावे शतक) हे संस्कृतातील ऐतिहासिक महाकाव्याचे उत्कृष्ट उदाहरण. आठ तरंगांच्या ह्या महाकाव्यात काश्मीरचा आणि काश्मीरच्या राजघराण्याचा प्राचीन काळापासून तो ११४८ पर्यंतचा इतिहास काव्यबद्ध केला आहे. अन्य ऐतिहासिक महाकाव्येही आहेत. आर्यमञ्जुश्रीकल्प हा एक महायान बौद्ध पंथीय गंथ दक्षिण भारतात उपलब्ध झाला आहे. ८०० च्या सुमारास ह्याची रचना झाली असावी. त्याच्या तिसऱ्या खंडात भारतवर्षाच्या समाटांचे बुद्धमुखाने वर्णन केले आहे. ७००-७७० ह्या कालखंडातील इतिहासाच्या अभ्यासासाठी हा गंथ उपयुक्त ठरतो. संध्याकर नंदिन् ह्या कवीचे रामपालचरित हे क्लिष्ट रचनेतील काव्य बंगालचा पालवंशीय राजा रामपाल ह्याचे चरित्र सांगते पण त्यातून प्रभू रामचंद्रांची कथाही प्रतीत होते. जैन आचार्य हेमचंद्र याचे कुमारपालचरित (कुमारपाल हा अनहिलवाडच्या चालुक्य वंशातील राजा) हे २८ सर्गांचे महाकाव्य ऐतिहासिकदृष्टया महत्त्वाचे असले, तरी त्यात काव्यगुणांचा अभाव आहे. सु. बाराव्या शतकाच्या अखेरीस झालेले पृथ्वीराजविजय हे काश्मीरी काव्यही इतिहासाला पोषक ठरले आहे. त्याची रचना १२०० च्या आतबाहेर झाली असावी. ऐतिहासिक स्वरूपाची दोन काव्ये गुजरातच्या सोमेश्र्वरदत्ताने (११७९-१२६२) लिहिली. त्यांपैकी कीर्तिकौमुदी काव्यात गुजरातच्या वीरधवल राजाच्या वस्तुपाल ह्या अमात्याची प्रशस्ती आहे, तर सुरथोत्सव काव्यात दुर्गासप्तशती तील सुरथ राजाचे चरित्र कथन केले आहे. यांत ऐतिहासिक महत्त्वाची बरीच माहिती आहे. इतरही लहानलहान काव्ये पुष्कळ आहेत परंतु त्यांपैकी काहींचा फक्त उल्लेखच मिळतो व ती अनुपलब्ध आहेत.

जैन कवींनी संस्कृतात लिहिलेली काव्ये, महाकाव्ये, पुराणगंथ आणि रामायण-महाभारता च्या संस्करणावृत्त्या ह्यांना सांप्रदायिक उपयोगिता आणि महत्त्व असले, तरी काही अपवाद वगळल्यास हे साहित्य सामान्य स्वरूपाचे आहे.

लघुकाव्ये : ऋग्वेदा त ज्याप्रमाणे मंडूकसूक्त किंवा अक्षसूक्त यांसारखी छोटी भावकाव्ये निर्माण झाली त्याचप्रमाणे ⇨ मेघदूत, ऋतुसंहार, चौरपंचा-शिका, घटखर्पर,अमरूशतक अशा प्रकारची अनेक काव्ये पुढील काळात निर्माण झाली. ही लघुकाव्ये होत. संस्कृत लघुकाव्यांत खंडकाव्ये, स्तोत्र-काव्ये, नीतिकाव्ये, सुभाषिते इत्यादींचा समावेश होतो. त्यांत विविधता व विपुलताही आढळते.

कालिदासाची दोन लघुकाव्ये शृंगारप्रधान आहेत. त्यांपैकी ऋतुसंहार ह्या काव्यात सहाच सर्ग असून सहा ऋतूंची कविसंकेतांनुसार केलेली रोचक वर्णने त्यात आहेत. ऋतूंचा प्रणयावर घडून येणारा परिणाम ह्यात कटाक्षाने सांगितला आहे. दुसरे मेघदूत हे खंडकाव्य असून विरही यक्षाने आपल्या पत्नीला मेघाबरोबर पाठविलेल्या संदेशाच्या मध्यवर्ती कल्पनेवर ते रचिलेले आहे. सुबक आणि रेखीव रचना, भावनोत्कटता, भाषासौष्ठव, अलंकारवैपुल्य, पदलालित्य इ. अनेक गुणांमुळे हे काव्य रसिकप्रिय व कविप्रियही ठरले आहे. यातील एकेक श्लोक स्वयंपूर्ण चित्रासारखा आहे आणि निसर्गचित्रांना मानवी भावांची चौकट आहे. या काव्याने दूतकाव्याची एक परंपराच निर्माण केली. उदा., रूपगोस्वामीचा हंसदूत, वजनाथाचा मनोदूत, हरिहराचा हृदयदूत इत्यादी. [⟶ दूतकाव्ये].

शृंगारतिलक नावाचे आणखी एक काव्य कालिदासाच्या नावावर आहे, पण हा दुसराच कोणीतरी कालिदास असावा, असे टीकाकारांचे मत आहे. या काव्यात २३ श्र्लोक आहेत. घटकर्पराचे घटखर्पर किंवा घटकर्पर हे आणखी एक २२ श्लोकांचे शृंगारकाव्य मेघदूता चीच दुसरी बाजू आहे. येथे पत्नीने मेघाकरवी पतीस संदेश पाठविला आहे. ⇨ आनंदवर्धना सारखा (नववे शतक) साहित्यशास्त्रज्ञ ज्याला ‘ अमृतकाव्य ’ अशी संज्ञा देतो, ते अमरूशतक हे अप्रतिम शृंगारकाव्य आहे. प्रणयाच्या विविध सूक्ष्म छटा आणि नाजुक भावनांची हळुवार गुंफण त्यात आढळते.

नीतिशतक, वैराग्यशतक आणि शृंगारशतक ह्यांचा कर्ता असलेल्या ⇨भर्तृहरीच्या च्या (सातवे शतक) शतकत्रयींपैकी शृंगारशतक विशेष प्रसिद्घ आहे. त्यात स्त्रीसौंदर्य, स्त्रीविभ्रम, स्त्रीच्या अभावामुळे जीवनाला येणारी रूक्षता, दुःख, मोह ह्यालाही कारण होणारी स्त्री ह्यांचे विलोभनीय वर्णन आहे. चौरीसुरतपंञ्चाशिका किंवा चौरपञ्चाशिका हे पन्नास श्लोकांचे काव्य संभोगशृंगारप्रधान आहे. हे बिल्हणाने रचिले आहे, असे म्हटले जाते. ⇨ हाला च्या प्राकृत भाषेतील गाथासप्तशती चे अनुकरण गोवर्धनाच्या (बारावे शतक) आर्यासप्तशती त आढळते. शृंगाराच्या विविध अवस्थांचे वर्णन या ७०० आर्यांमधून केले आहे. साहित्यगुणांनी समृद्ध असलेला ⇨ जगन्नाथपंडित (सतरावे शतक) याच्या मार्मिक आणि मनोज्ञ श्र्लोकांचा संग्रह भामिनीविलास या काव्यात आहे. यातील चार उल्लसांपैकी (अन्योक्ती, शृंगार, करूण आणि शांत) शृंगार हा शृंगारकाव्याचा उत्कृष्ट नमुना आहे. भावकाव्य आणि नाटक यांना जोडणारा एक दुवा किंवा या दोन्ही प्रकारांची छाया असलेले ⇨ जयदेवा च्या ⇨ गीतगोविंदा सारखे (बारावे शतक) काव्य हा एक विशिष्ट प्रकार आहे, असे कित्येक विव्दानांचे म्हणणे आहे. रागतालबद्ध अशा चोवीस गीतांच्या व्दारा श्रीकृष्णाचे स्तवन ह्यात केले आहे. ह्यांनाच कवी प्रबंध असे म्हणतो. त्यांनाच अष्टपदया असेही म्हणतात. पदलालित्य, गेयतेचे वैचित्र्य व सुस्वरता ह्यांच्या योगाने गीतगोविंदा त भक्तिपूर्ण शृंगाररस पूर्णतेला पोहोचला आहे. संस्कृत साहित्यशास्त्राच्या पुरातन नियमांची बंधने मोडलेले,गदयालाच गेयता आणणारे असे हे पदय आहे.

स्तोत्रकाव्ये हाही लघुकाव्याचाच एक प्रकार. हे संस्कृत साहित्याचे एक भूषण आहे. वैदिक सूक्तकाव्यात या काव्यप्रकाराचे बीज आढळते. मयूराने आपला कुष्ठरोग बरा व्हावा म्हणून सूर्याची शंभर श्लोकांव्दारे उपासना केली व तो रोगमुक्त झाला असे परंपरा सांगते. त्याचे सूर्यशतक वा मयूरशतक रसिक्रमनाचा वेध घेणारे असून सूर्यदेवाचे सविस्तर वर्णन ह्यात आहे. बाणाने चंडीस्तोत्र वा चंडीशतक लिहिले. बाणाच्या या चंडीशतका त गौडी रीतीचा प्रभाव आढळतो. आद्य शंकराचार्यांची पुष्कळ स्तोत्रे प्रसिद्ध आहेत. व्दादशपञ्जरिका, चर्पटपञ्जरिका, शिवापराधक्षमापन इ. अनेक स्तोत्रे कीर्तन-प्रवचनांतून म्हटली जातात. भावनानुकूल गेय छंदोबद्घता हे त्यांचे वैशिष्टय होय. आनंदलहरी हे त्यांचे वीस श्लोकांचे काव्य ज्वरनाशक समजले जाते. सौंदर्यलहरी ह्या त्यांच्या स्तोत्रकाव्यात तंत्र आणि योग यांचा अनुपम आविष्कार आढळतो. दोनशेहून अधिक स्तोत्रकाव्यांची रचना आदय शंकराचार्यांनी केली असावी, असे काही विव्दान म्हणतात. विविध छंदांतील त्रेचाळीस श्र्लोकांचे महिम्नस्तोत्र (सु. नववे शतक) कुणी रचले हे सांगता येत नाही, पण हे शिवस्तोत्र अनेकांना मुखोद्‌गत असते. लीलाशुकाचे श्रीकृष्णकर्णामृत हे उत्कट भक्तिकाव्य आहे. राजकवी पंडितराज जगन्नाथाच्या पंचलहरीं ना स्तोत्रसाहित्यात श्रेष्ठ स्थान आहे. करूणालहरी, पीयुषलहरी (गंगालहरी ह्या नावाने विशेष प्रसिद्ध), अमृतलहरी, लक्ष्मीलहरी आणि सुधालहरी यांना भावकाव्याची उत्कटता लाभलेली आहे. यांपैकी गंगालहरी विशेष रसिक प्रिय आहे.


पुराणांतरी आढळणारी विविध देवतांची स्तोत्रे, स्तवने व भक्तिकाव्ये तसेच जैन, बौद्ध, शैव, शाक्त इ. अनेक सांप्रदायिकांनी निर्मिलेली स्तोत्र-काव्ये संस्कृत साहित्याला ललामभूत ठरली आहेत. गणपत्यथर्वशीर्षोपनिषद, दत्तात्रयोपनिषद यांसारखी कितीतरी काव्ये वस्तुत: उपनिषदे नसून, ती स्तोत्र काव्याचेच प्रकार आहेत. [⟶ स्तोत्रवाङ्‌मय].

संस्कृत नीतिकाव्यात वृद्ध चाणक्य वा राजनीतिसमुच्यय अथवा चाणक्य-नीति उल्लेखनीय आहे. चंद्रगुप्त मौर्याचा प्रधानमंत्री चाणक्य (कौटिल्य) ह्याचा कर्ता असेल, असे मात्र वाटत नाही. ह्या काव्यातील विविध छंदांतील रचनांतून जीवनाच्या सूक्ष्म अंगोपांगांचे दर्शन घडते. ह्याच धर्तीवरील वररूचीचे नीतिरत्न, घटकर्पराचे नीतिसार आणि वेतालभट्टाचे नीतिप्रदीप हे तीन काव्यसंग्रह आहेत. वर उल्लेखिलेल्या भर्तृहरीच्या नीति आणि वैराग्य ह्या शतकांचा आणि जगन्नाथपंडितांच्या भामिनीविलासा तील अन्योक्ती आणि शांत या दोन विलासांचा ह्याच वर्गामध्ये समावेश होतो. इतरही अनेक कवींच्या रचना या प्रकारात आढळतात.

सुभाषितरचना : संस्कृत भाषेतील सुभाषितांचे भांडार अमूल्य आणि समृद्घ आहे. अनेक कवींच्या काव्यांतून आढळणाऱ्या चिरंतन सत्य- वचनांचे संग्रहही पुष्कळच आहेत. उदा., कवीन्द्रवचनसमुच्च्यय, सदुक्तिकर्णामृत, सुभाषितमुक्तावलि, शाङ्‌र्गधरपद्धती, सुभाषितावलि इत्यादी. [⟶ सुभाषित वाङ्‌मय].

गदयकाव्ये : संस्कृत गदयकाव्याचा पसारा लहान दिसला, तरी गुणोत्कर्षाने तो समृद्ध आहे. गदयात लिहिणे हा कवित्वाचा निकष मानला जात असे (गदय कवीनां निकषं वदन्ति). यजुर्वेदा चा आणि अथर्ववेदा चा काही भाग गद्य आहे. त्यानंतर बाह्मणगंथांतील गदय दिसते. सूत्रगंथांच्या रचनेनंतर जेव्हा भाष्यगंथलेखनाला प्रारंभ झाला, तेव्हा युक्तिवाद, पूर्वोत्तरपक्ष, खंडन-मंडन यांसाठी सुलभ व आवश्यक अशा गद्यलेखनाचाच अवलंब महान आचार्यांनी केला परंतु संस्कृत गदयकाव्याची शैली विशेष प्रकारची आहे. प्रदीर्घ समासरचना, पदलालित्य, चमत्कृतिपूर्ण अलंकारयोजना या कृत्रिम आभूषणांच्या जोडीला कविप्रतिभेचा आणि कवीच्या कल्पनाशक्तीचा आविष्कारही तीत आढळतो.

संस्कृत गदयकाव्य कथा आणि आख्यायिका या दोन प्रकारांत आहे. ह्या दोन प्रकारांच्या लक्षणांबद्दल मतभेद असला, तरी सामान्यत: कथा ही काल्पनिक असून आख्यायिका ही एखादया ऐतिहासिक कथावस्तूवर आधारलेली असते असे म्हणता येईल. ⇨ दंडी (६०० ते ७५० च्या दरम्यान), सुबंधू (सहावे किंवा सातवे शतक) आणि बाण यांची गदयकाव्ये श्रेष्ठ दर्जाची आहेत परंतु वररूचीची चारूमती, रामिल-सौमिलाची शूद्रककथा, पालित्तकृत तरंगवती आणि भट्टार हरिचंद्राचा गदयबन्ध (म्हणजे गदयकाव्य) यांची नावेच तेवढी ठाऊक आहेत. प्रत्यक्ष गंथ मात्र उपलब्ध नाहीत. दंडीच्या ⇨ दशकुमारचरिता ने गदयकाव्याच्या शैलीची एक परंपराच निर्माण केली. दशकुमारचरित तीन भागांत आहे : पूर्वपीठिका (पाच उच्छ्‌वास), दशकुमारचरित (आठ उच्छ्‌वास) आणि उत्तरपीठिका (चार उच्छ्‌वास). ह्या गंथाचे नाव दशकुमारचरित असले, तरी त्यात फक्त आठच कुमारांची कथा आहे. यावरून हा गंथ अपूर्ण असावा अगर यातील काही भाग अनुपलब्ध असावा. दशकुमारचरित हा गंथ धूर्तकथांचा आहे. ह्यात राजकुमारांच्या साहस कथां बरोबरच ढोंगी संन्यासी, धूर्त पुरोहित, लबाड कुंटिणी यांच्या दुराचारी कृत्यांचाही अंतर्भाव आहे. शिवाय जादू , मंत्रतंत्र, खून, चोऱ्या, प्रणय, चमत्कार, मदय, जुगार यांसारख्या अनेक गोष्टींना स्थान मिळाले आहे. अवन्तिसुंदरीकथा हा आणखी एक गदयकाव्यगंथ असून त्याचा पद्यात्मक सारांश अवन्तिसुंदरीकथासार या गंथात आढळतो. अवन्तिसुंदरीकथा या गंथाचा लेखक दंडीच असावा असे काहींचे मत आहे.

सुबंधूची ⇨ वासवदत्ता रसिकमान्य आहे. उदयनाच्या वासवदत्ते पेक्षा सुबंधूची वासवदत्ता ही स्वतंत्र आणि वेगळी आहे. ध्वन्यालोक कार आनंदवर्धनाने ह्या गंथाची फार स्तुती केली आहे मात्र श्र्लेष, विरोधाभासांचा पदोपदी वापर, शाब्दिक कोटया, काही ठिकाणी आढळणारी रसहीनता यांमुळे हा गंथ सामान्य वाचकाला दुर्बोध आणि क्लिष्ट वाटतो. दीर्घसमासप्रचुर अलंकृत शैलीची रचना ह्यात आढळते.

संस्कृत गदयकाव्याचा अनभिषिक्त सम्राट म्हणजे बाणभट्ट हा होय. बाणभट्टाने कादंबरी ही नावीन्यपूर्ण कथा आणि हर्षचरित असे दोन गंथ लिहिले. कादंबरी हा गंथ अपुरा राहिल्यामुळे त्याचा पुत्र भूषणभट्ट याने तो समर्थपणे पूर्ण केला. एका चक्रवर्ती समाटाचा त्याच्या समकालीनाने लिहिलेला इतिहास म्हणून हर्षचरिता ला विशेष महत्त्व आहे. आपल्या जीवनाचा वृत्तांत लिहिणाऱ्या संस्कृत कवींमध्ये बाणभट्टाला अगस्थान आहे. हा गंथ अपूर्ण राहिल्याचे दिसते.

बाणभट्टाची कादंबरी  अनन्यसाधारण असून चमत्कृतिपूर्ण कथानक, कल्पनासौंदर्य, रचनाकौशल्य व चित्रमय, भव्योदात्त आणि गहिरी वर्णनशैली इ. गुण तिच्यात आढळतात. मात्र वर्णनांतील प्रमाण व औचित्य यांकडे बाणाने दुर्लक्ष केले आहे. बाणभट्टाची उच्च अभिरूची आणि त्याचे साहित्यगुण यांची प्रचिती त्याने केलेल्या प्रणयवर्णनांवरून आणि पात्रांच्या स्वभावपरिपोषावरून येते.  

धनपालाची (दहावे शतक) तिलकमंजरी गदयकाव्यात समाविष्ट होणारी आहे. समरकेतू आणि तिलकमंजरी यांची प्रणयकथा बाणाच्या शैलीचे अनुकरण करून त्यात वर्णिलेली आहे.

चंपूकाव्ये : गदयपदयमिश्रित श्राव्य रचना म्हणजे चंपूकाव्य होय. उपलब्ध चंपूकाव्ये दहाव्या शतकानंतरचीच आहेत. तत्पूर्वीची चंपूकाव्ये बहुधा नष्ट झाली असावीत. गदयपदयात्मक कथा सांगण्याचे नवे तंत्र चंपूकाव्यात आढळते. त्यात मुख्यत्वे शब्दचमत्कृती आणि अर्थचमत्कृती यांची रेलचेल असते. त्यात सर्व कथन कवीचे आणि एकाच ढंगाचे असते. बौद्घ जातक कथांच्या संस्कृत रूपांतरांत आणि काही शिलालेखांत या शैलीचे स्वरूप दिसते. या शैलीत काही गंथ निर्माण झाले असावेत जैन कवींनीही जैन पुराणांच्या आधाराने काही चंपू रचना केलेल्या आढळतात.

त्रिविक्रम (दहावे शतक) ह्या कवीने आपल्या पित्याच्या अनुपस्थितीत सरस्वतीच्या वरप्रदानाने लाभलेल्या प्रतिभेच्या जोरावर नलचंपू लिहावयास घेतला परंतु पिता परतताच त्याची प्रतिभा लोप पावली आणि ही रचना अपुरी राहिली अशी दंतकथा आहे. श्र्लेषयुक्त वर्णनांनी हे काव्य क्लिष्ट झाले आहे. सोमदेव अथवा सोमप्रभसूरी (दहावे शतक) या जैन कवीने यशस्तिलकचंपू नावाचे चंपूकाव्य लिहिले. त्याचे आठ आश्र्वास आहेत. अखेरच्या तीन आश्र्वासांत दिगंबर जैनांच्या नित्य उपासनेसाठी माहिती आहे. पहिल्या पाच आश्वासांत अवंतिनृप यशोधराने जैन धर्म कसा स्वीकारला त्याचे वर्णन आहे.

भोज राजाने (१०१८-६३) रामकथेवर रामायणचंपू वा चंपूरामायण लिहिले. अभिनवकालिदासाने (अकरावे शतक) भागवता वर भागवतचंपू आणि अनंत कवीने (अकरावे-बारावे शतक) महाभारत कथेवर भारतचंपू रचिला आहे. श्रीवेंकटाध्वरीच्या (सतरावे शतक) चार चंपूंपैकी ⇨ विश्व-गुणादर्शचंपू विशेष प्रसिद्घ आहे. त्यात दोन गंधर्व विमानात बसून विश्वनिरीक्षणास निघतात. भारतवर्षाची सफर करताना विविध प्रदेश, तेथील लोक, त्यांचे आचारविचार इत्यादींची चर्चा करतात, अशी कल्पना आहे. नलचंपू हा सात उच्छ्‌वासांतच उपलब्ध असून अपूर्ण आहे.

ह्या महत्त्वाच्या चंपूगंथांखेरीज अन्नयार्य याचा तत्त्वगुणादर्श, कवी तार्किकसिंह वेदान्ताचार्य याचा वेदान्ताचार्य विजय, कृष्ण याचा मन्दार- मरन्दचंपू , रघुनाथदास याचा मुक्तिचरित, जीवगोस्वामी याचा गोपालचंपू , हरिचंद्राचा जीवन्धरचंपू , केशवभट्टाचा नृसिंहचंपू , शेषकृष्णाचा पारिजातहरण-चंपू , नीलकंठ दीक्षित याचा नीलकंठविजयचंपू , परमानंद सेन कविकर्णपूर याचा आनंदवृंदावनचंपू असे अनेक चंपू उपलब्ध आहेत. [⟶ चंपूकाव्य].


नीतिकथा : संस्कृत भाषेतील प्राचीनतम लोकसाहित्य म्हणून ⇨ पंचतंत्रा चा गौरवाने उल्लेख करता येईल. विष्णुशर्म्याने अमरशक्ती  राजाच्या तीन मूर्ख मुलांना राजनैतिक आणि व्यावहारिक शिकवण देण्यासाठी ह्या कथा सांगितल्या असे पंचतंत्रा च्या कथामुखात म्हटले आहे. या गंथाचा लेखनकाल निश्र्चितपणे सांगता येणे कठीण असले, तरी तो इ. स.चे दुसरे वा तिसरे शतक असावा असे मानण्याकडे कल आहे. मात्र इ. स. पाचशेच्या सुमारास तो अस्तित्वात होता, असे निश्र्चितपणे म्हणता येते. आकर्षक भाषाशैली, पठणसुलभ श्लोकरचना व मार्मिक नीतितत्त्वे यांमुळे पंचतंत्र जगन्मान्य ठरले आहे. दक्षिण भारतात उपलब्ध झालेल्या हस्तलिखितांत पंचतंत्रा चे बरेचसे संक्षिप्त रूप दिसते. त्याचा बंगाली पाठ नारायणनामक (बहुधा बारावे शतक) लेखकाने हितोपदेश ह्या शीर्षकाने केला आहे. त्यात अन्य पाठांत न आढळणाऱ्या काही नवीन नीतिकथा असून  शिवाय ⇨ कामंदकीय नीतिसार,वेतालपंचविंशतिका अशा काही गंथांचाही त्याने उपयोग करून घेतला आहे. शिवाय पंचतंत्रा ची तंत्राख्यायिका नावाची काही हस्तलिखिते सापडली आहेत.

