ब्रिटिश बेटे : यूरोप खंडाच्या वायव्येस अटलांटिक महासागरात असलेला जगातील एक प्रमुख द्वीपसमूह. क्षेत्रफळ ३,१५,००० चौ. किमी. ⇨ग्रेट ब्रिटन (⇨स्कॉटलंड ७८,७६८ चौ. किमी.⇨इंग्लंड १,३०,३६०⇨वेल्स २०,७६१) व ⇨आयर्लंड (⇨उ. आयर्लंड १४,१२१⇨आयर्लंड प्रजासत्ताक ७०,२८५) या दोन सर्वांत मोठ्या बेटांशिवाय हेब्रिडीझ (७,५११), ऑर्कनी (९७४), शेटलंड (१,४३०), आइल ऑफ मॅन (५७२),चॅनेल (१९४), आइल ऑफ वाइट (३८१), सिली (१६) या प्रमुख बेटांचा व सु. ५,५०० छोट्या द्वीपांचा ब्रिटिश बेटांत समावेश होतो. या बेटांच्या दक्षिणेस इंग्लिश खाडी, आग्नेयीस डोव्हर सामुद्रधुनी, पूर्वेस उत्तर समुद्र व पश्चिमेस अटलांटिक महासागर आहे. आयर्लंड बेट ग्रेट ब्रिटनच्या पश्चिमेस असून दोन्हींच्या दरम्यान आयरिश समुद्र व सेंट जॉर्जची खाडी आहे. बहुतेक बेटे स्कॉटलंडच्या पश्चिमेस व उत्तरेस आणि आयर्लंडच्या पश्चिमेस आहेत. फ्रान्सपासून ती किमान ३२ किमी., नॉर्वेपासून २३० किमी., आइसलँडपासून ८१० किमी. व न्यू फाउंडलंडपासून २,६०० किमी. अंतरावर आहे.

ब्रिटिश बेटांमधील आयर्लंड प्रजासत्ताक, आइल ऑफ मॅन आणि चॅनेल बेटे वगळता बाकीच्या भूप्रदेशाचा समावेश राजकीय दृष्ट्या ग्रेट ब्रिटनमध्ये होतो. ब्रिटिश बेटांचे हवामान समशीतोष्ण कटिबंधीय व सागरी प्रकारचे आहे. ग्रेट ब्रिटन औद्योगिक दृष्ट्या प्रगत असून दक्षिण भाग मिश्र शेतीसाठी उपयुक्त आहे. ब्रिटिश बेटांचा बाकीचा बराचसा प्रदेश पशुपालनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पुराणाश्मयुगापासून येथे वस्ती असल्याचे आढळते. इ. स. पहिल्या ते पाचव्या शतकांपर्यंत ब्रिटनचा दक्षिणेकडील प्रदेश रोमन साम्राज्याचा भाग होता. पाचव्या ते दहाव्या शतकांपर्यंत अनुक्रमे अँग्लो- सॅक्सन, डेन व नॉर्मन यांनी या प्रदेशावर हल्ले करून आपापल्या वसाहती स्थापन केल्या. इ. स. १०६६ मध्ये इंग्लंडवर नॉर्मनांनी ताबा मिळविला. अकराव्या ते एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत या प्रदेशात राजकीय दृष्टीने बरेच बदल होत गेले. नॉर्मंडीचा भाग असलेली चॅनेल बेटे १०६६ मध्येच इंग्लंडच्या राजसत्तेखाली आली. १२८४ मध्ये इंग्लंडने वेल्सवर ताबा मिळविला. नॉर्वेने १२६६ मध्ये आइल ऑफ मॅन व हेब्रिडीझ बेटे आणि १४६८ मध्ये ऑर्कनी व शेटलंड बेटे स्कॉटलंडच्या स्वाधीन केली. इंग्लंडचे आयर्लंड जिंकण्याचे प्रयत्न बाराव्या ते सतराव्या शतकांपर्यंत चालू होते. १८०१ मध्ये इंग्लंड स्कॉटलंड यांच्याबरोबर आयर्लंड संघटित झाला. सतराव्या शतकापासून जगभर ब्रिटिश साम्राज्य विस्तारत गेले. तथापि १७८३ मध्ये अमेरिकेतील ब्रिटिश वसाहती स्वतंत्र झाल्या. पहिल्या जागतिक महायुद्धानंतर (१९१४ – १९१९) द. आयर्लंडने स्वतंत्र शासन स्थापन करून १९३७ मध्ये स्वतंत्र प्रजासत्ताकाची निर्मिती केली.

पहा : ग्रेट ब्रिटन.

संदर्भ : Watson, J. W. and Sissons, J. B. The British Isles : A Systematic Geography, London 1964.

चौधरी, वसंत