सद्रस : तमिळनाडू राज्याच्या चिंगलपूट जिल्ह्यातील एक स्थळ. हे बंगालच्या उपसागर किनाऱ्यावरील ठिकाण. हे चेन्नई शहराच्या दक्षिणेस सु. ५६ किमी.वर असून जलवाहतुकीच्या दृष्टीने बकिंगहॅम कालव्याव्दारे चेन्नईशी जोडले आहे. पूर्वेकडील व्यापारासाठी १६०२ मध्ये युनायटेड डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. कंपनीने सुरत, चिनसुरा, कासीमबझार, नेगापटम, कोचीन इ. ठिकाणी वखारी उभारल्या. सद्रस येथे १६४७ मध्ये डच वखारीची स्थापना झाली. इथून नीळ, अफू, तांदूळ इ. मालाची निर्यात होत असे. सद्रस येथे मलमल विणण्याचे हातमाग होते. तेथील तलम मलमल प्रसिद्ध होती. डचांनी येथे समुद्रकिनाऱ्याजवळ संरक्षणाच्या दृष्टीने एक भक्कम व प्रशस्त किल्ल बांधला. या किल्ल्यात डचांची स्मशानभूमी होती. किल्ल्यासमोरील मैदानात चर्च होते. स्मशानभूमीची देखभाल शासकीय खर्चातून अव्वल इंगजी अंमलात केली जाई. स्मशानभूमीचे तसेच काही डच निवासी वास्तूंचे तेथे अवशेष आढळतात. इंगजांनी १७९५ मध्ये हे स्थळ डचांकडून घेतले परंतु डचांना हिंदुस्थानातील राजकीय उलाढालीत विशेष रस नसल्याचे लक्षात येताच व्यापारासाठी त्यांना ते १८१८ मध्ये परत दिले. अखेर डचांच्या सर्व वखारी इंगजांनी १८२५ मध्ये ताब्यात घेतल्या. सद्रस हे यूरोपीय प्रवाशांचे विश्रामधाम होते. येथे शेतीव्यतिरिक्त कापड विणण्याचा व्यवसाय पूर्वापार असून अजूनही गावात विणकऱ्याची वस्ती बरीच आहे पूर्वीच्या तलम कलाकुसरयुक्त मलमलचे कौशल्य वा कसब मात्र आता आढळत नाही. याच्या वायव्येस सु. १२ किमी.वर पक्षितीर्थ हे प्रसिद्ध धार्मिक ठिकाण आहे.
देशपांडे, सु. र.