लोककथा : गुणाढयाची बृहत्कथा हा लोककथा या संज्ञेला पात्र ठरणारा एकमेव गंथ संस्कृत साहित्यात आहे. मूळ गंथ ⇨ बड्डकहा हा पैशाची भाषेत होता, पण तो उपलब्ध नाही. त्याची तीन संस्करणे संस्कृतात आहेत. त्यांपैकी बुद्धस्वामीचा (आठवे-नववे शतक) बृहत्कथाश्र्लोकसंग्रह (२८ सर्ग व ४५३९ श्लोक) हा नेपाळात उपलब्ध झाला. क्षेमेन्द्राची बृहत्कथामंजरी आणि ⇨ सोमदेवा चा (अकरावे शतक) ⇨ कथासरित्सागर हे काश्मीरमध्ये उपलब्ध झाले. वेतालपंचविंशतिका हा वेताळाने त्रिविक्रमसेन किंवा विक्रमादित्य राजाला सांगितलेल्या पंचवीस कथांचा संग्रह पूर्वी स्वतंत्र गंथ असावा परंतु तो बृहत्कथामंजरीत आणि कथासरित्सागरात समाविष्ट केला गेल्यामुळे त्या त्या गंथाचा भाग मानला जात आहे. ह्या चटकदार कथांच्या लोकप्रियतेमुळे त्यांची नंतर स्वतंत्र संस्करणे झाली. या संस्करणांपैकी शिवदासाचे गदयसंस्करण विशेष प्रसिद्ध आहे. प्राचीन काळातील सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने विशेषतः तत्कालीन रूढी, चालीरीती इ. दृष्टीने हा गंथ म्हणजे खजिनाच होय. बौद्ध साहित्यातील दिव्यावदान, अवदानशतक, आर्यसुराची जातकमाला आणि हेमचंद्राचे परिशिष्टपर्व हे गंथ लोकसाहित्यातच जमा होण्यासाखे आहेत. सिंहासनव्दात्रिंशिका (मराठीत सिंहासनबत्तिशी) हा गंथही उल्लेखनीय आहे. विक्रमादित्य राजाच्या सिंहासनाला बत्तीस पुतळ्या होत्या. ते सिंहासन विक्रमाने पुरून टाकले होते. ते पुढे भोजराजाला जमीन खणताना मिळाले. त्या पुतळ्यांनी भोजाला विक्रमादित्याचे गुणवर्णन करणाऱ्या कथा सांगितल्या, त्यांचा हा संग्रह. हा गंथ अनेक संस्करणांव्दारे प्राप्त झाला आहे. त्यांत चौदाव्या शतकातील क्षेमंकरनामक जैनाचे गदयसंस्करण विशेष प्रसिद्ध आहे. शुकसप्तति हा ७२ कथांचा संग्रह असून त्यात व्यभिचारिणी स्त्रीचे चरित्र हा विषय आहे. विदयापतीची (पंधरावे शतक) पुरूषपरीक्षा आणि बल्लळसेनाचा भोजप्रबंध (सोळावेशतक)यादोन गंथांतून अद्‌भुतकथांचा संग्रह आढळतो.

शिलालेख व ताम्रपट : ऐतिहासिक महत्त्वाच्या उत्कीर्णलेखांतून वाङ्‌मयीन गुण असलेले लेखन आढळते. ते पूर्णत: गद्य किंवा पद्य, तसेच गदयपदयमिश्रित आहे. त्याची शैली भारदस्त आणि अलंकारपूर्ण आढळते. शिलालेख अगर ताम्रपट यांमधून आढळणाऱ्या ह्या रचना म्हणजे राजांनी वेळोवेळी दिलेले अगहार, दाने, मिळविलेले विजय, काही प्रसंगी केलेले जीर्णोद्धार वगैरे विषयांशी निगडित आहेत. जुनागढ येथील सुदर्शन-तडागसंस्करणात आढळलेला रूद्रदामनचा शिलालेख दीर्घ समासप्रचुर शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. हरिषेणाने केलेली समुद्रगुप्तप्रशस्ति ही स्तवनपर रचना असून ती प्रयागच्या शिलास्तंभावर आढळते. जुनागढ येथील स्कंदगुप्ताची प्रशस्ती याच स्वरूपाची आहे. मन्दसोर येथील सूर्यमंदिरावरील वत्सभट्टी कवीने लिहिलेली प्रशस्ती गौडरीतिप्रधान आहे. याच ठिकाणची वासुलाने रचिलेली यशोधर्मन्नृपप्रशस्ति किंवा स्तंभप्रशस्ति (सु. सहावे शतक) ही स्रग्धरा वृत्तातील उत्तम काव्यकृती आहे. यशोधर्मन्‌-नृपाचा मन्दसोर येथील शिलालेखही (सहावे शतक) उल्लेखनीय आहे. मेहरौली येथील लोहस्तंभावर ‘ चंद्र ’ नृपाची प्रशस्ति आढळून येते. तिच्या-तील काव्यगुणही श्रेष्ठ दर्जाचे आहेत. ईशानवर्म्यांची प्रस्तरप्रशस्ति रविशान्ति-नामक कवीने लिहिली असून ती हराह येथे पहावयास मिळते. ऐहोळ येथील ‘चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचा शिलालेख’ फार महत्त्वाचा आहे. बादामीच्या चालुक्य वंशाचा बराचसा भाग ह्या प्रशस्तीत येतो. ही प्रशस्ती रचणारा रविकीर्ति हा कवी स्वत:ला भारवी व कालिदासासमान श्रेष्ठ कवी मानतो. उदेपूर येथील अपराजिताची शिलाप्रशस्ति आणि अफसद येथील आदित्यसेनाची प्रशस्ति उल्लेखनीय आहे. या प्रकारची रचना हा संस्कृत साहित्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे, असे म्हणावे लागेल.

साहित्यशास्त्र : इतर शास्त्रांच्या मानाने संस्कृतात साहित्यशास्त्रासंबंधीची महत्त्वाची आणि विपुल निर्मिती झाल्याचे आढळून येते. अनेक सिद्धांतांपासून अलंकारचर्चेपर्यंत नाना विषयांवर साहित्यशास्त्रीय लेखन झाले आहे व ते अतिशय समृद्ध आहे.


भरतमुनीच्या नाटयशास्त्रा त काव्याच्या विविध अंगांचा ऊहापोह केला आहे. त्यात अलंकारांसंबंधीचे सर्वांत प्राचीन विवेचनही पाहावयास मिळते. काव्यशास्त्रावर लिहिणारा दुसरा एक सुरूवातीचा लेखक भट्टी (सु. ४९५ ते ६४१ च्या दरम्यान) असून ⇨ भट्टिकाव्य वा रावणवध या त्याच्या काव्याचा विषय रामकथा असला, तरी ह्या काव्याचे प्रयोजन, काव्यशास्त्र आणि व्याकरण यांच्या नियमांची उदाहरणे देणे हे आहे. ⇨भामहाने(सु. ६०० ते ७५० च्या दरम्यान) काव्यालंकारा त मांडलेल्या मजकुराशी त्याचे विलक्षण साम्य आहे. त्यावरून भट्टीचा भामहावरील प्रभाव जाणवतो. भामहाने आपल्या काव्यालंकार ह्या गंथामध्ये साहित्यशास्त्रासंबंधी विचार मांडले आहेत. भामह हा अलंकारमताचा प्रवर्तक मानण्यात येतो त्याने अलंकारांची स्वतंत्रपणे चर्चा करण्याची आवश्यकता दाखवून दिली. भामहानंतर दंडीने आपल्या काव्यादर्शा मध्ये सारे साहित्य वकोक्ती आणि स्वभावोक्ती ह्या दोन विभागांत विभागले असल्याचा विचार मांडला. कालकमानुसार भामह व दंडी हे एकाच काळातील असून त्यांपैकी आधी कोण ह्याविषयी तज्ज्ञांत मतभेद आहेत. दंडीनंतर भामह असेही एक मत आहे तथापि या दोघांच्या गंथांचा प्रभाव नंतरच्या काव्यशास्त्रावर पडलेला आढळतो. ⇨ वराहमिहिर (४९०-५८७) याने बृहत्संहिता आणि बृहज्जातक या गंथांपैकी बृहत्संहिता ह्या गंथात अभिजात संस्कृत वृत्ते उदाहरणासह दिली आहेत. उद्‌भटाने (सु. ८००) अलंकारचर्चेवरील अलंकारसारसंग्रह हा मौलिक गंथ लिहून प्रथमच त्यास शास्त्रीय स्वरूप दिले. ⇨ वामना ने (सु. ८००) रीती हा काव्याचा आत्मा आहे, असा सिद्धांत आपल्या काव्यालंकारसूत्र ह्या गंथात मांडला. आनंदवर्धनाने आपल्या ध्वन्यालोक या गंथाच्या रूपाने साहित्यशास्त्रचर्चेला पुढे नेले. ध्वनी हाच काव्याचा आत्मा होय, असा त्याचा सिद्धांत आहे. या ध्वनिसिध्दांतावर महाकवी श्यामलाचा शिष्य राजानक महिमभट्ट (अकरावे शतक) याने व्यक्तिविवेक या आपल्या गंथात टीका केली आहे. त्याच्या मते रस हा अनुमित होतो. लक्षणा आणि व्यंजना ह्यांचा अंतर्भाव तो अनुमानातच करतो. श्रीशंकुक हा नाटयशास्त्रा चा टीकाकारही अनुमानवादीच आहे. ⇨ अभिनवगुप्त (सु.९५०-१०२०) हा आनंदवर्धनाच्या ध्वन्यालोका वरील एक प्रसिद्घ टीकाकार होय. लोचन वा ध्वन्यालोकलोचन हा त्याचा एक गौरवार्ह गंथ आहे. आनंदवर्धनानंतर वकोक्तिजीवित कार कुंतकाने (९२५-१०२५ च्या दरम्यान) सर्व अलंकारांचा आत्मा वकोक्ती हाच होय, असे मत मांडले, ⇨ राजशेखराच्या (नववे-दहावे शतक) काव्यमीमांसा ह्या गंथातील ‘ कविरहस्य ’ नामक एकच अधिकरण उपलब्ध आहे (मूळ गंथ अठरा अधिकरणांचा होता असे गंथाच्या आरंभी दिलेल्या अनुक्रमणिकेवरून दिसते). वाङ्‌मयाचे शास्त्र व काव्य असे दोन प्रकार राजशेखराने सांगितले असून शब्दार्थ हे काव्यपुरूषाचे शरीर, तर रस हा आत्मा असे म्हटले आहे. रूद्रटाचा (नवव्या शतकाचा पूर्वार्ध) काव्यालंकार प्रसिद्ध असून त्यात साहित्यशास्त्रातील महत्त्वाच्या विषयांवर, विशेषत: शास्त्रावर मूलभूत चर्चा आढळते. अलंकारांचे वर्गीकरण करण्याचा पहिला प्रयत्न त्याचाच. दशरूपक कार धनंजय (दहावे शतक) आणि अवलोक कार धनिक (सु. १०००) हे आणखी काही सैद्धांतिक गंथकार होत. परमार भोजाचे शृंगारप्रकाश आणि सरस्वतीकण्ठाभरण हे गंथही निर्देशनीय होत. त्याच्या मते साहित्य हा शब्दार्थांचा संबंध असून तो बारा प्रकारांचा आहे. ह्या बारा प्रकारांचे विवेचन त्याने शृंगारप्रकाशा त केलेले आहे. सरस्वतीकण्ठाभरणा त काव्यप्रयोजन, काव्यलक्षण, काव्यभेद, शब्दालंकार, अर्थालंकार, रस, भाव इ. विषयांची चर्चा आहे. त्याने शृंगार हा एकच रस वर्णिला आहे. क्षेमेंद्राची औचित्यविचारचर्चा आणि कुंतकाचे वकोक्तिजीवित या गंथांनी साहित्य-समीक्षेच्या मीमांसेत मोलाची तात्त्विक भर घातलेली आहे. क्षेमेंद्र औचित्य हा रसाचा गाभा आहे, असे प्रतिपादितो.

मम्मटा चा (सु. ११००) काव्यप्रकाश म्हणजे संस्कृत साहित्य-शास्त्रातील गंथराज होय. वेदान्तावरील शांकरभाष्य किंवा व्याकरणावरील पातंजलभाष्य या गंथांइतकेच अलंकारशास्त्रावरील गंथांत त्याचे असाधारण स्थान असल्याचे विव्दान मानतात. अनेक टीकागंथ काव्यप्रकाशा वर लिहिले गेले. त्यांतील माणिक्यचंद्र याची संकेत (११५९-६०) ही टीका प्रारंभीची होय. काव्यप्रकाशा ची लोकप्रियता त्याची सुबोध शैली आणि मौलिक विचार यांच्यामुळेच आहे. त्यातील अलंकारमीमांसा प्रमाण मानली जाते.

हेमचंद्र (अकरावे-बारावे शतक) आणि वाग्भट (बाराव्या शतकाचा पूर्वार्ध) ह्यांचे अनुक्रमे काव्यानुशासन आणि वाग्भटालंकार हे गंथ प्रसिद्ध आहेत. रूय्यकाचे (बारावे शतक) अलंकारसर्वस्व आणि शारदातनयाचे भावप्रकाश हे दोन गंथही उल्लेखनीय आहेत. रूय्यकाने केलेले अलंकारांचे वर्गीकरण त्याच्यानंतरच्या बहुतेक आलंकारिकांनी साधारणपणे मान्य केलेले आहे. विदयानाथ (चौदावे शतक) याच्या प्रतापरूद्रयशोभूषण या गंथात तीन भाग (कारिका, वृत्ती आणि उदाहरणे) असून अखेरच्या भागात काकतीय राजा प्रतापरूद्रदेव याची प्रशस्ती आहे कारण त्याचा राजाश्रय विदयानाथाला होता. त्याने प्रस्तुत गंथात नायक, काव्य, नाटक, रस, दोष, गुण, शब्दालंकार, अर्थालंकार आणि मिश्रालंकार यांची चर्चा केली असून ⇨ विश्र्वनाथा च्या (सु. १३००-८४) ⇨ साहित्यदर्पणा च्या धर्तीवरच मीमांसा केली आहे. विदयानाथाने सामान्यत: मम्मटाचे अनुकरण केले असून अलंकारांच्या बाबतींत तो रूय्यकाच्या अलंकारसर्वस्वा वर भिस्त ठेवतो. मम्मटाच्या गंथात नसलेले परिणाम, उल्लेख, विचित्र आणि विकल्प हे चार अलंकार त्याने सांगितले आहेत. मल्लिनाथाचा मुलगा कुमारस्वामिन् याने प्रतापरूद्रयशोभूषण या गंथावर रत्नप्रभा नामक टीका लिहिली.

अनंत किंवा अनपोत हा वेंकटगिरीचा राजा व अन्नमांबा या दांपत्यापोटी जन्मलेल्या सिंहभूपाल वा शिंगभूपाल (चौदावे शतक) याने रसार्णवसुधाकर नावाचा गंथ लिहिला. त्याच्या सखोल पांडित्यामुळे त्यास सर्वज्ञ म्हणत. त्याने रसार्णवसुधाकर गंथात तीन विलासांत नायक-नायिकांचे उद्दीपन-विभाव, रीती, गुण आणि नाटयमय वृत्ती तसेच व्यभिचारीभाव, अनुभाव, स्थायीभाव, रस आदींची उदाहरणांसह चर्चा केली असून शेवटच्या विलासात नाटक, त्याचे प्रकार, गुणविशेष यांची माहिती दिली आहे. सिंहभूपालाने याव्यतिरिक्त नाटयकलेवर नाटक परिभाषा हे स्वतंत्र प्रकरण लिहिले असून ते रसार्णवसुधाकरा चेच परिशिष्ट आहे. सिंहभूपालाच्या राजदरबारातील कवी विश्वेश्वर याने चमत्कार-चंद्रिका हा अलंकारशास्त्रावर लिहिलेला गंथ असून त्यात सिंहभूपाल राजाच्या स्तुतिपर काही दाखले आढळतात. पेड कोमटी वेम रेड्डी (वेमभूपाल) हा कुमारगिरीनंतर १४०२ मध्ये गादीवर आला आणि त्याने वीरनारायण हे बिरूद धारण केले. तो स्वत: लेखक असून विव्दानांचा आश्रयदाता होता. त्याच्या आश्रयास श्रीनाथ आणि वामनभट्ट बाण हे विव्दान होते. वेमभूपालाने साहित्य चिंतामणि (किंवा चूडामणि) हा काव्यशास्त्रावरील आणि संगीता चूडामणि हा संगीतावरील गंथ लिहिला. पहिल्या गंथात ध्वनी, शब्दार्थ, ध्वनिभेद, गुणीभूतव्यंग्य, दोष, गुण आणि अलंकार यांचा ऊहापोह सात प्रकरणांत निवेदन केला आहे. विश्वनाथाचा साहित्यदर्पण हा मम्मटाच्या काव्यप्रकाशा प्रमाणेच प्रसिद्ध व महत्त्वाचा गंथ आहे. साहित्यदर्पण हा गंथ म्हणजे संस्कृत साहित्यशास्त्रातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. काव्यलक्षणांच्या बाबतीत रसपंथाच्या असलेल्या विश्वनाथाची ‘ वाक्य रसात्मकं काव्यम् ’ ही काव्यव्याख्या आहे. मिथिला नगरीचा रहिवासी भानुदत्त (१४५०-१५००) याने काव्यशास्त्रावर रसतरंगिणी आणि रसमंजरी हे दोन गंथ लिहिले. त्यांपैकी पहिल्या गंथाचे आठ तरंग असून त्यांत भाव, विभाव, स्थायीभाव, अनुभाव आदींची माहिती आढळते. रसांची चर्चाही त्याने केली आहे. रसमंजरी हा गंथ छोटा आहे. त्यात नायक-नायिकांचे विविध प्रकार, आठ सात्त्विक गुण, शृंगाराचे दोन प्रकार आणि विप्रलंभाच्या दहा अवस्था निर्दिष्ट केल्या आहेत. गोपाल याने विकास या शीर्षकाने रसमंजरी वर टीका लिहिली आहे (१५७२). काव्यशास्त्रावर सोळाव्या शतकात बंगालमधील वैष्णव धर्माचा प्रभाव जाणवतो. त्याची प्रचिती भक्तिरसातील मधुराभक्तीच्या आविष्कारातून दृष्टोत्पत्तीस येते. मोगल काळातील ⇨ अप्पय्य दीक्षित (१५५४-१६२६) आणि जगन्नाथपंडित हे दोन थोर गंथकार होत. अप्पय्य दीक्षित हा महापंडित, तर जगन्नाथपंडित हा कवी होय. कविराज जगन्नाथपंडिताचा ⇨ रसगंगाधर हा साहित्यशास्त्रावरील मौलिक गंथ होय. ‘काव्य म्हणजे रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्द’, अशी त्याने काव्याची व्याख्या केली. प्रगल्भ आणि प्रौढ भाषा, सूक्ष्म आणि मूलगाही युक्तिवाद, स्वतंत्र विचारसरणी आणि त्या स्वतंत्रतेला शोभणारी अशी स्वतः निर्माण केलेली मार्मिक आणि रोचक उदाहरणे ह्यांमुळे हा गंथ असामान्य ठरला आहे. या गंथाशिवाय त्याने चित्रमीमांसाखण्डन आणि भामिनीविलास हे काव्यशास्त्रविषयक अन्य दोन गंथ लिहिले. अप्पय्य दीक्षित याने प्रामुख्याने तत्त्वज्ञानावर लिहिले. चित्रमीमांसा, कुवलयानंद आणि वृत्तिवार्तिक हे त्याचे काव्यशास्त्रविषयक तीन गंथ प्रसिद्ध असून चित्रमीमांसा या गंथावर जगन्नाथपंडिताने कठोर टीका केली आहे. गंगाधरकवींद्र (सोळावे शतक) आणि रामानंद यांनी अनुक्रमे काव्यडाकिनी आणि रसतरंगिणी हे दोन अलंकारशास्त्रावरील गंथ लिहिले. राजचूडामणी दीक्षित (हा श्रीनिवास दीक्षितांचा पुत्र असावा) याने अलंकारशास्त्रावर लिहिले आहे अलंकार-कौस्तुभ, काव्यदर्पण, काव्यसारसंग्रह आणि साहित्यसूक्ष्मसरणि हे श्रीनिवास दीक्षितांचे गंथ होत. राजचूडामणी दीक्षित याने अलंकारशिरोमणि, काव्यदर्पण आणि चित्रमंजरी इ. गंथ लिहिले. महाराष्ट्रातील कुलाबा जिल्ह्यातील रघुनाथ मनोहर (१७५८-१८२०) याने अलंकारशास्त्रावर कविकौस्तुभ हा गंथ लिहिला.


विसाव्या शतकातही साहित्यचर्चेवरील संस्कृत गंथलेखन चालूच होते पण त्यामध्ये मौलिक विचारसरणीची भर घालणारा गंथ क्वचितच आढळतो. गंथ अनेक असले, तरी एक तर ते केवळ टीकागंथ आहेत अथवा पूर्वसूरींचे केवळ अनुकरण करणारे आहेत.

संगीतशास्त्र : भारतीय संगीताचा आरंभ सामवेदा पासूनचा आहे. ऋग्वेदातील ज्या ऋचांवर गान म्हणायचे त्या ऋचांचा संग्रह म्हणजे सामवेद. यज्ञप्रसंगी उद्गाता, प्रस्तोता आणि प्रतिहर्ता हे ऋत्विज सामगायन करीत. उद्गाता हा मुख्य गायक असे तर प्रस्तोता आणि प्रतिहर्ता हे दोघे त्याचे साथीदार असत. पुढे सामगायन करणारी ऋषिकुलेच निर्माण झाली. पौराणिक परंपरेनुसार महादेव हा संगीताचा आदिकर्ता मानला जातो. शिवपार्वती संवादरूपात लिहिला गेलेला गांधर्व हा गंथ, तसेच नंदिकेश्वरसंहिता हा गंथ आज उपलब्ध नाही. काश्यपीयम् ह्या गंथातील उद्‌धृते अन्य गंथांत मिळतात पण हा मूळ गंथ मिळत नाही. अकराव्या शतकात झालेल्या संगीतमकरंद ह्या गंथात संगीत व नृत्य ह्या दोन्ही कलांबाबतचे विवेचन दोन स्वतंत्र भागांतून केले आहे. जगदेकमल्ल प्रतापचकवर्ती ह्याचा संगीतचूडामणी बाराव्या शतकातला. त्यातही संगीताचा आणि नृत्याचा परामर्श पाच प्रकरणांत घेतलेला आहे. सोमेश्र्वराच्या मानसोल्लसात २,५०० श्लोक संगीत आणि वादये यांच्यासाठी दिलेले असून संगीतातील प्रबंधांवर विशेष भर दिलेला आहे. देवगिरीच्या सिंघण यादवाच्या सेवेत अधिकारपदावर असलेल्या सोद्घलाचा पुत्र शार्ङ्गदेव ह्याचा संगीतरत्नाकर हा एक विस्तृत आणि महत्त्वाचा गंथ आहे. सात प्रकरणांच्या ह्या गंथात अनेक प्राचीन गंथकारांचे संगीतविषयक विचार, त्याचप्रमाणे अनेक मौलिक व्याख्या, चर्चा ह्यांचा समावेश आहे. वादये, नृत्य आणि अभिनय ह्यांचाही परामर्श शाङ्‌र्गदेवाने घेतलेला आहे. ह्या गंथाचा काल १२०० असा दिला जातो. काहींच्या मते तेरावे शतक हा ह्या गंथाचा काळ होय. या गंथावर कुंभकर्ण, केशव, कल्लिनाथ, सिंहभूपाल, हंसभूपाल इत्यादींनी टीका लिहिल्या आहेत. पार्श्र्वदेव या जैन लेखकाने ह्याच प्रकारचा संगीतसमयसार (बारावे शतक) हा नऊ अधिकरणांचा गंथ लिहिला असून त्यात संगीताच्या सर्व पैलूंचा परामर्श घेतलेला आहे. संगीतावरील अन्य काही गंथ व त्यांचे कर्ते असे : रागरत्नाकर (गंधर्वराज), संगीतराज (कुंभकर्ण), संगीतदर्पण (चतुर दामोदर), चतुर्दण्डिप्रकाशिका (व्यंकटमखी) इत्यादी.

कामशास्त्र : भारतीय संस्कृतीत कामशास्त्राला धर्म व अर्थ ह्या पुरूषार्थांबरोबरच एक पुरूषार्थ म्हणून प्राचीन पंडितांनी महत्त्व दिलेले असल्यामुळे, या विषयावर संस्कृत भाषेत विपुल लेखन झाले आहे. वात्स्यायनाच्या ⇨कामसूत्रा पूर्वी (इ. स.चे तिसरे वा चौथे शतक) या विषयावर बरेच गंथ लिहिले गेले असल्याचे कामसूत्रा वरून कळते. कामशास्त्राच्या उत्पत्तीविषयी वात्स्यायनाने कामसूत्रा च्या आरंभी दिलेल्या आख्यायिकेनुसार, बह्मदेवाने प्रथम निर्मिलेल्या त्रिवर्गविषयक विशालकाय शास्त्रातून महादेवाचा सेवक नंदी ह्याने १,००० अध्यायांचे ‘ कामसूत्र ’ निराळे काढले. पुढे उद्दालकाचा पुत्र श्वेतकेतू याने हे कामशास्त्र ५०० अध्यायांत संक्षेपाने लिहून काढले. नंतर पांचाल देशातील बाभव्याने काम-शास्त्राचा संक्षेप साधारण, सांप्रयोगिक, कन्यासंप्रयुक्तक, भार्याधिकारिक, पारदारिक, वैशिक आणि औपनिषदिक अशा सात अधिकरणांत (विभागांत) व १५० अध्यायांत केला. त्यांतील वैशिक हे अधिकरण वेगळे काढून ते दत्तकाचार्याने स्वतंत्रपणे रचले. पुढे सहा आचार्यांनी स्वमतप्रदर्शनार्थ उर्वरित सहा अधिकरणे प्रत्येकाने एक, अशी स्वतंत्रपणे रचिली. कामशास्त्राचे असे वेगवेगळे विभाग झाल्यामुळे ते अध्ययन-अध्यापनास गैरसोयीचे ठरून लुप्तप्राय झाले म्हणून वात्स्यायनाने या शास्त्रातील सर्व विषयांचा अभ्यास करून व ते संक्षेपाने संकलित करून कामसूत्र ह्या नावाने लोकांपुढे ठेवले.

