समन्वेषण : शास्त्रीय, व्यापारी किंवा लष्करीदृष्टया नवनवीन प्रदेशांचा घेतलेला शोध म्हणजे समन्वेषण होय. समन्वेषण ही मानवाची एक फार जुनी व चेतनामय कृती आहे. प्राचीन काळापासून शिकार, व्यापार, प्रदेश जिंकणे किंवा वसाहती स्थापन करण्याच्या उद्देशाने पृथ्वीच्या समन्वेषणास चालना मिळत गेली. अगदी सुरूवातीच्या काळातील समन्वेषक बहुधा शिकारी होते. शिकारीच्या शोधार्थ ते अपरिचित प्रदेशात प्रवास करीत असत, त्यानंतर प्राचीन संस्कृतीतील राजे व्यापारवृद्धीसाठी, सोने व इतर संपत्तीच्या शोधासाठी तसेच नवीन वसाहतींसाठी स्थाने शोधण्याच्या उद्देशाने अपरिचित प्रदेशांकडे समन्वेषक पाठवीत असत.
वेगवेगळ्या सफरींची कारणे वेगवेगळी असली तरी त्या प्रत्येकाची काही विशेष वैशिष्टये असत. मोठया साहसाची आवड व नवीन प्रदेशाचा शोध घेण्याची प्रबळ इच्छा ही त्या प्रवासाची प्रमुख कारणे होती. हे करीत असताना त्यात फार मोठा धोका आहे, कदाचित मृत्यूही, याचीही जाणीव त्यांना असे. असे आव्हान स्वीकारूनच कोलंबस १४९२ मध्ये आशियाकडे जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी निघाला होता. कोलंबस व इतर समन्वेषकांनी लावलेल्या शोधांचा, मार्गांचा उपयोग पुढील समन्वेषकांना झाला. जुन्या माहितीच्या आधारेच काहींनी उत्तर अमेरिकेच्या पर्वतीय प्रदेशांतून व जंगलांतून पायी प्रवास केला. काहींनी आफिकेच्या अंतर्गत प्रदेशाचे नकाशे तयार केले. काहीजण ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटी प्रदेशात गेले, तर काहीजण धुवीय बर्फाळ व ओसाड प्रदेशात समन्वेषणासाठी गेले. अशा प्रकारे वेगवेगळ्या समन्वेषकांच्या प्रयत्नातून विसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत पृथ्वीच्या बहुतेक सर्व पृष्ठभागाचे समन्वेषण पूर्ण झाले. आता प्रामुख्याने अध:पृष्ठ ( सब्सर्फेस ) व सागरी प्रदेश, विशेषत: खोल महासागरी तळ, तसेच अंतराळ यांच्या समन्वेषणावर विशेष लक्ष मानवाने केंद्रित केले आहे. तो चंद्राच्या पृष्ठभागावर चालू लागला आहे. मंगळावर अवकाशयान पाठवून तेथील मातीचे नमुने तपासणे त्याला शक्य झाले आहे. अंतराळात अवकाश स्थानक स्थापन करण्यात त्याला यश आले आहे.
इतिहास : प्राचीन : प्राचीन काळातील पहिले ज्ञात समन्वेषक हे प्रामुख्याने बॅबिलोनिया ( सांप्रत आग्नेय इराक ) व ईजिप्शियन संस्कृती-तील व्यापारी होते. प्रवासामुळे बॅबिलोनियातील व्यापाऱ्यांना दूरवरच्या प्रदेशाची माहिती झाली होती. ख्रिस्तपूर्व २५०० च्या सुमारास बॅबिलोनियातील व्यापाऱ्यांनी दक्षिणेकडे हिंदी महासागरापर्यंत तर पश्चिमेकडे भूमध्य सागरी प्रदेशापर्यंत प्रवास केल्याचे आढळते. याच सुमारास ईजिप्शियनांनी तांबडया समुद्रापासून दक्षिण आफिकेच्या पूर्व किनाऱ्यापर्यंत सफर केली होती. हा प्रदेश पूर्वी पुंट नावाने ओळखला जाई. तज्ज्ञांच्या मते पुंट म्हणजेच सांप्रत सोमालिया किंवा त्याच्या लगतचा प्रदेश असावा. इ. स. पू. पंधराव्या शतकामध्ये ईजिप्तची राणी हॅटशेपसूट हिने आपले व्यापारी सागरी मार्गाने पुंट प्रदेशात पाठविले होते.
प्राचीन काळातील समन्वेषणात फिनिशियन अगेसर होते. भूमध्य समुद्राच्या पूर्व भागात म्हणजेच सांप्रत इझ्राएल, लेबानन व सिरिया यांच्या किनारी प्रदेशात ते रहात होते. त्यांनीच इ. स. पू. ११०० च्या सुमारास संपूर्ण भूमध्य समुद्राचा पूर्व-पश्चिम असा पहिला प्रवास केला. व्यापारवृद्धीसाठी त्यांनी सांप्रतच्या ट्युनिशियातील ट्युनिस शहरानजीक कार्थेज हे शहर वसविले. त्यानंतर फिनिशियनांनी भूमध्य समुद्राच्या पश्र्चिम भागात असलेली जिबाल्टरची सामुद्रधुनी ओलांडून अटलांटिक किनाऱ्यावरील उत्तर आफिकेच्या प्रदेशात वसाहत स्थापन केली. इ. स. पू. चौथ्याशतकात फिनिशियनांनी आफिकेच्या अटलांटिक किनाऱ्याचे समन्वेषण करण्यासाठी तसेच तेथे वसाहती स्थापन करण्यासाठी कार्थेज येथून ६० जहाजांचा ताफा पाठविला. कार्थेजियन मार्गनिर्देशक हॅनो याने या सफरीचे नेतृत्व केले. या सफरीत त्याने जिबाल्टर सामुद्रधुनीतून पुढे जाऊन आफिकेच्या पश्र्चिम किनाऱ्यावरून दक्षिणेकडे सांप्रत सेनेगलपर्यंतचे समन्वेषण केले.
प्राचीन ग्रीक लोकांना जगाच्या भूगोलाविषयीची तत्कालीन सर्वाधिक माहिती होती. इ. स. पू. चौथ्या शतकातील भरभराटीच्या काळात ग्रीक खलाशांनी वसाहतींसाठी स्थानांचा शोध घेण्याच्या उद्देशाने भूमध्य
समुद्रावरील आफिका व यूरोपच्या किनारी प्रदेशाचे समन्वेषण केले. ग्रीक संस्कृतीला जगाची विशेष ओळख करून देण्यात पायथॅगोरस व अलेक्झांडर द गेट या दोघांचा फार मोठा सहभाग होता. पायथॅगोरस हा मार्गनिर्देशक, गणिती व खगोलशास्त्रज्ञ तर अलेक्झांडर द गेट हा सत्ताधीश होता. इ. स. पू. ३३० च्या सुमारास पायथॅगोरसने जिबाल्टर सामुद्रधुनीतून अटलांटिकमध्ये येऊन सांप्रत पोर्तुगाल, स्पेन व फान्सच्या अटलांटिक किनाऱ्याचे समन्वेषण केले, तसेच तो बिटिश बेटे ओलांडून उत्तरेकडे गेला परंतु पुढे बर्फाळ भाग लागल्याने त्याला परत फिरावे लागले. त्याने जो ‘ अल्टीमा थुले ’ हा उल्लेख केला आहे तो त्याने सर्वांत उत्तरेकडील पाहिलेला भाग असावा. तज्ज्ञांच्या मते हा भाग म्हणजे सध्याचा आइसलँड किंवा नॉर्वेचा भाग असावा. पायथॅगोरस उत्तर अटलांटिक महासागराचे समन्वेषण करीत होता, त्याचवेळी अलेक्झांडर आपल्या सत्तेचा विस्तार पूर्वेकडे वाढवीत चालला होता. इ. स. पू. ३३४ मध्ये वयाच्या बाविसाव्या वर्षी अलेक्झांडर व त्याच्या सैन्याने इराणच्या सैन्याचा पाडाव करून मध्यपूर्व आशिया गाठले. बॅबिलोनिया, इराण इ. पश्चिम आशियातील प्रदेश ताब्यात घेत तो हिंदुस्थानात सिंधू नदीपर्यंत पोहोचला. इ. स. पू. ३२३ मध्ये अलेक्झांडरचा मृत्यू झाला. त्यावेळी गीकांची सत्ता उत्तर अटलांटिकमधील ‘ अल्टीमा थुले ’ पासून पूर्वेकडे पश्र्चिम हिंदुस्थानापर्यंत होती.
अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर साधारण दोनशे वर्षानंतर चीन व यूरोप यांच्यात संबंध प्रस्थापित होऊ लागले. अलेक्झांडरने जिंकलेल्या प्रदेशातील लोकांकडून प्रथमच चिनी लोकांना यूरोपीयांविषयीची माहिती मिळत होती. इ. स. पू. १३८ मध्ये चिनी समाट वू टि याने ज्या§J च्यन याला आपला प्रतिनिधी म्हणून पश्चिम आशियात पाठविले. ज्यांगने इ. स. पू. १२८ ते १२६ या कालावधीत मध्य आशियाचे समन्वेषण केले. व्यापारी मार्गांची माहिती मिळवून तो चीनला परत आला, या मोहिमेमुळे पश्चिम चीनमधील यार्कंदला ( सांप्रत सूची ) जोडणारा मार्ग सापडला. याच ठिकाणी चिनी, भारतीय व यूरोपीय व्यापारी एकत्र येऊ लागले होते. हिप्पालस या कप्तानाने इ. स. सु. १५ मध्ये असे दाखवून दिले की, मोसमी वाऱ्याची दिशा व गती यांच्या साहाय्याने हिंदी महासागर पार करणे शक्य आहे. त्यामुळे पूर्वेकडील प्रदेशाबरोबरील व्यापारास चालना मिळाली. रोमन साम्राज्यात विशेष समन्वेषक निर्माण झाले नाहीत परंतु रोमन व्यापाऱ्यांचे यूरोप, आफिका व आशियाई देशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित झालेले असल्यामुळे त्यांना त्या प्रदेशांविषयी बरीच माहिती होती.
मध्ययुगीन : इ. स. चौथ्या शतकापासून ते पंधराव्या शतकापर्यंतच्या मध्ययुगीन काळात व्हायकिंगांनी समन्वेषणाच्या क्षेत्रात फार मोठे कार्य केले. डेन्मार्क, नॉर्वे व स्वीडन या प्रदेशांत व्हायकिंगांचे वास्तव्य होते.
