सफेद कोह : श्वेत पर्वत. (१) अफगाणिस्तानच्या पूर्व भागातील व पाकिस्तानच्या वायव्य प्रांतातील डोंगररांग. ही अफगाणिस्तान व पाकिस्तान यांच्या सरहद्दीवर पूर्व-पश्चिम दिशेने पसरलेली असून हिंदुकुश पर्वताचा तो एक फाटा आहे. पर्शियन भाषेतील कोह म्हणजे ‘ पर्वत ’ यावरून हिमाच्छादित शिखरांमुळे तिला हे नाव पडले असावे. ३४° उ. व ६९° ३०’ पू. ते ३३° ५०’ उ. व ७२° १०’ पू. यांदरम्यान विस्तारलेल्या या रांगेतील सिकराम (४,७६१ मी.) हे सर्वोच्च् शिखर आहे. भूशैलदृष्टया ही रांग हिमालयकालीन असावी. बाजूच्या इतर रांगांच्या तुलनेत सरळ उभे कडे हे या रांगेचे वैशिष्टय आहे. या रांगेमुळे अफगाणिस्तानातील काबूल आणि कुर्रम, आफिडी तिराह या नदयांची खोरी एकमेकांपासून अलग झाली आहेत. काबूल नदीची अरूंद द्रोणी वगळता ही पर्वतरांग म्हणजे नदीखोऱ्यांचा अखंड जलविभाजक असून तो पुढे उत्तरेस हिंदुकुश पर्वताच्या शांडूर या उंच भागात विलीन झाला आहे.

सफेद कोह रांगेतील काबूल व जलालाबाद यांदरम्यानच्या खिंडी तसेच जलालाबाद व पेशावर यांदरम्यानची ⇨खैबर खिंड ऐतिहासिक घटनांमुळे प्रसिद्ध झाली आहे.या खिंडीत पहिल्या ⇨ इंग्रजअफगाण युद्धा त (१८३८-१८४२) मोठय कत्तली झाल्या होत्या. सफेद कोह रांग कुर्रमच्या दक्षिणेस टोची नदीच्या खिंडीपर्यंत पसरलेली आहे. या खिंडीतून गझनीला रस्ता जातो. या प्रदेशात चुनखडीपासून बनलेल्या सु. १,००० मी. उंचीच्या अनेक टेकडय विखुरलेल्या आहेत. सफेद कोह रांगेत या प्रदेशातील इतर रांगांच्या मानाने अरण्यांचे प्रमाण जास्त आहे. या रांगेचा उत्तरेकडील काही भाग रूक्ष असला तरी दसऱ्या व दक्षिणेकडील भाग विविध वनस्पतींनी व मलबेरी, डाळिंबे इ. फळांच्या बागांनी तसेच फुलझाडांनी व्यापलेला आहे. मुख्य रांगेच्या वरच्या भागात पाइन, देवदार इ. वृक्षांची जंगले आहेत. रांगांदरम्यानच्या गवताळ प्रदेशात शेती व पशुपालन ( विशेषत: मेंढयापालन ) व्यवसाय चालतो. दसऱ्याखोऱ्यांतील लागवडयोग्य जमिनीमध्ये अन्नधान्ये व कडधान्ये घेतली जातात.

(२) अफगाणिस्तानच्या वायव्य भागातील, हिंदुकुश पर्वताची पश्चिमेकडे विस्तारलेली शाखा. ही रांगही ‘सफेद कोह’ नावाने ओळखली जाते. ती हिंदुकुश पर्वताच्या फिरोझ कोह रांगांपैकी एक असून ६३° पू. ते ६५° पू. रेखांशांदरम्यान विस्तारलेली आहे. सु. १६० किमी. लांबीची ही रांग सस.पासून सु. ३,०४८ मी. उंचीची आहे. हरिरूद नदीच्या उत्तरेकडील पूर्व-पश्चिम पसरलेल्या पॅरोपमिसस पर्वतरांगेचा हा पूर्व भाग आहे.

चौंडे, मा. ल.