वात्स्यायनाच्या कामसूत्रा वर काही टीका व वृत्तिवजा टिप्पण्या लिहिल्या गेल्या असून यशोधराच्या टीकेखेरीज (तेरावे शतक) भास्कर, मल्ल‌देव व राजा वीरभद्र या पंडितांच्या टिप्पण्या निर्देशनीय आहेत. यांपैकी यशोधराची जयमंगला ही टीका सर्वोत्तम मानली जाते. जयमंगला ह्या टीकेमध्ये वात्स्यायनाच्या कामसूत्रा चे महत्त्व तत्कालीन परिस्थितीचा आढावा देऊन प्रतिपादण्यात आले आहे. वात्स्यायनानंतर कामशास्त्रविषयक अनेक गंथ निर्माण झाले. यांपैकी बहुतेक गंथ वात्स्यायनाच्या कामसूत्रा वर आधारित असून नाटके व महाकाव्य लिहिताना कालिदास-भवभूतींसारख्या महाकवींनीही कामसूत्रा चा उपयोग केलेला दिसतो. या विषयावर अधिकारवाणीने लिहिणारा दुसरा संस्कृत पंडित म्हणजे दामोदर गुप्त (आठवे शतक) होय. तो काश्मीरचा राजा जयापीड याचा मुख्यमंत्री होता. त्याने कुंटिणींना (वेश्यांना) उपदेश करण्याच्या उद्देशाने ⇨ कुट्टनीमत हा गंथ लिहिला. हा पूर्ण गंथ उपलब्ध नाही. हा गंथ उपदेशपर शैलीत असून त्यातून आठव्या शतकातील काश्मीरमध्ये धार्मिक व सामाजिक परिस्थिती कशी होती, याची काहीशी कल्पना येते. पद्मश्रीचा नागरसर्वस्व (सु. दहावे शतक) हाही ह्या विषयावरील एक गंथ. या कामशास्त्रावर लिहिणारा काश्मीरमधील दुसरा लेखक म्हणजे क्षेमेंद्र होय. त्याने दामोदर गुप्ताच्या गंथामुळे स्फूर्ती घेऊन समयमातृका हा गंथ लिहिला. त्याचा मूळ उद्देश राजदरबारातील कलावंतीणींना उपयुक्त असा एक गंथ रचण्याचा होता. याशिवाय त्याने कामसूत्रा चा सारांश गंथित करणारा वात्स्यायनसूत्रसार नावाचा आणखी एक ग्रंथ लिहिला.

कोक किंवा कोक्कोकपंडित (बाराव्या शतकापूर्वी) याने कामशास्त्राची शास्त्रशुद्ध, चिकित्सक व पद्धतशीर माहिती दिली. ती त्याच्या रतिरहस्य (कोकशास्त्र या नावाने विशेष प्रसिद्ध) या गंथात लिहिली आहे. त्याच्यानंतर या शास्त्रावर ज्योतिरीश्वर कविशेखर (तेरावे वा चौदावे शतक) याने पंचशायक नावाचा गंथ लिहिला. त्यात बहुविध स्त्री-पुरूषांची शारीरिक वैशिष्टये सांगितली आहेत. हा गंथ हिंदू व मुसलमान या दोन्ही धर्मीयांत लोकप्रिय झाला होता. त्याची अरबी, फार्सी आदी भाषांत भाषांतरे झाली आहेत. अकबरशाह याचा या विषयावरील शृंगारमंजरी आणि भानुदासाचा रसमंजरी हे गंथही याच काळातील असून यांत प्रणयाराधना व रतिविलास यांची मनमोकळी चर्चा आहे.


कोकपंडितानंतरचा कामशास्त्रावरील दुसरा महत्त्वाचा गंथकार म्हणजे कल्याणमल्ल (सोळाव्या शतकाचा पूर्वार्ध). त्याने अनंगरंग नावाचा गंथ लिहिला. त्यात नायक-नायिकांचे राग-अनुराग दिले आहेत. याही गंथाचा मुस्लिम समाजात फार प्रसार झाला आणि नंतर त्याची अरबी, फार्सी, उर्दू इ. भाषांत भाषांतरे झाली. कल्याणमल्ल हा ओरिसातील कलिंग देशाचा राजा अनंगभीम याच्या दरबारात होता, असे म्हटले जाते. कामशास्त्रावरील अशा काही गंथांशिवाय इतरही काही गंथ लिहिले गेले. तसेच कोकपंडिताच्या रतिरहस्य या गंथावरही कांचीनाथ, भावत्य रामचन्द्र, कवी प्रभू व हरिहर या पंडितांच्या टीका प्रसिद्घ आहेत. हरिहराचा रतिरहस्य किंवा शृंगारदीपिका, विजयानगरचा राजा प्रौढ देवराय (१४२२-४८) याचा रतिरत्नदीपिका, तंजावरचा राजा शहाजी (१६८४-१७१०) याचा शृंगारमंजरी, अनंताचा कामसुधा, मीनानाथाचा स्मरदीपिका इ. अनेक गंथ कामशास्त्रावर मध्ययुगात लिहिले गेले. यांपैकी काही गंथ अद्याप अप्रकाशित आहेत. कंदर्पचूडामणी हा वीरभद्र याने सोळाव्या शतकात लिहिलेला गंथ प्रसिद्घ असून रतिकल्लीलिनी हा दीक्षित सामराज याचाही गंथ ख्यातनाम आहे. तसेच स्मरदीपिका या शीर्षकाचे दोन गंथ अनुक्रमे मीनानाथ आणि रूद्र यांनी लिहिले आहेत. वरील गंथांशिवाय कामशास्त्रावरील काही गंथ व गंथकार यांचा उल्लेख प्राचीन संस्कृत साहित्यात आढळतो. त्यांपैकी आदिशास्त्र, दशरूपक, नायिकालक्षण कामकुंजलाट, रसिकसर्वस्व, रति-वल्ल्भम् , संगीतराज, कामरत्न, कोकसार, रसरत्नकोश, रसरत्न प्रदीपिका आदी गंथ आणि चंद्रमौली, ईश्वर, कर्णिसुत, कश्यपमुनी, कात्यायन, कवींद्र, महेश्वर, महूक, मल्ल‌दम् , मूलदेव, मुनींद्र, राजपुत्र, रन्तिदेव इ. गंथकार आहेत. [⟶ कामशास्त्र कामसूत्र].

छंदःशास्त्र : छंदःशास्त्रावरील ⇨ पिंगला ची (इ. स. पू. दुसरे शतक) छंद:सूत्रे विख्यात असली, तरी ह्या विषयावरील अनेक गंथकारांच्या नावांचा ठिकठिकाणी उल्लेख आढळूनही त्यांचे मूळ साहित्य उपलब्ध नाही. जयदेवाचे छंद:शास्त्र, जानाश्रयीचे छंदोविचिती, केदारभट्टाचे वृत्तरत्नाकर, गंगादासाची छंदोमंजिरी वगैरे गंथ ह्या शास्त्राचा सखोल आणि विस्तृत वेध घेणारे आहेत. [⟶ छंदोरचना].

व्युत्पत्ती व व्याकरण : पाणिनी हा संस्कृतातील सर्वांगपूर्ण अशा व्याकरणाचा कर्ता होय. त्याची अष्टाध्यायी म्हणजे व्याकरणशास्त्रावरील आदर्श गंथ होय. त्यात पूर्वीच्या दहा व्याकरणकारांचा उल्लेख आहे. पाणिनीच्या अष्टाध्यायी तील सूत्रांवर इ. स. पू. सु. तिसऱ्या शतकात होऊन गेलेल्या ⇨ कात्यायना नेवार्तिके लिहिली आणि या वार्तिकांवर ⇨ पतंजलीने (इ. स. पू. सु. १५०) आपले महाभाष्य लिहिले. भर्तृहरी आणि वामन (सातवे शतक) हे दोन महान व्याकरणकार होते. भर्तृहरीने ⇨ वाक्यपदीय, तर जयादित्य (सातवे शतक) आणि वामनाने काशिका हे पाणिनीय पद्धतीवर विवेचन करणारे गंथ लिहिले. सुमारे ८०० मध्ये कातंत्र व्याकरणा वर (किंवा कालाप) भाष्य लिहिणारा सर्वांत प्राचीन भाष्यकार दुर्गसिंह होय त्याने वृत्ति आणि टीका नावाचे भाष्य लिहिले. शाकटायन हा नवव्या शतकातील एका नवीन व्याकरणप्रणालीचा संस्थापक असून त्याने अमोघवृत्ति हा व्याकरणावर गंथ लिहिला. त्यात राष्ट्रकूट राजा अमोघवर्ष (८१४-७८) याचा उल्लेख आहे. त्याचा या विषयावरील अन्य मुख्य गंथ म्हणजे शब्दानुशासन असून तो श्र्वेतांबर जैन संप्रदायात अतिशय लोकप्रिय झाला होता. मैत्रेयरक्षित या बौद्ध संप्रदायी  विव्दानाने जिनेंद्रबुद्धीच्या न्यासा वर तंत्रप्रदीप या शीर्षकाने भाष्य लिहिले. याव्यतिरिक्त त्याच्या नावावर धातुप्रदीप हा पाणिनीच्या धातुपाठा वर आधारित अन्य एक गंथ आहे. मैत्रेयरक्षिताचा काळ निश्चितपणे सांगता येत नाही. जिनेंद्रबुद्धीच्या न्यासा वर दुसरी एक टीका इन्दू किंवा इन्दुमित्र याने अनुन्यास या शीर्षकनामाने केली आहे. नवव्या शतकातील दुसरा एक प्रसिद्घ व्याकरणकार विमलमती याने भागवृत्ति नावाचा गंथ रचिला आहे. शिष्यहितन्यास ही उगभूती (इ. स. सु. १०००) या व्याकरणकाराची कातंत्र व्याकरणमता वरील टीका आहे. ह्या मतप्रणालीचा प्रसार प्रामुख्याने बंगाल व काश्मीर या प्रदेशांत झाल्याचे आढळते. काश्मीरी पंडितांपैकी भट्ट जगद्घर आणि छिछुभट्ट हे प्रसिद्ध असून त्यांनी अनुक्रमे बालबोधिनी आणि लघुवृत्ति हे दोन टीकागंथ रचिले (१०००).

दहाव्या शतकानंतर व्याकरणावरील गंथांत फारशी भर पडली नाही परंतु व्याकरणावरील अनेक मतप्रणाली अस्तित्वात आल्या आणि त्यांनी सर्वसाधारण लोकांसाठी व्याकरणशास्त्र सुलभ व सोपे करण्याचा प्रयत्न केला. त्याचा पहिला आविष्कार म्हणजे अष्टाध्यायी च्या स्पष्टीकरणात्मक सुलभ रचना करण्यात आल्या. त्यात पाणिनी व्याकरणप्रणालीतील क्षीरस्वामिन् याच्या धातुवृत्ती चा अंतर्भाव होतो. त्यानंतर कैयट (जैयटाचा मुलगा. जैयट हा बहुधा काश्मीरचा रहिवासी होता) याने पतंजलीच्या महाभाष्या वर प्रदीप ही टीका लिहिली. काशिके वरील हरदत्ताचे पदमंजरी हे भाष्य मोलाचे आहे. तो आंध्र प्रदेशचा रहिवासी असून त्याच्या वडिलांचे नाव पद्मकुमार होते. पाणिनीय गणपाठा वर वर्धमानाचा गणरत्नमहोदधी हा पूर्ण असा एकच गंथ आहे. त्यात गणांची छंदोबद्ध व्यवस्था केली असून त्यावर लेखकाने स्पष्टीकरणात्मक भाष्य केले आहे. सर्वरक्षिताच्या निरीक्षणाखाली शरणदेव या बौद्ध संप्रदायी लेखकाने दुर्घटवृत्ति नावाचा व्याकरणावर गंथ लिहिला. त्यात पाणिनीच्या संहितेतील अवघड परिच्छेदांचा परामर्श घेतला आहे.


अ-पाणिनीय व्याकरणप्रणालीतील चान्द्र व्याकरणप्रणालीचा ह्या काळात (इ. स. दहाव्या शतकानंतरच्या) अस्त झाला होता परंतु या प्रणालीच्या गंथांचा अभ्यास तिबेट आणि श्रीलंकेत अदयाप होतो. त्यांत श्रीलंकेतील बौद्ध भिक्षू काश्यप याने बालावबोध ह्या नावाने चांद्र व्याकरणाची जी पुनर्रचना केली तिचा हा परिणाम होय. जैनेन्द्र व्याकरणप्रणालीचे प्रतिनिधित्व तेराव्या शतकातील काही गंथ करतात. त्यांतील सोमदेव (१२०५) आणि अभयनंदी (१२५०) या दोघांचे टीकागंथ उपलब्ध आहेत. सोमदेव हा कोल्हापूर जिल्ह्यातील आजरे या गावचा (आजुरिका) रहिवासी असून शिलाहार राजा दुसरा भोज ह्याचा समकालीन होता. त्याने शब्दार्णवचंद्रिका या शीर्षकाने टीका लिहिली आहे. पंचवस्तू हा गंथ म्हणजे जैनेन्द्र व्याकरणाची पुनर्रचना असून अभ्यासाला आरंभ करणाऱ्या विदयार्थ्यांसाठी त्याने लिहिला होता. आर्य श्रूतकीर्ती ह्याचा ह्या गंथाच्या आरंभीच्या भागात लेखक म्हणून निर्देश आढळतो. चालुक्य राजा दुसरा जयसिंह याचा सहाध्यायी दयापाल याने शाकटायनाच्या व्याकरणाचे संक्षिप्तीकरण रूपसिद्धी ह्या गंथात केले. या व्याकरणप्रणालीचा प्रभाचन्द्राचार्य याचा न्यास हा दुसरा एक गंथ होय. मुग्धबोध हा सारस्वत व्याकरणप्रणालीचा काळ १२५० च्या अलीकडे फारसा जात नाही, असे दिसते. संस्कृतच्या अभ्यासाला उत्तेजन देणाऱ्या मुस्लिम राज्यकर्त्यांच्या इच्छेला प्रतिसाद म्हणून बहुधा सारस्वत व्याकरणप्रणाली उदयास आली. संक्षिप्त मांडणी आणि सुलभता ही सारस्वत व्याकरणप्रणालीची मुख्य वैशिष्टये होत. अनुभूतिस्वरूपाचार्य हे परंपरेनुसार सारस्वत व्याकरणप्रणालीचे संस्थापक असून त्यांनी सारस्वतप्रक्रिया हा गंथ व्याकरणावर लिहिला. त्यांच्यापूर्वी या विषयाचा परामर्श घेणारे एक-दोन पूर्वसूरी असावेत. कर्णदेव (हा बहुधा गुजरातमधील एक राजा असावा) याचा आश्रित वर्धमान पंडित याने कातंत्रविस्तार हे दुर्गसिंहाच्या वृत्तीवर भाष्य लिहिले. वर्धमानानंतर त्रिलोचनदास या गंथकाराने कातंत्रवृत्तिपंजिका हा गंथ रचिला. या प्रणालीचा दुसरा गंथ म्हणजे शब्दसिद्धी होय. तो महादेवाने टीकेच्या स्वरूपात संवत १3४० मध्ये लिहून पूर्ण केला (इ. स. १३९६). गुजराती बहुश्रूत विव्दान हेमचन्द्र याने हेमचन्द्र व्याकरणप्रणालीची संस्थापना केली. त्याच्या शब्दानुशासन गंथात अष्टाध्यायी प्रमाणे प्रत्येकी चार पादांचे आठ अध्याय असून एकूण ४,५०० सूत्रे आहेत. यांतील जवळपास एक चतुर्थांश सूत्रे शेवटच्या अध्यायात असून ती केवळ प्राकृत भाषेच्या परामर्शासाठी आहेत. बोपदेव व्याकरणप्रणालीचा प्रवर्तक बोपदेव ह्याचा मुग्धबोध हा मुख्य पाठ्यगंथ होय. बोपदेव हा बेरारचा रहिवासी होता. त्याच्या वडिलांचे नाव केशव व तो धनेश पंडिताचा शिष्य होता. त्याने विपुल गंथलेखन केले. मुक्ताफल, हरिलीलाविवरण, शतश्र्लोकी वगैरे त्याच्या प्रमुख गंथांपैकी होत. त्याचा व्याकरणशास्त्रावर गंथ लिहिण्याचा उद्देश व्याकरणाची थोडक्यात आणि सुलभपणे ओळख करून देणे हा होता बोपदेवाने त्यात धार्मिकतेलाही प्राधान्य दिले असून हरी, हर आणि राम ह्यांचा उदाहरणांत स्पष्टीकरणार्थ उपयोग केला आहे. बोपदेवाने कविकल्पद्रूम हा छंदोबद्ध धातुपाठही सिद्ध केला होता. यात त्याने केवळ धातू आणि त्यांचा अर्थ स्पष्ट केला नसून व्याकरणदृष्टया धातूंचा उपयोग कसा करावयाचा याचीही चर्चा केली आहे. या काळातील आणखी एक व्याकरणप्रणाली म्हणजे जौमर व्याकरण होय. ह्या प्रणालीतल्या प्रसिद्ध जौमरनंदी व्याकरणकारावरून हे नाव त्यास मिळाले असून या प्रणालीचा संस्थापक-लेखक कमदीश्वर हा ख्यातकीर्त व्याकरणकार होता. त्याने संक्षिप्तसार हा व्याकरणावर गंथ लिहिला असून महाराजाधिराज जुमरनंदी याने तो तपासून शुद्ध केला. त्यांच्या वृत्तीचे नाव रसवती होय. त्याने पाणिनीय धातुपाठा त काही फेरफार करून त्याचा उपयोग या व्याकरणप्रणालीसाठी केला.

चौदाव्या-सोळाव्या शतकांत मुख्यत्वे पाणिनीच्या अष्टाध्यायी या गंथावर आधारित व्याकरणाच्या गंथांचे लेखन झाले. त्यांतील विमल-सरस्वतीचा रूपमाला (हा १३५० च्या पलीकडचा असणार नाही) हा प्रारंभीचा व्याकरणगंथ असून अष्टाध्यायी ची अत्यंत सुलभ अशी पुनर्रचना आहे. रामचंद्राने प्रक्रियाकौमुदी या गंथात (सु. १४००) पाणिनीच्या गंथातील मजकुराची पुनर्मांडणी केली. या काळातील महत्त्वाचा व्याकरणगंथ म्हणजे ⇨भट्टोजी दीक्षिता चा (सतरावे शतक) सिद्धांतकौमुदी. हा प्रक्रिया-कौमुदीवर आधारलेला आहे. शब्दकौस्तुभ हा आणखी एक गंथ त्याने लिहिला. सिद्धांतकौमुदी तून पुढे अनेक लहान प्रबंध उत्पन्न झाले. त्यांपैकी मध्य-सिद्धांतकौमुदी, लघु-कौमुदी आणि सारकौमुदी (वरदराज- सतरावे शतक) हे महत्त्वाचे प्रबंध होत. वरदराजाने गीर्वाणपदमंजरी हा व्याकरणावर आणखी एक गंथ लिहिला होता. सायणाचा बंधू ⇨ माधवाचार्य (सु. १२९६-१3८६) याने धातुवृत्ति हा गंथ व्याकरणावर लिहिला.

हेमहंसविजयगणी या संस्कृत पंडिताने हेमचन्द्र व्याकरणप्रणालीतील हेमचन्द्राच्या व्याकरणगंथातील वापरलेल्या १४० परिभाषांचे किंवा अर्थ-बोधक सूत्रांचे संकलन आणि त्यांवरील भाष्य न्यायार्थमंजुषा (१४५८) या शीर्षकाने केले. देवसुंदरसूरींचा शिष्य गुणरत्नसूरी याने व्याकरणावर क्रियारत्नसमुच्च्य (१४०९) हा गंथ लिहिला तथापि हेमचन्द्र व्याकरणप्रणाली मौलिकतेचा अभाव आणि तिच्या संस्थापकांचा व अनुयायांचा पंथीय दृष्टिकोन ह्यांमुळे अल्पकाळच अस्तित्वात राहिली. त्यानंतर माळव्याचा घियासुद्दीन खल्जी (१४६९-१५००) याचा मंत्री पुंजराज याने शिशुप्रबोध हा अलंकारांवर आणि ध्वनिप्रदीप हा ध्वनिविचारांवर गंथ लिहिला. याशिवाय या काळात अमृतभारतीची सुबोधिका (१४९७) व चन्द्रकीर्तीची सुबोधिका किंवा दीपिका ह्या टीकांची निर्मिती झाली.

पद्मनाभदत्त या मैथिल बाह्मणाने (चौदावे शतक) सौपद्म व्याकरणप्रणालीची स्थापना केली. त्याचा सौपद्म हा व्याकरणगंथ पाणिनीच्या अष्टाध्यायी वर बेतलेला असून प्रत्येक सूत्राखाली स्पष्टीकरणात्मक खुलासा दिला आहे. त्याने स्वत: आपल्या व्याकरणावर सुपद्मपंजिका नामक टीका लिहिली आहे. सौपद्म व्याकरणप्रणालीचा प्रभाव फक्त बंगालपुरता मर्यादित राहिला.

शाकटायन व्याकरणाचे पुनर्रचित स्वरूप प्रक्रियासंग्रह या अभय-चंद्राचार्य या पंडिताच्या गंथात आढळते. त्यात त्याने नवशिक्यांसाठी अनावश्यक अशी सूत्रे वगळली आहेत आणि आवश्यक त्या सूत्रांचा विस्तार केला आहे. बोपदेवाच्या मुग्धबोध या मूळ गंथाला नंदकिशोरभट्ट याने एक पुरवणी-निबंध जोडला आहे (१३९८). व्याकरणात धार्मिक तत्त्वे घुसडण्याची प्रवृत्ती बोपदेवाच्या गंथांतून दिसते. ती पुढे दोन वैष्णव व्याकरणकारांच्या गंथांतून अधिक तीव झालेली आढळते यांपैकी एका गंथाचे नावच मुळी हरिनामामृत असे असून तो रूपगोस्वामी नावाच्या वैष्णव पंथीयाने लिहिला आहे आणि व्याकरण हे वैष्णव धर्माचे माध्यम म्हणून स्वीकारले आहे. जीवगोस्वामी ह्या वैष्णवानेही ह्याच नावाचे व्याकरण लिहिले आहे. हे व्याकरण बंगालच्या वैष्णव पंथीयांत वापरले जाते. बंगालमध्ये पाणिनीच्या व्याकरणावर पंधराव्या शतकात काही संस्कृत टीका लिहिल्या गेल्या. त्यांपैकी नरपतिमहामिश्र याची न्यासप्रकाश, नंदनमिश्र याची न्यासोद्दिपन या प्रसिद्ध आहेत. बंगालमधील एक श्रेष्ठ विव्दान व संस्कृत पंडित पुंडरीकाक्ष विदयासागर याने स्वतंत्र रीत्या कारक-कौमुदी हा व्याकरणगंथ लिहिला आणि न्यास कातंत्रटीका, काव्यादर्श, काव्यप्रकाश, भट्टिकाव्य इत्यादींवर भाष्ये लिहिली. बंगालमधील श्रीमन मिश्र याने पाणिनी व्याकरणाच्या प्रणालींवरील न्यास, अनुन्यास आणि तंत्रप्रदीप ह्या तीन अभिजात गंथांवर टीका लिहिल्या.


नागोजी भट्ट (इसवी सनाच्या सतराव्या शतकाची अखेर ते अठराव्या शतकाचा मध्य) हा थोर व्याकरण कार असून त्याची गंथरचना विपुल आहे. त्याचा ⇨ परिभाषेंदुशेखर हा गंथ पाणिनीय संप्रदायातील व्याकरणविषयक परिभाषांच्या स्पष्टीकरणार्थ लिहिला गेला. नारायणीयम् या गंथाचा कर्ता नारायण याने प्रक्रिया सर्वस्व नावाची व्याकरणावर टीका लिहिली आहे. त्याचा मानमेयोदय हा मीमांसा साहित्यावरील गंथ महत्त्वाचा व मूलभूत मानला जातो. ह्याशिवाय सर्ववर्मन याचे कातंत्रव्याकरण, वररूचीचे प्राकृतप्रकाश, हेमचंद्राचे प्राकृतव्याकरण,चंद्रगोमी चे चांद्रव्याकरण, तसेच कलापसूत्र,व्याडिसूत्र इ. अनेक गंथ व्याकरणशास्त्राविषयीची प्राचीनांची आवड आणि आस्था दाखवितात.

कोशवाङ्‌मय : वैदिक काळात निघंटूंची (शब्दकोशांची) निर्मिती झाली होती. तथापि नामलिंगानुशासन किंवा ⇨ अमरकोश हा प्राचीन शब्दकोश संस्कृतातील सर्व शब्दकोशांचा मुकुटमणी होय. ह्याचा कर्ता अमर ह्याच्या काळाविषयी मतभेद आहेत काही विद्वानांच्या मते त्याचा काल इ. स. पू. पहिले शतक असून काहींच्या मते तो इ. स.च्या तिसऱ्या वा पाचव्या शतकांत होऊन गेला असावा, ⇨मॉरिझ विटंरनिट्स सारख्या विद्वानांच्या मते सहावे ते आठवे शतक ह्या कालखंडात तो केव्हातरी होऊन गेला असावा. सुमारे १,५०० श्लोकांचा हा शब्दकोश आहे. ह्या कोशाची रचना वर्णानुकमाने केलेली नाही. ह्या कोशाच्या कर्त्याने शब्दार्थाबरोबर शब्दाच्या लिंगाचीही माहिती दिली आहे. तसेच वैदयकातले शब्दही अंतर्भूत केले. ह्या कोशावर अनेक टीका लिहिल्या गेल्या, त्यांत क्षीरस्वामी (अकरावे शतक), सर्वानंद (११५९), बृहस्पती रायमुकुटमणी (१४३१), नारायण शर्मा (१६१९), भानुजी दीक्षित (सतरावे शतक) ह्यांच्या टीका प्रसिद्घ आहेत. अमरसिंहाचा कदाचित समकालीन असलेला शाश्वत याने अनेकार्थसमुच्च्य नावाचा कोश रचिला होता. अग्निपुराणा त एक कोश असून तो अमरकोशा चीच संक्षिप्त आवृत्ती असल्यासारखा दिसतो. धन्वंतरीचा मूळ स्वरूपातला निघंटू अमरकोशा पूर्वीचाच असावा परंतु त्याची आता उपलब्ध असलेली प्रत उत्तरकालीनच म्हणावी लागेल. वैदयकशास्त्रावरचा महत्त्वाचा कोशगंथ म्हणून याचे मूल्य वादातीत आहे. आठवे ते दहावे शतक ह्या कालखंडात हलायुधाचा अभिधानरत्नमाला हा कोश लक्षणीय असून त्याने अमरदत्त, वररूची, भागुरी आणि वोपालिता या कोशकारांना अनुसरले आहे. त्याची रचना जवळजवळ अमरकोशा प्रमाणेच असून त्यातील समानार्थक शब्दांचा भाग चार काण्डांत दिला आहे. त्या काण्डांना स्वर्ग, भूमी, पाताळ आणि सामान्य अशी नावे दिली आहेत. शेवटचे पाचवे काण्ड अनेकार्थकाण्ड या नावाने लिहिले आहे. मंख (बारावे शतक) हा या कोशाचा उल्लेख करणारा सर्वांत आधीचा संस्कृत पंडित होय. याशिवाय हलायुधाने कविरहस्य हा स्वतंत्र गंथ आणि पिंगलाच्या छंद:सूत्र यांवर मृतसंजीविनी नावाची टीका लिहिली. ही टीका ९७४ ते ९९५ ह्या काळात धाराचा राजा मुंज वाक्पती याच्या सन्मानार्थ रचिली होती, तर पहिले काव्य (कविरहस्य) हे राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्णराज (दक्षिणेचा राजा कार. ९३९-९६७) याच्या प्रशस्तिनिमित्त रचिले होते.