इ. स. सातव्या शतकात वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची तीव्रता जाणवू लागली. शेतीसाठी जमीन कमी पडू लागली. त्यामुळे अनेक व्हायकिंग लोकांनी नवीन प्रदेशाच्या शोधार्थ आइसलँड, आयर्लंड व स्कॉटलंड प्रदेशांकडे स्थलांतर केले. इ. स. ९८२ मध्ये एरिक द रेड ही नॉर्वेजियन व्यक्ती आइसलँडवरून सागरी मार्गाने ग्रीनलंडकडे गेली. त्यानंतर काही वर्षांनी एरिकने गीनलंडमध्ये स्थापन केलेल्या वसाहतीकडे हरजुल्फसन या कप्तानाला पाठविले परंतु वादळामुळे त्याचा मार्ग चुकून तो सांप्रत कॅनडाच्या किनाऱ्यापर्यंत गेला. अशा प्रकारे उत्तर अमेरिकेची भूमी पाहणारा हरजुल्फसन हा पहिला यूरोपीय ठरला. हरजुल्फसन याने वर्णन केलेल्या प्रदेशाचे समन्वेषण करण्यासाठी इ. स. १०२० च्या सुमारास एरिक द रेडचा मुलगा लीफ एरिकसन याच्या नेतृत्वाखाली एक सफर काढण्यात आली. त्यांनी एक वसाहत स्थापन केली. एरिकसनने त्या वसाहतीला व्हिनलँड हे नाव दिले, तज्ज्ञांच्या मते सांप्रत कॅनडातील न्यू फाऊंडलंड म्हणजेच व्हिनलँड असावे, कारण १९६१ मध्ये येथे सापडलेले अवशेष व्हायकिंग वसाहतीचे असावेत.
दहाव्या शतकाच्या अखेरीस कूसेडांच्या म्हणजेच ख्रिश्चन लष्कराच्या सफरी सुरू असताना यूरोपियनांचे मध्यपूर्वेतील आकर्षण पुन्हा वाढले. मध्यपूर्व आशियात मुस्लिमांची सत्ता होती. त्यामुळे यूरोपियनांना मध्यपूर्वेतील येशू ख्रिस्ताच्या स्मारकाला भेट देता येत नव्हती. येशू ख्रिस्ताची भूमी काबीज करण्याचे कूसेडांचे प्रयत्न १०९६ पासून पुढे सु. दोनशे वर्षांपर्यंत चालू होते. व्यापाराच्या निमित्ताने यूरोपीयांचे मध्यपूर्वेतील तसेच अतिपूर्वेकडील प्रदेशांशी संबंध प्रस्थापित होत होते. बाराव्या शतकाच्या मध्यास यूरोपीय पूर्व आशियाई लोकांच्या प्रत्यक्ष संपर्कात आले. त्यावेळी आशियाच्या बृयाचशा प्रदेशावर मंगोलांची सत्ता होती. १२४५ मध्ये पोप इनोसंट चौथा याच्यामार्फत फान्समधील जोव्हान्नी दे प्यानो कार्पीनी या धर्मगुरूला मंगोल सत्ताधीशाशी ( खानाशी ) मैत्रीची बोलणी करण्यास पाठविले. सांप्रत मंगोलियाचा प्रवास करून तेथील लोकांची व प्रदेशाची माहिती घेऊन धर्मगुरू परत आला. १२५३ मध्ये फान्सचा राजा लूई नववा याने विल्यम ऑफ रूब्रूक या धर्मगुरूला खानाची भेट घेण्यास पाठविले. त्यानेही पूर्व आशियातील प्रवासात तेथील वैशिष्टयपुर्ण संपत्तीबद्दलची मनोरंजक माहिती आणली. त्यामुळे यूरोपीय व्यापाऱ्यांची पूर्वेकडील देशांबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली.
व्हेनिसच्या निकोलॉ व माफफेओ पोलो या दोन व्यापाऱ्यांनी १२६०च्या दशकात चीनकडे एक व्यापारी मोहीम काढली. मंगोल नेता कूब्लाईखान याच्याशी त्यांनी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. हे दोन्ही बंधू रत्ने व इतर वस्तू घेऊन व्हेनिसला परतले १२७१ मध्ये पोलो बंधू पुन्हा व्यापारासाठी चीनला गेले. यावेळी निकोलॉचा १७ वर्षीय अतिशय बुद्घिमान मुलगा मार्को पोलो त्यांच्या बरोबर होता. मार्को पोलोचा कूब्लाईखानवर चांगलाच प्रभाव पडला. कूब्लाईखानचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून मार्को पोलोने सु. पंधरा वर्षे चीन व आग्नेय आशियाचा प्रवास केला. घरी परतल्यावर मार्को पोलोने आपल्या प्रवासावर आधारित डिस्किप्शन ऑफ द वर्ल्ड हे पुस्तक प्रकाशित केले. या प्रवासवर्णनामुळे यूरोपीयांचे पूर्वेकडील देशांशी जवळचे संबंध प्रस्थापित होण्यास मदत झाली. बाराव्या शतकाच्या अखेरीस तसेच तेराव्या शतकात इतर अनेक प्रवाशांनी प्रवासवर्णने लिहिली. ओडेरिक ऑफ पोर्डेनोन व इब्न बतूता हे त्यांपैकीच होत. इटालियन मिशनरी ओडेरिक १३१४ मध्ये हिंदी महासागर मार्गाने चीन व दक्षिण पॅसिफिक महासागराकडे गेला. त्यानंतर मध्य आशियामार्गे १३३० मध्ये यूरोपला परतला. अरब प्रवासी इब्न बतूता याने १३२५ते १३५४ या कालावधीत पश्र्चिम आफिका, मध्यपूर्व आशिया, भारत, चीन व आग्नेय आशियात प्रवास केला.
चौदाव्या शतकात यूरोपीय व पूर्व आशियाई देश यांदरम्यानचा जमिनीवरून होणारा व्यापार बराच वाढला होता. १४५३ मध्ये तुर्की मुस्लिमांनी या व्यापारी मार्गांवर ताबा मिळविला. मुस्लिम व्यापारी पूर्वेकडून येणारी उत्पादने यूरोपियनांना फार महाग विकू लागले. त्यामुळे यूरोपमधील प्रमुख व्यापारी देश पूर्वेकडील इंडीजकडे म्हणजेच पूर्व आशियाई प्रदेशात जाण्यासाठी थेट सागरी मार्गांचा शोध घेण्याचे प्रयत्न करू लागले. याबाबतीत पोर्तुगाल व स्पेनने विशेष पुढाकार घेतला आणि खऱ्या अर्थाने यूरोपीय समन्वेषकांचा महाकाळ सुरू झाला. या समन्वेषणातूनच यूरोपियनांनी अमेरिका खंडाचा शोध लावला.
चौदाव्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात पोर्तुगीजांनी आफिकेच्या पश्र्चिम किनाऱ्याच्या समन्वेषणावर लक्ष केंद्रित केले. पोर्तुगालचा राजा हेन्री म्हणजेच हेन्री द नॅव्हिगेटरने अशा सफरींना फार मोठे साहाय्य केले. त्याच्या काळात सफरींवर सफरी सुरू झाल्या. त्याच्या मृत्यूपर्यंत ( इ. स. १४६०) सांप्रत सिएरा लिओनपर्यंतच्या किनाऱ्याचे समन्वेषण केले गेले होते. चौदाव्या शतकाच्या अखेरीस पोर्तुगीजांना आफिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचण्याच्या आशा निर्माण झाल्या. या दिशेनेच आशियाकडे जाण्याचा मार्ग सापडेल अशी त्यांना आशा होती. पोर्तुगीज समन्वेषक बार्थालोमेऊ दीयश याने आफिकेच्या दक्षिण टोकाचा म्हणजेच केप ऑफ गुड होपचा शोध लावला.
पोर्तुगीज पूर्वेकडे जाण्याचा मार्ग शोधत होते त्याचवेळी इतर यूरोपीय समन्वेषक अटलांटिकमधून पश्चिमेकडे जाऊन इंडीजकडे ( पूर्व आशियाई प्रदेशाकडे ) जाण्याचा जवळचा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात होते. विशेषत: किस्तोफर कोलंबस या मताचा होता. स्पेनची राणी इझाबेला व राजा फर्दिनंद पाचवा यांच्या मदतीने ३ ऑगस्ट १४९२ रोजी कोलंबस स्पेनवरून तीन जहाजांसह पश्र्चिमेस निघाला. या सफरीत तो सॅन साल्व्हादोर, हिस्पानिओला व क्यूबा या बेटांपर्यंत जाऊन आला. त्याला वाटले आपण आशियातील इंडीज बेटापर्यंत पोहोचलो. प्रत्यक्षात ती सांप्रत वेस्ट इंडीजमधील बेटे होती. बऱ्याच यूरोपीयांना वाटले की कोलंबस खरोखरच इंडीजपर्यंत जाऊन आला परंतु पोर्तुगीज या मताशी सहमत नव्हते. आफिकेला वळसा घालूनच आशियाकडे जाता येईल या विचारावर पोर्तुगीज ठाम होते. १४९७ मध्ये पोर्तुगालचा राजा मॅन्युएल पहिला याने वास्को द गामा या समन्वेषकाला बार्थालोमेऊ दीयशच्या मार्गाने जाऊन आशियाकडे जाण्याचा मार्ग शोधण्याचा आदेश दिला. त्यानुसार ८ जुलैला वास्को द गामा चार जहाजांसह पोर्तुगालमधील लिस्बनहून निघाला. प्रवासात आलेल्या अनेक संकटांवर मात करत तो २२ नोव्हेंबरला केप ऑफ गुड होपला पोहोचला. तेथून आफिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील अनेक ठिकाणी गेला. मालिंदी ( सांप्रत केन्या ) येथून त्याने हिंदी महासागरातून जाण्यासाठी एका अरब मार्गनिर्देशकाला बरोबर घेतले. २० मे १४९८ रोजी वास्को द गामा भारताच्या केरळ राज्यातील कालिकत बंदरात पोहोचला. अशा प्रकारे त्याने आशियाकडे येण्याचा सागरी मार्ग शोधून काढला.
कोलंबस १४९३, १४९८ व १५०२ मध्ये अटलांटिक पार करून पुन्हा पश्चिमेकडे गेला. त्याने सांप्रतच्या जमेका, प्वेर्त रीको, त्रिनिदाद या बेटांचे तसेच पनामा व व्हेनेझुएलाच्या किनाऱ्यांचे समन्वेषण केले.
इ. स. १५०० मध्ये पोर्तुगीज समन्वेषक पेद्रो अल्व्हारेस काबाल आपल्या सफरीत बाझीलच्या किनाऱ्यावर आला होता. आफिकेला थोड्या दुरून वळसा घालून भारताकडे जाण्याचा त्याचा प्रयत्न होता परंतु तो दक्षिण अमेरिकेला जाऊन पोहोचला. त्यानंतर तो आफिकेला वळसा घालूनभारतापर्यंत आला होता. आमेरीगो व्हेस्पूची या इटालियन समन्वेषकाने दक्षिण अमेरिकेच्या तीन सफरी केल्या. त्यांपैकी १४९९-१५०० मधील सफर स्पॅनिश समन्वेषक ऑलोन्सो दे ओखेदा याच्याबरोबर, तर १५०१-०२ व १५०३-०४ या दोन सफरी पोर्तुगीज कप्तान गाँथालो कूएल्यू याच्याबरोबर केल्या. आमेरीगोनेच नव्या जगाचा शोध लावल्याच्या समजुतीमुळे त्याच्या नावावरूनच या खंडाला अमेरिका असे नाव देण्यात आले.
