समंतभद्र : ( सु. दुसरे ते चौथे शतक ). थोर दिगंबर जैन आचार्य, धर्मप्रसारक व गंथकार. ह्यांच्या जीवनकाळाविषयी वेगवेगळी मते आहेत. परंपरेप्रमाणे त्यांचा काळ इ. स. १३८ हा मानला जातो तथापि नरसिंहकृत कविचरिते मध्ये तो इ. स.चे चौथे शतक असा दिलेला आहे. विख्यात भारतविदयावंत सतीशचंद्र विदयाभूषण इ. स.चे सहावे शतक हा त्यांचा  काळ असल्याचे मानतात. ह्यांचे आईवडील, गुरू ह्यांची नावे तसेच दीक्षापूर्व आयुष्य अज्ञात आहे. पण काव्य, अलंकार, तर्क, व्याकरण व जैन सिद्धांत ह्यांचे अध्ययन करून ह्यांनी दिगंबरपंथीय मुनिदीक्षा घेतली व कर्नाटकातील मणुवकहळ्ळी येथे कठोर तपश्चर्या केली, असे दिसते. त्यानंतर त्यांनी भारतात ठिकठिकाणी विद्वत्सभा जिंकून जयपत्रे मिळविली. कांची येथील शैव राजा शिवकोटी ह्याला त्यांनी दिगंबर जैन धर्माची दीक्षा दिली.

समंतभद्रांनी दिगंबर जैन साहित्यात फार मोलाची भर घातली आहे. त्यांचे ग्रंथ असे : (१) रत्नकरण्डक-श्रावकाचार, (२) स्वयम्भूस्तोत्र, (३) आप्तमीमांसा ( स्याद्वाद सिद्धांताची मांडणी ), (४) युक्त्यनुशासन, (५) जिनस्तुतिशतक, (६) जीवसिद्धी, (७) तत्त्वानुशासन, (८) कर्म-प्राभृत-टीका आणि तत्त्वार्थसूत्रा वरील गन्धहस्तिमहाभाष्य. हा अखेरचा ग्रंथ अनुपलब्ध आहे.

सिद्धसेन दिवाकर ह्याच्या बरोबरीने समंतभद्रांनी ⇨जैन दर्शना चा   पाया घातला आणि महावीरांच्या तत्त्वदर्शनास शास्त्रशुद्ध आकार दिला. अनेकान्तवादाचे वा स्याद्वादाचे ते प्रवर्तक आहेत.

तगारे, ग. वा.