कोशवाङ्‌मयात दहाव्या ते चौदाव्या शतकात मौलिक भर पडली. या काळातील वैजयंती या गंथाचा कर्ता यादवप्रकाश हा ⇨ रामानुजाचार्यां चा (१०१७-११३७) गुरू असल्याचे म्हटले जाते. परमार भोजलिखित नाममालिका हे संकलन म्हणजे संग्रहित वा एकत्रीकरण असून त्यावर वैजयंती या गंथाचा प्रभाव दृष्टोत्पत्तीस येतो. पुरूषोत्तमदेव (बारावे शतक) या बौद्घ धर्मीय कोशकाराने त्रिकाण्डशेष, हारावलीवर्णदेशना हे तीन स्वतंत्र शब्दकोश रचिले. त्यांपैकी त्रिकाण्डशेष हा कोश तीन भागांत विभागलेला असून त्यात सु. १,०५० श्र्लोक आहेत. अमरकोशा स जोडलेली ही पुरवणी आहे. तीत अमरकोशा ची परिभाषा व विभागणी तीच ठेवली असून कोशकाराचा उद्देश अमरकोशा त न आढळणारे शब्द देणे एवढाच आहे. हारावली हा २७८ श्लोकांचा सामान्यत: प्रचारात नसणारे समानार्थक शब्द आणि भिन्नार्थक समोच्चरित शब्द यांचा दोन भागांतील लघुकोश आहे. वर्णदेशना हा गदयात असून त्यात वेगवेगळ्या प्रकारे लिहिल्या जाणाऱ्या शब्दांचे संकलन आहे. या तीन कोशांव्यतिरिक्त एकाक्षरकोश आणि व्दिरूपकोश हे अन्य दोन कोशगंथही पुरूषोत्तमदेवाच्या नावावर मोडतात. त्यांपैकी व्दिरूपकोश हा फक्त ७५ श्लोकांचा असून त्यात दोन प्रकारे लिहिल्या जाणाऱ्या शब्दांचा विचार केला आहे.

विश्र्वप्रकाश (११११) आणि अनेकार्थकोश हे दोन भिन्नार्थदर्शक समोच्चरित शब्दकोश आहेत. महेश्वर याने विश्र्वप्रकाश संकलित केल्याचा उल्लेख त्या गंथाच्या अखेरच्या श्लोकात आहे. तो श्रीब्रह्म्याचा मुलगा होता आणि बाराव्या शतकात तो लोकप्रिय असल्याचा उल्लेख तत्कालीन सर्वानंद आणि हेमचंद्र या दोन कोशकारांनी केला आहे. अनेकार्थकोश हा मंख नावाच्या एका गंथकाराने रचला असून हा मंख श्रीकंठचरित कार मंखच असावा आणि तो काश्मीरचा राजा जयसिंह (११२८-५५) ह्याच्या कारकीर्दीत होऊन गेला असावा असे मानले जाते. विश्वप्रकाश या गंथाचाच पुनर्रचित नमुना म्हणजे मेदिनीकराचा (अंदाजे बारावे शतक) अनेकार्थ-शब्दकोश होय. तो मेदिनी या नावानेही ओळखला जातो. अजयपालाचा नानार्थसंग्रह हा फक्त हस्तलिखित स्वरूपात उपलब्ध असून शाश्वतकोशा तील सु. १,७३० शब्द ह्यात समाविष्ट आहेत. अजयपाल हा बौद्ध धर्मीय होता आणि त्याचा उल्लेख गणरत्नमहोदधी (११४०) या गंथात येतो. केशव-स्वामीचा नानार्थार्णवसंक्षेप हा या काळातील भिन्नार्थदर्शक समोच्चरित शब्दांचा सर्वांत मोठा कोश असून त्यात ५,८०० श्र्लोक आहेत. त्यांची विभागणी सहा काण्डांत केली आहे. राजराजा चोल याच्या आश्रयास केशवस्वामी होते. धनंजयाच्या नाममाला ह्या गंथाच्या मुद्रित संहितेत समानार्थदर्शक शब्दांचा २०० श्लोकांचा भाग फक्त आढळतो. धनंजय हा दिगंबर जैन पंथीय आणि कर्नाटकाचा मूळ रहिवासी होता. त्याच्या नावावर व्दिसंधानकाव्य हा आणखी एक गंथ असल्याचा उल्लेख गणरत्नमहोदधी या गंथात आढळतो.

गुजरातचा अनेकविदयाविज्ञ हेमचंद्र याने अभिधानचिंतामणि, अनेकार्थ-संग्रह, निघंटुशेष आणि देशीनाममाला हे चार शब्दकोश रचिले यांतील पहिले दोन शब्दकोश अनुक्रमे समानार्थक शब्द आणि भिन्नार्थदर्शक समोच्चरित शब्द यांना वाहिलेले आहेत. तिसरा वानस्पतिक निघंटू असून चौथा प्राकृत शब्दकोश आहे. हेमचंद्रानंतर महीप याचे नाव घेतले जाते. त्याने अनेकार्थतिलक हा भिन्नार्थदर्शक समोच्चरित शब्दांचा कोश रचिला. या काळातच अमरकोशा वर अनेक टीका प्रसिद्ध झाल्या.

चौदाव्या-पंधराव्या शतकांत एकावयवी (मोनोसिलॅबिक) शब्दकोशांची रचना झालेली आढळते. त्यांना एकाक्षरकोश म्हणतात. यांपैकी सुधाकलश (चौदावे शतक) याचा एकाक्षरनाममाला आणि माधवाचार्य याचा एकाक्षररत्नमाला हे प्रसिद्ध आहेत. स्वर, व्यंजन आणि संयुक्त अशी तीन कांडे यात आहेत. व्याकरणाच्या सौपद्म प्रणालीचा संस्थापक पद्मनाभदत्त याचे भूरिप्रयोगपृशोदरादिवृत्ति (१३७४) हे शब्दकोश आहेत. इरूपग दण्डाधिनाथ किंवा भास्कर हा विजयानगरचा दुसरा हरिहर (चौदावे शतक) याच्या आश्रयार्थ होता. त्याने नानार्थरत्नमाला हा शब्दकोश तयार केला होता. वामनभट्ट बाण याच्या शब्दरत्नाकरा त अव्यये आणि भिन्नतादर्शक समोच्चरित शब्द शेवटी दिले आहेत मात्र हा वामन भट्ट बाणानेच लिहिला का याविषयी मतभेद आहेत. मदनपाल याने १३७४ मध्ये मदनविनोदनिघंटू हा सु. २,२५० श्र्लोकांचा बृहद् शब्दकोश तयार केला. त्याचे १४ वर्ग (प्रकरणे) असून त्याला मदनपालनिघंटू असेही म्हणतात. तो बहुसमावेशक कोश असून त्यात औषधीविदयाविषयक विशेषत: औषधी द्रव्ये, त्यांचे गुणधर्म, विविध प्राण्यांचे मांस वगैरेंसंबंधी शब्द आढळतात. पंचवर्गनामसंग्रह हा शुभशीलगणी (पंधरावे शतक) याचा शब्दकोश असून त्याने उणादिनाममाला हा शब्द कोशही रचिला.


वैदयकशास्त्रीय लेखन : अथर्ववेदा त विविध रोगांच्या निर्मूलनासाठी वापरावयाचे मंत्र आहेत. भारतीय आयुर्वेदाची प्रारंभीची अवस्था त्यात दिसते. चरकसंहिता, सुश्रूतसंहिता, अष्टांगसंग्रहअष्टांगहृदय हे आयुर्वेदाचे मुख्य आधारस्तंभ होत. ⇨ चरक हा कनिष्काचा (इ. स. पहिले शतक) राजवैदय होता, असा चिनी भाषेत अनुवादिलेल्या ⇨ त्रिपिटका त निर्देश आहे. चरक-संहिता ह्या गंथाचा मूळ गाभा इ. स. पू. सातव्या शतकाच्या सुमारास रचिला गेला असावा. ह्या संहितेचा गाभा असलेले तंत्र पुनर्वसू आत्रेय याने रचिले व त्याचा शिष्य अग्निवेश आचार्य याने त्याची नवी आवृत्ती तयार केली असावी, चरकाने अग्निवेशाच्या तंत्रावर पुन:संस्कार केला. चरकसंहिते वर इ. स.च्या पाचव्या शतकाच्या सुमारास झालेल्या कपिलबलपुत्र दृढबलाने पुस्ती जोडली. चरकसंहिते त (१) सूत्रस्थान, (२) निदानस्थान, (३) विमानस्थान, (४) शारीरस्थान, (५) इंद्रियस्थान, (६) चिकित्सास्थान, (७) कल्पस्थान व (८) सिद्धान्तस्थान अशी आठ स्थाने वा प्रकरणे आहेत. रोगोपचारांचे सामान्य स्वरूप, आठ मुख्य रोगांची निदाने, पथ्यापथ्य, शरीररचना, गर्भविदयानिदान आणि परिणाम ह्यांचा विचार, चिकित्सेचे तपशीलवार वर्णन इ. विषय ह्या आठ प्रकरणांतून आले आहेत. चरकसंहिते चे अरबी व फार्सी भाषांत नवव्या शतकात अनुवाद झाले आहेत. ⇨ सुश्रूता ची संहिताही तेवढीच महत्त्वाची असून त्यावेळी इतर राष्ट्रांना माहीत नसलेले शस्त्रकियेचे प्राचीन काळचे प्रगल्भ तंत्र सांगणारा गंथ म्हणून सुश्रूतसंहिते ची ख्याती आहे. महाभारता त सुश्रूत हा विश्वामित्रांचा मुलगा असल्याचा उल्लेख आहे ही संहिता तिच्या मूळ स्वरूपात आपल्यापर्यंत आलेली नाही. नागार्जुनाने सुश्रूताची संहिता वापरली होती असे म्हटले जाते व पुढे चंद्रटनामक पंडिताने मूळ पाठात काही दुरूस्त्या-सुधारणा करून तयार केलेली संहिता मिळते. त्यात शारीर, विकारविज्ञान, गर्भविज्ञान , चिकित्सा-विज्ञान आणि विषचिकित्साविज्ञान इत्यादींचा ऊहापोह केला असून त्यात दोन स्वतंत्र प्रकरणांत शस्त्रक्रियेच्या उपकरणांची आणि शस्त्रक्रियेच्या पद्धती-विषयी माहिती आहे. अशाच प्रकारचा भेलसंहिता हा वैदयकशास्त्रावरील गंथ जीर्णशीर्ण हस्तलिखितात उपलब्ध असून तो छंदस्वरूपात आहे. गंथकर्त्यास सुश्रूतसंहिते चा परिचय असून त्याने चरकसंहिते तील प्रकरणांचे 

अनुकरण केले आहे. वैदयकावरील ‘बॉवर’ हस्तलिखित काश्गर येथे १८९० मध्ये सापडले. ते बॉवर नावाच्या संशोधकास मिळाल्यामुळे त्यास हे शीर्षक प्राप्त झाले आहे. पुरालेख विदयेच्या दृष्टीने पाहता ते इ. स. चौथ्या शतकातील असावे. त्यात वैदयकातील आत्रेय, क्षारपाणी, जातुकर्ण, पराशर, भेड, हारीत आणि सुश्रूत या पूर्वसूरींचा उल्लेख आहे. यात लसूण, आयुष्यवर्धक औषधे यांचे गुणविशेष वर्णिले असून औषधनिर्मितीचेही विवेचन आहे. दुसरे एक कातड्यावर लिहिलेले पण त्रूटित अवस्थेतील हस्तलिखित पूर्व तुर्कस्तानामध्ये सापडले. ते इ. स. दुसऱ्या शतकातील असून संस्कृत भाषेत आहे पण त्यात प्राकृत भाषांच्या काही प्रवृत्ती आलेल्या आहेत.त्यात रसमीमांसा आहे.

आयुर्वेद विदयेतील आणखी एक श्रेष्ठ नाव ⇨ वाग्भटा चे होय : अष्टांगसंग्रह आणि अष्टांगहृदयसंहिता हे दोन गंथ वाग्भटाचे होत तथापि वाग्भट नावाचे दोन गंथकार होऊन गेल्याचे दिसते आणि त्यांचे नाते आजोबा-नातवाचे असावे, असाही अंदाज केला जातो. अष्टांगसंग्रह हा गंथ आजोबांचा असावा. त्यांचा निर्देश वृद्ध वाग्भट असा केला गेला आहे. हे दोन्ही वाग्भट बौद्ध होते. थोरल्या वाग्भटाचा काळ इ. स. सातव्या शतकाच्या आरंभीचा किंवा त्याआधीचा असावा. तो बौद्घ अवलोकिताचा शिष्य होता. अष्टांग-संग्रह हा गंथ गदयपदयात्मक आहे. अष्टांगसंग्रहा च्या अखेरीस थोरल्या वाग्भटाने, आपण सिंहगुप्ताचा पुत्र असून आपल्या आजोबांचे नाव वाग्भट असल्याचे म्हटले आहे. अष्टांगसंग्रहा त चरक, सुश्रूत ह्यांचे आधार दिलेले आहेत. अष्टांगहृदयसंहिता या धाकट्या वाग्भटाच्या गंथात अष्टांगसंग्रहा चे सार सूत्ररूपाने आलेले दिसते. धाकटया वाग्भटाचा काळ इ. स. आठवे वा नववे शतक असा असावा.

पशुवैदयक व वनस्पतिवैदयकही प्राचीन भारतीयांनी निर्माण केले होते. हस्त्यायुर्वेद या प्रबंधात हत्तींना होणाऱ्या विकारांबद्दल सविस्तर चर्चा आहे. अंगदेशचा राजा रोमपाद आणि पालकाप्य मुनी ह्यांच्या संवादातून ह्या प्रबंधातील विवेचन केलेले आहे. काही अभ्यासकांच्या मते ह्या प्रबंधाची रचना इ. स. पू. पाचव्या वा सहाव्या शतकात झाल्याचे मानतात, तर काही हा गंथ बराच उत्तरकालीन मानतात. अश्र्वशास्त्र ही अशाच प्रकारची- घोडयांच्या विकारांबद्दलची – रचना मुनी शालिहोत्र ह्याच्या नावावर मोडते. महाभारता त (विराट पर्व, अध्याय ३-१०-१२) नकुल सांगतो, की मी अश्र्वविदया, अश्र्वशिक्षा, अश्र्वचिकित्सा, गोविदया व गोचिकित्सा या विषयांत पारंगत आहे.

रूग्विनिश्र्चय (हा माधव-निदान ह्या नावानेही ओळखला जातो) हा विकारविज्ञानावरील एक मान्यवर आणि श्रेष्ठ गंथ होय तो माधवकर या वैदयकशास्त्रावरील तज्ज्ञाने लिहिला आहे. यात सर्व रोगांची चिकित्सा कशी करावी व त्यांवरील उपचारपद्धती काय आहेत यांचे विश्लेषण आहे. वैदयकशास्त्राच्या इतिहासातील हा, अशा प्रकारचा रोगांची सर्वप्रकारे चिकित्सा करणारा पहिलाच गंथ होय. चकपाणिदत्त आणि वंगसेन या नंतरच्या वैदयकावरील लेखकांनी त्याचा उपयोग केला. तसेच यावर अनेक टीकागंथ लिहिले गेले. माधवकराचा काळ इ. स.चे नववे शतक असा सामान्यत: मानला जातो. सिद्धीयोग किंवा वृंदमाधव हा एक या शास्त्रावरील उल्लेखनीय गंथ असून तो माधवनिदाना तील रोग आणि उपचार ह्यांच्यासंबंधीच्या चर्चेचे अनुसरण करतो. हाही इ. स.च्या नवव्या शतकातलाच मानतात. धन्वंतरीचा निघंटू हा सर्वांत प्राचीन वैदयकशास्त्र आणि वनस्पतिविज्ञान यांचा शब्दकोश असून धन्वंतरी निघंटू चे दोन पाठ उपलब्ध आहेत. एकात सात तर दुसऱ्यात नऊ प्रकरणे आहेत.

चरक आणि सुश्रूत यांच्या गंथांवर चकपाणिदत्त (अकरावे शतक) या बंगाली टीकाकाराने अनुक्रमे आयुर्वेददीपिका आणि भानुमती या टीका लिहिल्या याशिवाय त्याने चिकित्सासारसंग्रह हा भारतीय वैदयकशास्त्राला वरदान ठरणारा गंथ सिद्ध केला त्यांत विविध धातूंपासून तयार होणाऱ्या औषधांची माहिती दिलेली आहे. तसेच त्याच्या शब्दचंद्रिका या गंथात विविध भाज्या आणि खनिजे ह्यांसाठी वापरलेले शब्द दिले आहेत तर त्याचा द्रव्यगुणसंग्रह हा गंथ आहारविदयाविषयक आहे. या काळातील सुरेश्वर वा सूरपाल हा अन्य एक बंगाली गंथकार राजा भीमपालाचा दरबारी वैदय होता. त्याने शब्दप्रदीप, वृक्षायुर्वेदलोहपद्धती वा लोहसर्वस्व हे तीन गंथ अनुक्रमे औषधी वनस्पतींच्या संज्ञा व उपयोग लोहाचे औषधी गुण व त्यापासून तयार करावयाची औषधे यांविषयी लिहिले. भोज परमाराने घोडे, त्यांचे रोग, त्यांवरील उपचार ह्यांवर शालिहोत्र ग्रंथ लिहिला आहे. याशिवाय या काळात मिल्हणाने चिकित्सामृत (१२२४), शारंगधराने संहिता हे ग्रंथ लिहिले. संहिता ह्या गंथात अफू आणि पाऱ्याचा औषधी उपयोग सांगितला असून नाडीपरीक्षा व रोगनिदान ह्यांच्या महत्त्वावर भर दिला आहे. रसार्णव (सु. १२००) आणि रसरत्नसमुच्च्य यांतून धातूंचा उपयोग चिरंतन तारूण्यासाठी कशा प्रकारे करावा, वगैरेची माहिती दिली आहे. इ. स. १३०० मध्ये हा गंथ झाला असावा, असा अंदाज आहे.

आयुर्वेदाची रसतंत्र ही शाखा इ. स.च्या सु. आठव्या शतकापासून अस्तित्वात आली, असे मानले जाते. रस म्हणजे पारा. पाऱ्याबरोबरच अन्य धातूंचा उपयोग रोगनिवारणासाठी तसेच आरोग्यासाठी करण्याची कल्पना वेदकाळापासूनची आहे. तथापि त्याचे शास्त्र होऊन त्या विषयावरचा रसरत्नाकर हा नागार्जुनाचा गंथ इ. स.च्या सातव्या वा आठव्या शतकात लिहिला गेला. विंटरनिट्सच्या मते त्याचा काळ इ. स.चे दहावे शतक हा असावा.


गणित व ज्योतिषशास्त्र : या शास्त्रावर प्राचीन भारतात प्रामुख्याने संस्कृत भाषेतच विपुल लेखन झाले आहे. वेदकालीन ज्योतिष हे वेदांग तयार झाले होते. वेदांग ज्योतिषाचे अनेक गंथ लुप्त झाले असून लगध आचार्यांचा ज्यौतिषम् (इ. स. पू. १४००) हा एक लहानसा निबंध उपलब्ध आहे. लगधाच्या कालखंडात गर्ग आचार्यांनी केलेली गर्गसंहिता ही लुप्त झाली, तरी तिच्यातील संदर्भ नंतरच्या गंथांत घेतलेले दिसतात. इ. स. सहाव्या शतकात वराहमिहिर याने पंचसिद्धान्तिका हा गंथ लिहिला ह्या गंथात खगोलीय सिद्धान्तसंज्ञक पाच गंथांची माहिती मिळते. हे गंथ म्हणजे पैतामह वा पितामह, वसिष्ठ, पौलिश, रोमक आणि सूर्य हे होत. ह्यांपैकी सूर्य हा गंथच तेवढा उपलब्ध आहे. भारतीयांना ग्रीक ज्योतिषाची  माहिती असली, तरी त्यांनी आपली परंपरा कायम ठेवली असे अनेक पश्चिमी संशोधकांचे मत आहे. वराहमिहिराने अनेक प्राचीन ज्योतिषज्ञांचा उल्लेख केला आहे. त्यांपैकी लाट, सिंह, प्रद्युम्न, विजयनंदी आणि ⇨ आर्यभट (इ. स. ४७६– ?) हे प्रमुख होत. त्यांच्या गंथांपैकी आर्यभटाचे आर्यसिद्धान्त वा आर्यभटीय, दशगीतिकासूत्र आणि आर्याष्टशत हे महत्त्वाचे व मौलिक होते. आर्यभटाने प्रथमच गणितशास्त्र हा स्वतंत्र विषय असल्याचे मानले आणि पृथ्वी गोल असून ती स्वत:भोवती फिरते हे दर्शविले. आर्यभट हा ज्योतिषशास्त्रातील आणि गणितशास्त्रातील शिरोमणी होय.

वराहमिहिराने बृहत्संहिता हा विश्र्वकोशसदृश छंदोबद्घ बृहद्गंथ लिहिला. त्यात ग्रहांच्या गती व त्यांचे मानवी जीवनावर परिणाम, भूगोल, शिल्पशास्त्र इ. विषयांवरील माहिती आढळते. त्याने विवाहविधीच्या मुहूर्तांवर, शुभघटिकांवर बृहद्विवाहपटल आणि स्वल्पविवाहपटल हे दोन स्वतंत्र गंथ लिहिले. शिवाय राजांच्या युद्धांतील शुभाशुभ शकुनांवर त्याने योगयात्रा नावाचा गंथ लिहिला. ⇨ बह्मगुप्त (सातवे शतक) याने बह्मसिद्धान्त किंवा बह्मस्फुटसिद्धान्त आणि खंडखादय हे दोन गंथ लिहिले (अनुक्रमे इ. स. ६२८ व इ. स. ६६५), त्यानेच ध्यानग्रह वा ध्यानग्रहोपदेश हा ७२श्र्लोकांचा आर्या वृत्तातील गंथ लिहिला असे दिसते. हा गंथ अंकगणितीय स्वरूपाचा आहे. जन्म-लग्नकुंडलीची मीमांसा करणारे काही संस्कृत गंथ आहेत. त्यांमध्ये पाराशरी, जैमिनीचा जातकसूत्र ह्यांचा अंतर्भाव होतो. जातकसूत्र हा गंथ केरळमधील मलबारमध्ये प्रचारात आहे. भृगुसंहिता, नाडिगंथ, मीनराजजातक (यवनजातक), वराहमिहिराचे लघुजातक आणि बृहज्जातक व त्याचा पुत्र पृथुन्यास वा पृथुयश ह्याचे षट्पंचाशिका वगैरे उल्लेखनीय होत. भोजाचा म्हटला जाणारा राजमृगांक आणि शतानंदाचा भास्वती हे दोन गंथ ज्योतिष शास्त्रावरील असून ते अकराव्या शतकातील आहेत. अकराव्या शतकातील त्रिशती हा गणितशास्त्रावरील श्रीधराचा गंथ. गणितशास्त्रावरील सर्वांत महत्त्वाचा गंथ म्हणजे ⇨ भास्कराचार्यां चा (बारावे शतक) सिद्धान्तशिरोमणि हा होय. त्यात लीलावती, ग्रहगणित, बीजगणित आणि गोलाध्याय असे चार भाग आहेत. ग्रहगणित आणि गोलाध्याय हे ज्योतिषशास्त्राविषयक अत्यंत महत्त्वाचे लेखन होय. करणकुतूहल हाही भास्कराचार्यांचा एक महत्त्वाचा गंथ होय. तो ज्योतिषावर आहे. अल्बीरूनी याने बलभद्राने ज्योतिषशास्त्रावर अनेक स्वतंत्र गंथ लिहिल्याचा उल्लेख केला आहे. आर्यभट (दुसरा नववे किंवा दहावे शतक) याने आर्यसिद्धान्त हा गंथ लिहिला.