इटालियन समन्वेषक जॉन कॅबट याने कोलंबसपेक्षाही जवळच्या मार्गाने इंडीज बेटांकडे आपण जाऊ शकू असे इंग्लंडचा राजा सातवा हेन्री याला पटवून दिले. त्यानुसार मे १४९७ मध्ये कॅबट इंग्लंडमधील बिस्टल येथून निघून सरळ पश्र्चिमेकडे अटलांटिक पार करून गेला. कोलंबसच्या मार्गाच्या बरेच उत्तरेला तो गेला. साधारण महिन्यानंतर तो सांप्रत न्यू फाऊंडलंड किंवा कॅनडाच्या केप बेटन बेटावर गेला असावा. साधारण १५०८ मध्ये इंग्लंडच्या राजाने कॅबटचा मुलगा सेबॅस्टियन याला समन्वेषणासाठी उत्तर अमेरिकेकडे पाठविले. त्याच्या समन्वेषणामुळे उत्तर अमेरिकेच्या किनारी भागाची बरीच माहिती इंग्लंडला मिळाली.
स्पॅनिश समन्वेषक व्हास्को नून्येथ बॅल्बोआ याने १५१३ मध्ये एक सफर केली. या सफरीत त्याने सांप्रत पनामा देशाच्या अटलांटिक किनाऱ्यापासून पॅसिफिक किनाऱ्यापर्यंतचा प्रवास केला. पॅसिफिकचा पूर्व किनारा पाहणारा हा पहिला यूरोपीय ठरला. या शोधामुळे असे आढळले की हे नवे जग म्हणजे एक फार मोठे भूखंड असून त्याचा विस्तार यूरोप व आशिया यांच्या दरम्यान आहे.
बॅल्बोआच्या सफरीदरम्यानच काही समन्वेषक दक्षिण अमेरिकेला वळसा घालून आशियाकडे जाता येईल का याचा शोध घेत होते. पोर्तुगीज समन्वेषक फर्डिनंड मॅगेलन याला असा मार्ग सापडण्याची आशा वाटत होती. पोर्तुगालच्या राजाने मॅगेलनची ही कल्पना फेटाळली. स्पेनचा राजा चार्ल्स पहिला हा मात्र मॅगेलनच्या कल्पनेशी सहमत झाला. त्याने १५१८ मध्ये मॅगेलनला प्रवासासाठीची आवश्यक ती सर्व तरतूद केली. त्यानुसार २० सप्टेंबर १५१९ रोजी पाच जहाजे व सु. दोनशे खलाशांसह मॅगेलन स्पेनहून निघाला. बाझीलच्या ईशान्य किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर किनाऱ्याकिनाऱ्याने तो दक्षिणेकडे निघाला. मार्च १५२० मध्ये सांप्रत अर्जेंटिनातील सेंट ज्यूलियन येथे आला. हिवाळा तेथेच घालविल्यानंतर १८ ऑक्टोबरला पुन्हा दक्षिणेकडे निघाला. तीनच दिवसांत तो अमेरिकेच्या दक्षिण टोकाजवळच्या सामुद्रधुनीत (सांप्रत मॅगेलन सामुद्रधुनी) पोहोचला. त्याच्या पाच जहाजांपैकी एक जहाज वादळात सापडले, एक स्पेनला परत आले तर तीन जहाजे सामुद्रधुनी पार करून पॅसिफिक महासागरात आली. मार्च १५२१ मध्ये मॅगेलन सांप्रत ग्वॉम येथे पोहोचला. त्यानंतर तो फिलिपीन्स बेटांवर आला. २७ एप्रिल १५२१ रोजी तेथील स्थानिक लोकांबरोबर झालेल्या भांडणात तो मारला गेला. त्यानंतर बाकीचे खलाशी लेफ्टनंट जॉन सेबॅस्टियन डेल कानो याच्या नेतृत्वाखाली दोन जहाजांमधून इंडोनेशियातील स्पाइस बेटावर आले. शेवटी उरलेल्या एका जहाजातून पश्चिमेकडे हिंदी महासागर ओलांडून केप ऑफ गुड होपला वळसा घालून उर्वरित १८ खलाशी ६ सप्टेंबर १५२२ रोजी स्पेनला पोहोचले. या सफरीमध्ये त्यांनी सु. तीन वर्षांत ८०,००० किमी. पेक्षाही अधिक प्रवास केला. जगाला वळसा घालता येतो हे या सफरीने दाखवून दिले.
पंधराव्या शतकाच्या सुरूवातीस स्पॅनिश समन्वेषक मोठय संख्येने मध्य व दक्षिण अमेरिकेकडे जाऊ लागले. त्यानंतर या प्रदेशाकडे लष्कर आणि वसाहतकरी पाठविण्याची लाट आली. स्पेनची या नव्या जगाकडील महत्त्वपूर्ण सफर १५१९ मध्ये सुरू झाली. यावर्षी एर्नांदो कोर्तेझ याच्या नेतृत्वाखाली ६०० स्पॅनिश सैनिकांची तुकडी क्यूबावरून मेक्सिकोच्या पूर्व किनाऱ्यावर पाठविण्यात आली. तेथील अंतर्गत भागातील ॲझटेक इंडियनांचा प्रदेश ताब्यात घेतल्यानंतर स्पॅनिशांनी मध्य अमेरिकेवर आपली सत्ता प्रस्थापित केली. स्पॅनिश समन्वेषक फ्रांथीस्को पिझारो याने १५३३ मध्ये सांप्रत पेरूमधील इंका इंडियनांचे सामाज्य जिंकून घेतले. १५३५ ते १५३७ या काळात पिझारोचा सहकारी द्येगो दे आल्मागो याने पश्चिम बोलिव्हियाचे समन्वेषण केले. तसेच अँडीज पर्वत पार करून तो चिलीमध्ये गेला. १५५३ पर्यंत स्पॅनिश समन्वेषकांनी दक्षिणेस मॅगेलन सामुद्रधुनीपर्यंत प्रवास केला. पंधराव्या शतकातच स्पॅनिशांनी सांप्रत संयुक्त संस्थानांच्या दक्षिण भागाचे समन्वेषण केले. जॉन पाँसे दे लेआँ हा समन्वेषक १५१३ मध्ये प्वेर्त रीकोपासून निघून फ्लॉरिडाच्या किनाऱ्यावर पोहोचला. १५३९ मध्ये हेर्नांदो दे सोटो याच्या नेतृत्वाखालील ६०० जणांच्या स्पॅनिश लष्करी तुकडीने क्यूबापासून फ्लॉरिडाच्या पश्र्चिम किनाऱ्यापर्यंत प्रवास केला. सोन्याच्या शोधार्थ या तुकडीने सांप्रत जॉर्जिया, दक्षिण कॅरोलायना, उत्तर कॅरोलायना, टेनेसी, ॲलाबॅमा मिसिसिपी, आर्कॅन्सॉ व लुइझिॲनामधून प्रवास केला. त्यांना सोन्याचा शोध लागला नाही परंतु मिसिसिपी नदीपर्यंत जाणारे ते पहिले यूरोपीय ठरले. १५४० मध्ये स्पॅनिश लष्कराने मेक्सिको सोडले आणि ‘ सेव्हन सिटीज ऑफ सेबोला ’ चा शोध घेण्यासाठी उत्तरेकडे निघाले. ही सात शहरे सोने, रत्ने व चांदी यांसाठी प्रसिद्ध असल्याचे इंडियनांकडून ऐकले होते. फ्रान्सिस्को व्हास्केस दे कोरोनादो याच्या नेतृत्वाखालील या सफरीने सांप्रत ॲरिझोना, न्यू मेक्सिको, टेक्सस, ओक्लाहोमा व कॅनझस राज्यांतून प्रवास केला. अमेरिकेच्या नैऋत्य भागाचे त्यांनी नकाशेही तयार केले परंतु त्यांना सेव्हन सिटीज सापडल्या नाहीत.
दक्षिण अमेरिकेला वळसा घालून आशियाकडे जाणारा मॅगेलनचा मार्ग यूरोपीय व्यापाऱ्यांना खूपच लांबचा वाटत होता. उत्तर अमेरिकेच्या उत्तरेकडील वायव्य पॅसेज ( चिंचोळा मार्ग ) किंवा यूरोपच्या उत्तरेकडील ईशान्य पॅसेज हे जवळचे असू शकतील असा, विशेषत: फ्रान्स व इंग्लंडमधील समन्वेषकांचा, अंदाज होता. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्नही चालू होते. १५२४ मध्ये फान्सचा राजा फान्सिस पहिला याने वायव्य पॅसेजचा शोध घेण्यासाठी इटालियन मार्गनिर्देशक जोव्हानी दा व्हेराझानो याच्या नेतृत्वाखाली एक सफर अमेरिकेला पाठविली. त्याला वायव्य पॅसेज सापडू शकला नाही परंतु त्याने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याचे बरेच समन्वेषण केले. १५३५ मध्ये फेंच समन्वेषक झाक कार्त्येअर याने सेंट लॉरेन्स नदीमधून माँट्रिऑलपर्यंतचे समन्वेषण केले. वायव्य पॅसेजचा शोध घेण्याच्या या प्रयत्नाचा फायदा फ्रेंचांना अमेरिकेत आपल्या साम्राज्य विकासासाठी झाला. अनेक बिटिश समन्वेषकांनी १५७० व १५८० च्या दशकात वायव्य पॅसेजचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मार्टिन फोबिशरने लॅबॅडॉरच्या उत्तरेकडून वायव्य पॅसेजचा शोध घेण्याचे तीन वेळा प्रयत्न केले. सर फान्सिस ड्नेक याने वायव्य पॅसेजची पश्चिम बाजू खुली आहे का याचा शोध घेण्यासाठी दक्षिण अमेरिकेला वळसा घालून जाणाऱ्या मॅगेलनच्या मार्गाने जाऊन उत्तर अमेरिकेच्या पॅसिफिक किनाऱ्याचे समन्वेषण केले. जॉन डेव्हिसने गीनलंडच्या पश्चिम किनाऱ्यावरून सफर करून वायव्य पॅसेजचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रिचर्ड चान्सलर, चार्ल्स जॅकमन, आर्थर पेट यांसारख्या अनेक बिटिश मार्गनिर्देशक व समन्वेषकांनी पंधराव्या शतकात वायव्य पॅसेजच्या शोधाचे प्रयत्न केले. डच मार्गनिर्देशक व्हिलेम बॅरेंट्स याने तीन वेळा असा प्रयत्न केला.