धर्मशास्त्रीय लेखन : हिंदू समाजाच्या दैनंदिन जीवनात धर्मशास्त्राचे महत्त्व प्राचीन काळापासून अबाधित राहिले आहे. धर्मशास्त्राचा आरंभ ⇨ कल्पसूत्रे ह्या सर्वसामान्य संज्ञेने ओळखल्या जाणाऱ्या वाङ्‌मयातून झाला. कल्प हे एक वेदांग आहे. त्याचा अर्थ कर्मकांड किंवा धार्मिक क्रियाकलाप. श्रौतसूत्रे, शुल्बसूत्रे, गृह्यसूत्रे आणि धर्मसूत्रे असे ह्या वाङ्‌मयाचे चार प्रकार आहेत. यज्ञसंस्थेचे सांगोपांग स्वरूप व्यवस्थित, एकत्र आणि विषयवारीने उपलब्ध व्हावे म्हणून श्रौतसूत्रांची निर्मिती झाली. काही श्रौतसूत्रांना- उदा., बौधायन, आपस्तंबकात्यायन श्रौतसूत्रे – शुल्बसूत्र नावाचा अध्याय जोडलेला असतो. शुल्ब म्हणजे आखण्याची व मोजण्याची दोरी. यज्ञकुंड, यज्ञवेदी व यज्ञमंडप ह्यांची जी मोजमापे घ्यावी लागतात, त्यांचे गणित शुल्ब-सूत्रांत सांगितलेले असते. गृह्यसूत्रांमध्ये उपनयन, समावर्तन, विवाह, गर्भाधान, नामकरण, वास्तुप्रवेश इ. संस्कार, विविध श्राद्धे व अन्य आश्रमकर्मे सांगितलेलीआहेत. धर्मसूत्रांत वर्णाश्रमधर्माचे प्रतिपादन आहे.

धर्मसूत्रे व स्मृति यांचे वर्णधर्म व आश्रमधर्म हे मुख्य विषय होत. धर्मसूत्रांमध्ये राजधर्म व न्यायव्यवहारधर्म ह्यांचे विवेचन त्रोटक आहे. खाली निर्देशिलेल्या मनुस्मृति, विष्णुस्मृति, याज्ञवल्क्यस्मृति आणि नारदस्मृति यांसारख्या स्मृतींत ते सविस्तर आले आहे.

धर्मशास्त्रीय लेखनाच्या संदर्भात ⇨ मनुस्मृती हा एक मुख्य प्रमाणभूत गंथ मानला जातो. इ. स. पू. दुसरे शतक हा मनुस्मृती चा काळ असावा. १२ अध्यायांच्या मनुस्मृती त २,६८४ श्लोक आहेत. मनुस्मृती त प्रतिपादिलेल्या धर्मशास्त्रविषयक तत्त्वांच्या प्रभावाखाली हिंदू समाज गेली हजारो वर्षे जगला आहे. इ. स.च्या नवव्या शतकापासून मनुस्मृती वर टीका लिहिल्या गेल्या आहेत. मेधातिथीची टीका नवव्या शतकातली आहे गोविंदराजाची अकराव्या शतकातली आणि कुल्लूकाची बहुधा तेराव्या शतकातली. यांशिवाय असहाय, भागुरी, भोजदेव, धरणीधर, राघवानंद, नंदन, रामचंद्र इ. मनुस्मृती चे टीकाकार होत.

मनुस्मृती नंतर इतरही काही स्मृतिगंथ झाले. त्यांत विष्णू , याज्ञवल्क्य, नारद, बृहस्पती आणि कात्यायन ह्यांचे गंथ विशेष महत्त्वाचे होत. वैष्णव धर्मशास्त्र वा विष्णुस्मृति प्रत्यक्ष विष्णूने पकट केली, अशी श्रद्धा आहे. वस्तुत: ते कृष्ण यजुर्वेदा च्या काठक ह्या शाखेचे धर्मसूत्र असावे आणि नंतर त्याचे स्मृतीत रूपांतर केले गेले असावे. ही स्मृती गदयपदयात्मक असून ती एखादया भागवतपंथीय वैष्णवाने रचिली असावी. तिची सध्याची संहिता इ. स.च्या तिसऱ्या शतकाच्या अलीकडची नसावी. काहींच्या मते इ. स. १०० ते ३०० ह्या कालखंडाच्या दरम्यान ती रचिली गेली असावी. याज्ञवल्क्यादी उपर्युक्त स्मृतींच्या काळाबद्दल मतभेद आहेत तथापि म. म. पां. वा. काणे ह्यांनी दिलेले काळ असे : याज्ञवल्क्यस्मृति (इ. स. १०० ते ३००), नारदस्मृति (इ. स. १०० ते ४००), बृहस्पतिस्मृति (इ. स. ३०० ते ५००), कात्यायनस्मृति (इ. स. ४०० ते ६००). नारदस्मृतिबृहस्पतिस्मृति लक्षात घेऊन कात्यायनाने आपला स्मृतिगंथ लिहिला. [⟶ कात्यायन-३].


पराशरस्मृति किंवा पाराशरस्मृति हिचा रचनाकाल इ. स. पाचव्या शतकाच्या आधीचा असावा. हिचा कर्ता पराशर हा गोत्रप्रवर्तक वैदिक ऋषी मानला जातो बृहत्‌पराशर स्मृती ही आहे तथापि ही मूळ स्मृती नसून ती मूळ स्मृतीत भर घालून केलेली पुनर्रचित स्मृती आहे. स्मृतिवाङ्‌मयावर अनेक टीका लिहिल्या गेल्या. अपरार्क आणि विज्ञानेश्वर ह्यांनी चतुर्विशतिमत आणि षट्‌त्रिंशन्‌मत या दोन संकलित धर्मशास्त्रावरील गंथांचा उल्लेख केला आहे पहिल्या संकलनात चोवीस ऋषींची शिकवण थोडक्यात दिली आहे दुसरा गंथ फक्त त्यातील उद्‌धृतांवरूनच माहीत झाला आहे. पण त्याचे स्वरूप चतुर्विशतिमत ह्या गंथासारखेच असावे. हे दोनही गंथ बौद्धमतविरोधी आहेत. विश्र्वरूपाने (नववे शतक) बालक्रीडा हे भाष्य याज्ञवल्क्यस्मृती वर लिहिले, तर विज्ञानेश्वराने ⇨ मिताक्षरा लिहिली. असहाय (इ. स. सु. ६००-८००) भर्तृयज्ञ (सु. ८००) आणि भारूची (सु. ९००) हेही टीकाकार पण फारसे प्रसिद्घ नसलेले. विश्वरूपाने (नववे शतक) याज्ञवल्क्यस्मृती वर बालक्रीडा ही टीका लिहिली. नवव्या शतकात मेघातिथीने मनुस्मृती वर विस्तृत टीका लिहिली. मनुस्मृती वरचा हा सर्वांत जुना भाष्यकार होय. तो उत्तर भारतातला- बहुधा काश्मीरचा-रहिवासी. धर्मशास्त्र आणि मीमांसा ह्यांचा त्याचा व्यासंग होता. धर्मशास्त्रावरील एक अधिकारी व्यक्ती म्हणून विज्ञानेश्वर त्याला मानतो. साधारणपणे सातव्या शतकाच्या अखेरीपासून स्वतंत्र ⇨ धर्मनिबंधां ची निर्मिती होऊ लागली. हिंदूंच्या धार्मिक जीवनाशी निगडित असलेल्या अनेक विषयांची सांगोपांग चर्चा धर्मनिबंधांत आढळते. भट्ट लक्ष्मीधर (सु. ११००-५०) याचा कल्पतरू वा कृत्यकल्पतरू हा उल्लेखनीय निबंधगंथ होय. शिलाहार राजा अपरार्क वा अपरादित्य (बारावे शतक) याने निबंधात्मक स्वरूपात याज्ञवल्क्यस्मृती वर भाष्यगंथ लिहिला. तसेच बंगाली पंडित जीमूतवाहनाने (सु. १०९०-११३०) कालविवेक, व्यवहारमातृका आणि दायभाग हे तीन गंथ लिहिले. त्यांपैकी कालविवेक मध्ये धार्मिक विधी करण्याच्या योग्य काळाची चर्चा आहे. श्रीधराच्या (सु. ११५०-१२००) स्मृत्यर्थसार गंथात धर्मशास्त्रातील विविध विषयांचा ऊहापोह आहे त्याचा उल्लेख स्मृतिचंद्रिका गंथात असून हेमाद्रीनेही केला आहे बंगाली लेखकांपैकी अनिरूद्घ याने हारलतापितृदयिता हे धर्मनिबंध लिहिले. देवण्णभट्टाचा (सु. १२००) स्मृतिचंद्रिका हा धर्मशास्त्रावरील विस्तृत निबंध असून त्यात संस्कार, आन्हिक, व्यवहार, श्राद्घ आणि आशौच अशा विषयांवर विवेचन आढळते आणि प्रायश्चित्त काण्डही त्यात अंतर्भूत असावे. याच काळातील वरदराजाचा (सु. १२०० ते १३०० च्या दरम्यान) व्यवहारनिर्णय हा निबंध दक्षिण भारतात अतिशय आदरणीय मानला जातो. दक्षिण भारतातील हरदत्त (सु. ११५० ते १३०० च्या दरम्यान) हा दुसरा धर्मशास्त्री असून त्याच्या अनाकुला, अनाविला, मिताक्षरा (गौतम धर्मसूत्रां वर) व उज्ज्वला ही आपस्तंब धर्मसूत्रा वरील टीका प्रसिद्घ आहे. वामन आणि जयादित्य यांच्या काशिका या गंथावरील हरदत्तची टीका पदमंजरी या शीर्षकाने आढळते. हेमाद्री या महादेवराव यादव व रामदेवराय यादव या राजांचा करणाधिपयाने ⇨ चतुर्वर्गचिंतामणि (सु. १२६० ते १२७० च्या दरम्यान) नावाचा ज्ञानकोशसदृश गंथ लिहिला. ह्याचे वत, दान, तीर्थ, मोक्ष आणि परिशेष असे पाच भाग आहेत तथापि वत व दान हे भाग व परिशेषातील श्राद्ध व काल एवढीच प्रकरणे समग्र उपलब्ध आहेत. मनुस्मृती वरील टीका मन्वर्थमुक्तावली शीर्षकाने ख्यातकीर्त असून ती कुल्लूकभट्ट (सु. ११५० ते १३००च्या दरम्यान) या पंडिताने लिहिली आहे. श्रीदत्त उपाध्याय याने धर्मशास्त्रावर अनेक गंथ लिहिले. त्यांचा आचार्यदर्श हा गंथ म्हणजे शुक्ल यजुर्वेदींच्या धार्मिक विधींचे पाठयपुस्तकच आहे. सामवेदींच्या नित्यनैमित्तिक धार्मिक कर्तव्यांची जंत्री त्याने छंदोगान्हिक या गंथात दिली आहे. समयप्रदीप या गंथात त्याने वतवैकल्यांच्या विविध घटिका योग्य समयी कशा पाळावयाच्या याविषयी माहिती दिली असून पितृभक्ती आणि श्राद्धकल्प या दोन गंथांत अनुक्रमे यजुर्वेदी व सामवेदी ह्यांच्या श्राद्धविधींची माहिती आहे.

चौदाव्या शतकातील विजयानगरच्या सामाज्याचे प्रधानमंत्री माधवाचार्यकृत पराशरमाधवीय (पराशरस्मृती वर) आणि कालनिर्णय हे दोन गंथ प्रसिद्ध आहेत. याच शतकातील विश्र्वेश्र्वरभट्ट ह्याने पारिजातमदन हा गंथ लिहिला. पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेलेला मिथिलेचा वाचस्पतिमिश्र याचा विवादचिंतामणि हा गंथ ब्रिटिश राजवटींत हिंदू कायदयाच्या बाबतीत, उच्च न्यायालयांनी प्रमाण मानला होता. सोळाव्या शतकात प्रतापरूद्रदेवाने सरस्वती विलास नावाचा गंथ लिहिला. गोविंदानंदाने (सु. १५००-४०) शुद्धीकौमुदी, श्राद्धकौमुदी हे निबंध लिहिले. तसेच रघुनंदनाचा (सोळावे शतक) स्मृतितत्त्व नारायणभट्टाचे (सु. १५४०-७०) अंत्येष्टिपद्धती, त्रिस्थलीसेतु, प्रयोगरत्न नंदपंडिताचा (सु. १५८०-१६३०) दत्तकमीमांसा हे निबंधही उल्लेखनीय आहेत.

अन्य काही शास्त्रे : वरील प्रमुख विदयाशाखांशिवाय अन्य काही शास्त्रांवरही संस्कृतमध्ये लेखन झाले आहे. शिल्पशास्त्र व वास्तुशास्त्र यांवरही काही संस्कृत गंथलेखन झाले त्यांपैकी मानसोल्लस (सोमेश्वर), अपराजितपृच्छा, समरांगणसूत्रधार (भोज परमार), मयमत, सनत्‌कुमारवास्तुशास्त्र, मानसार, शिल्परत्न (श्रीकुमार, सोळावे शतक), रूपमंडन वगैरे काही मान्यवर गंथ आहेत. चतुर्वर्गचिंतामणी सारख्या गंथातून वास्तुशिल्पशैलीविषयी माहिती मिळते. काही मूल्यवान रत्नांसंबंधी अगस्तिमत, रत्नपरीक्षा (बुद्धभट्ट) आणि नवरत्नपरीक्षा (नारायण पंडित) या गंथांत माहिती आहे. शुभाशुभशकुनांविषयीही काही संस्कृत ग्रंथ आढळतात. समुद्रतिलक (दुर्लभराज व त्याचा पुत्र जगद्देव) अद्‌भुतसागर (बल्लळसेन आणि लक्ष्मणसेन) नरपतिजयचर्या (नरहरी, बारावे शतक) हे गंथही निर्देर्शनीय आहेत. नरहरीच्या नरपतिजयचर्या मध्ये युद्ध वा इतर साहसी कृत्यांचे परिणाम काही आकृत्यांच्या साहाय्याने आधी कसे असू शकतात हे दाखविले आहे. जगद्देवाने स्वप्नचिंतामणि हा स्वप्नांवरील ग्रंथही लिहिला.

भारतीय तत्त्वज्ञानातील षड्दर्शने, तसेच हिंदू पंथोपपंथ आणि विविध संप्रदाय यांचा विपुल साहित्यसंभार संस्कृतात उपलब्ध आहे. सर्व भारतीय दर्शने म्हणजे भारतीय तत्त्वज्ञाने, ही अध्यात्मविदयाच होय. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा आणि वेदान्त अशा सहा दर्शनांचे गंथ आहेत. सांख्यदर्शनात कपिल, पंचशिख आणि आसुरी यांची नावे प्रमुख असली, तरी ⇨ ईश्वरकृष्णां ची ⇨ सांख्यकारिका हा सांख्यांचा आकरगंथ आहे. ह्यावर ⇨ वाचस्पतिमिश्रां चा (नववे शतक) सांख्यतत्त्वकौमुदी हाही प्रमाण गंथ होय. तथापि, माठराची माठरवृत्ति ही सांख्यकारिकां वरील सर्वांत प्राचीन टीका होय. योगशास्त्रावरील पतंजलीचा योगसूत्रे हा प्रमाण गंथ असून त्यावर आचार्य व्यास ह्यांचे भाष्य आहे (हे महाभारत कार कृष्णव्दैपायन वा बह्मसूत्रकार बादरायण व्यास नव्हेत). ह्या व्यासांचा काळ इ. स.च्या पाचव्या शतकाच्या सुमारास येतो. या भाष्यावर वाचस्पति-मिश्र ह्यांची तत्त्ववैशारदी नावाची उत्कृष्ट टीका आहे तसेच विज्ञान-भिक्षूची योगवार्त्तिक ही टीका प्रसिध्द असून पतंजलीच्या योगसूत्रा वरील टीकांत राजमार्तंड, मणिप्रभा, योगसुधाकर याही टीकांचा समावेश आहे. हठयोगावर हठयोगप्रदीपिका आणि धेरंडसंहिता हे इतर काही गंथ उपलब्ध आहेत. अक्षपाद गौतमाची न्यायसूत्रे आणि कणादाची वैशेषिक सूत्रे हेअनुक्रमे न्याय व वैशेषिक ह्या दर्शनांवरचे आद्यगंथ होत. पक्षिलस्वामी वात्स्यायनाने (इ. स.चे तिसरे वा चौथे शतक) न्यायसूत्रां वर न्यायभाष्य लिहिले. उदयोतकाराने न्यायवार्त्तिक लिहिले. न्यायवार्त्तिका वर वाचस्पतिमिश्रांची न्याय-वार्त्तिक-तात्पर्य-टीका आहे. जयंतभट्टांची (इ. स.चे नववे शतक) न्यायमंजरी, भासर्वज्ञांचा न्यायसार इ. गंथही महत्त्वाचे आहेत. प्रशस्तपादाच्या पदार्थधर्मसंग्रहा ने वैशेषिक दर्शनाला नवेच परिमाण दिले. उदयनाची  तत्त्वशुद्धी हे न्याय-वार्त्तिक-तात्पर्य टीकेवरील भाष्य आहे. प्रशस्तपादांनी वैशेषिक सूत्रांवर लिहिलेल्या भाष्यावर किरणावलि नावाचे भाष्यही उदयनाने लिहिले. श्रीधराची न्यायकंदली प्रशस्तपादांच्या उपर्युक्त भाष्यावरच आहे. जैमिनीय पूर्वमीमांसासूत्रेशबरस्वामी च्या भाष्यामुळे अधिक प्रसृत झाली. ह्या भाष्यावर प्रभाकराने बृहती आणि कुमारिल-भट्टाने शाबरभाष्या वर श्लोकवार्त्तिक, तंत्रवार्त्तिक आणि टुपटीका हे गंथ लिहिले. मंडनमिश्रांनी भावनाविवेक आणि विधिविवेक हे स्वतंत्र गंथ लिहिले. ⇨ बादरायणा ने लिहिलेली बह्मसूत्रे ही वेदान्ताची गंगोत्री. ही बह्मसूत्रे, उपनिषदे आणि भगवद्गीता मिळून ⇨ प्रस्थानत्रयी होते. ती वेदान्ताचे अधिष्ठान होय. आदय शंकराचार्याचे बह्मसूत्रभाष्य किंवा शारीरिक भाष्य हा जगद्विख्यात गंथ होय. ह्यापूर्वीच्या ⇨ गौडपादाचार्यांच्या गौडपादीय कारिका वा आगमशास्त्र ह्या गंथास अव्दैत तत्त्वज्ञानात अगेसर स्थान आहे. अव्दैत वेदान्ताचा त्यांनी पाया घातला. ⇨ केवलाद्वैतवाद हा शंकराचार्यांनी विस्ताराने प्रतिपादिला. त्याच्या आधी गौडपादांनी त्याचे स्पष्ट विवरण आपल्या कारिकांमधून केले. शंकराचार्यांचे ते परमगुरू होत. नंतरच्या काळात रामानुजाचार्यां चा ⇨ विशिष्टाद्वैतवाद,वल्ल्भाचार्यां चा (पंधरावे व सोळावे शतक), ⇨ शुद्धाव्दैतवाद,निंबार्क (सु. अकरावे शतक) वा निंबार्काचार्यांचा द्वैताद्वैतवाद आणि ⇨ मध्वाचार्यां चा ⇨ व्दैतवाद ह्या सिद्धातांची उभारणी झाली. आदय शंकराचार्यांचे उपदेशसाहस्त्री, विवेकचूडामणी, आत्मबोध असे गंथ तसेच अनेक स्तोत्रे आणि लघुकाव्ये प्रसिद्ध आहेत. त्यांचे शिष्य पद्मपाद यांनी पंचपादिका, सुरेश्वराचार्य यांनी नैष्कर्म्यसिद्धो, वाचस्पतिमिश्र यांनी शंकराचार्यांच्या बह्मसूत्रां वरील भाष्यावरची सर्वांत महत्त्वाची अशी भामती ही टीका विदयारण्य (माधवाचार्य) यांनी पंचदशी आणि जीवनमुक्तिविवेक हे गंथ लिहिले. त्यांनी सर्वदर्शनसंग्रह हा गंथही लिहिला, हा भारतीय तत्त्वज्ञानांचा वा दर्शनांचा कोश होय. श्रीहर्षाचे खंडनखंडखादय, सदानंदाचे वेदान्तसार ह्यांसारखे हे गंथ केवलाव्दैतवादाच्या अध्ययनास फार उपयुक्त आहेत.


शंकराचार्यांच्या पूर्वीची, मायावादी नसलेली बह्मसूत्रां वरील भाष्यांवर नवे भाष्य लिहिण्यासाठी रामानुजाचार्यांनी श्रीभाष्य लिहिले. रामानुजाचार्यांनी मायावादाचे खंडन करून विशिष्टाव्दैताचा पुरस्कार केला त्यांनी गीताभाष्य लिहिले. त्याचप्रमाणे वेदार्थसंग्रह, वेदान्तदीप, वेदान्तसार हे त्यांचे इतर गंथ होत. सुदर्शन सूरींचे श्रूतप्रकाशिका उल्लेखनीय आहे. श्रीभाष्य समजून घेण्यासाठी हा गंथ महत्त्वाचा आहे.

वेदान्ताचा नवा द्वैताद्वैतवादी अर्थ स्पष्ट करण्यासाठी निंबार्काचार्यांनी वेदान्तपारिजातसौरभ हा गंथ निर्माण केला. वल्ल्भाचार्यांच्या अणुभाष्या ने शुद्धाव्दैतवादाची उभारणी केली. श्रीमध्वाचार्यांनी गीता, बह्मसूत्रे आणि भागवत यांवर भाष्ये लिहून मोठया हिरिरीने व्दैत संप्रदायाची स्थापना आणि प्रचार केला. माधवाचार्यांच्या सर्वदर्शनसंग्रहा त सर्व दर्शनांचा आणि मतांचा समावेश केला आहे.

वेदान्तशास्त्रावरील ग्रंथांमध्ये योगवासिष्ठाचा अवश्य समावेश करावा लागेल. शैव संप्रदायानुसार श्रीकण्ठशिवाचार्यांनी बह्मसूत्रां वर लिहिलेले शैवभाष्य हा स्वतंत्र गंथ आहे. शैव संप्रदायात वसुगुप्ताची शिवसूत्रे, कल्ल्टाची स्पंदकारिका, सोमानंदाची शिवदृष्टी, उत्पलदेवाचे ईश्वरप्रत्यभिज्ञासूत्र यांसारखे अनेक गंथ उल्लेखनीय आहेत.

तंत्रवाङ्‌मयातील सर्व गंथांचा उल्लेख करणे कठीण व्हावे, इतके हे वाङ्‌मय विपुल आहे. शारदातिलकतंत्र, तंत्राभिधान, प्रपंचसार, मंत्रमहोदधि, यंत्रचिंतामणि इ. अनेक गंथ तांत्रिक संप्रदायात मान्यता पावले आहेत. अनेक गंथ प्रकाशित असून पुष्कळसे गंथ हस्तलिखित स्वरूपात आहेत.

देशपांडे, सु. र. पाटील, ग. मो.

अर्वाचीन संस्कृत साहित्य : वेदकाळापासून संस्कृत भाषेत साहित्यनिर्मिती अव्याहतपणे होत असली, तरी एकोणिसाव्या शतकापर्यंत समग्र संस्कृत साहित्याचे विमर्शात्मक आलोडन कोणीही केलेले नव्हते. एकोणिसाव्या शतकात पश्र्चिमी पंडितांना संस्कृत साहित्याचा पहिल्यांदा परिचय झाला आणि ते त्यांच्या पद्धतीने संस्कृत साहित्याचे विवेचनात्मक परीक्षण करू लागले. अशा पंडितांत ⇨माक्स म्यूलर(१८२३-१९००), ⇨आल्ब्रेख्त फीड्रिख वेबर (१८२५-१९०१), ⇨आर्थर मॅकडॉनल (१८५४-१९३०), ⇨आर्थर बेरिडेल कीथ, मॉरिझ विंटरनिट्स, ओल्डेनबर्ग, श्रडर, व्ही. हेन्री यांचा प्रामुख्याने समावेश होतो. पश्र्चिमीपंडितां- कडून झालेले हे संस्कृत साहित्यविषयक लेखन इंग्रजी, जर्मन आणि फ्रेंच भाषांत झालेले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापासून विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंतचे हे लेखन आहे. ह्या लेखनाच्या आधारे भारतीय पंडितांनी-उदा., हंसराज अगरवाल, पंडित व्दिजेंद्रनाथ शास्त्री, दासगुप्ता, डे, व्ही. वरदाचारी इत्यादी- संस्कृत साहित्याच्या इतिहासाचे गंथ लिहिले. भारतातल्या विविध प्रादेशिक भाषांतूनही-उदा., मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू इ. संस्कृत साहित्याचा विमर्शात्मक परामर्श घेतला गेला. परंतु ह्या सर्व गंथकारांनी सोळाव्या शतकानंतर-विशेषत: पंडितराज जगन्नाथानंतर-संस्कृतात निर्माण झालेल्या साहित्याच्या अस्तित्वाचा विचार केला नाही. त्यामुळे संस्कृत साहित्याचा इतिहास म्हणजे त्या साहित्याचा सोळाव्या शतकापर्यंतचा इतिहास असेच मानण्याचा संकेत रूढ झाला. अर्वाचीन संस्कृत साहित्याच्या अस्तित्वाची जाणीव नसल्यामुळे संस्कृत भाषा ही एक मृत भाषा आहे, असाही समज रूढ झाला. वस्तुत: सोळाव्या शतकानंतरही संस्कृतात अनेक गंथ लिहिले गेले आहेत. महाकाव्ये तसेच विविध प्रकारच्या काव्यरचना, चंपूकाव्य, कथा-कादंबऱ्या इ. गद्यवाङ्‌मय, नाटयवाङ्‌मय, कोशवाङ्‌मय, इतिहास असे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य संस्कृतात लिहिले गेले तसेच नियतकालिकेही निघाली. प्रत्येक प्रकारामध्ये साहित्य, गंथ विपुल असले, तरी निरनिराळ्या साहित्यिकांनी संस्कृतात केलेल्या कामगिरीचा वर निर्देशिलेल्या प्रकारांनुसार थोडक्यात, वेचकपणे परामर्श घेणे हा ह्या नोंदभागाचा हेतू आहे.