सोळाव्या शतकात इंग्लंड व फान्सच्या समन्वेषकांनी उत्तर अमेरिकेचे समन्वेषण केले. सतराव्या व अठराव्या शतकांत यूरोपीय समन्वेषक हळूहळू जगाच्या इतर अज्ञात प्रदेशांकडे वळले त्यांनी पॅसिफिकचे नकाशे तयार केले, आफिका व ऑस्ट्रेलियाच्या अंतर्गत प्रदेशाचा प्रवास केला आणि आर्क्टिक, अंटार्क्टिकाच्या सीमेपर्यंत जाऊन पोहोचले. एकोणिसाव्या शतकात तर उत्तर व दक्षिण धुवावर जाण्यासाठी त्यांच्यात स्पर्धाच निर्माण झाली. फ्रेंच फर व्यापाऱ्यांनी उत्तर अमेरिकेच्या समन्वेषणात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली व इंडियनांशी व्यापार वाढवीत असताना त्यांनी त्या भूमीविषयी बरीच माहिती मिळविली. १६०३ मध्ये फ्रेच समन्वेषक साम्यूएल द शांप्लँने झाक कार्त्येअरच्या सेंट लॉरेन्स ते माँटि्नऑलपर्यंतच्या मार्गाने प्रवास केला. त्यावेळी त्याला पश्र्चिमेकडे बऱ्याच दूरवर जलाशयाचे भाग असल्याची माहिती इंडियनांकडून मिळाली. या माहितीमुळे वायव्य पॅसेज सापडण्याची त्याला आशा वाटू लागली. १६०८ मध्ये त्याने फर व्यापाराचे ठाणे म्हणून क्वीबेक शहराची स्थापना केली. त्यानंतरची २७ वर्षे त्याने क्वीबेकच्या पश्चिमेकडील तसेच दक्षिणेकडील नदया व सरोवरांच्या समन्वेषणात घालविली. बिटिश समन्वेषक हेन्री हडसन १६१० मध्ये कॅनडाच्या पूर्वेकडील सांप्रत हडसन सामुद्रधुनीतून एका मोठया जलाशयात गेला. त्याला वाटले आपण पॅसिफिकमध्येच आलो आहोत. प्रत्यक्षात तो एक उपसागर होता. त्यानंतर तो दक्षिणेकडे जेम्स उपसागरात आला. हिवाळा असल्याने त्याचे जहाज तेथेच अडकले. कमालीची थंडी आणि खाद्यपदार्थांचा तुटवडा अशा पेचात तो सापडला. थंडी कमी झाल्यावर बर्फ वितळू लागले तेव्हा त्याच्याबरोबरील बहुतेक खलाशी त्याला सोडून इंग्लंडला परतले. हडसनबद्दल मात्र पुढे काही समजले नाही.
सतराव्या शतकात फ्रेच व इंग्रज समन्वेषक उत्तर अमेरिकेच्या भूमीवरून पश्चिमेस गेले. त्यांनी या खंडाची उत्तर सीमाही शोधून काढली. फेंच कॅनडियन फर व्यापारी पीअरी गोत्ये दे व्हारेनेस, स्यूर दे ला व्हेरांद्रे व त्याच्या तीन मुलांनी मिळून अमेरिकेतील पश्र्चिमेस सस्कॅचेवनपर्यंतच्या भूप्रदेशाचे समन्वेषण केले. त्यातील दोन मुलांनी दक्षिणेस सांप्रत डकोटामधील मिसूरी नदीपर्यंत प्रवास केला. व्हेरांद्रे हे रॉकी पर्वतापर्यंत पोहोचणारे पहिले यूरोपीय ठरले. १७७१ मध्ये इंगज समन्वेषक सॅम्युएल हार्नेई याने उत्तर अमेरिकेचा विस्तार आर्क्टिकपर्यंत असल्याचे दाखवून दिले. त्याने हडसन उपसागर व कॅनडाच्या वायव्य भागातून वाहणारी कॉपरमाइन नदी यांदरम्यानच्या भूप्रदेशाचे समन्वेषण केले. फरचा व्यापार करणाऱ्या नॉर्थ वेस्ट कंपनीचा मध्यस्थ सर अलेक्झांडर माकेंझी याने १७८९ मध्ये मॅकेंझी नदीचे समन्वेषण केले. त्याने मॅकेंझी नदीच्या गेट स्लेव्ह सरोवरापासून आर्क्टिक महासागरापर्यंतच्या प्रवासाचा मागोवा घेतला. त्यानेच १७९२-१७९३ मध्ये पीस नदीच्या समन्वेषणासाठी सफर काढली. ॲल्बर्टापासून उगमाकडे रॉकी पर्वतापर्यंत त्याने पीस नदीप्रवाहाचा मागोवा घेतला. त्यानंतर तो रॉकी पर्वताच्या पश्र्चिमेस असलेल्या फेझर नदीमार्गाने १६० किमी. अंत रगेला. नंतर जमिनीवरून पॅसिफिक महासागर किनाऱ्यापर्यंत प्रवास केला. माकेंझीने आपल्या सफरीतून दाखवून दिले की, संपूर्ण उत्तर अमेरिका खंडातून जाणारा असा कोणताही जलमार्ग अस्तित्वात नाही. मेरिवेदर ल्यूइस व विल्यम क्लार्क या दोन अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांनी १८०४-०५ मध्ये वायव्येकडे पॅसिफिक महासागरापर्यंतची एक महत्त्वपूर्ण सफर केली. मे १८०४ मध्ये सेंट लूइस येथून मिसूरी नदीमार्गाने तिच्या उगमाकडे ते बोटीने निघाले. बोटी कधी वल्हवून तर कधी घोडे किंवा माणसांनी ओढून न्याव्या लागल्या. नदीमार्गाने रॉकी पर्वतापर्यंत पोहोचल्यानंतर पुढे महिनाभरात त्यांनी रॉकी पर्वतही ओलांडला. पर्वत ओलांडल्यानंतर कोलंबिया नदीमार्गाने ते नोव्हेंबर १८०५ मध्ये पॅसिफिकपर्यंत पोहोचले.
सोळाव्या शतकात अनेक यूरोपीय मार्गनिर्देशक अटलांटिक महासागर ओलांडून अमेरिकेकडे गेले परंतु पॅसिफिक महासागर त्यांच्या दृष्टीने अपरिचितच राहिला होता. डच मार्गनिर्देशक विल्यम जान्झ हा पहिला यूरोपीय ऑस्ट्रेलियापर्यंत गेला (१६०६). त्याने इंडोनेशिया येथून निघून ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावरील कार्पेंटेरिया आखाताचे समन्वेषण केले. डच खलाशी टास्मान हा टास्मानिया व न्यूझीलंडपर्यंत जाणारा पहिला यूरोपीय होता (१६४२). जेम्स कुक या बिटिश नौदलातील कप्तानाने १७६० व १७७० च्या दशकात पॅसिफिकच्या तीन सफरी काढल्या. त्यामुळेच तो पॅसिफिकचा थोर समन्वेषक ठरला. ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेस एक खंड असावे असा भूगोलज्ञांचा कयास होता. कुक त्या खंडाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत होता. त्याने १७६८ ते १७७१ मधील पहिल्या प्रवासात न्यूझीलंड तसेच तत्कालिन यूरोपियनांना ज्ञात नसलेल्या दक्षिण पॅसिफिकमधील अनेक बेटांना भेटी दिल्या. १७७२ ते १७७५ मधील दुसऱ्या सफरीत त्यावेळेपर्यंत कोणतीही यूरोपीय व्यक्ती गेली नव्हती, इतक्या दक्षिणेस तो गेला होता. या सफरीत त्याने अंटार्क्टिकाजवळच्या गोठलेल्या सागरी प्रदेशातून, दाट धुक्यात दडलेल्या उंच हिमगिरींतून मार्ग काढत प्रवास केला. बर्फाच्या जाड थरांमुळे अंटार्क्टिका पाहता येईल इतक्या जवळ त्याला जाता आले नाही. वायव्य पॅसेज पश्र्चिमेच्या बाजूने खुला आहे का हे शोधण्यासाठी १७७६ मध्ये कुक उत्तर अमेरिकेच्या वायव्य किनाऱ्याकडे गेला. या प्रवासात हवाई बेटांना भेट देणारा तो पहिला यूरोपीय होता. हवाई बेटांनंतर कॅनडाच्या पश्चिम किनाऱ्याने उत्तरेकडे जाऊन त्याने आर्क्टिक महासागरात प्रवेश केला. हिमाच्छादनामुळे पुढे जाता येईना म्हणून तो परत हवाई बेटांवर आला. तेथेच १७७९ मध्ये कुक मारला गेला.
अर्वाचीन : सतराव्या शतकाच्या अखेरपर्यंत आफ्रिकेच्या अंतर्गत भागातील गूढ जगाला कळले नव्हते. १७८८ मध्ये आफिका खंडाच्या समन्वेषणासाठी बिटिश गटाने ‘ आफिकन असोसिएशन ’ संघाची स्थापना केली. ब्रिटिश समन्वेषक मंगो पार्क याने १७९५ ते १८०६ या काळात या संघासाठी आणि बिटिश शासनासाठी नायजर नदीमार्गाने मुखाच्या दिशेने सफर केली. अठराव्या शतकात यूरोपियनांचे आफिकेतील समन्वेषण अगदी शिगेला पोहोचले होते. ब्रिटिश समन्वेषक अलेक्झांडर गॉर्डन लाईंग हा सांप्रत मालीमधील तिंबक्तू या व्यापारी केंद्रावर पोहचणारा पहिला यूरोपीय होता. फ्रेंच समन्वेषक रेने केली याने १८२८ मध्ये तिंबक्तूला भेट दिली आणि तो सहारा प्रदेश ओलांडून पुढे उत्तरेकडे गेला.
श्वेत नाईल या नाईल नदीच्या दक्षिणेकडील उपनदीच्या उगमस्थानाचा शोध घेण्यासाठी यूरोपीय समन्वेषकांनी पूर्व आफ्रिकेचे समन्वेषण केले. इंग्रज समन्वेषक रिचर्ड बर्टन आणि जॉन हॅनिंग स्पीक हे समन्वेषक १८५८ मध्ये सांप्रत झाईरे व टांझानिया यांदरम्यान असलेल्या टांगानिका सरोवरापर्यंत पोहोचले. स्पीक तसाच पुढे जवळजवळ व्हिक्टोरिया सरोवरापर्यंत पोहोचला. १८६१ ते १८६३ या काळात त्याने पुन्हा व्हिक्टोरिया सरोवराचे समन्वेषण करून हे सरोवरच श्वेत नाईलचे उगमस्थान असल्याचे दाखवून दिले. स्कॉटिश धर्मप्रचारक ( मिशनरी ) डेव्हिड लिव्हिंग्स्टन याला आफिकेचा प्रसिद्घ समन्वेषक म्हणून ओळखले जाते. १८४१ ते १८५६ या कालावधीत तो आफिकेच्या दक्षिण व नैऋर्त्य भागाचा प्रवास करून लूअँडाला ( सांप्रत अंगोला ) आला. त्यानंतर त्याने आफिकेच्या पूर्वेकडील प्रदेशाचा प्रवास करून झँबीझी नदीचा शोध लावला व १८५८ ते १८६३ या काळात आग्नेय आफिकेचे समन्वेषण करून टांझानियातील न्यासा सरोवरापर्यंत आला. १८६६ पासून मुत्यूपर्यंत (१८७३) त्याने पूर्वमध्य आफिकेचा प्रवास केला. लिव्हिंग्स्टनबाबत बरीच वर्षे काहीच समजले नाही. त्यामुळे न्यूयॉर्क हॅरॉल्ड चा वार्ताहर हेन्री मॉर्टन स्टॅन्ली १८६९ मध्ये लिव्हिंग्स्टनला शोधण्यासाठी आफिकेला गेला. १८७१ मध्ये टांगानिका सरोवराजवळ स्टॅन्लीला लिव्हिंग्स्टन सापडल्याचे मानले जाते. १८७४ ते १८७७ या काळात स्टॅन्लीने मुख्यतः मध्य आफिकेपासून काँगो नदीमार्गाने तिच्या मुखापर्यंतचा प्रवास केला. या सफरीत तो ९,७०० किमी.पेक्षा अधिक अंतर फिरला.
ऑस्ट्रेलिया खंडाच्या अंतर्गत भागातील समन्वेषणास अठराव्या शतकाच्या सुरूवातीस प्रारंभ झाला. या खंडातील पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या वाळवंटी प्रदेशातून प्रवास करणे अतिशय धोकादायक होते. अठराव्या शतकाच्या मध्यात स्कॉटलंडचा समन्वेषक जॉन मॅकडॉल स्टुअर्ट आणि इंगज समन्वेषक चार्लस् स्टर्ट यांनी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरून बराचसा प्रवास केला. इंगज समन्वेषक एडवर्ड जॉन इअरी हा ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरून पूर्व-पश्चिम प्रवास करणारा पहिला यूरोपीय ठरला. त्याची १८४० व १८४१ मधील सफर प्रामुख्याने ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनाऱ्याच्या जवळून होती. जन्माने बिटिश असलेला हॅमिल्टन ह्यूम व जन्माने ऑस्ट्रेलियन असलेल्या विल्यम हाव्हेल या दोघा समन्वेषकांनी ऑस्ट्रेलियातील सर्वांत जुन्या वसाहतींपैकी असलेल्या सिडनी ते मेलबर्न दरम्यानचा मार्ग दाखवून दिला. आयरिश समन्वेषक रॉबर्ट ओहारा बर्क व इंगज समन्वेषक विल्यम जॉन विल्स हे ऑस्ट्रेलियातून दक्षिण-उत्तर प्रवास करणारे पहिले यूरोपीय होते. चार जणांचा हा समन्वेषक गट १८६० मध्ये आग्नेय टोकाशी असलेल्या मेलबर्न येथून निघाला. १८६१ मध्ये ते उत्तर किनाऱ्यावर असलेल्या कार्पेन्टॅरिया आखातात पोहोचले. मात्र परतीच्या प्रवासात उपासमारीमुळे ते मृत्युमुखी पडले.
अठराव्या शतकाच्या सुरूवातीच्या काळापर्यंत जगाच्या दृष्टीने अज्ञात असलेले अंटार्क्टिका हे एकमेव खंड होते. संयुक्त संस्थानांतील नाथान्येल बी. पामर आणि इंग्लंडमधील एडवर्ड बॅन्सफील्ड या सील माशांची शिकार करणाऱ्या दोन व्यक्तींनी १८२० मध्ये अंटार्क्टिक द्वीपकल्प म्हणून ओळखला जाणारा भूभाग वेगवेगळ्या वेळी पाहिला होता. १८४० मध्ये लेफ्टनंट चार्ल्स विल्क्स याच्या नेतृत्वाखालील संयुक्त संस्थानच्या नौदल सफरीने अंटार्क्टिकाच्या किनाऱ्याने २,४०० किमी.पेक्षा अधिक अंतराचा प्रवास केला. हिमाच्छादित असलेला हा विस्तृत प्रदेश म्हणजे खंडच असावे असे पटवून देण्याइतपत त्याने हा भूप्रदेश पाहिला होता. १९११ मध्ये समन्वेषकांचे दोन गट दक्षिण धुवावर पोहोचण्याच्या चढाओढीने अंटार्क्टिका खंडाकडे गेले. त्यांपैकी एका गटाचे नेतृत्व रोआल आमुनसेन या नॉर्वेजियन समन्वेषकाने केले, तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व बिटिश नौदलातील कॅप्टन रॉबर्ट फाल्कन याने केले. कुत्र्यांच्या ‘ स्लेज ’ गाडीवरून जाण्याच्या कौशल्यामुळे आमुनसेनला १४ डिसेंबर १९११ रोजी दक्षिण धुवापर्यंत पोहोचणे शक्य झाले. त्यानंतर पाच आठवडयंनी चार सहकाऱ्यांसह स्कॉट दक्षिण धुवावर पोहोचला परंतु परतीच्या प्रवासात थंडीने गारठून त्याचा मृत्यू झाला.
उत्तर धुवीय ( आर्क्टिक ) प्रदेशाचे सखोल समन्वेषण १८४० च्या दशकात सुरू झाले. बिटिश समन्वेषक सर जॉन फँक्लिन याच्या नेतृत्वाखाली गेलेली १३० जणांची सफर उत्तर धुवीय प्रदेशात नाहीशी झाली. त्यानंतर या प्रदेशाच्या समन्वेषणासाठी मोहिमा वाढल्या. वायव्य पॅसेजच्या शोधासाठी हा गट कॅनडाच्या मुख्य भूमीच्या उत्तरेकडून, बेटांदरम्यान असलेला नागमोडी मार्गाने गेला होता. अनेक समन्वेषक गटांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना त्यात यश आले नाही. बिटिश समन्वेषक रॉबर्ट मॅक्क्लूअर याने वायव्य पॅसेजच्या शोधासाठीची आपली पहिली सफर १८५० ते १८५४ या काळात काढली. त्याच्या गटाने अखेरच्या टप्प्यातील प्रवास स्लेज गाडीने केला. १९०३ ते १९०६ या काळात रोआल आमुनसेन वायव्य पॅसेजच्या शोधार्थ आपला संपूर्ण प्रवास बेटांदरम्यानच्या गोंधळात टाकणाऱ्या नागमोडी मार्गाने करून पॅसिफिक महासागरात पोहोचला. अशा प्रकारे वायव्य पॅसेजमधून पहिल्यांदा मार्गनिर्देशन करण्याचे श्रेय त्याला मिळाले. तत्पूर्वी चारशे वर्षे वेगवेगळे समन्वेषक वायव्य पॅसेज शोधण्याचा प्रयत्न करीत होते, ते सिद्घीस नेण्याचे काम त्याने केले. उत्तर धुवावर पोहोचण्यासाठीही शेकडो प्रयत्न झाले होते. अमेरिकन समन्वेषक रॉबर्ट ई. पीअरी याच्या नेतृत्वाखाली गेलेल्या सफरीने ६ एप्रिल १९०९ रोजी उत्तर धुवावर पोहोचण्याचा मान मिळविला. उत्तर धुवावर जाताना पीअरीबरोबर मॅथ्यू हेन्सन व चार एस्किमो होते. पीअरी सफरीवरून परतण्याच्या आधीच एक आठवडा अमेरिकन समन्वेषक फेडरिक ए. कुक याने असा दावा केला की, आपण एक वर्ष आधीच म्हणजे एप्रिल १९०८ मध्ये उत्तर धुवावर पोहोचलो होतो परंतु त्याचा हा दावा विश्र्वासार्ह मानला जात नाही.
आर्क्टिक व अंटार्क्टिक प्रदेशांचे समन्वेषण ⇨ विमाना च्या शोधामुळे कमी धोक्याचे बनले. रिचर्ड ई. बर्ड आणि फ्लॉइड बेनेट हे दोन अमेरिकन समन्वेषक १९२६ मध्ये विमानाने सरळ उत्तर धुवावरच गेले. तसेच १९२९ मध्ये बर्ड आणि नॉर्वेजियन-अमेरिकन वैमानिक बर्न्ट बालचेन हे दोघे विमानाने दक्षिण धुवावर गेले. संपूर्ण अंटार्क्टिकाची भूमी पार करणारी पहिली सफर १९५७ व १९५८ मध्ये करण्यात आली. शास्त्रीय अभ्यासासाठी गेलेल्या या तुकडीचे नेतृत्व बिटिश भूगर्भशास्त्रज्ञ सर व्हिव्हिअन ई. फ्यूचस याने केले. या तुकडीने बर्फावरून चालणाऱ्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने अंटार्क्टिकाच्या बर्फाच्छादित भूमीवरून ९९ दिवसांत ३,४७३ किमी.चा प्रवास केला. १९५८ मध्ये अमेरिकेची नॉटिल्स ही अणुशक्तीवरील पाणबुडी आर्क्टिक हिमक्षेत्राच्या खालून उत्तर धुवापर्यंत जाऊन आली.
प्राचीन काळापासून पृथ्वीच्या अज्ञात प्रदेशांकडे समन्वेषक नेहमीच आकर्षिले गेले आहेत. आजही महासागरांचे तळ आणि बाह्य अंतराळ या आधुनिक अज्ञात सरहद्द प्रदेशांच्या समन्वेषणाचे प्रयत्न धाडसी स्त्री- पुरूषांकडून करण्यात येत आहेत. महासागरांचे तळ व सागरी जीव यांच्या समन्वेषणासाठी पहिली सफर १८७२ मध्ये आखण्यात आली. जगातील खोल सागरांची माहिती गोळा करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या चॅलेंजर या जहाजावरील अत्याधुनिक यंत्रसामगी बसविण्याच्या कामात रॉयल सोसायटी ऑफ लंडन व बिटिश सायंटिफिक असोसिएशन या संस्थांनी मदत केली होती. स्कॉटिश निसर्ग वैज्ञानिक चार्ल्स व्हीव्हील थॉम्सन याने या सफरीचे नेतृत्व केले होते. चॅलेंजरने सागरी प्रदेशात तीन वर्षांपेक्षा अधिक काळ घालवून सु. १,१०,००० किमी.चा प्रवास केला. महासागरविज्ञान विकासाच्या दृष्टीने ही सफर विशेष महत्त्वपूर्ण ठरली. एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात नॉर्वेजियन समन्वेषक फित्यॉफ नान्सेन याने समुद्रातील कोणत्याही खोलीवरील पाण्याचे नमुने घेऊन त्याचे तापमान मोजणारी उपकरणे विकसित केली. १९३४ मध्ये अमेरिकन निसर्गवैज्ञानिक विल्यम बीब बर्म्यूडाजवळच्या खोल सागरी भागात गभीर-गोलातून ( समुद्रातून खाली खोल जाता यावे म्हणून तयार केलेला धातूचा मोठा पोकळ गोल ) ९३३ मी. खोलीपर्यंत गेला होता. १९४० च्या दशकात स्वीस भौतिकीविज्ञ ऑगस्टी पीकार याने महासागर समन्वेषणात फार महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यानेच गभीर-गोलाचा शोध लावला. त्या काळातील इतर कोणत्याही गलबतापेक्षा गभीर-गोल अधिक खोल जाऊ शकत होता. १९६० मध्ये पीकारचा मुलगा झाक पीकार आणि अमेरिकन नौदलातील लेफ्टनंट डॉन वॉल्श यांनी ‘ट्रिएस्ट’ या गभीरतामापक पाणबुडी ( बॅथिस्कॅफ ) मधून पॅसिफिकमधील मेअरिॲना खंदकात १०,९१७ मी. खोलीपर्यंत जाण्याचा जागतिक विक्रम केला. तेथून या खंदकाचा तळ अवघ्या १२० मी. खोलीवर होता.