महाकाव्ये : संस्कृत साहित्याचा प्रारंभच एका लोकोत्तर विभूतीच्या चरित्रगंथाने झाला. वाल्मीकिरामायण हे महाकाव्य श्रीरामचंद्रांचे चरित्रच आहे. अर्वाचीन संस्कृत साहित्यातही चरित्रात्मक महाकाव्ये विपुल प्रमाणात रचिली गेली आहेत.

सतराव्या शतकाच्या आरंभकाळी दक्षिण भारतातील महान संस्कृत पंडित अप्पय्य दीक्षित यांनी श्रीरामचंद्रांच्याच चरित्रावर रामायण-सारसंग्रह, रामायणतात्पर्यनिर्णय, रामायणतात्पर्यसंग्रह, रामायणसारस्तव हे प्रमुख काव्यगंथ लिहिले. तंजावरचा नायकवंशीय अधिपती रघुनाथ (सतरावे शतक) ह्याच्या आश्रयास असलेल्या ‘ मधुरवाणी ’ ह्या कवयित्रीने रामायणकाव्यम् हे चवदा सर्गांचे महाकाव्य लिहिले. श्रीनिवाससुत वेंकटेशनामक दाक्षिणात्य महाकवीने रामचंद्रोदयम् ह्या नावाचे तीस सर्गांचे रामचरित्रात्मक काव्य लिहिले. सतराव्या शतकाच्या अखेरीस रामचंद्रतर्कवागीश ह्याने रामविलासकाव्यम् लिहिले. अठराव्या शतकात तंजावरच्या सरफोजी भोसल्यांच्या आश्रयास असलेल्या आनंदनारायण ह्या कवीने राघवचरित् हे बारा सर्गांचे महाकाव्य लिहिले. ‘ पंचरत्नकवी ’ ह्या नावाने तो प्रसिद्घ होता. ह्याच शतकात विख्यात केरळीय साहित्यिक रामपाणिवाद ह्याने राघवीयम् हे वीस सर्गांचे महाकाव्य लिहिले. कांगनोरचा युवराज रामवर्मा (अठरावे-एकोणिसावे शतक) ह्याने रामचरितम् हे बारा सर्गांचे महाकाव्य लिहिले. एकोणिसाव्या व विसाव्या शतकांतही रामकाव्ये लिहिली गेली. उदा., पद्मनाथ कवीचे रामखेटकाव्यम् (एकोणिसावे शतक) आणि गोपालशास्त्री (१८५३-१९२८) ह्यांचे सीतारामाभ्युदयम्. रामावरील महाकाव्ये साठांहून अधिक आहेत.

रामाप्रमाणेच कृष्णजीवनाच्या प्रभावातूनही महाकाव्ये लिहिली गेली. तंजावरनरेश रघुनाथनायकाने सतराव्या शतकात पारिजातहरणम्, अच्युतेंद्राभ्युदयम्, रूक्मिणीकृष्णविवाहम् ही महाकाव्ये लिहिली. राज-चूडामणीची रूक्मिणीकल्याणम् आणि कंसवधम् (प्रत्येकी दहा सर्ग), रामपाणिवादाचे मुकुंदस्तव, महामहोपाध्याय लक्ष्मणसूरींचे (एकोणिसावे शतक) कृष्णलीलामृत इ. काव्येही उल्लेखनीय आहेत. कृष्णावरील काव्यांची संख्या सत्तरच्या आसपास भरते.

शैवभक्तांनी शिवचरित्रपर महाकाव्ये लिहिली. उदा., शितिकण्ठ-विजयकाव्यम् (‘ रत्नखेट ’ श्रीनिवास दीक्षित-सतरावे शतक), शीवलीलार्णव (२२ सर्ग, नीलकंठ दीक्षित-सतरावे शतक), चंद्रशेखरचरितम् (कवी दु:खभंजन-अठरावे शतक), उमापरिणयम् (विधुशेखर भट्टाचार्य-एकोणिसावे-विसावे शतक).

भगवान विष्णूच्या दशावतारांपैकी राम व कृष्ण यांच्यावर बरीच महाकाव्ये झालेली असली, तरी विष्णूच्या इतर अवतारांसंबंधी लिहिल्या गेलेल्या महाकाव्यांची संख्या फारशी नाही. त्यातही श्रीनिवासपुत्र वरदा-देशिक (सतरावे शतक) याचे लक्ष्मीनारायणचरितम्, तंजावरचे राजे तुकोजी भोसले यांचा मंत्री घनश्याम (अठरावे शतक) याचे वेंकटेशचरितम्  यांसारखी काही काव्ये उल्लेखनीय आहेत.

विष्णूप्रमाणेच महाभारताच्या आधारे झालेले काव्यलेखनही फारसे नाही. तंजावरचा राजा रघुनाथ नायक ह्याचे नलाभ्युदयम् (सतरावे शतक), कवी श्रीहर्षाच्या नैषधचरित्रा चे अनुकरण करण्याच्या उद्देशाने वंदारूभट्टाने (एकोणिसावे शतक) लिहिलेले उत्तरनैषधम् (१६ सर्ग), कवी परमानंदाचे (विसावे शतक) कर्णार्जुनीयम् अशा काही काव्यांचा निर्देश करता येईल.


चरित्रकाव्ये व गदय चरित्रगंथ :थोर पुरूषांची, तसेच आपल्या पित्यांची वा पूर्वजांची चरित्रेही काव्यांतून वर्णिली गेली. त्यांत वाल्मीकी, आद्य शंकराचार्य, महाभाष्य कार पतंजली, श्रीपूर्णानंदस्वामी, शीख धर्मसंस्थापक नानक ह्यांच्यावरील महाकाव्यात्मक चरित्रांचा समावेश होतो. वाल्मीकिचरितम् हे वाल्मीकीच्या चरित्रावर संस्कृतात लिहिलेले एकमेव काव्य तंजावरच्या रघुनाथ नायकाने लिहिले. सतराव्या शतकातल्या राजचूडामणीने शंकराभ्युदयम् हे शंकराचार्यांच्या जीवनावरील महाकाव्य लिहिले. अठराव्या शतकातले कवी रामचंद्र दीक्षित यांनी पतञ्जलिंचरितम् (आठ सर्ग) लिहिले. एकोणिसाव्या शतकातले विदर्भातले एक प्रसिद्ध साधू श्रीपूर्णानंदस्वामी ह्यांच्यावरील चरित्रकाव्य शेवाळशास्त्री यांनी लिहिले. देवराज व गंगाराव ह्यांनी नानकचंद्रोदयम् हे काव्य गुरू नानकांवर लिहिले. संस्कृत कवयित्री क्षमादेवी राव ह्यांनी ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, मीरा ह्या संतांची चरित्रे काव्यरूप केली. थोर विव्दान शंकर पांडुरंग पंडित हे क्षमादेवींचे वडील. त्यांच्या जीवनावर क्षमादेवींनी शंकरजीवनाख्यानम् लिहिले आहे.

उपास्य दैवते, पौराणिक विभूती, साधुसंत यांच्याप्रमाणेच काही राजपुरूष हेही संस्कृत कवींच्या काव्याचे विषय झाले. ज्यांना राजकवीचे वा सभापंडिताचे स्थान प्राप्त झाले होते, त्यांनी आपल्या आश्रयदात्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या चरित्रावर काव्ये वा महाकाव्ये लिहिली. ज्यांना असे स्थान मिळालेले नव्हते, त्यांनी अशा आश्रयदात्यांचा कृपाकटाक्ष आपल्याकडे वळविण्यासाठी त्यांच्यावर काव्ये रचिली. राजपुरूषांच्या  चरित्रांवर लिहिण्यात आलेल्या अनेक काव्यांचे नायक ऐतिहासिक दृष्टया महत्त्वाचे आहेत.

तंजावरनरेश रघुनाथ नायक हा स्वत: कवी आणि कवींचा आश्रयदाता होता. त्याची पत्नी रामभद्रांबा हीदेखील एक उत्तम कवयित्री होती. तिने रघुनाथाभ्युदयम् हे काव्य आपल्या पतीवर लिहिले. रघुनाथ नायकाचा मंत्री गोविंद दीक्षित तसेच गोविंद दीक्षिताचा पुत्र यज्ञनारायण ह्यानेही रघुनाथ नायकाच्या गुणवर्णनपर काव्यरचना केली (गोविंद दीक्षित-साहित्यसुधा यज्ञनारायण-रघुनाथभूपविजयम्). रघुनाथ नायकावर अन्य कवींनीही काव्यरचना केली आहे.

शिवाजी महाराजांच्या जीवनावर काही महाकाव्ये लिहिली गेली. शिवभारत लिहिणारा कवींद्र परमानंद (सतरावे शतक) हा महाराजांचा समकालीन होता, त्यामुळे ह्या काव्याचे विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे. महाराजांचा आणखी एक समकालीन पंडित जयराम पिंड्ये ह्याने पर्णालपर्वतग्रहणाख्यानम् हे पाच अध्यायांचे काव्य लिहिले. पन्हाळा किल्ल्यावरचा महाराजांचा पराकम हा ह्या काव्याचा विषय. बंगाली कवी कालिदास विदयाविनोद ह्याचे शिवाजीचरितम्, अंबिकादत्त व्यास (१८५९-१९०१) ह्याचे शिवराजविजयम्, व्यंकटेश वामन सोवनी (१८८२-१९२५) ह्याचे शिवावतारप्रबंध, इंदूरचे श्रीपादशास्त्री हसूरकर ह्यांचे छत्रपति शिवाजी महाराज चरितम् ह्याही काही निर्देशनीय रचना.

तंजावरचे भोसले वंशीय राजे शहाजी (शाहेंद्रविलासकाव्यम्-६ सर्ग, कवी श्रीधर व्यंकटेश), तसेच तेथील सरस्वती महाल गंथालयाचे संस्था-पक राजे सरफोजी भोसले (शरभविलासकाव्यम्-कवी अक्का-नारायणपुत्र जगन्नाथ) ह्यांच्यावरही स्तुतिपर काव्यरचना झाली आहे. जयपूरच्या राजांची चरित्रे जयपूरविलासम् आणि जयनगरपञ्चरंगम्  ह्या काव्यांतून अनुक्रमे आयुर्वेदाचार्य कृष्णराम (एकोणिसावे शतक) आणि मल्लभट्टहरिवल्लभ ह्यांनी वर्णिली आहेत. अशी अन्यही अनेक चरित्रात्मक काव्ये आहेत.

मेधाव्रत शास्त्री यांनी दयानंददिग्विजय हे स्वामी दयानंद सरस्वतींवर महाकाव्यात्मक चरित्र लिहिले. अंबिकादत्त व्यास याने लिहिलेले शिवराजविजयम् हे बाणभट्टी गद्य शैलीत लिहिले आहे. स्वामी भगवदाचार्य यांनी महात्मा गांधींच्या जीवनावर भारतपारिजात, पारिजातापहार आणि पारिजातसौरभ ही काव्ये लिहिली. पं. वासुदेवशास्त्री बागेवाडीकर यांनी लोकमान्य टिळकांचे चरित्र लिहिले. गांधीचरितम् हे महात्मा गांधींचे चरित्रही त्यांनी लिहिले (१९५८). त्यांची संस्कृत गद्यशैली सोपी, सुंदर आहे. श्रीकृष्ण वामन चितळे ह्यांनीही टिळकांचे चरित्र लिहिले आहे.

राजसन्मानाच्या आकांक्षेतून अनेक परकीय राज्यकर्त्यांवरही संस्कृत कवींनी काव्ये लिहिली. खुद्द जगन्नाथपंडिताने शाहजहानच्या दरबारातला एक अधिकारी आणि जगन्नाथाचा एक मित्र आसफखान ह्याच्यावर असफविलास हे खंडकाव्य लिहिले. सतराव्या शतकातील सुंदरदेव ह्या कवीने सुक्तिसुंदरम् नावाचा एक सुभाषितसंग्रह तयार केला होता. त्यात अनेक मुसलमान राजांची स्तुती करणारे श्लोक अंतर्भूत केले होते. सोळाव्या-सतराव्या शतकांतील रूद्रकवीने जहांगीरचरितम् लिहिले. एकोणिसाव्या शतकातील पी. जी. रामार्य कवीने तर गझनीच्या महंमदावर गझनीमहम्मदचरितम् हे काव्य लिहिले. विजापूरच्या मुसलमान बादशहांची चरित्रेही काव्यरूप पावली. पुढे देशात इंग्रजी अंमल सुरू झाल्यानंतर इंगज राजांची-विशेषत: राणी व्हिक्टोरिया, राजा एडवर्ड, पंचम जॉर्ज ह्यांच्या प्रशस्तीच्या काव्यरचना केल्या जाऊ लागल्या. गीतभारतम् (२१ सर्ग) असे नाव दिलेल्या त्रैलोक्यमोहन गुहकृत महाकाव्यात इंग्रजांचे साम्राज्य आणि राणी व्हिक्टोरिया ह्यांचे गुणवर्णन केलेले आहे. व्हिक्टोरिया राणीवर अनेक काव्ये आहेतच, परंतु सातव्या एडवर्डचा राज्याभिषेक (दिल्लीमहोत्सवकाव्यम् -६ सर्ग-कवी श्रीश्वर भट्टाचार्य एडवर्ड राज्याभिषेकदरबारम् -१९०३, कवी शिवराम पांडे), पंचम जॉर्जचा राज्याभिषेक (चकवर्तिचत्वारिंशतकवी आर्. व्ही. कृष्णम्माचार्य) यावरही काव्यरचना आहेत. जी. व्ही. पद्मनाभशास्त्री ह्यांनी तर पंचम जॉर्जला देव मानून जॉर्जदेवचरितम् लिहिले. हेच काव्य राजभक्तिप्रदीप ह्या दुसऱ्या नावानेही प्रसिद्ध आहे.

क्लिष्ट काव्ये : आपल्या काव्यातून पांडित्यप्रदर्शन करण्यासाठी त्यात विविध प्रकारची क्लिष्टता आणण्याची एक प्रवृत्ती संस्कृत कवींमध्ये काही वेळा आढळून येते. भारवी, माघ, हर्ष, कविराज ह्यांच्यासारखे कवी तसेच सुबंधू, बाणभट्ट इ. गदयलेखकांतही ही प्रवृत्ती दिसते. उदा., बाराव्या शतकातले राघवपांडवीयम् हे काव्य. ह्या एकाच काव्यात द्वयर्थी रचना करून कवीने (कविराज) रामायण आणि महाभारत ह्या महाकाव्यांच्या कथा सांगितल्या आहेत. प्राचीन संस्कृत काव्यातल्या ह्या प्रवृत्तीचे अनुकरण अर्वाचीन काळातही कवी करताना दिसतात. वेंकटाध्वरीने राघवपांडवीयम् ह्या काव्याचे अनुकरण यादवराघवीयम् हे व्दयर्थी काव्य लिहून केले. या काव्यात शब्दालंकारांचे प्राचुर्यही भरपूर आहे. चिदंबरम् (सतरावे शतक) ह्या कवीने तर राघवयादवपांडवीयम् हे तीन सर्गांचे त्र्यर्थी काव्य लिहिले. नंतर त्याने पंज्चकल्याणचंपू हे श्र्लेषमय पंचार्थी काव्य लिहिले. त्यात राम, कृष्ण, विष्णू, शिव आणि सुबह्मण्य ह्या पाच देवांचे विवाहोत्सव वर्णिले आहेत. मेघविजयगणी या एका जैन साधूने तर सप्तसंधानमहाकाव्यम् (वृषभनाथ, शांतिनाथ, पार्श्वनाथ, नेमिनाथ, महावीर, कृष्ण, बलराम यांची चरित्रे) हे सप्तार्थक काव्य लिहिले. अर्वाचीन संस्कृत साहित्यातील क्लिष्ट काव्यांची काही उदाहरणे अशी : राघवनैषधीयम् (दोन सर्गांचे द्वयर्थी  काव्य अठरावे शतक- जयशंकरपुत्र हरदत्त), कोसलभोसलीयम् (६ सर्गांचे द्वयर्थी काव्य – शेषाचल कवी. तंजावरच्या भोसले घराण्यातील एकोजीचा पुत्र शहाजी आणि प्रभु रामचंद्र ह्यांचे श्र्लेषाने एकत्र सांधलेले चरित्र), कंकणबंधरामायणम् (एकोणिसावे शतक-कृष्णमूर्ती) ह्या काव्यात ३२ अक्षरांच्या एका श्र्लोकात संपूर्ण रामकथा आणली आहे. केवळ हा एक श्र्लोक म्हणजे हे रामायण. चारलु भाष्यकार शास्त्री (विसाव्या शतकाचा पूर्वार्ध) याने लिहिलेल्या कंकणबंधरामायणम् या ‘ एकश्लोकी रामायणा ’तून १२८ अर्थ निघतात.


शास्त्रनिष्ठ काव्ये : शास्त्रनिष्ठ काव्ये म्हणजे कवींनी अलंकारशास्त्रावरील आपले पांडित्य प्रकट करण्यासाठी म्हणून रचलेली काव्ये. तंजावरच्या रघुनाथ नायकाच्या आश्रयास असलेल्या कृष्णपंडिताने रघुनाथभूपालीयम् हे ८ सर्गांचे महाकाव्य रचले. त्यात रघुनाथ नायकाची स्तुती तर आहेच परंतु अलंकारांचे निदर्शनही आहे. अशा शास्त्रनिष्ठ काव्यांची काही उदाहरणे अशी : षठगोपगुणालंकारपरिचर्या (सतरावे शतक-कवी अप्रसिद्ध), अलंकारमंजूषा (अठरावे शतक-देवशंकर), अलंकारमणिहार (कवी-बह्मतंत्र परकालस्वामी, १८३९-१९१६).

चंपूकाव्य : दहाव्या शतकातल्या त्रिविकमभट्टकृत नलचंपू हा सर्वांत प्राचीन चंपू मानला जातो. त्रिविकमभट्टानंतर विशेष ख्याती पावलेला आणि अर्वाचीन काळातला चंपूकार म्हणजे वेंकटाध्वरी. त्याने लिहिलेला विश्वगुणादर्शचंपू संस्कृत साहित्यातील एक प्रसिद्घ चंपू होय. हा चंपू संवादरूपाने लिहिलेला आहे. ह्यात कृशानु आणि विश्वावसु हे दोन गंधर्व विमानातून भारतातील तीर्थक्षेत्रे आणि वेगवेगळे प्रदेश पाहताना आणि तेथील गुणदोषविवेचन करताना दाखविले आहेत. विश्वावसु हा गुणगाहक आहे पण कृशानुला सगळीकडे दोषच दिसतात. ह्या चंपूकडून प्रेरणा घेऊन अण्णय्याचार्य ह्याने तत्त्वगुणादर्शचंपू लिहिला. त्यात जय आणि विजय यांच्या संवादातून शैव व वैष्णव मतांचे गुणदोष दाखविले आहेत. सोमशेखर वा राजशेखर (अठरावे शतक) ह्याचा भागवतचंपू, शंकर दीक्षितांचा शंकरचेतोविलासचंपू (अठरावे शतक-काशीनरेश चेतसिंह ह्याच्या चरित्रावर), तंजावरच्या व्यंकोजीराजांचा व्दितीय पुत्र सरफोजी  भोसलेकृत कुमारसंभवचंपू (अठरावे शतक), वेंकटकृष्णकृत उत्तरचंपू-रामायणम् (एकोणिसावे शतक) असे अन्य काही चंपूही उल्लेखनीय आहेत. महाभारत, कृष्णचरित्र, रामायण ह्यांतील विषयांवर, त्याचप्रमाणे शिवदेवतापर चंपूही झालेले आहेत. अर्वाचीन कालखंडात झालेल्या चंपूंची संख्या दीडशेहून अधिक भरेल.

संस्कृत साहित्यातील इतिहास : भारताचा प्राचीन इतिहास जाणून घेण्याच्या दृष्टीने संस्कृत गंथांचे मोल मोठे आहे. उदा., बाणभट्टाचे हर्षचरितम् (सातवे शतक), नवचंद्रसूरीचे हम्मीरवंशकाव्यम् (दहावे शतक), कल्हणाची राजतरंगिणी (अकरावे शतक), बिल्हणाचे विकमाङकदेवचरितम् अशा काही काव्यकृती. अर्वाचीन काळातील अशा काही काव्यरचनांचा उल्लेख याच नोंदीत पूर्वी आलाच आहे. उदा., कवींद्र परमानंदाचे शिवभारतम्, जयराम पिंड्ये ह्यांचे पर्णालपर्वतग्रहणाख्यानम्. अशा अन्य काही गंथांत शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजीमहाराज ह्यांनी लिहिलेला बुधभूषणम् ह्याचा समावेश होतो. संभाजी महाराजांनी ह्या गंथात, तो स्वत: लिहिल्याचा स्पष्ट निर्देश केलेला आहे. कामंदकीय नीतिसारा सारख्या नीतिपर गंथातील राजनीतिविषयक सुभाषिनींचे संकलन ह्या गंथात आढळते. छ. शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राजाराम ह्यांची चरित्रेही काव्यरूप झालेली आहेत. तंजावरच्या भोसले घराण्यासंबंधी बरीच चरित्रे लिहिली गेली. शहाजी व सरफोजी ह्यांच्यासारखे विदयाकलांचे रसिक चाहते ह्या घराण्यात होऊन गेले. शहाजीराजांना ‘अभिनव भोजराज’ असे एका कवीने आदरपूर्वक संबोधिले आहे (भूमिनाथ दीक्षितकृत धर्मविजयचंपू). तंजावरच्या भोसले वंशाचा इतिहास जगन्नाथ नावाच्या एका कवीने शरभराजविलासम् (१७२२) ह्या काव्यात वर्णिला आहे. सरफोजी राजांचे चरित्र त्यात प्रामुख्याने सांगितलेले आहे. ह्या चरित्रांप्रमाणेच भारतातील अनेक प्रसिद्ध राजघराणी व राजपुरूष ह्यांच्याविषयी काव्ये लिहिली गेली आहेत.

छ. शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने निर्माण झालेले संस्कृत गंथ : शिवाजी महाराजांनी संस्कृतचे महत्त्व ओळखले होते. त्या दृष्टीने त्यांनी पंडित रघुनाथ हणमंते ह्यांच्याकडून राजव्यवहारकोश संस्कृतात करवून घेतला. पंचांगशुद्धीसाठी त्यांनी कृष्णनामक ज्योतिषाकडून करणकौस्तुभ ह्या गंथाची रचना करवून घेतली. राज्याभिषेकप्रयोग हा धर्मशास्त्रविषयक गंथ महाराजांच्या राज्याभिषेकासाठी आलेल्या गागाभट्टांनी राज्याभिषेक विधीसाठी लिहिला.