वेगवेगळ्या समन्वेषकांनी १९७० च्या दशकात असे गंभीर-गोल इतर अनेक ठिकाणी नेऊन खोल सागरी भागातील आश्चर्यकारक माहिती समोर आणली. भूभागावर ज्याप्रमाणे पर्वत, मैदाने, दृया ही भूमिस्वरूपे आढळतात तशीच ती सागरी भागातही असल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आले. महासागर वैज्ञानिकांनी अद्याप माहीत नसलेले अनेक जातीचे मासे आणि इतर सागरी जीवांचा शोध लावला. आज अनेक समन्वेषक सागरतळावर खनिजतेल, नैसर्गिक वायू यांसारख्या महत्त्वाच्या खनिज द्रव्यांचा शोध घेत आहेत. काहीजण अन्न म्हणून उपयुक्त ठरतील अशा सागरी वनस्पती व प्राण्यांचा शोध घेत आहेत, तर काही जणांना या समन्वेषणातून पृथ्वीच्या निर्मितीविषयी काही महत्त्वपूर्ण धागेदोरे हाती लागण्याची आशा वाटत आहे.
अवकाश समन्वेषण : मानवासहित किंवा मानवविरहित अवकाशयानातून पृथ्वीच्या वातावरणापलीकडच्या वैश्र्विक मर्यादांचा शोध घेणे म्हणजेच अवकाश समन्वेषण होय. एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीपासून अंतराळ समन्वेषणाबाबत तज्ञांचे संशोधन चालू होते. विसाव्या शतकाच्या सुरूवातीस अवकाश उडडाणासाठी रॉकेटचा ( अग्निबाण ) वापर करण्याबाबत शास्त्रशुद्ध अभ्यास चालू होता. याकामी रशियन भौतिकशास्त्र अध्यापक कॉन्स्टँटिन इ. त्सिओल्कोव्हस्की (१९०३), अमेरिकन भौतिकीविज्ञ रॉबर्ट एच्. गॉडर्ड (१९१९) व जर्मन भौतिकिविज्ञ हेर्मान ओबेर्थ (१९२३) यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. १९३० च्या दशकाच्या सुरूवातीस रॉकेट परिचालनाबाबत जर्मनीचे विशेष संशोधन चालू होते. त्यातूनच त्यांनी व्ही-२ या शक्तीशाली क्षेपणास्त्रांचा विकास केला. अंतराळ समन्वेषणासाठी पहिल्यांदा वापरण्यात आलेले रॉकेट प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्घकाळात विकसित करण्यात आले होते. त्यानंतर संयुक्त संस्थाने व सोव्हिएट युनियन यांनी महायुद्धातील जर्मन बंदिवान तंत्रज्ञांच्या मदतीने अधिक उंचीचा पल्ला गाठणाऱ्या रॉकेट निर्मिती तंत्रज्ञानात महत्त्वपूर्ण प्रगती केली. या दोन्ही देशांनी रॉकेटच्या साहाय्याने सोडता येणारी आंतरखंडीय क्षेपणास्त्रे विकसित केली. त्यानंतर शक्तीशाली रॉकेट निर्माण करण्यात येऊ लागली. विविध प्रकारचे कृत्रिम उपगह व अन्वेषक अवकाशयाने पृथ्वीभोवतीच्या तसेच सूर्य, चंद्र, बुध, शुक, मंगळ इत्यादींच्या कक्षांत सोडण्यासाठी रॉकेटांचा वापर करण्यात आलेला आहे.
सोव्हिएट युनियनने ४ ऑक्टोबर १९५७ रोजी स्पुटनिक-१ हा जगातील पहिला कृत्रिम उपगह पृथ्वीभोवती तिच्या कक्षेमध्ये सोडला. सोव्हिएट युनियनचे अवकाशातील यशस्वी पदार्पण ठरून अवकाशयुगाच्या एका नव्या पर्वाचा प्रारंभ झाला. त्यानंतर लगेचच ३१ जानेवारी १९५८ रोजी संयुक्त संस्थानांनी एक्स्प्लोअरर-१ हा आपला पहिला कृत्रिम उपगह पृथ्वीच्या कक्षेत सोडला. त्यानंतरची काही वर्षे या दोन्ही देशांनी शास्त्रीय अभ्यासासाठी, टेहळणीसाठी आणि संदेशवहनाच्या उद्देशाने स्पुटनिक, एक्स्प्लोअरर या मालिकेतील तसेच इतर अनेक कृत्रिम उपगह अवकाशात सोडले. इतर काही देशांनीही अवकाशीय अन्वेषणासाठी आपले कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडले. बहुतांश अवकाशीय समन्वेषण यांत्रिक व इलेक्ट्नॉनीय यंत्रमानवामार्फत ( रोबॉट ) करण्यात येई. विविध प्रकारची माहिती मिळविण्यासाठी यंत्रमानवयुक्त अवकाशयाने चंद्र, शुक, मंगळ व शनी इ. ग्रहांवर पाठविण्यात आली. यातूनच मानवाला सूर्यमाला व विश्र्वाबद्दलची अधिकाधिक माहिती मिळू लागली.
अवकाश समन्वेषणाचा दुसरा टप्पा म्हणजे मानवाने अवकाशात पाठविलेले मानवासहितचे अंतराळयान होय. याचाच भाग म्हणजे सोव्हिएट वायुसेना अधिकारी यूरी गागारिन याने अवकाशात घेतलेली पहिली भरारी. १२ एप्रिल १९६१ रोजी या अंतराळवीराने व्होस्टोक-१ या अवकाशयानातून पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा घालून जगातील पहिला अंतराळ-वीर म्हणून बहुमान मिळविला. त्यानंतर एक महिन्याच्या आतच म्हणजे ५ मे रोजी संयुक्त संस्थानांनी मर्क्युरी हे मानवासहितचे यान अवकाशात पाठविले. अमेरिकेचा पहिला अंतराळवीर ॲलन शेपर्ड याने या यानातून पृथ्वीभोवती तीन प्रदक्षिणा घातल्या. तद्नंतर सोव्हिएट युनियन व संयुक्त संस्थानांनी परिभमणकक्षा वाढविण्याचे प्रयत्न केले. १९६० च्या दशकाच्या मध्यात संयुक्त संस्थानांचे ‘ जेमिनी ’ व सोव्हिएट युनियनचे ‘ व्होकशोड ’ या मोहिमांमधून अधिकाधिक सुधारणा करीत दोन-तीन व्यक्ती अवकाशात पाठविण्यापर्यंत तसेच अंतराळात भमण कक्षेतील दोन अवकाशयाने विशिष्ट संकेतस्थळी एकमेकांना जोडणे व परत ती अलग करणे, एका यानातून दुसऱ्या यानात मनुष्य पाठविणे येथपर्यंत प्रगती केली. या अगदी प्रारंभीच्या काळापासूनच शास्त्रज्ञांच्या मनात अंतराळस्थानकाची कल्पना घोळू लागली आणि पुढील दहा वर्षांतच ही कल्पना प्रत्यक्षात साकारली.
संयुक्त संस्थानांतील सागरी जहाज चाचणी मार्गदर्शी जॉन एच्. लेन ज्युनि. याने २० फेबुवारी १९६२ रोजी फ्रेंडशिप-७ यानातून पृथ्वीच्या कक्षेत अंतराळात जाऊन पृथ्वीभोवती तीन प्रदक्षिणा घातल्या. १९६०च्या उर्वरित दशकात संयुक्त संस्थानांनी चंद्रावर उतरण्याच्या दृष्टीने अपोलो अवकाश कार्यकमाच्या मालिकाच राबविल्या. नील ए. आर्मस्ट्नाँग व एडविन इ. आल्ड्रिन, ज्युनि. या अमेरिकी अंतराळवीरांनी २० जुलै १९६९ रोजी अपोलो-११ मधून चंद्रावर पहिले मानवी पाऊल ठेवले. ‘ मनुष्याचे हे एक छोटे पाऊल संपूर्ण मानवजातीच्या दृष्टीने फार मोठी झेप आहे ’, असे उद्गार त्यावेळी नील आर्मस्ट्राँग याने काढले. त्यानंतरच्या तीन वर्षांत १२ अमेरिकन अंतराळवीरांनी चंद्राच्या पृष्ठभागाचे समन्वेषण केले. त्यांनी प्रयोगासाठी चंद्रावरील खडक व मातीचे नमुने गोळा केले. इतरही अनेक प्रयोग त्यांनी केले. अपोलोच्या माध्यमातून चंद्राची समन्वेषण मोहीम झाल्यानंतर संयुक्त संस्थानांनी वाहतुकीसाठी पुन्हा-पुन्हा वापरता येतील, अग्निबाणाप्रमाणे उड्डाण घेतील आणि विमानाप्रमाणे जमिनीवर उतरतील अशा बहुउद्देशीय अवकाश पुनर्वापर यानाच्या ( स्पेस शटलच्या ) निर्मितीव्रर विशेष लक्ष केंद्रित केले. संयुक्त संस्थानांनी १९८१ मध्ये पहिले क्षेपणयान ( launching vehicle ) अवकाशात पाठविले. याचा उपयोग उपगह प्रक्षेपणासाठी तसेच पृथ्वीच्या कक्षेत अवकाशयानाच्या दुरूस्तीसाठी अवकाशमंच ( space platform ) म्हणून अनेकदा करण्यात आला.
सोव्हिएट युनियनने १९७० व १९८० च्या दशकात सॅल्यूत ही अंतराळ स्थानकांची मालिकाच राबविली. त्यांपैकीच एका सॅल्यूतमधून भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा याने अवकाशातून भारताचे दर्शन घेतले. १९७३-७४ मध्ये अमेरिकेने स्कायलॅब नावाची प्रयोगशाळा अंतराळात स्थापन केली. स्कायलॅबच्या माध्यमातून अंतराळवीरांनी पृथ्वीवरील उपयुक्त साधनसामगी, वातावरण इ. विविध प्रकारची निरीक्षणे केली. दीर्घकाळ वजनविरहित परिस्थितीचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो याचाही अभ्यास केला. १९६० च्या दशकाच्या सुरूवातीस संयुक्त संस्थाने व सोव्हिएट युनियन यांनी सुरू केलेला अवकाश कार्यकम इतर देशांनीही उचलून धरला. त्यासाठी मानवविरहित याने वेगवेगळ्या गहांकडे पाठविण्यात आली. काही महत्त्वपूर्ण अवकाशीय अन्वेषक यानांचे कार्यकम सिद्घीस नेले गेले ते असे : सोव्हिएट युनियनने १९६० च्या दशकाच्या मध्यात व १९७० च्या दशकाच्या अखेरीस शुकाचे वातावरण व भूपृष्ठ यांच्या समन्वेषणासाठी पाठविलेले व्हेनेरा यान, संयुक्त संस्थानांनी १९७६ मध्ये मंगळावर उतरविलेले व्हायकिंग व १९७९ ते १९८९ या कालावधीत गुरू, शनि, युरेनस व नेपच्यून या ग्रहांकडे पाठविण्यात आलेली व्हॉयेजर ही अवकाशयाने. सोव्हिएट युनियनने मिर हा अंतराळस्थानक कार्यकम १९८६ ते २००० या काळात राबविला. १९९१ मधील सोव्हिएट युनियनच्या विसर्जनानंतर त्यांचा अवकाश कार्यकम मर्यादित प्रमाणात रशियाने पुढे नेला. सॅल्यूत व त्यानंतर मिर या अवकाश स्थानकांव्दारे खगोलशास्त्रविषयक, पृथ्वीच्या निरीक्षणाबाबत तसेच जैविक व भौतिकशास्त्रविषयक संशोधन करण्यात आले. १९८६ मध्ये यूरोपियन स्पेस एजन्सीचे ( इएस्ए ) जिओट्टो ह्या अवकाशयानाने हॅलीच्या धूमकेतूजवळ जाऊन त्याच्या केंद्रभागाची छायचित्रे घेतली. संयुक्त संस्थानांचे निअर अर्थ ॲस्टेरॉइड रॉनडिव्हूज ( एन्इएआर् ) हे अवकाशयान लघुगहांभोवती त्यांच्या कक्षेत वर्षभर फिरून २००१ मध्ये इरॉसवर उतरले. १९९५ च्या अखेरीस संयुक्त संस्थानांचे गॅलिलीओ हे अवकाशयान गुरू गहाच्या कक्षेत गेले. एकविसाव्या शतकाच्या सुरूवातीस या यानाने गुरू गहाचे तसेच त्याच्या चंद्राचे निरीक्षण केले. संयुक्त संस्थानांची हबल अवकाश दुर्बिण (१९९०), चांद्र एक्स-रे ऑब्झर्व्हेटरी (१९९९) व जपानची योहकोह सोलर ऑब्झर्व्हेटरी (१९९१) यांमार्फत अनेक अवकाश निरीक्षणे केली गेली.
मंगळावरील वातावरण, जमीन, जीवसृष्टीचे अस्तित्व इत्यादींबाबतचा शोध घेण्यासाठी अमेरिकेच्या नॅशनल एअरॉनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ( नासा )च्या समन्वेषण मोहिमा चालू आहेत. ४ डिसेंबर १९९६ रोजी पाथफाइंडर हे अवकाशयान मंगळाकडे पाठविले. सु. आठ महिन्यांचा प्रवास करून ते ४ जुलै १९९७ रोजी मंगळावर उतरले. या अवकाशयानातून पहिल्यांदाच ‘ सोजोर्नर ’ नावाची यांत्रिक बग्गी ( रोव्हर ) पाठविली. या यांत्रिक बग्गीमार्फत मंगळावरील छायाचित्रे पृथ्वीवर पाठविण्याचे उद्दिष्ट यशस्वी झाले. अजूनही मंगळावरील वातावरण, जमीन, पाणी, जीवसृष्टी इत्यादींबाबतचे गूढ कायम आहे. यापूर्वी रशियाने १९७० मध्ये चंद्रावर अशी बग्गी पाठविली होती. १९५७ मधील स्पुटनिक-१ च्या यशस्वी क्षेपणानंतर जगातील वेगवेगळ्या देशांनी अवकाश समन्वेषणासाठी कृत्रिम उपग्रह, वेगवेगळ्या गहांवरील व चंद्रावरील मोहिमा, तसेच अवकाशातील मानवरहित व मानवसहित मोहिमा, अवकाश स्थानकांकडील मोहिमा या अंतर्गत आज अनेक हवाई वाहने अवकाशात पाठविली आहेत. या सर्वच मोहिमांमध्ये संयुक्त संस्थाने व सोव्हिएट युनियन हे दोनच देश अगेसर आहेत. या दोन देशांव्यतिरिक्त पृथ्वीच्या कक्षेतील कृत्रिम उपगह कॅनडा, इटली, फान्स, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, जपान, चीन, गेट बिटन, भारत, इंडोनेशिया या देशांनी तसेच यूरोपियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, यूरोपियन स्पेस एजन्सी व अरब लीग यांनी संयुक्त रीत्या पाठविले आहेत. वेगवेगळ्या गहांवरील व चंद्रावरील मोहिमा संयुक्त संस्थाने व सोव्हिएट युनियन व्यतिरिक्त जर्मनी, जपान व यूरोपियन स्पेस एजन्सी यांनीही आखल्या. मानवसहित अवकाशयाने मात्र फक्त संयुक्त संस्थाने व सोव्हिएट युनियन या दोन देशांनीच अवकाशात पाठविली. अवकाशातील ही वाहने म्हणजे संदेशवहन, मार्गनिर्देशन, हवामानाचे पूर्वानुमान वर्तविणे आणि विव्दान व्यक्तींना एकत्र आणणारी अधिक विश्र्वासार्ह व दीर्घकालीन साधने बनली आहेत.
मानवी आकांक्षा ही एक विलक्षण शक्ती आहे. या आकांक्षेला बुद्धीमत्तेची जोड मिळाली की, माणूस अलौकिक कृत्ये करून दाखवितो. आज पृथ्वीभोवती भमण करणारे अंतराळ स्थानक हे त्याचेच मूर्तिमंत उदाहरण आहे. संयुक्त संस्थानांनी १९८७ मध्ये कायमस्वरूपी अवकाशस्थानक उभारण्याचा निर्णय घेतला. आजच्या या आंतरराष्ट्नीय अंतराळ स्थानकाच्या उभारणीस १९९८ मध्ये सुरूवात झाली.यास्थानकाची तयार करण्यात आलेली झारया नामक पहिली प्रतिकृती व तिचे वेगवेगळे सुटे भाग अंतराळात वाहून नेण्यासाठी एटीएस्-८८ अवकाशयानाचा( शटल )व रशियन अग्निबाणांचा वापर करण्यात आला. या अवकाश स्थानकातील विशेष प्रयोगशाळांची उभारणी यूरोपियन स्पेस एजन्सी व जपानने केली आहे. प्रतिकृती क्षेपण केल्यानंतर दीड वर्षापर्यंत ती मानवरहित होती. इ. स. २००० मध्ये रशियन प्रतिकृतीचा यात समावेश करण्यात आल्यानंतर दोन अंतराळवीरांना तेथे वास्तव्य करण्याची सोय झाली. हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजे सोळा देशांची संयुक्त आणि अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. अमेरिकेची नासा, रशियाची फेडरल स्पेस एजन्सी, जपानची एरोस्पेस एक्स्प्लोरेशन एजन्सी, कॅनडियन स्पेस रिसर्च सेंटर आणि यूरोपियन स्पेस एजन्सी अशा पाच स्पेस एजन्सी या योजनेत गुंतल्या आहेत. ब्राझीलच्या अंतराळ संशोधन संस्थेने नासाशी स्वतंत्रपणे करार करून या योजनेत सहभाग घेतला आहे. हे अंतराळ स्थानक म्हणजे मानवी बुद्धीमत्तेचा एक उत्तुंग आविष्कार आहे. सु. २,१३,८०० किगॅ. वजन असलेले हे अवाढव्य अंतराळ स्थानक भूपृष्ठापासून सरासरी ३३६ किमी. अंतरावरून केवळ ९१ मिनिटे २० सेकंदात पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. ताशी सु. २७,७५० किमी. इतक्या प्रचंड वेगाने ते पृथ्वीभोवती फिरत असते. एका दिवसात ते सोळा पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करते.
या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात २ नोव्हेंबर २००० रोजी पहिल्यांदा अंतराळवीरांनी प्रवेश केला. आतापर्यंत चौदा देशांच्या अंतराळवीरांनी व पाच अंतराळ पर्यटकांनी या स्थानकाला भेट दिली आहे. ७ जून २००७ पर्यंत या अंतराळ स्थानकात अवकाशवीरांनी एकूण २,३१६ दिवस निवास केला आहे. अंतराळवीरांच्या अंतराळ स्थानकातील वास्तव्याच्या काळात प्रामुख्याने शरीरशास्त्र, भौतिकशास्त्र, धातुशास्त्र, तंत्रज्ञान, शैक्षणिक तसेच पृथ्वीशी संबंधित असे अनेक शास्त्रीय प्रयोग केले जातात. याशिवाय पृथ्वी निरीक्षण, वनस्पती व लहान प्राणी यांच्यावरही अनेक प्रयोग करण्यात येतात. त्यासाठी काही वनस्पती व प्राणीही तेथे नेण्यात आले होते. शून्य गुरूत्वाकर्षणात तसेच वजनरहित अवस्थेत प्रदीर्घ काळ वास्तव्य केले तर मानवी स्नायू , हृदय, मेंदू, हाडे इ. अवयवांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला जातो. आज ना उद्या मानव मंगळाकडे प्रस्थान करील, त्यावेळी त्याला सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ शून्य गुरूत्वाकर्षणात घालवावा लागेल. यादृष्टीने अवकाश स्थानकामध्ये वास्तव्य करणाऱ्या अंतराळवीरांवर अनेक प्रकारचे प्रयोग केले जातात.