काही अवांतर काव्ये : त्यांत शृंगारकाव्ये, निसर्गवर्णनात्मक काव्ये, स्फुट शतके, प्रवासवर्णनात्मक काव्ये अशा काव्यांचा समावेश होतो. उदा., कृष्णलीला (शृंगारकाव्य-सतरावे शतक कवी मदन), जवाहरवसंतसाम्राज्यम् (निसर्गकाव्य-दिल्लीतील वसंतऋतु-वर्णनपर-पं. जवाहरलाल नेहरू ह्यांच्या षष्ठय्द्बिपूर्तिमहोत्सवप्रसंगी-१९५०-कवी पं. जयरामशास्त्री), धर्मशतकम्अर्थशतकम् (शतककाव्ये – धर्म व अर्थ ह्या पुरूषार्थांसंबंधी-कवी पं. जयराज पांडे), तीर्थाटनम् (प्रवास वर्णनात्मक-भारतातील प्रवासाचे विविध अनुभव-कवी-चकवर्ती राजगोपाल, (१८८२-१९३४). साताऱ्याच्या न्यू  इंग्लिश स्कूलचे माजी संस्कृताध्यापक दिगंबर महादेव कुलकर्णी यांनी माळव्याचा प्रदेश आणि त्याचा इतिहास वर्णन करणारे धारायशोधारा हे काव्य लिहिले. प्रसन्न शैली हे ह्या काव्याचे लक्षणीय वैशिष्टय. विदर्भातील माधव नारायण डाऊ ह्यांनी आपल्या विनोदलहरी या काव्यात हरि-हर व उमा-रमा ह्यांच्या विनोदी संवादांतून सर्वसामान्यांची सांसारिक सुख:दुखे प्रकट केली आहेत. अर्वाचीन संस्कृत साहित्यात स्तोत्रसाहित्य, दूतकाव्ये आणि सुभाषितसंग्रहही आहेत. शिवस्तोत्रे, अवतारस्तोत्रे, श्रीरामस्तोत्रे, विभूतिस्तोत्रे अशी अनेक प्रकारची स्तोत्रे लिहिली गेली. पंडितराज जगन्नाथाचे गंगालहरी हे स्तोत्र विख्यात आहे. शिवस्तोत्रांमध्ये अप्पय्य दीक्षित याचे शिवमहिम-कालिकास्तव शिवकामिस्तवरत्नम् ही दोन स्तोत्रे निर्देशनीय आहेत. अलीकडच्या काळातील श्रीसोमस्तवराज हे शिवस्तोत्र सोमनाथ मंदिराच्या प्रतिष्ठापन महोत्सवाच्या निमित्ताने जयंतकृष्ण हरिकृष्ण दवे ह्यांनी लिहिले. नागपूरचे प्रसिद्ध संस्कृत पंडित म. म. कृष्णशास्त्री घुले यांनी हरहरियम् (१९५३) हे शिवस्तुतिपर काव्य लिहिले. विष्णूच्या दहा अवतारांवर दशावतारस्तोत्रम् (बेल्ल्मकोण्ड रामराय), दशावतारस्तव (विजयराघवाचार्य) अशी काही स्तोत्रे लिहिली गेली आहेत. नागपूरचे म. म. केशव गोपाळ ताम्हण यांची श्रीरामस्तव, श्रीरामाष्टकम्, श्रीरामयष्टिकम् आणि श्रीरामस्तुति ही श्रीरामस्तोत्रे उल्लेखनीय आहेत. विभूतिस्तोत्रांत महाकवी कालिदासावर अनेक स्तोत्रे लिहिली गेली आहेत. श्री. भा. वर्णेकरकृत कालिदासरहस्यम् तसेच कालिदासप्रतिभा (१९५५) ह्या गंथांत २८ कवींनी कालिदासाच्या स्तुतिपर लिहिलेली काव्ये आहेत. स्वामी दयानंद सरस्वती, केशव लक्ष्मण दप्तरी, लोकमान्य टिळक, विनोबा भावे, राजेंद्रप्रसाद, चिंतामणराव देशमुख अशा थोर व्यक्तींवरही स्तोत्ररचना झालेली आहे. मेघदूता पासून स्फूर्ती घेऊन अर्वाचीन संस्कृत कवींनी दूतकाव्ये लिहिली. उदा., उद्घवसंदेशम् (सतरावे शतक-रूप-गोस्वामी), पिकदूतम् (सतरावे  शतक-रूद्रन्यायवाचस्पती), चंद्रदूतम् (अठरावे शतक), मेघदूतम् (एकोणिसावे शतक-त्रैलोक्यमोहन), पांथदूतम् (विसावे शतक-भोलानाथ). सुभाषितसंग्रहांत पंडितराज जगन्नाथाच्या भामिनीविलास ह्या काव्याचा अंतर्भाव करता येईल. त्यातील अन्योक्ती, शृंगार, करूण व शांत ह्या चार उल्लसांत त्याने त्याच्या स्फुट काव्यांचा जो संग्रह केलेला आहे, तो एक प्रकारे सुभाषितसंग्रहच आहे. सुंदरदेव (सतरावे शतक) ह्याने सूक्तिसुंदरम् हा सुभाषितसंग्रह संकलित केला. काशीनाथ पांडुरंग परब ह्यांनी संपादिलेला सुभाषितरत्नभांडागारम् हा गंथ सुप्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कवी विठोबाअण्णा दफ्तरदार ह्यांचा सुश्लोकराघवम् हा सुभाषितसंग्रहही निर्देशनीय आहे. यात ५०० हून अधिक श्लेषगर्भ सुभाषिते आहेत. मुख्य म्हणजे कवीच्या समकालीन लोकजीवनाचे प्रतिबिंब या सुभाषितांतून पाहावयास मिळते.

अर्वाचीन संस्कृत साहित्यात नाटके, कथा, कादंबरी, निबंध असे साहित्यही निर्माण झाले आहे. त्याचा थोडक्यात आढावा :


 नाट्यवाङ्‌मय : संस्कृतातील नाटयरचनेची परंपरा प्राचीन आहे आणि ती खंडित झालेली नाही. संस्कृत नाटयशास्त्रात रूपक-साहित्याचे जे दहा प्रकार सांगितलेले आहेत, ते अर्वाचीन कालखंडातील साहित्यिकांनी कौशल्याने हाताळलेले आहेत. सतराव्या, अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकाचा पूर्वार्ध ह्या दीर्घ कालखंडात भारतात अनेक ठिकाणी नाटयरचना झाली.

इंग्रजी साहित्याच्या संपर्काने संस्कृत नाटकांतही काही नावीन्य आले. इंग्रजी शिकलेल्या अर्वाचीन संस्कृत साहित्यिकांनी इंग्रजी आणि काही जर्मन, फ्रेंच इ. नाटकांचे संस्कृत अनुवाद केलेले आहेत. अर्वाचीन संस्कृतातील नाटयसाहित्य विपुल आहे तथापि काही विशेष उल्लेखनीय नाटके पुढीलप्रमाणे :

वसुमतीचित्रसेनविलासम् (अप्पय्य दीक्षित), भावनापुरूषोत्तमम् (‘ रत्नखेट ’ ह्या नावाने प्रसिद्ध असलेले श्रीनिवास दीक्षित-जिंजीचा राजा सुराप्पा याच्या पराकमाचे चित्रण), आनंदराघवम् आणि कमलिनीकलहंसम् (‘रत्नखेट ’ दीक्षितांचा पुत्र राजचूडामणी दीक्षित-या नाटकांचा प्रयोग तंजावरच्या रघुनाथ नायकाच्या राजसभेत झाला होता). ही सर्व नाटके सतराव्या शतकातली आहेत. अठराव्या शतकात बालमार्तंडविजयम् (त्रावणकोरनरेश मार्तंडवर्मा ह्याचा सभापंडित शेषाद्रिसुत देवराज), वसुलक्ष्मीकल्याणम् (अप्पय्य दीक्षितांचा वंशज वेंकटसुबह्मण्य याने त्रावणकोरचा राजा रामवर्मा-कार.१७५८-१७८९ याच्या सन्मानार्थ हे नाटक लिहिले. सिंधुराजकन्या वसुलक्ष्मी हिच्या विवाहाचे वर्णन त्यामध्ये आले आहे). इ. नाटके लिहिली गेली. एकोणिसाव्या शतकात रामराज्याभिषेकम् (कवी वीरराघव), स्नुषाविजयम् (त्रावणकोरचा राजा केरळवर्मा याचा परममित्र सुंदरराजाचार्य), कुश-लव विजय नाटकम् (वेंकटकृष्ण) इ. नाटयरचना झाल्या.

आधुनिक संस्कृत नाटककारांत नारायणशास्त्री (१८६०-१९११) ह्यांचे नाव विशेष निर्देशनीय आहे. संस्कृताखेरीज अन्य काही भाषांतही त्यांनी लेखन केले. नाटकदीपिका हा बारा भागांचा नाट्यशास्त्रीय प्रबंध त्यांनी लिहिला पण त्यांचे मुख्य लेखन नाटकांचे होते. त्यांनी एकूण ९२ नाटके लिहिली. ती मुख्यत: पौराणिक विषयांवरील आहेत. त्यांची मैथिलीयम् (१० अंक-संपूर्ण रामायणक थेला नाट्यरूप), कलिविधूननम् (१० अंक- संपूर्ण नलकथेला नाटयरूप) ही नाटके विशेष उल्लेखनीय होत.

अर्वाचीन नाटककारांनी ‘ भाण ’ ह्या नाटयप्रकारातही लेखन केले. काही उल्लेखनीय भाण असे : शृंगारसर्वस्वभाण (सतरावे शतक- राजचूडामणी), अनंगविजयभाण (अठरावे शतक-जगन्नाथकवी), रससदनभाण (एकोणिसावे शतक-कांगनूरचा युवराज गोदवर्मा) इत्यादी व्यायोग या नाट्यप्रकारातील किरातार्जुनीय व्यायोग (एकोणिसावे शतक-रामवर्मा युवराज) त्रिपुरविजयव्यायोग (एकोणिसावे शतक-कामशास्त्रीपुत्र पद्मनाभ) अशा काही उल्लेखनीय व्यायोगरचना होत नाटिका या नाटयप्रकारात मृगांकलेखा (अठरावे शतक-त्रिमालदेवसुत विश्वनाथ. मृगांकलेखा व कर्पूरतिलक यांची प्रणयकथा), मुक्तावली नाटिका (एकोणिसावे शतक-सोंठीभद्रादी रामस्वामी), वृत्तशंसिच्छत्रम् (१९५७, क्षमादेवी राव) इ. रचना झाल्या.

याखेरीज ऐतिहासिक नाटके, हास्यरसात्मक नाटके, लाक्षणिक नाटके (नाटकांच्या व्दारे आध्यात्मिक तत्त्वज्ञान लोकांपुढे उभे करण्याचा प्रयत्न) लिहिली गेली. ऐतिहासिक नाटकांमध्ये बडोदयाचे श्रीमूलशंकर माणिकलाल याज्ञिक (१८८६-?) यांचे छत्रपतिसाम्राज्यम (१० अंक-शिवछत्रपतींचे संपूर्ण जीवनचित्रण) हे नाटक, तसेच महाराणा प्रताप व पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरील त्यांची नाटके उल्लेखनीय आहेत. हास्यरसात्मक नाटकांत प्रहसने लिहिली गेली. उदा., कविता-तार्किककृत कौतुकरत्नाकर (सतरावे शतक), धूर्तवर्तक (अठरावे शतक-सामराज दीक्षित) अशा प्रहसनांची तसेच के. के. आर. नायर ह्यांचे आलस्यकर्मीय (बेकारी) भाण ह्या नाट्यप्रकारातील महालिंगशास्त्रीकृत मर्कटमर्दलिका अशा नाटकांचीही रचना झाली. पूर्णपुरूषार्थचंद्रोदय (अठरावे शतक) या लाक्षणिक नाटकामध्ये दशाश्वराजाचा (दहा इंद्रिय-रूपी अश्वांचा नियंता असलेल्या आत्म्याचा) आनंदपक्ववल्लीशी समागम सुश्रद्धा व सुभक्ती घडवून आणतात असे दाखविले आहे. तंजावरच्या तुकोजीराजाचा मंत्री घनश्याम आर्यक ह्याने प्रचंडराहूदयम् हे लाक्षणिक नाटक संकल्प-सूर्योदय (वेंकटनाथ) ह्या विशिष्टाव्दैतवादी नाटकातील सिद्धान्तांचे खंडन करण्यासाठी लिहिले. चित्सूर्यालोक या मुडुंबी वेंकटराम नरसिंहाचार्यकृत (१८४२-१९२८) नाटकात सूर्यग्रहणाची कथा सांगितली आहे.

संस्कृत नाटयसाहित्यात सामाजिक विषयांवरच्या नाट्यकृतीही लिहिल्या गेल्या. काही लघुनाटके संस्कृत नियतकालिकांतून कमशः लिहिली गेली. पी. व्ही. वरदराज शर्मा ह्यांनी कस्याहम् (१९३९) ह्या एकपात्री स्वगतभाषणात्मक नाटकात एका नवपरिणित स्त्रीचे मन व्यक्त केले आहे. ए. आर्. हेबे ह्यांनी मनोहरम् दिनम् (१९४१) मध्ये सुटी मिळविण्यासाठी विदयार्थी काय काय उदयोग करतात, ते दाखविलेले आहे. आधुनिक समाजातील समस्या के. एल्. व्ही. शास्त्री यांच्या लीलाविलास (१९३५), चामुण्डा आणि निपुणिका या तीन नाटकांत मांडलेल्या दिसतात. क्षमादेवी राव यांनी स्वातंत्र्यचळवळीत सत्याग्रह करणाऱ्या तरूणांच्या घरांतल्या स्थितीचे चित्रण कटुविपाक (१९५५) या नाटिकेत केले आहे. भारताचे विभाजन झाल्यानंतर जो हिंसाचार आणि रक्तपात झाला, त्याचे दर्शन महाश्मशान या नाटिकेत घडते. राजकीय विषयांवरील नाटकांत निर्पाजे भीमभट्ट ह्यांचे काश्मीरसंधानसमुदयम् हे नाटक उल्लेखनीय आहे. काश्मीर प्रश्न आणि शेख अब्दुल्ल हा ह्या नाटकाचा विषय. या नाटकाचा प्रयोग कर्नाटकात एका राजकीय परिषदेच्या निमित्ताने झाला होता.

कथा व कादंबरी : अर्वाचीन संस्कृत कथासाहित्यातही सामाजिक विषयांवरील कथा लक्ष वेधून घेतात. कथापंचक (१९३३) आणि ग्रामज्योति (१९५४) हे क्षमादेवी राव यांचे कथासंग्रह, मात्र ते पदयात्मक आहेत. ग्रामज्योति मध्ये सत्यग्रह चळवळीच्या काळातील कथा आहेत. कथा- मुक्तावली हा क्षमादेवींचा कथासंग्रह विषय, तंत्र इ. दृष्टींनी आधुनिक म्हणावा, असा आहे. पुण्याला जन्मलेल्या क्षमादेवी (१८९०) या विख्यात संस्कृत पंडित शंकर पांडुरंग पंडित यांच्या कन्या. त्यांनी इंग्रजीतही कथा आणि नाटके लिहिली. साधुमणि (के. श्रीनिवासन्), भामिन्याः मदनतापः (के. शंकरनारायण शास्त्री), यौतकम् (विश्र्वेश्र्वर दयाळ), मार्जारचरितम् (क्षितीशचंद्र चट्टोपाध्याय) ह्या कथा अनुक्रमे एक गरीब मिठाईवाला, वृद्ध पतीच्या तरूण पत्नीची वेदना आणि हुंडापद्धती, काळा बाजार या विषयांवर लिहिलेल्या आहेत. सामाजिक विषयांवर अशा अनेक कथा लिहिल्या गेल्या.

कादंबऱ्यांमध्ये कृष्णम्माचार्य यांनी मंदारवती (१९२९) ही अठरा प्रकरणांची कादंबरी लिहिली. चकवर्ती राजगोपाल (१८८२-१९३४) यांनी शैवलिनीकुमुदिनी या दोन कादंबऱ्या लिहिल्या. ऐतिहासिक कादंबऱ्यांत वंगवीर-प्रतापादित्य (देवेंद्रनाथ चट्टोपाध्याय), गौरचंद्र (इंद्रनाथ बंदयोपाध्याय) अशा काही कादंबऱ्यांचा उल्लेख करता येईल.

प्रवासवर्णने : अर्वाचीन संस्कृत साहित्यात प्रवासवर्णनात्मक साहित्य फारसे नाही. तरीही उपर्युक्त राजगोपाल यांचे तीर्थाटन, छाबा यांचे न्यक्तर-जनपदशोभा (हॉलंडचा प्रवास), श्रीशैल दीक्षित यांचे कावेरीगदय असे काही गंथ उल्लेखिता येतील.


 निबंध : पं. महावीर प्रसाद द्विवेदी यांनी आपल्या सरस्वती या नियतकालिकात दर्जेदार निबंधलेखन करून निबंधाला एक नेटके स्वरूप दिले. आर्. कृष्णम्माचार्य यांनी रघुवंशसार आणि मेघसंदेशविमर्श हे रसग्रहणात्मक निबंध लिहिले. संस्कृत प्रबंधमंजरी, लघुनिबंधमणिमाला, गल्पकुसुमांजली (ऐतिहासिक निबंधसंग्रह) असे काही निबंध संग्रह ही उल्लेखनीय आहेत.

गणेश श्रीपाद हुपरीकर यांनी संस्कृतानुशीलनविवेक ह्या आपल्या निबंधात संस्कृतचे अध्ययन-अध्यापन कसे व्हायला हवे याबद्दल मौलिक विचार मांडले आहेत. डॉ. रामजी उपाध्याय यांचा भारतस्य सांस्कृतिको निधिः हा भारतीय संस्कृति विषयक गंथ ही निर्देशनीय आहे.

विज्ञानविषयक माहितीस पसिद्घी देण्याचे काम आप्पाशास्त्री राशिवडेकर ह्यांनी आपल्या संस्कृत चंद्रिका ह्या नियतकालिकातून केले. सहृदया या पत्रिकेत ‘ पाश्चात्त्य शास्त्रसारः ’ ह्या सदरातून अनेक विद्वान आधुनिक शास्त्रीय विषयांवर लिहीत होते. सनातनभौतिकविज्ञानम् या पुस्तकात सी. सी. वेंकटरमणाचार्य यांनी प्राचीन भारतातील वैज्ञानिक वाङ्‌मयाचा आढावा घेतला आहे. इलात्तुर रामस्वामी शास्त्री यांचे क्षेत्रतत्त्वदीपिका (१८२३) हे आधुनिक भूमितीवरचे पहिले संस्कृत पुस्तक. योगध्यानमिश्र यांनी याच नावाचे दुसरे पुस्तक लिहिले.

संस्कृतातील भाषांतरे : तमिळ, तेलुगू, मलयाळम्, हिंदी, बंगाली, मराठी, फार्सी या भारतीय प्रादेशिक भाषांतील अनेक गंथांचे संस्कृतात भाषांतर झाले. त्याचप्रमाणे इंग्रजीतून संस्कृतात अनुवादित झालेले साहित्यही लक्षणीय आहे. उदा., तमिळमधील अनेक भक्तिकाव्ये मेडपल्ली वेंकटरमणाचार्य यांनी संस्कृतमध्ये अनुवादून गीर्वाणशठगोपसहस्त्रम्  या नावाने गंथरूप केली. वुडुवुर डोरास्वामी अयंगारकृत मेनका ह्या तमिळ कादंबरीचा अनुवाद ताताचार्य यांनी केला. रघुनाथकवीच्या तेलुगू रामायणाचा अनुवाद मधुरवाणी (सतरावे शतक) ह्या कवयित्रीने केला. मलयाळम् कवी ⇨ कुमारन् आशान (१८७३-१९२४) यांच्या चिन्ता विष्टयाय सीता (१९१९) या काव्याचे संस्कृत भाषांतर आचार्य एन्. गोपाल पिल्ले यांनी केले. थोर हिंदी कवी ⇨ जयशंकर प्रसाद ’ ह्यांचे कामायनी हे महाकाव्य पं. भगवद्‌दत्तशास्त्री ह्यांनी संस्कृतात आणले (१९६०). हरिचरण भट्टाचार्य यांनी ख्यातनाम बंगाली कादंबरीकार ⇨बंकिमचंद्र  चतर्जी यांच्या कपालकुंडला (१८६६) ह्या कादंबरीचा संस्कृतानुवाद केला. बंकिमचंद्रांची लावण्यमयी ही कादंबरी आप्पाशास्त्री राशिवडेकर यांनी अनुवादिली. ⇨रवींद्रनाथ टागोरांची गीतांजली ही संस्कृतभारती ह्या मासिकातून संस्कृतात आली. ज्ञानेश्वरांच्या भावार्थदीपिके चा (ज्ञानेश्वरीचा) संस्कृत अनुवाद अनंत विष्णु खासनीस यांनी केला आहे, तर समर्थांचे मनाचे श्लोक तपतीरवासी ह्या नावाच्या कोणा सत्पुरूषाने मनोबोध ह्या नावाने अनुवादिले आहेत. संत तुकारामांच्या ६३ निवडक अभंगांचा अनुवाद अभंगरसवाहिनी (१९३०) या नावाने महादेव पांडुरंग ओक यांनी केलेला आहे. ⇨नरसिंह चिंतामण केळकर यांच्या बलिदान (१९३७) या कादंबरीचा अनुवाद वासुदेव आत्माराम लाटकर यांनी बलिदानम् या नावाने केला. वीर सावरकरांच्या १२ वेचक काव्यांचा अनुवाद भारतवाणी (संपा. डॉ. ग. बा. पळसुले) ह्या संस्कृत पाक्षिकात प्रसिद्ध झाला (१९५८). पळसुले यांनी सावरकरांच्या कमला ह्या खंडकाव्याचा अनुवाद केलेला आहे.

उमर खय्यामच्या फार्सी भाषेतील रूबायांचा पहिला संस्कृत अनुवाद अमरशुक्तिसुधाकर (१९२९) पं. गिरिधर शर्मा यांनी केला. एम्. आर. राजगोपाल यांनीही रूबायां चा अनुवाद (१९४०) केला. रूबायां च्या अन्य अनुवादांत भावचषक (६६ रूबाया, डॉ. सदाशिव अंबादास डांगे), मदिरोत्सव (व्ही. पी. कृष्णनायर) ह्यांचा समावेश होतो.

आप्पाशास्त्री राशिवडेकरांनी अरेबियन नाइट्स मधल्या ‘अल्लादीन अँड हिज् वंडरफुल लॅम्प’ या प्रसिद्ध कथेचा संस्कृतानुवाद केला. छ. शिवाजी महाराजांनी जयसिंहांना फार्सीमधून एक भावोत्कट पत्र पाठविले होते त्या पत्राचा ‘कविराज ’ हे टोपण नाव घेतलेल्या एका अज्ञात कवीने ६० संस्कृत श्र्लोकांत अनुवाद केला आहे.

संस्कृतात बायबल चे अनेक अनुवाद झालेले आहेत. त्याचप्रमाणे क्रिस्ती धर्मविषयक काही गंथही संस्कृतात लिहिले गेले आहेत. मात्र त्यांची शैली क्लिष्टतेच्या वळणाने जाणारी आहे. ह्या साहित्याचे काही अनुवाद असे : क्रिस्तसंगीत (१८४२, येशू क्रिस्ताचे पद्यबद्घ चरित्र), ईश्र्वरोक्तशास्त्रधारा (१८४६, जॉन मूर), परमात्मस्तव (१८५३). क्रिस्तयज्ञविधि (१९२६, मूळ लॅटिन संहितेवरून अँबोज सुरेशचंद्र रॉय यांनी केलेला अनुवाद).

इंग्रजीतील विविध साहित्यकृतींचेही संस्कृत अनुवाद झालेले आहेत. शेक्सपिअरच्या नाटकांचे काही अनुवाद असे : भांतिविलास (मूळ नाटक – कॉमेडी ऑफ एरर्स – श्रीशैल दीक्षित, १८०९-७७), पुरूषदशासप्तक (मूळ नाटक – ॲज यू लाइक इट-रामचंद्राचार्य), पितुरूपदेश (मूळ नाटक- हॅम्लेट – रामचंद्राचार्य), वासंतिकास्वप्न (मूळ नाटक – मिड-समर नाइट्स ड्रीमआर्. कृष्णम्माचार्य-१८९२). शेक्सपिअरच्या काही सुनीतांचा अनुवाद महालिंगशास्त्री ह्यांनी केला.

ऑलिव्हर गोल्डस्मिथच्या द व्हिकार ऑफ वेकफील्ड (१७६६) ह्या प्रसिद्घ कादंबरीच्या आधारे तंजावरचा कवी रघुनाथपुत्र रंगाचार्य (१८९४-?) याने प्रेमराज्य हे नाटक लिहिले. गोल्डस्मिथच्याच हर्मिट ह्या काव्याचा कौमुदी हा अनुवाद रामवर्मा याने केला आहे. योगी अरविंदांच्या तीन दीर्घकाव्यांचा संस्कृतानुवाद विश्वेश्वरपुत्र कपालीशास्त्री यांनी केला. अरविंदांचे ते शिष्यच होते. अरविंदांच्या फोर पॉवर्स ऑफ द मदर ह्या गंथाचा त्यांनी मातृतत्त्वप्रकाश या नावाने अनुवाद केला. महात्मा गांधींच्या १०० सुभाषितांचा पद्यानुवाद भारताचे माजी अर्थमंत्री, थोर प्रशासक चिं. द्वा. देशमुख यांनी गांधीसुक्तिमुक्तावली या नावाने केला. म्हणजे विख्यात ब्रिटिश तत्त्वज्ञ जॉन लॉक याच्या एसे कन्सर्निंग ह्यूमन अंडरस्टँडिंग ह्या तत्त्वज्ञानीय गंथाचा एका अप्रसिद्ध पंडिताने केलेला मानवीय ज्ञानविषयक शास्त्र हा आणखी एक विशेष संस्कृतानुवाद होय. थोर जर्मन कवी गटे ह्याच्या फाउस्ट ह्या नाटकाचा विश्र्वमोहन हा अनुवाद ताडपत्रीकर ह्यांनी केला. ॲरिस्टॉटलच्या पोएटिक्स चा (अनुवादक व गंथ अप्रसिद्ध) आणि फ्रान्सिस बेकनच्या नोव्हम ऑर्गॅनम चाही अनुवाद झाला आहे. (बेकनीयसूत्र- व्याख्यान, १८५२-विठ्ठल).


 कोशरचना : संस्कृतातील अमरकोश या प्राचीन शब्दकोशानंतर इ. स. च्या सातव्या शतकापासून अनेक संस्कृत शब्दकोश झाले. या शब्दकोशांत संस्कृत शब्दांचे दुसऱ्या भाषांतील अर्थ दिलेले नाहीत. अशा प्रकारच्या अर्वाचीन शब्दकोशांत केशवदैवज्ञकृत कल्पद्रूम (सतरावे शतक) आणि अप्पय्य दीक्षिताचा नामसंग्रहमाला (सतरावे शतक) यांचा समावेश होतो. संस्कृत-पारसिकप्रकाश या कर्णपूरकृत शब्दकोशाने, अन्य भाषेशी संबंध जोडणाऱ्या संस्कृत कोशांत उल्लेखनीय कोश म्हणून स्थान मिळविले. त्यानंतर अशा प्रकारचे अनेक शब्दकोश तयार झाले. उदा., डिक्शनरी ऑफ बेंगाली अँड संस्कृत (१८३३, गेब्ज हागून), ए डिक्शनरी : इंग्लिश अँड संस्कृत (१८५१), संस्कृतइंग्लिश डिक्शनरी एटिमॉलॉजिकली अँड फिलॉलॉजिकली अरेंज्ड विथ स्पेशल रेफरन्स टू कॉग्नेट इंडो-यूरोपिअन लँग्वेजिस (१८९९) हे ⇨ मोनिअर विल्यम्स (१८१९-९९) ह्यांचे शब्दकोश, स्टुडंट्स इंग्लिशसंस्कृत डिक्शनरी(१९१५, बा. शि. आपटे), संस्कृतहिंदी कोश(१९१७, द्वारिकाप्रसाद चतुर्वेदी), संस्कृतगुजराती शब्दादर्श(१९२४, गिरिजाशंकर मेहता) इत्यादी.

ह्यांखेरीज अन्य भाषांशी संबंधित असलेले अनेक संस्कृत शब्दकोश तयार झाले. नागपूरचे सदाशिव नारायण कुलकर्णी यांनी आपल्या नित्य उपयोगात येणाऱ्या शब्दांचे वर्गीकरण करून व्यवहारकोश (१९५१) दोन भागांत तयार केला. कोशाच्या पहिल्या भागात हिंदी, संस्कृत, मराठी, इंग्रजी अशा चार भाषांतील शब्द संकलित केले आहेत. दुसऱ्या भागात नित्योपयोगी इंग्रजी शब्दांचे संस्कृत पर्याय दिले आहेत.

जे संस्कृत-मराठी शब्दकोश झाले, त्यांत अनंतशास्त्री तळेकर यांचा कोश पहिला. त्यात बव्हंशी अमरकोशा तून घेतलेले शब्द वर्णानुकमाने दिले आहेत. माधव चंद्रोबांचा शब्दरत्नाकर (१८७०) हा त्यानंतरचा. यातील शब्दसंग्रह बराच मोठा आहे. अधिक उपयुक्त आणि काटेकोर असा शब्दकोश तयार करण्याच्या हेतूने जनार्दन विनायक ओक यांनी गीर्वाणलघुकोश (पहिली आवृ. १९१८) तयार केला.

अर्वाचीन काळात मानव्यविदया आणि विज्ञान व तंत्रज्ञान यांचा विकास वेगाने होत गेला. त्यामुळे जे अनेक पारिभाषिक शब्द पश्चिमी भाषांत निर्माण झाले, त्यांना भारतीय पर्यायी शब्द देण्याची आवश्यकता होती. ⇨ डॉक्टर रघुवीर (१९०२-६३) ह्यांनी पश्चिमी पारिभाषिक शब्दांचा महाकोश-काँप्रेहेन्सिव्ह इंग्लिश-हिंदी डिक्शनरी ऑफ गव्हर्नमेंट अँड एज्युकेशनल र्वड्स अँड फेजीस (१९५५) तयार केला. महाराष्ट्रातील थोर संस्कृत पंडित ⇨ केवलानंदसरस्वती (पंडित नारायणशास्त्री मराठे) ह्यांनी मीमांसाकोशा चे संपादन केले (७ खंड, १९५२-६६). धर्मकोशा चे कामही वाई येथे सुरू आहे धर्मकोशा ची संकल्पित कांडे एकूण ११ असून ह्यांपैकी पहिली चार कांडे व वर्णाश्रमधर्म ह्या पाचव्या कांडाचा पहिला भाग प्रसिद्घ झाला आहे. धर्मकोशा चे काम पाहणाऱ्या पंडित नारायणशास्त्री मराठे यांनी संन्यास घेतल्यानंतर (१९३१) त्यांचे शिष्य तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांनी ह्या कोशाचे काम पुढे नेले. त्यांच्या निधनानंतर (१९९४) ह्या कोशाचे काम संस्कृत पंडिता डॉ. सरोजा भाटे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

व्याकरण : अर्वाचीन संस्कृत साहित्यात जे व्याकरणगंथ झाले, त्यांत नागोजी भट्टाचा परिभाषेंदुशेखर हा गंथ ख्यातनाम आहे. पाणिनीय संप्रदायातील व्याकरणविषयक परिभाषांच्या स्पष्टीकरणार्थ तो लिहिला गेला. ह्या गंथावर त्याचा शिष्य वैदयनाथ पायगुंडे ह्याने टीका लिहिली. भैरवमित्र, उदयशंकर पाठक, हरिनाथ, विष्णुशास्त्री भट्ट ह्यांनीही या गंथावर टीका लिहिल्या आहेत. परिभाषेंदुशेखरा खेरीज नागोजी भट्टाने व्याकरणशास्त्रावर लघु-शब्देंदुशेखर, बृहत्-शब्देंदुशेखर, लघुमंजुषा, महाभाष्यप्रत्याख्यानसंग्रह हे अन्य गंथही लिहिले. त्याच्या लघुशब्देंदुशेखरा वर सदाशिवभट्ट घुले, राघवेंद्राचार्य गजेंद्रगडकर, गुरूप्रसादशास्त्री आदींनी टीका लिहिल्या आहेत. अन्नम्भट्ट ह्या आंध्र प्रदेशातील पंडिताने महाभाष्यप्रदीपोद्योतन सारखा गंथ लिहिला.

साहित्यशास्त्र : अप्पय्य दीक्षित व जगन्नाथपंडित यांच्यानंतर साहित्य-शास्त्रात म्हणण्यासारखे लेखन झाले नाही, अशी समजूत आहे परंतु वस्तुस्थिती तशी नाही. सामराज दीक्षिताचा शृंगारामृतलहरी, त्याचा पुत्र कामराज ह्याचा काव्येंदुप्रकाश, नातू वजराज याची रसमंजरीवरील टीका, पणतू जीवराज याची रसतरंगिणी वरील सेतु ही टीका हे साहित्यशास्त्रीय लेखन सामराज दीक्षितानंतरच्या तीन पिढ्यांचे आहे. चतुर्भुजाच्या रसकल्पद्रूमात १,००० श्लोक असून आपल्या ज्या रसिक आश्रयदात्यासाठी त्याने हा ग्रंथ लिहिला, त्या शाहस्ताखान ऊर्फ आषकखान ह्याचे ५-६ उत्तम श्लोक त्यात आहेत. गौरांग महाप्रभूंचा भक्त बलदेव विदयाभूषण (अठरावे शतक) याने साहित्यकौमुदी हा भरतसूत्रां वरील टीकागंथ लिहिला. विश्वेश्वर पांडे (अठरावे शतक) याने अलंकारकौस्तुभ, अलंकारकर्णाभरण, काव्यलीला, काव्यरत्नम् असे साहित्यशास्त्रविषयक गंथ लिहिले त्याचप्रमाणे भानुदत्ताच्या रसमंजरी वर टीकाही लिहिली. ओरिसातील वासुदेव पात्राने कविसंकेत आणि समस्यापूर्ती ह्यांविषयी आपल्या कविचिंतामणी त चर्चा केलेली असून संगीताबद्दलही लिहिले आहे. अच्युतराय मोडक (अठरावे – एकोणिसावे शतक) याचा साहित्यसार, आंध्र प्रदेशातील राजशेखरकृत (एकोणिसावे शतक) साहित्यकल्पद्रूमअलंकारमकरंद,मुडुंबी नरसिंहाचार्यांचे काव्योपोद्धात, काव्यप्रयोगविधि, काव्यसूत्रवृत्ति आणि अलंकारमाला हे ग्रंथही निर्देशनीय आहेत. ह्यांखेरीज अन्यही अनेक ग्रंथ आहेत.

ज्योतिष : अठराव्या शतकात ज्योतिषावर व्यासंगी लेखकांनी लेखन केले. उदा., शंकर (वैष्णवकरण), मणिराम (ग्रहगणितचिंतामणि), भूला (बह्मसिद्धान्त), मथुरानाथ (ज्योतिषसिद्धन्तसार), सातारचे चिंतामणि दीक्षित (सूर्यसिद्धान्तसारिणी, गोलानंद), खानदेशचे राघवपंडित खांडेकर (खेटकृति, पंचांगार्क, पद्धतीचंद्रिका), शिव (तिथि पारिजात), पुण्याचे दिनकर (ग्रहविज्ञानसारिणी, मासप्रवेशसारिणी, चंद्रोदयांकजालम्-ग्रहणांकजालम् इत्यादी) हे ग्रंथकार मोठे ज्योतिषतज्ज्ञ होते.

मराठी ज्योतिषतज्ज्ञांमध्ये अहमदनगरला राहणारे म. म. बापूदेवशास्त्री (१८२१-?) ह्यांनी भारतीय आणि यूरोपीय ज्योतिषशास्त्राचा तौलनिक अभ्यास केला होता. त्यांच्या गंथांत सायनवाद, प्राचीन ज्योतिषाचार्यांशवर्णन, अष्टादशविचित्रप्रश्नसंग्रह अशा काही गंथांचा समावेश होतो. सूर्यसिद्धान्त ह्या गंथाचे तसेच सिद्धान्तशिरोमणीच्या गोलाध्यायां चे त्यांनी इंग्रजी भाषांतर केले होते. नीलांबर शर्मा ह्या मैथिल पंडिताचा गोलप्रकाश हा गंथ बापूदेवशास्त्र्यांनी प्रकाशित केला. हा गंथ ज्योतिषशास्त्राच्या यूरोपीय पद्धतीनुसार लिहिलेला आहे.

व्यंकटेश बापूजी केतकर (जन्म १८५४) यांचा ज्योतिर्गणित हा गंथ प्रसिद्ध असून तो १८९० च्या सुमाराचा आहे. याशिवाय त्यांनी केतकीग्रहगणित, भूमंडलीयसूर्यग्रहगणित इ. ग्रंथ लिहिले.

संगीत : सतराव्या शतकात पंडित सोमनाथ (रागविबोध), दामोदरपंडित (संगीतदर्पन), अठराव्या शतकात अहोबलपंडित (संगीतपारिजात) ह्यांनी संगीतविषयक रचना केली. अहोबलपंडितांच्या संगीतपारिजाता चे तर फार्सीत भाषांतरही झाले. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पंडित कृष्णानंद व्यासांचा रागकल्पद्रूम हा गंथ प्रसिद्ध झाला. हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रात संशोधक, संगीतशास्त्रकार आणि संगीतप्रसारक म्हणून ⇨विष्णु नारायण भातखंडे (१८६०-१९३६) ह्यांनी असामान्य कामगिरी बजाविली. श्रीमल्ल्क्ष्यसंगीत, अभिनवरागमंजरी आणि अभिनवतालमंजरी हे त्यांचे संगीतावरील संस्कृत गंथ होत.


 वैदयक : पाश्र्चात्त्य वैदयकाच्या भारतात झपाटयाने होणाऱ्या प्रसारामुळे भारतीय आयुर्वेद मागे पडू लागलेला असताना कविराज गणनाथ सेन, डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे, चिं. ग. काशीकर, पुरूषोत्तम सखाराम हिर्लेकर यांनी आयुर्वेदावर गंथरचना केली. गणनाथ सेन ह्यांनी प्रत्यक्षशारीरम् (१९१९) आणि सिद्धान्तनिदानम् (१९२२) हे दोन गंथ लिहिले. डॉ. मुंजे ह्यांचा नेत्ररोगचिकित्सा हा नेत्ररोगांवरचा एकमेव संस्कृत गंथ आहे. काशीकरांनी आयुर्वेदीयपदार्थविज्ञानम् (१९५८) ह्या त्यांच्या गंथात आयुर्वेदाची पार्श्र्वभूमी विशद केली आहे. हिर्लेकरांनी शारीरतत्त्वदर्शन (१९४२) हा गंथ लिहून आयुर्वेदातील त्रिदोषसिद्धान्ताची शास्त्रीयता स्पष्ट केली. हा संपूर्ण गंथ अनुष्टुप छंदात आहे. ह्यांखेरीज जंतूंपासून होणाऱ्या रोगांची चिकित्सा पी. एस्. वेरियर व व्ही. एन्. नायर ह्यांनी अनुग्रहमीमांसा (१९३८) या गंथात केली आहे.

धर्मशास्त्र : सतराव्या शतकापासून झालेले धर्मशास्त्रविषयक लेखन लक्षणीय आहे. वासुदेव दीक्षिताने यज्ञेश्वर दीक्षिताच्या सहकार्याने बौधायनश्रौतसूत्रव्याख्या हा गंथ लिहिला. विवादार्णवसेतु हा अठराव्या शतकातील गंथ भारताचा गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज (पद १७७३-८५) ह्याने पंडितांची एक समिती नेमून तयार करून घेतला. तसेच सर्वोरूशर्मा त्रिवेदी ह्याने सर विल्यम जोन्सच्या (१७४६-९४) प्रेरणेने विवादसारार्णव हा गंथ लिहिला. धर्मशास्त्रावर लिहिणारी महिला अपवादच म्हणावी लागेल. तथापि एकोणिसाव्या शतकात कामाक्षी ह्या आंध्र प्रदेशीय लेखिकेने स्मृतिरत्नप्रकाशिका हा गंथ लिहिला. धर्मशास्त्रावर लिहिणाऱ्या महाराष्ट्रीय पंडितांपैकी कृष्णनाथ ह्या लेखकाच्या धर्मसिंधू चा उल्लेख म. म. पां. वा. काणे ह्यांनी लिहिलेल्या धर्मशास्त्राच्या इतिहासा त आला आहे. शिवदीक्षित (धर्मतत्त्वप्रकाश), त्र्यंबकभट्ट (प्रतिष्ठेंदु) तसेच अच्युतराव मोडक हे धर्मशास्त्रावर लिहिणारे अन्य काही महाराष्ट्रीय ग्रंथकार होत.

तत्त्वज्ञानपर साहित्य : दक्षिण भारतातील शैव-वैष्णव वादातून काही तत्त्वज्ञानपर गंथ लिहिले गेले. त्यागराजमखी ह्याने न्यायेन्दुशेखर हा गंथ शिवाव्दैताच्या समर्थनावर लिहिला. त्यावर रामानंद संस्थानच्या सेतुपतीचा आश्रित वेंकटेश याने त्याचे खंडन करण्यासाठी त्रिंशच्छलोकी-विष्णुतत्त्वनिर्णय हा वैष्णवमताचा पुरस्कार करणारा ग्रंथ लिहिला. त्याला उत्तर देण्यासाठी अप्पय्य दीक्षित (अठरावे शतक-हा एदय्यात्तुमंगलम्‌चा रहिवासी होता). ह्याने विमतभंजन हा गंथ लिहून त्यागराजमखीच्या शिवाव्दैतमताचे समर्थन केले. रामानुजाचार्य आणि मध्वाचार्य यांच्या व्दैतमताचे खंडन करण्यासाठी महादेव याने प्रपंचामृतसार हा ग्रंथ लिहिला.

म्हैसूरच्या व्दितीय कृष्णराजाचा सर्वाधिकारी नंजराज याने शैवतत्त्व-ज्ञानावर १८ गंथ लिहिले. सांख्य योग आणि वेदान्त ह्यांचा समन्वय करून देण्यासाठी अप्पय्याचार्य याने ज्ञानेश्वरांच्याच एका प्रख्यात गंथाच्या नावाचे स्मरण करून देणारा अनुभवाव्दैत हा गंथ लिहिला. माधवाचार्यांनी लिहिलेल्या सर्वदर्शनसंग्रहा नंतर भारतीय तत्त्वज्ञानांचा – दर्शनांचा – परिचय  श्रीपादशास्त्री हसूरकर यांनी आपल्या व्दादशदर्शनसोपानावलि (विसाव्या शतकाचा पूर्वार्ध) या गंथातून करून दिला. हा गंथ १९३८ मध्ये प्रसिद्ध झाला. ह्या गंथाची शैली सुबोध असल्यामुळे तत्त्वज्ञानासारखा गहन विषयही वाचनीय झालेला आहे.

न्यायशास्त्रावरही गंथ झाले. अक्षपाद गौतमाच्या न्यायसूत्रां वर सतराव्या शतकात रामभद्र (न्यायरहस्य), विश्वनाथ (न्यायसूत्रवृत्ति), गोविंद खन्ना (न्यायसंक्षेप), जयराम (न्यायसिद्धान्तमाला) ह्यांनी लिहिलेले टीकागंथ उल्लेखनीय आहेत.

नव्यन्यायाच्या परंपरेत अर्वाचीन कालखंडात अनेक लेखक झाले सार्वभौमाने सोळाव्या शतकापासून सुरू केलेल्या नव्यन्यायाच्या नवव्दीप शाखेतील लेखक सोळाव्या-सतराव्या शतकांपासून एकोणिसाव्या शतकापर्यंत तिसांहून अधिक आहेत. 

संस्कृत नियतकालिके : हृषिकेश भट्टाचार्य (जन्म १८५०) यांनी १८६९ मध्ये सुरू केलेले विदयोदय हे पहिले संस्कृतमासिक होय. ते आधी लाहोरहून आणि नंतर कलकत्त्याहून निघू लागले. जवळपास ५० वर्षे हे मासिक चालले होते. चरित्रे, कथा, आख्यायिका, इंग्रजी काव्यानुवाद असे साहित्य या मासिकातून प्रसिद्ध होई. मंजुभाषिणी हे मासिक कांचीवरम् येथून निघे. तेथील एका मठाचे अधिपती श्री अनंताचार्य ह्यांनी ते आपल्या मठाच्या मतप्रतिपादनार्थ सुरू केले होते. न्याय, वेदान्त अशा विषयांवर तर अनंताचार्यांनी लेखन केलेच पण ऑलिव्हर गोल्डस्मिथच्या हर्मिट ह्या काव्याचे एकांतवासी योगी हे संस्कृत भाषांतरही त्यांनी केले होते.

सहृदया हे मासिक पौर्वात्य व पश्र्चिमी विदयांचा समन्वय साधण्याच्या हेतूने आर. कृष्णम्माचार्य यांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस काढले. प्रथम कलकत्त्यातून प्रकाशित होणारी संस्कृतचंद्रिका (मासिक) आप्पाशास्त्री राशिवडेकर हे तिचे संपादक झाल्यावर कोल्हापूरहून निघू लागले. भारतभर ह्या मासिकाची ख्याती होती. सूनृतवादिनी हे साप्ताहिकही त्यांनी काढले होते. निरनिराळ्या प्रचलित विषयांवरचे लेखन ह्या साप्ताहिकात येई. आप्पाशास्त्रींच्या निधनानंतर (१९१३) सहृदया आणि सूनृतवादिनी ही दोन्ही नियतकालिके बंद पडली. वाराणसीमधल्या संस्कृतभारती या मासिकात रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजली चा संस्कृत अनुवाद प्रसिद्ध झाला होता. अनेक गदयपदय प्रबंधही ह्या मासिकात प्रकाशित झाले. संस्कृतरत्नाकर ह्या जयपूरहून प्रसिद्ध होणाऱ्या मासिकाने वेद, दर्शने, आयुर्वेद इ. विषयांवर विशेषांक काढले. संस्कृतम्  हे १९३० पासून अयोध्येहून निघणारे साप्ताहिक. संस्कृत वाक्यांमध्ये इंग्रजी शब्द वापरायला हरकत नाही, अशी ह्या साप्ताहिकाची भूमिका होती. त्यात येणाऱ्या लेखनातही ती दिसून येत असे. पं. कालिकाप्रसाद त्रिपाठी ह्यांनी ते सुरू केले. नेपाळमध्ये सुरू झालेल्या जयतु संस्कृतम् (१९६०) या मासिकाने मुख्यतः नेपाळी संस्कृततज्ञांचेच लेख प्रसिद्ध केले आहेत. सारस्वती सुषमा हे वाराणसीहून निघणारे एक अतिशय प्रतिष्ठित असे त्रैमासिक. यात मोठमोठया विव्दानांनी लेख लिहिलेले आहेत. साहित्य अकादमीने संस्कृतप्रतिभा (संपा. डॉ. राघवन्) हे षण्मासिक सुरू केले. अन्य नियतकालिकांत श्रूतप्रकाशिका (बाह्म समाजाचे मुखपत्र), पंढरीनाथाचार्य गलगली यांची बागलकोटहून निघणारी साप्ताहिक वैजयंती, पन्नसेरी नीलकंठ शर्मा ह्यांचा विज्ञानचिंतामणि, भरतपूर येथील विदयोदयम्, आंध्रसाहित्यपरिषत् पत्रिका, १९५० पासून सुरू झालेले संस्कृतभवितव्यम् (डॉ. श्री. भा. वर्णेकर), पुणे येथील संस्कृत सभेचे भारतवाणी हे पाक्षिक मुखपत्र, तसेच १९६० पासून निघणारे संस्कृत साहित्य परिषदेचे पाक्षिक शारदा, वाई येथील मोदवृत्त (भाऊशास्त्री लेले) इ. सर्व नियतकालिकांनी संस्कृत भाषेच्या प्रचाराचे कार्य तळमळीने केले.


 संस्कृत भाषा-साहित्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ज्या संस्था कार्यरत आहेत, त्यांपैकी काही प्रातिनिधिक संस्था अशा :

(१) भारतीय विदया भवन: ⇨ कन्हैय्यालाल मुनशी यांच्या कर्तृत्वाचे एक प्रतीक असलेल्या ह्या संस्थेने १९३९ साली मुंबादेवी संस्कृत महाविदयालयाची स्थापना केली. ह्या महाविदयालयाने चौदा शास्त्रांच्या शास्त्री, आचार्य अशा परीक्षांसाठी अध्ययनाची व्यवस्था केली. याच संस्थेतर्फे ‘ मुंगालाल गोयंका संशोधन मंदिर ’ सुरू झाले. या संस्थेतर्फे प्रकाशित होणाऱ्या भारतीय विदया या संशोधन पत्रिकेतून संस्कृतातील अनेक महत्त्वाचे हस्तलिखित गंथ प्रकाशित झाले. ह्याच संस्थेच्या अंतर्गत असलेल्या गीतामंदिर या संस्थेने गीते चा प्रसार करण्याच्या कामी मोलाचे योगदान दिले.

(२) स्वाध्याय मंडल, किल्ल पारडी (गुजरात राज्य) येथील वेदमूर्ती पं. ⇨ श्री. दा. सातवळेकर यांनी वैदिक धर्मसंस्कृतीच्या प्रचारार्थ उभारलेल्या या संस्थेने समाजाच्या विविध स्तरांत संस्कृतचा प्रचार केला.

(३) भांडारकर प्राच्यविदया संशोधनमंदिर : भूर्जपत्र, ताडपत्र, जुना कागद यांवर लिहिलेल्या संस्कृतातील अनेक पोथ्या, संस्थेने जपलेल्या आहेत. सुंदर अक्षरात लिहिलेली पाणिनीची अष्टाध्यायी, माक्स म्यूलरने ऋग्वेदा च्या पहिल्या आवृत्तीसाठी वापरलेली पोथी अशा अनेक दुर्मिळ वस्तू अभ्यासकांसाठी ह्या संस्थेने जमवल्या. ‘ महाभारता ची चिकित्सक पाठावृत्ती ’ ह्या संस्थेने अनेक थोर विव्दानांच्या मदतीने तयार केली. जगातील अनेक देशांतून अभ्यासक येथे येतात. [⟶ भांडारकर प्राच्यविदया संशोधन मंदिर].

(४) विश्र्वेश्वरानंद वैदिक संशोधन संस्था, होशियारपूर या संस्थेनेही अनेक मौल्यवान ग्रंथ प्रकाशित केले. त्यांत वैदिक पदकोश, अथर्ववेदाच्या पहिल्या भागावरील सायणभाष्य इत्यादींचा समावेश होतो.

(५) प्राच्यविदयामंदिर, बडोदा: अप्रकाशित संस्कृत हस्तलिखितांचे संशोधन आणि प्रकाशन हे संस्थेने आपले प्रमुख कार्य मानले.

(६) प्राज्ञपाठशाळा, वाई: केवलानंद सरस्वती (पं. नारायणशास्त्री मराठे) या धर्मसुधारणावादी संस्कृत पंडितांनी १९०१ पासून वाई येथे स्वत:ची पाठशाळा सुरू केली. प्राज्ञपाठशाळा असे तिचे नामकरण १९१६ साली केले. त्यांनी या संस्थेतर्फे धर्मकोशा च्या कामाला आरंभ केला.ह्या संस्थेत अनेक प्राचीन हस्त लिखितांचे संकलनही केलेले आहे.

ह्यांखेरीज देशभरात संस्कृत भाषा आणि विदया यांच्या अभिवृद्धीसाठी कित्येक संस्था काम करीत आहेत.

संदर्भ : 1. Dasgupta, S. N. Ed. A History of Sanskrit Literature, Calcutta, 1962.

            2. De, S. K. Studies in the History of Sanskrit Poetics, 2 Vols., London, 1923, 1925.

            3. Gowen, H. H. History of Indian Literature, New York, 1931.

            4. Gupta, Dharmendra K. Recent Studies in Sanskrit and Indology, London, 1982.

            5. Kane, P. V. History of Sanskrit Poetics, Bombay, 1951.

            6. Keith, A. B. History of Sanskrit Literature 1953.

            7. Krishnamachariar, M. History of Classical Sanskrit Literature, Madras, 1937.

            8. Macdonell, A. A. History of Sanskrit Literature, London, 1928. 2nd Ed., Delhi, 1986.

            9. Majumdar, R. C. Ed. The History and Culture of the Indian people. Vols. I to VII, Bombay, 1990.

          10. Murti, M. S. An Introduction to Sanskrit Linguistics, 1984.

          11. Shastri, Gaurinath, Concise History of Classical Sanskrit Literature, London, 1974.

          12. Winternitz, M. History of Indian Literature, 2 Vols. London, 1955.

          १३. जोशी, लक्ष्मणशास्त्री, वैदिक संस्कृतीचा विकास, वाई, १९९६.

         १४. देशपांडे, ग. त्र्यं. भारतीय साहित्यशास्त्र, मुंबई, १९६३.

         १५. देशपांडे, सु. र. भारतीय कामशिल्प, पुणे, २००२.

         १६. वर्णेकर, श्री. भा. अर्वाचीन संस्कृत साहित्य, नागपूर, १९६३.

वर्णेकर, श्री. भा.