इ. स. २००३ मध्ये कोलंबिया हे अवकाशयान या स्थानकाकडे पाठविण्यात आले होते. सात अंतराळवीरांच्या या मोहिमेत भारतीय वंशाची अंतराळ अभियंता कल्पना चावला सहभागी झाली होती. अंतराळात जाणारी ती पहिलीच भारतीय-अमेरिकन महिला होती. सोळा दिवसांच्या मोहीमकाळात जगभरातील सत्तरांवर शास्त्रज्ञांच्या सहभागातून शंभरांवर शास्त्रीय प्रयोग करण्यात आले. अवकाश संशोधन, जीवसृष्टी, भौतिकशास्त्र हे संशोधनाचे मुख्य विषय होते. शून्य गुरूत्वाकर्षणात मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांच्या अभ्यासावरून कॅन्सरसारख्या वेगवेगळ्या असाध्य रोगांवरील औषधे शोधण्याच्या दृष्टीने काही प्रयोग केले गेले. संशोधनासाठी कोळी, मुंग्या, रेशमी किडे, अन्नातील अळ्या, भुंगे, माशाचे गर्भ, घूस इत्यादींना यानातून नेले होते. संशोधनासाठी यानातच वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगशाळा होती. कोलंबियाबरोबर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकासाठीचे कोणतेही सुटेभाग नेले नव्हते. त्यामुळे सातही अंतराळवीर सतत चोवीस तास आळीपाळीने वेगवेगळे प्रयोग करीत होते. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पुनःचक्रीय पद्धतीने कायम स्वरूपी पाणी उपलब्ध करता येण्याच्या दृष्टीनेही प्रयोग करण्यात आले. सोळा दिवसांच्या प्रवासानंतर कल्पना चावला व सहकाऱ्यांना परत पृथ्वीकडे घेऊन येणाऱ्या कोलंबिया अंतराळयानाचा १ फेबुवारी २००३ रोजी स्फोट होऊन ते नष्ट झाले. त्यातच कल्पना चावला या भारतीय अंतराळवीरांगनेचा अंत झाला.
अशा या अनोख्या अंतराळ स्थानकाकडे मूळ भारतीय वंशाची दुसरी अंतराळवीरांगना सुनीता विल्यम्स ९ डिसेंबर २००६ रोजी ‘ डिस्कव्हरी ’ अवकाशयानातून गेली. जास्तीतजास्त म्हणजे १९५ दिवस आंतरराष्ट्नीय अंतराळ स्थानकात राहण्याचा, २९ तास १७ मिनिटे इतका विकमी अवकाश संचार करण्याचा तसेच इतर अनेक विकम तिने आपल्या नावावर नोंदविले. तिला परत पृथ्वीवर आणण्यासाठी गेलेल्या अटलांटिस यानाने १४ दिवसांत सु. ५८ लाख मैलांचा प्रवास केला. सहा अंतराळवीरांसह सुनीता विल्यम्स अटलांटिसमधून २२ जून २००७ रोजी पृथ्वीवर सुरक्षित परतली. सुनीताने तेथील वास्तव्यात अंतराळ स्थानकाच्या उभारणी व दुरूस्तीपासून ते इतर अनेक विषयांवर प्रयोग केले. भविष्यातील मानवाच्या प्रगतीसाठी तिचे हे कार्य बहुमूल्य ठरणार आहे. अवकाशात वसाहती स्थापन करणे ही अवकाश समन्वेषण व संशोधनातील पुढची पायरी असेल. अशा प्रकारच्या मोहिमांमुळे पुढील संशोधनासाठी संधी उपलब्ध होणार आहेत. ज्याप्रमाणे अवकाशाला मर्यादा नाहीत त्याप्रमाणे अवकाश समन्वेषणालाही मर्यादा असणार नाहीत.
भारत : भारताच्या अवकाश संशोधनास १९६० च्या दशकापासून सुरूवात झाली. १९६२ मध्ये या संशोधनाकरिता इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च ( INCOSPAR ) ही समिती स्थापन करण्यात आली. १९६३ मध्ये केरळमधील त्रिवेंद्रमजवळ थुंबा येथे विषुववृत्ता जवळील उच्चतर वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशन हे केंद्र स्थापन केले.१९६९मध्येइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ( ISRO-इस्रो) या संघटनेची स्थापना करण्यात आली. अवकाश समन्वेषण कार्यकमाला प्रोत्साहन व गती देण्याच्या दृष्टीने १९७२ मध्ये भारत सरकारने समिती व अवकाश खात्याची स्थापना केली. त्याचवर्षी अवकाश खात्याच्या अखत्यारीखाली इस्रो ही संघटना आणली. इस्रोमार्फत अवकाशविज्ञान, अवकाश तंत्रविदया व तिचे उपयोग यांसंबंधीच्या संशोधनाची व विकास कार्याची जबाबदारी पार पाडली जाते. या संघटनेचे कार्य विकम साराभाई अवकाश केंद्र, त्रिवेंद्रम ( केरळ ), उपग्रह केंद्र, बंगलोर ( कर्नाटक ), शार केंद्र, श्रीहरिकोटा ( आंध प्रदेश ) व अवकाश अनुप्रयुक्ती केंद्र, अहमदाबाद ( गुजरात ) या ठिकाणी चालते. उपकरणयुक्त रॉकेटे क्षेत्रीय करण्याची केंद्रे थुंबा, श्रीहरिकोटा व बलसोर ( ओरिसा ) येथे आहेत. येथून नियमितपणे रॉकेट क्षेपित केली जातात. थुंबा हे केंद्र आंतरराष्टनीय उपकरणयुक्त रॉकेट क्षेपण केंद्र म्हणून कार्यरत आहे. बंगलोर येथील केंद्रात कृत्रिम उपग्रहांचे अभिकल्प, रचना व तंत्रविदया-विकास हे कार्य करण्यात येते. अहमदाबाद येथील केंद्रात अवकाशविज्ञान व तंत्रविदया यांचे व्यावहारिक उपयोगाच्या दृष्टीने संशोधन केले जाते.
भारतीय अवकाश कार्यकमाच्या इतिहासातील १९७० चे दशक हा एक अत्यंत कसोटीचा काळ होता. कारण या दशकात भारताने प्रयोगात्मक असे आर्यभट (१९७५), भास्कर (१९६९), रोहिणी (१९८०) हे उपगह अवकाशात सोडले. आर्यभट हा भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह. हे तीनही उपग्रह भारतीय उपखंडांचे सर्वेक्षण व वैज्ञानिक माहिती गोळा करण्यासाठी क्षेपित करण्यात आले होते. या यशामुळे १९८० च्या दशकात ॲपल, इन्सॅट व आय्आर्एस् कार्यक्रम यशस्वीपणे राबविले. १९८१ मध्ये संदेशवहनासाठी ॲपल हा उपगह भूस्थिर कक्षेत सोडण्यात आला. त्यानंतर वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी इन्सॅट मालिकेतील उपगह अवकाशात सोडण्यात आले. १९८२ मध्ये इन्सॅट-१ अ तर १९८३ मध्ये इन्सॅट-१ ब यांचे क्षेपण करण्यात आले. भारतीय शास्त्रज्ञांनी उपगह क्षेपणासाठी लागणारे सॅटेलाइट लाँच व्हेइकल ( एस्एल्व्ही-३) हे क्षेपणयान त्रिवेंद्रम येथील ‘ विकम साराभाई स्पेस सेंटर ’ या केंद्रात विकसित केले. त्याचे पहिले यशस्वी क्षेपण १९८० मध्ये करण्यात आले. एस्एल्व्ही-३ या क्षेपणयानाने रोहिणी-१, रोहिणी-२ हे उपगह क्षेपित केले होते. एस्एल्व्ही-३ च्या निर्मितीच्या अनुभवावरून एएस्एल्व्ही हे अधिक सुविकसित क्षेपणयान तयार केले परंतु एएस्एल्व्ही या क्षेपणयानाच्या १९८७ व १९८८ मध्ये घेण्यात आलेल्या दोन्ही चाचण्या अयशस्वी झाल्या. दूरवर्ती संवेदना-ग्राहक उपग्रह व अन्य प्रकारचे उपग्रह विकसित करण्याचे काम भारतात चालू आहे.
इंडियन नॅशनल सॅटेलाइट ( इन्सॅट ) ही भारताची आशिया-पॅसिफिक प्रदेशातील सर्वांत मोठया संदेशवहन व्यवस्थेपैकी एक व्यवस्था आहे. इन्सॅट मालिकेतील इन्सॅट-२इ, ३अ, ३ब, ३क, ३इ, कल्पना-१, जीएस्एटी-२ ( GSAT-२), इडीयूएस्एटी ( EDUSAT) व इन्सॅट-४अ हे उपगह आजपर्यंत कार्यान्वित करण्यात आले आहेत. यांमार्फत दूरसंदेशवहन, दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे प्रसारण, हवामानाचे पूर्वानुमान वर्तविणे, नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना, शोध व बचाव क्षेत्र अशा बहुउद्देशीय सेवा पुरविल्या जातात. सन २००५ मधील पोलर सॅटेलाइट लाँच व्हेइकल ( पीएस्एल्व्ही-सी ६) या क्षेपणयानाचे यशस्वी क्षेपण हा भारतीय अवकाश कार्यकमातील अतिशय महत्त्वपूर्ण असा मैलाचा दगड ठरला. ५ मे २००५ रोजी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटर ( एस्डीएस्सी ), शार या केंद्रावरून पीएस्एल्व्ही-सी ६ या क्षेपणयानाचे यशस्वी क्षेपण करण्यात आले. या क्षेपणयानाने १,५६० किगॅ.चा कार्टोस्टर-१ ( CARTOSTAR )व४२ किगॅ.वजनाचा हॅमसॅट ( HAMSAT) हे दोन उपगह यशस्वी रीत्या पूर्वकल्पित धुवीय सौर समकालिक कक्षेत ( एस्एस्ओ ) क्षेपित केले. भारताने तयार केलेल्या इन्सॅट-४ अ या अवजड व अधिक शक्तिशाली उपगहाचे २२ डिसेंबर २००५ रोजी केलेले यशस्वी क्षेपण ही या वर्षातील दुसरी महत्त्वाची घटना होय. या उपगहामार्फत डायरेक्ट-टू-होम ( डीटीएच ) ही दूरदर्शन प्रसारण सेवा पुरविली जाते. भारतीय शास्त्रज्ञांनी निर्माण केलेल्या क्षेपणयानाच्या साहाय्याने इतर काही देशांतही उपगह अवकाशात सोडले जातात. उदा., सप्टेंबर २००७ मध्ये पीएस्एल्व्ही या क्षेपणयानाच्या साहाय्याने इझ्राएलचे ‘ टेकसा ’ अवकाशात सोडण्यात आले.
चांद्रयान-१ हे भारताचे पहिले अवकाशयान २२ ऑक्टो. २००८ रोजी चंद्र या पृथ्वीच्या उपगहाकडे पाठविण्यात आले आहे. भारताच्या चंद्रावरील या पहिल्या मोहिमेतील चांद्रयान-१ चंद्राच्या कक्षेत, चंद्राच्या पृष्ठभागापासून सु. १०० किमी. अंतरावरून चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणार आहे. या अवकाशयानाबरोबर भारत, ग्रेट ब्रिटन, जर्मनी, स्वीडन, बल्गेरिया व संयुक्त संस्थाने यांनी तयार केलेली ११ वैज्ञानिक उपकरणे पाठविण्यात आली आहेत. पीएस्एल्व्ही या रॉकेटच्या साहाय्याने त्याचे क्षेपण करण्यात आले आहे. या मोहिमेत चंद्राचे रासायनिक, खनिजविज्ञानविषयक आणि प्रकाश-भूवैज्ञानिक चित्रण करण्यात येणार आहे.
चौधरी, वसंत